अंग्रेजसिंग चकमक-marathi true story
अंग्रेजसिंग चकमक-marathi true story

अंग्रेजसिंग चकमक-marathi true story

अंग्रेजसिंग चकमक-marathi true story

श्री अरविंद सराफ.
निवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.

अंग्रेजसिंग हे नाव उच्चारताच उत्तर भारतातील सराफ व्यावसायिकांचे मनात धडकी भरायची. अंग्रेजसिंग मूळचा पंजाबचा, पण त्याच्या गुन्हेगारी कारवायांनी उत्तराखंड, दिल्ली, पंजाब व उत्तर प्रदेशातील सराफ व्यावसायिकांना जगणे कठीण केले होते. सराफ दुकान फोडण्यात पटाईत अंग्रेजसिंग नागपूरात आला आणि पोलीसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. नागपूर शहर पोलीस आणि उत्तराखंड पोलीसांनी केलेले हे – ‘ऑपरेशन अंग्रेजसिंग !’

पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्याच्या अलियाना येथील मूळ रहिवासी असलेला अंग्रेजसिंग उत्तर भारतात सराफ दुकान फोडणारा अट्टल गुन्हेगार म्हणुन कुख्यात होता. त्याची स्वतःची टोळी होती, पण या टोळीतील सदस्य त्याचे कुटुंबातील व्यक्तीच होते. तो स्वतः दुकाने फोडायचा.रखवालीकरिता दोन बायका, मुलगा, मुलगी, भाऊ, सोबतीला नेहमीच असायचे. मुलबाळं सोबत राहत असल्यामुळे व श्रीमंती तोऱ्यात वावर असल्याने सहजासहजी या टोळीवर कुणी शंका पण घेत नसे.
प्रवासाकरिता तो नेहमी वेगवेगळ्या चार चाकी वाहनांचा वापर करीत असे. कुटुंबासोबत एखाद्या शहरात जायचे. तेथील मोठे सोन्या-चांदीचे दुकाने हेरायचे. पहाटेच्या सुमारास सर्व साखरझोपेत असताना दुकान फोडायचे. चोरलेले सोने,चांदी कुटुंबातील सदस्यांकडे सुपूर्द करायचे आणि त्या शहरातून पसार व्हायचे अशी त्याची योजना असायची.
याच पध्दतीने त्याने अनेक गुन्हे केले असल्याने उत्तर भारतातील पोलीसांना तो डोकेदुखी ठरला होता. दरम्यान त्याची दहशत वाढत असतांनाच उत्तराखंड पोलीसांनी त्याला सशस्त्र अटक केली होती, पण न्यायालयात नेत असतांना त्याच्या टोळीने पोलीसांवर हल्ला करून त्याला सोडवून नेले होते. पोलीसांच्या रखवालीतून पसार झालेल्या कुख्यात अंग्रेजसिंगचा देशभर शोध सुरू झाला. उत्तराखंड पोलीस त्याच्या मागावर होते. उत्तराखंडमध्ये अंग्रेजसिंगच्या गुन्हेगारीमुळे तेथील पोलीसांनी त्या टोळीला अटक करण्यासाठी वेगवेगळे तपास पथकेही तयार केलीत. त्यांची माहिती मिळावी म्हणून रोख बक्षीसही जाहीर केले होते. पण तो काही पोलीसांच्या हाती सापडला नाही. या दरम्यान त्याच्या कारवाया वेगवेगळ्या राज्यात सुरूच होत्या. दरम्यान चार महिन्याचा कालावधी लोटला असेल. उत्तराखंड पोलीसांना खबरीकडून बातमी मिळाली, की अंग्रेजसिंग आपल्या कुटुंबासह नागपूरला गेला आहे.आपली वेशभूषा बदलून आपली ओळख लपविण्यात तरबेज अंग्रेजसिंग लपत छपत नागपूरला आला आहे ही सूचना मिळताच उत्तराखंड पोलीस तपास पथकाच्या हालचालींना वेग आला. त्यांनी नागपूर पोलीसांना लगेच सूचना दिली. उत्तराखंड पोलीसांचे एक पथक लगेच विमानाने नागपूरात धडकले.
अँग्रेजसिंगने नागपूरलाही सराफ दुकानांची टेहाळणी करणे सुरू केले होते. येथेही त्याने सराफ दुकान फोडण्याची योजना आखली होती. आखलेल्या योजनेवर अंमलही करणार होता पण त्यापूर्वीच…
नागपूर शहरातील परीसर माहिती नसलेने उत्तराखंड पोलीसांनी नागपूर शहर पोलीसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. उत्तराखंडच्या पोलीसांनी नागपूर पोलीसांचे गुन्हे शाखेचे तत्कालीन अपर पोलीस आयुक्त यांची भेट घेवून अंग्रेजसिंगबाबत सर्व माहिती सांगून मदत मागितली. उत्तराखंड पोलीसांनी अंग्रेजसिंगला पकडण्यासाठी सक्षम मनुष्यबळाची विनंती केली. आपल्या पोलीसांवर दृढविश्वास दाखवून नागपूर शहराचे विद्यमान पोलीस आयुक्त डाॅ. भुषणकुमार उपाध्याय यांनी विश्वासाने उत्तराखंड पोलीस तपास पथक प्रमुख अपर पोलीस अधीक्षक मुकेशकुमार यांना सांगितले, की जर तुमची खबर खरी असेल व अंग्रेजसिंग नागपूर शहरात असेल तर तो व त्याचे टोळीला नक्की आपण मिळून शोधूच. उत्तराखंड पोलीसांना मदत करून त्यांना हवा असलेला आरोपी अंग्रेजसिंगला शोधून कोणत्याही परिस्थितीत पकडून देण्याचे आदेश तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरविंद सराफ व राजेंद्र तिवारी यांना दिलेत. नागपूर पोलीसांचे मदत पथक सज्ज झालेत. दोन्ही पथकांनी मिळून अंग्रेजसिंग व त्याच्या टोळीबाबत माहिती जाणून घेतली. त्या सर्वांचे फोटोसुध्दा बधितलेत. सोबतच आपले खबरीसुध्दा कामाला लावलेत. दिवसभर शोध घेतला पण त्यांचा काही ठावठिकाणा लागला नाही. उत्तराखंड पोलीस निराश झालेत, पण नागपूर पोलीस हताश झाले नाहीत. त्यांनी शहरातील सर्व हाॅटेल्स लाॅजेस पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. आता शहरात काही मोजकेच हाॅटेल्स व लाॅजेस नाहीत. नेमका शोध कसा घ्यायचा हा प्रश्न निर्माण झाला. अंग्रेजसिंग श्रीमंतीच्या तोऱ्यात राहतो, तर नक्कीच मोठे सधन हाॅटेलच निवडेल. एक आशेचा किरण पोलीसांना दिसला. मोठी हाॅटेल्स लाॅज शोधणे सुरू झाले. रात्र झाली, पण हाती काही आले नाही. जसजशी वेळ जात होती तशी निराशा व चिंता वाढत होती. उत्तराखंड पोलीसांना नागपूर पोलीसांनी धीर दिला. अंग्रेजसिंग मिळत नाही, तोपर्यंत शोधकार्य सुरुच ठेवू. पुन्हा शोधकार्य सुरू झाले.
प्रत्येक हाॅटेल्सची तपासणी करायची म्हटले तर दिवस उजाडेल. रस्त्याचे दोन्ही भागातील हाॅटेल्सची तपासणी दोन वेगवेगळे पथके करून करायचे असे ठरले. शोध सुरू झाला. शोध सुरू असतांनाच एका मोठ्या हाॅटेलचे बाजूला मरून कलरची काॅलीस गाडी उत्तराखंडच्या एका जवानाला उभी दिसली. त्याने गाडीचे निरीक्षण केले. गाडी तर ओळखीची दिसते पण नंबरप्लेट दुसरी असलेने तो गोंधळला. नागपूर पोलीसांनी त्या गाडीची शहानिशा करण्याचे ठरविले… दिशाभूल करण्यासाठी कदाचित गाडी येथे ठेवून दुसरीकडे पण जवळच हाॅटेल बुक केले असेल, अशी शंका पोलीसांना आली. पोलीसांनी गाडी जवळ एक जवान ठेवून आजुबाजूला सर्व हाॅटेल्समध्ये विचारपूस केली, तपासणी केली, पण काही सुगावा लागला नाही, म्हणून परत त्या गाडी जवळ आले. गाडी ज्या हाॅटेलसमोर उभी केली होती, त्या हाॅटेलमध्ये तपासणी करण्याचे ठरले. पोलीसांनी त्या हाॅटेलला वेढा घातला. काही नागपूर पोलीस तुरळक उत्तराखंड पोलीसांसह त्या हाॅटेलमध्ये शिरलेत. रात्रीचे अडीच वाजले असावे. हाॅटेलच्या स्वागत कक्षातील कर्मचारी डुलक्या देत होता. पोलीसांनी त्याला उठविले. ग्राहक आल्याचे समाधान काही वेळच त्याचे चेहऱ्यावर दिसले. नागपूर पोलीसांनी आपला परिचय देताच, “साहब, थोडी आँख लग गई थी।” असे म्हणून आपली बाजू मांडू लागला. पोलीसांनी त्याला, “चलता है, लेकीन ड्युटी पे सोना अच्छा नही। आगे से खयाल रखना,” असे म्हणून समज दिली व येण्याचे प्रयोजन सांगितले. बाहेर उभ्या असलेल्या कारबाबत विचारले असता, “साहब, दिल्ली की पार्टी है, उनकी गाडी है ।” असे म्हणून नाव शोधण्याकरिता रजिष्टर चाळणे सुरू केले. नाव वेगळेच होते. “काही ओळखपत्रे घेतली असतीलच ना ? ती दाखव.” असे पोलिसांनी म्हणताच त्याने ड्रॉवर उघडला व कागदपत्रे शोधू लागला. पोलीसांनी त्यास जवळील फोटो दाखविताच, “हा साहब, यही है, दो औरते, एक अधेड उम्र का इन्सान और लडका लडकी भी साथ मे है । उसी की गाडी है, वो बाहर खडी है।” काही आठवल्यासारखे करुन, “साहब उसके साथ एक पामेरीयन कुत्ता भी है।” तितक्यात एक वेटर डोळे चोळत आला. “साहब, मैं ही रुम सर्व्हिस देता हूँ। दो रुम लिये है उसने !” असे सांगितल्यावर पोलीसांनी वेटरलाही फोटो दाखविला. त्याने लगेच फोटो ओळखला. अंग्रेजसिंग व त्याचे कुटुंब याच हाॅटेलमध्ये असल्याची खात्री पटली. पकडण्यासाठी सापळा रचण्याची योजना सुरू झाली.
ते कुटुंबब ज्या तिसऱ्या माळ्यावरील खोलीत होते. तेथून बाहेर पळण्याचा काही मार्ग आहे का? पाईप लाईन वैगरे आहे का ? हे पोलीसांनी शोधले. काही पोलीस हाॅटेलबाहेर तैनात केले. एक जवान इंटरकाॅमजवळ पोलीस आल्याची सूचना कुणी देवू नये म्हणून स्वागत कक्षात तैनात ठेवला. वेटरला सोबत घेवून उर्वरित उत्तराखंड पोलीस व नागपूर पोलीस चमूने दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०२ ची पाहणी केली. तेथे काही जवान ठेवले. नंतर तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३०४ ची पाहणी केली. दोन्ही खोल्यांवर एकाच वेळी धडक दिली तर स्टाॅफ अपुरा पडेल. पण काहीही झाले तरी सोबत असलेल्या मनुष्यबळासह धडक देवून अंग्रेजसिंगला पकडायचेच असा ठाम निर्धार पोलीसांनी केला. एका एका खोलीवर सावधतेने धडक मारायची असे ठरले. जर तिसऱ्या मजल्यावर धडक मारली व दुसऱ्या मजल्यावरील खोलीत राहणाऱ्या आरोपींना याचा सुगावा लागला तर ते पळून जावू शकतात, पण तेच जर दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०२ वर धडक दिली व याचा सुगावा तिसऱ्या मजल्यावरील खोलीतील आरोपींना लागलाच तर ते कुठून पळून जावू शकतात, याची माहिती घेवून ते मार्ग बंद करण्यात आले. तसेच लिफ्टदेखील बंद करण्यात आली. खोली क्रमांक ३०४ ला बाहेरून बंद करण्यात आले. तेथे एक जवान ठेवण्यात आला. नंतर शिल्लक सर्व पोलीस दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक २०२ समोर आले. आरोपींना जेरबंद करण्याची व्यूहरचना आखली गेली. जो वेटर या खोलीत रूम सर्व्हिस देत होता, त्यालाच नाॅक करून ‘रुम सर्व्हिस’ असा आवाज देण्यास सांगीतले. दार ठोठावताच काही वेळाने दार आतून उघडले गेले. दार उघडणारा व्यक्ती अंग्रेजसिंगचा भाऊ आहे हे उत्तराखंड पोलीसांनी ओळखताच पोलीसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या मुसक्या बांधल्या. तसेच त्याच खोलीत असलेला अंग्रेजसिंगचा मुलगा याच्याही मुसक्या बांधल्या. त्यांनी ओरडू नये म्हणून तेथील बेडशीटनेच दोघांचेही तोंड बांधले. जेरबंद केलेल्या त्या दोघांनाही स्वागत कक्षा लगत स्टाॅफरुममध्ये ठेवण्यात आले. तेथे काही सशस्त्र पोलीस ठेवलेत, लगेच हे पथक पुन्हा लगबगीने त्याच वेटरसह तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक ३०४ जवळ पोहचले. पुन्हा ‘रुम सर्व्हिस’ असा आवाज त्याच वेटरने दिला. अंग्रेजसिंगच्या पहिल्या बायकोने खोलीचे दार उधडले तत्क्षणीच सोबत असलेल्या महिला पोलीसांनी तिला पकडले व ओरडू नये म्हणून तिच्या मुसक्या आवळल्या. खोली क्रमांक ३०४ मधून अंग्रेजसिंगची पहिली पत्नी, मुलगा व मुलीलासुध्दा जेरबंद करून स्वागत कक्षात आणले. उत्तराखंड पोलीसांना बघून काय समजायचे ते त्यांना समजले होते, पण जेरबंद केलेल्या लोकांमध्ये अंग्रेजसिंग नव्हताच म्हणून पोलीसांची चिंता वाढली होती. पोलीसांनी जेरबंद केलेल्या लोकांना अंग्रेजसिंगबाबत विचारले असता, “हमें मालूम नही !” असा नन्नाचा पाढा त्यांनी वाचण्यास सुरुवात केली. त्याच्या भावाला उत्तराखंड पोलीसांनी वेगळे नेवून विचारले असता, “अंग्रेज कल ही बंबई गया ।” असे चाचपडत सांगितले ते लगेच पोलीसांच्या लक्षात आले. यांनी तर दोनच रुम घेतल्या, पण तेथे तो मिळाला नाही. तोच तर मुख्य आरोपी आहे. तो तर मिळायलाच हवा असा विचार करून नागपूर पोलीसांनी त्याला पोलीसांचा खाक्या दाखविताच, “वो दुसरे रुम में दुसरे औरत के साथ है।” असे दचकून घाबरलेल्या क्षीण आवाजात सांगितले. पोलीसांनी स्वागत कक्षातील कर्मचारी यास दरडावून विचारले तर त्याने, ” त्यांनी दोनच रुम बुक केल्या,” असे सांगितले. पोलीसांनी सर्व वेटरला बोलावून विचारपूस केली असता, एक वेटर म्हणाला, “सर ! एक साहब रुम का एसी खराब है, ऐसा बोले तो मैं ने उन्हे रातभर के लिए खोली नंबर ३०७ सोने के लिए दिया है। शायद वो ही साहब होंगे, जिन्हे आप ढुंढ रहे हो,” असे ऐकताच पोलीसांनी त्या वेटरला अंग्रेजसिंगचा फोटो दाखविला. तो लगेच त्याने ओळखून, “हाँ ! ये ही तो है वो साहब,” असे म्हटले.
आता महत्वाचे मिशन अंग्रेजसिंग पोलीसांना फत्ते करावयाचे होते. ही वेगळी खोली म्हणजे तिसऱ्याच माळ्यावरील रूम नंबर ३०७ पण वेगळ्या कोरीडोरमधील असल्यामुळे त्याला काहीच चाहूल लागली नसावी, असा पोलीसांचा कयास होता. अंग्रेजसिंग नेहमी हत्यारबंद असतो व चाणाक्षसुध्दा आहे याची कल्पना उत्तराखंड पोलीसांना असलेने ‘आॅपरेशन अंग्रेज !’ काळजीपूर्वक करण्याच्या सूचना त्यांनी सोबत असलेल्या पोलीसांना दिल्यात. अंग्रेजसोबत धाकटी पत्नी, दोन मुलं तसेच लहान मुलीचा आवडता पामेरीयन कुत्रापण होता. कुत्रा सोबत असलेने अंग्रेजला जेरबंद करण्यात अजूनच अडचण येणार होती, कारण चाहूल लागताच जर कुत्रा भुंकला तर तो सावध होईल अशी भिती पोलीसांना होती, पण चार राज्यांना ‘मोस्ट वाॅन्टेड’ असलेल्या अंग्रेजला आता ताब्यात घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असा निर्धार पोलीसांनी केला होता. खोली क्रमांक ३०७ समोर पोलीसांनी मोर्चेबांधणी केली होती. ज्या वेटरने अंग्रेजला रुम दिली होती, त्यालाच पोलीसांनी रुमवर थाप देवून ‘रुम सर्व्हिस’ असा आवाज देण्यास सांगितले. वेटरने ‘रुम सर्व्हिस’ असा आवाज दिला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही, मात्र कुत्रा भुकंण्याचा आवाज आला. थोड्या वेळाने पुन्हा वेटरने दारावर थाप दिली. यावेळी मात्र आतून पुरुषी आवाजात कुणीतरी ओरडले, “क्या है।” त्या वेटरला पूर्वीच दिलेल्या सूचनेनुसार वेटरने, “साहब ! ये रुम अलाॅट हो गई है। रुम खाली करना पडेगा। सफाई करना है।” असे म्हटले. त्यावर आतून, “मैनै पैसै दिये है, उन्हे दुसरा रुम दो। मुझे सोने दो
।” म्हणताच वेटरने, “नही साहब ! रुम खाली करो और अपने रुम में जाओ।” असे म्हटले. आतून चालत येण्याचा आवाज येताच पोलीस सतर्क झाले. आतून हलकेच दार उघडून फटीतून त्याने बाहेर पाहिले व जोरात ओरडला, “ठोला है।” व पूर्ण ताकदीने आतून दार बंद करून घेतले तसेच पोलीसांन सुध्दा पूर्ण ताकदीने दार ढकलणे सुरू केले. त्याच्या ओरडण्याने खोलीतील बायको मुलंबाळं जागी झाली होती. त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. बाहेरून पोलीस दार ढकलीत होते व आतून ते सर्व घट्ट पकडून होते. पोलीसांच्या समोर त्याचा जोर जास्त वेळ टिकला नाही. पकड ढिली होते आहे हे पाहून त्याने एकदम दार उघडले व रुम बाहेर एकटाच पळाला. अचानक दार उघडल्या गेल्याने बाहेरून दाराला ताकदीनिशी धक्का मारणारे पोलीस एकामागोमाग एक धाडकन खोलीत पडले याच संधीचा फायदा घेवून अंग्रेज खोलीबाहेर पळाला. पोलीसांनी स्वतःला सावरुन त्याचा पाठलाग सुरु केला. पोलीस पाठलाग करीत आहे हे पाहून अंग्रेजसिंगने पोलीसांच्या दिशेने रिव्हाल्व्हवरमधून गोळी झाडली. अंग्रेजने झाडलेली गोळी उत्तराखंडचा पोलीस दिपक याच्या पायाला लागली. अंग्रेजसिंगच्या या आक्रमकतेने पोलीसांनी मुठी आवळल्या. पोलीसांनीसुध्दा कांऊटर फायरींग सुरू केली. या चकमकीत अंग्रेजसिंगला गोळी लागल्याने तो जिन्याच्याजवळ जागीच खाली कोसळला. अंग्रेजसिंगला व उत्तराखंडच्या जखमी शिपायाला पोलीसांनी लगेच मेयो हाॅस्पीटलला उपचारासाठी नेले, पण तोपर्यंत अंग्रेजसिंग गतप्राण झाला होता. मेयो हाॅस्पीटलमधील डॉक्टरांनी तपासून अंग्रेजसिंगला मृत घोषित केले. जखमी शिपायाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चकमकीत अंग्रेजसिंग ठार झाला होता. ‘ऑपरेशन अंग्रेजसिंग !’ यशस्वी पार पडले होते. ही माहिती वरिष्ठ पोलीसांना लगेच कळविण्यात आली. चकमक झाल्याने वरीष्ठ घटनास्थ्ळी त्वरीत दाखल झाले होते. तहसील पोलीसांचे पथकही दाखल झाले होते. ताब्यातील सर्व आरोपींना तहसील पोलीसांनी पुढील कारवाईसाठी आपल्या ताब्यात घेतले होते. शवविच्छेदनानंतर अंग्रेजसिंगचे पार्थिव व अटक केलेल्या आरोपींना आपल्यासोबत घेऊन उत्तराखंड पोलीस हरिद्वारकडे रवाना झाले.
पोलीसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक झाले. परप्रांतातून येणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसला. उत्तर भारतातील सराफा व्यावसायिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. उत्तराखंड पोलीसांनी नागपूर शहर पोलीसांचे सन्मानपत्र देवून विशेष आभार मानलेत.

!! जयहिंद !!

श्री अरविंद सराफ.
सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक, नागपूर.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!