२-स्वप्न तहानलेले
पुर्वी आणि रुद्रला घेऊन रेल्वेने आनंदी माहेरी निघाली.रेल्वेच्च्या वेगाबरोबर तिचे मनही वेगाने गतकाळात पोहचले…..
आता पुढील कथा……
मुले गाढ झोपली होती. गाडीचा खळखळाट सुरू होता.कुणी गाढ झोपले तर कुणी जागे. जे गाढ झोपले होते ते खरेच जगातील सर्वात सुखी लोक असतील बहूधा,
जे जागे होते त्यांना निश्चितच काहीतरी काळजी असावी असे तिला उगीचच वाटले. कुणी उतरत होते तर कुणी गाडीत चढत होते. प्रत्येकाची गडबड.
आयुष्यात कधीही न भेटणारी लोकं थोड्या काळासाठी एकत्र येत होती. प्रत्येकाची दिशा ठरलेली. मुक्काम ठरलेला. तेवढ्यापुरते हसणे, बोलणे सुरू होते. आपले स्टेशन आले कि उतरत होते.सगळाच दोन घडीचा डाव.
तेवढ्यात एक गोड जोडपे गाडीत चढले.नवीनच लग्न झाले होते. हातावर गडद मेंदी दिसत होती.लग्नानंतरचे रुप खुलून दिसत होते. हळदीचा पिवळा रंग अजून निघाला नव्हता.त्यामुळे गालावरची लाजेची लाली अजून तशीच होती.
नवे स्वप्न घेऊन ती सासरी निघाली होती. आंनदीला तिचा धवलसोबतचा पहिला प्रवास आठवला.
मांडवपरतीला ती आल्यानंतर दुसऱ्या दिवशी धवल तिला घ्यायला आला. त्याचा ड्रायव्हर सोबत होता. निघतांना अचानक धवलने रेल्वेने जाण्याचे ठरवले. सर्वांनी त्याला वेड्यात काढले.
आंनदीला आश्चर्य वाटत होते.धवलने सांगितले ,
अग, हा आपला दोघांचा पहिला प्रवास.हा प्रवास मला मनाच्या कुपीत साठवून ठेवायचा आहे. समोर आपल्याला आयुष्यभर असाच सोबतीने प्रवास करायचा आहे.
आणि खरे सांगु का.. ड्रायव्हर समोर तुझ्या डोळ्यात असे बघता आले असते का? धवल खळखळून हसला.
संपूर्ण प्रवासात त्याची अखंड बडबड सुरु होती. स्टेशनवर सोडायला सर्व आले होते.आई-बाबा, तिची जवळची मैत्रीण दिपा. सगळेच उदास होते.
आंनदीची नजर मात्र कनकला शोधत होती. तो नक्कीच आला असणार निरोप द्यायला. … ती दुरवर नजर टाकत होती.
अंधारात कनक उभा होता. मला का सोडून चालली म्हणून आक्रोश करत होता. त्याच्या मनातले आक्रंदण आंनदीला जाणवत होते. मला विसरून जा कनक आंनदीचे मन बोलत होते.
कनक-आनंदीने संसाराची बघितलेली स्वप्ने आक्काच्या हेकेखोर स्वभावात विरुन गेली कायमची.
आंनदी त्या अंधारात कोण उभे आहे ग?
धवलच्या बोलण्याने आंनदी भानावर आली होती.. माहिती नाही कोण आहे तर तिने डोळयात आलेले अश्रू लपवत उत्तर दिले.
धवल नावाप्रमाणेच होता.निष्पाप, निरागस,नितळ मनाचा.
पहिल्या वेळी बघायला आला तेव्हा वाड्याच्या पद्धतीप्रमाणे त्याला वाड्यात चहाला बोलावले होते. तिथेच त्याने कनकला बघितले.
तेव्हापासून त्याला कनक आवडायचा. कनक होताच तसा . श्रीमंती असूनही पाय जमिनीवर होते त्याचे. नम्र..शांत,मनातले मनात ठेवण्यात पटाईत होता तो.
तो फक्त आंनदी समोर खुलायचा. त्याची प्रत्येक गोष्ट तिने ऐकावी असा तो आग्रह धरायचा. दोघे एकाच वर्गात होते. आंनदीची आई वाड्यात स्वयंपाक करायची त्यामुळे आईसोबत आंनदी बरेचदा जायची.
आंनदी दिसली कि कनक खूष होत होता. तो तिची वाट बघायचा. तस़ेही वाड्यात त्याला खेळायला मित्र नव्हते.
कनकला आठवत.. आठवत आंनदी बाहेर बघत होती.
बारा वर्षापूर्वीचे कनकचे डोळे तिचा पाठलाग करत होते. अंधारात उभा असलेला कनक डोळ्यासमोर येत होता. आंनदी तिच्या संसारात खूष होती. धवलच्या प्रेमाने तिला जिंकले होते. जुन्या आठवणी नको म्हणून ती माहेरी जाणे टाळायची. धवल.. मुले यात पार गुंतली होती ती.पण तिला कनकची काळजी वाटायची.
आता जरी ती ती तिच्या संसारात रमली असली तरी कधीकाळी कनकने तिचे जीवन व्यापून टाकले होते.
ही तुझी रात….हे तुझे तारे
श्वास घेती फुले तुझ्यासाठी
दूर… येथून दूर…दूर तिथे
चांदणे थांबले तुझ्यासाठी
गीत आसावले तुझ्यासाठी……कनकचे आवडते गाणे गुणगुणत आनंदीने डोळे मिटले.
लहानपणीच्या मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झाले ते कळले नाही. दोघे सोबत अभ्यास करायचे. कनकची आई त्याला सोडून लवकरच देवाघरी गेली होती. वाड्यात भरपूर लोकं होती पण आईची कमी त्याला सतत जाणवायची.
गाडी थांबली. आठवणींचा धागा खंडीत झाला.
धवलचे फोन आला. तोही घरी जागाच होता.
आभाळात मेघ दाटून आले.काळोख अजूनच गडद वाटत होता.थोड्या वेळातच रिमझिम पाऊस पडायला लागला. होता.मातीचा सुगंध दूरवर पसरला.
आंनदीला तो सुगंध पुन्हा कनकजवळ घेऊन गेला. पाऊस आला कि तो त्या मातीच्या सुवासाने धुंद होत असे.आंनदी आणि तो पावसात चिंब भिजायचे.काही दिवसांनी मात्र वाड्यात छोट्या.. छोट्या गोष्टींची चर्चा होऊ लागली.
कनकची आक्का सुमती त्याला सतत सांगायची.. हे बघ कनक आंनदीची आई आपल्याकडे स्वयंपाक करते. तिचे बाबा दिवाणजी आहेत. शेवटी काय ते नोकर. आतापर्यंत ठीक होते.आता तू मोठा होत आहे. आपल्या बरोबरीच्या घराण्यात मैत्री करायची.
आक्काचे असे बोलणे त्याला आवडायचे नाही. आंनदीच्या आईने केलेल्या स्वयंपाकाशिवाय तो जेवत नसे.
मध्येच वीज चमकली.सारा आसमंत एका क्षणासाठी उजळून निघाला. नवीन जोडपे हातात हात घेऊन बसले होते.एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते. पावसाचा वेग वाढला होता.आनंदी खिडकीतून बाहेर बघात होती.वीज चमकली कि चिंब झालेली धरती दिसत होई.
मातीचा सुगंध हवेत विरला होता.
क्रमशः
एकमेकांना आवडणाऱ्या कनक आणि आनंदीचा संसार आक्काने का फुलू दिला नाही? दोघांचे प्रेम आक्का का समजू शकली नाही…….वाचत रहा स्वप्न तहानलेले
प्रिय वाचक, कथामालिकेचा हा भाग.
तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा.तुमचा प्रतिसाद,तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाची आहे.
Previous Part





Wahwa
Very nice 👌👌👌👍👍
अनुत्तरित प्रश्न.
अप्रतिम कथा.