टिफिन-marathi stri katha
राधा.. खिडकीतून बाहेर बघत होती…अरे आज खूपच उशिर झाला टिफिनला.. शामची वेळ तर अगदी ठरलेली.. सातच्या ठोक्याला हजर असतो तो.पावसाचे दिवस… झाला असेल वेळ. रस्त्यावर गर्दी पण किती असते आजकाल.. पण मला मेलीला काय माहिती?..सांगतात सर्व… मी तर सतत व्हील चेअरवर.. राधा पुटपुटली…बाहेरच्या जगाशी तर केव्हाच संबंध तुटला..आता फक्त खिडकीतून बघत राहायचे.. उडणारे पक्षी त्यांचे आवाज यात रमायचे..फ्लॅट मधील खिडकीतून कधीतरी लहान बाळाचा आवाज येतो रडण्याचा…
बाजुच्या खिडकीतून काहीतरी तळण्याचा वास येत आहे. शरीर गलितगात्र झाले आहे.. पण भाज्यांचा सुवास मात्र लगेच कळतो.. सारे आयुष्य त्या सुवासातच गुंग होते मी…आता हेच बघा.. बाजुच्या सुमतीकडे भरलेली वांगी बनत आहेत… भरलेली वांगी रौनकला किती आवडायची..
रात्री जेवणानंतर त्याचा एकच प्रश्न .. अग राधा उद्या टिफिन मध्ये काय देणार?
काय रौनक?रोज तुझा तोच प्रश्न …अरे तुझ्यापेक्षा मला काळजी आहे तुझ्या टिफिनची.. झोपा महाराज तुम्ही.. सकाळी लवकर उठायचे आहे.
अग राधा बाहेर बघ किती टिपूर चांदणे पडलय..जरा चल नं झोपाळ्यात बसू…
अरे … मी कशी येऊ? ऊद्याच्या टिफिनसाठी भेंडी चिरायची आहे.. सकाळी खूप गडबड होते रे.. बाबा पण फिरायला जातात त्यांचा चहा असतो.. अरे लग्नाआधी मला स्वयंपाकाची…
सवय नव्हती.. मस्त आरामात नऊ वाजता उठायचे.. आई ओरडायची… अग बाई ..सासरी कसे होईल तुझे? बाबांचे मात्र उलट .. अग झोपू दे तिला.. करेल ती सर्व …मला काही दिवस जड जाईल रे सर्व
मग बघ किती झटपट टिफिन करीत जाईल मी…
चल.. पाच वाजताचा गजर लाव.. मला सवय नाही बाबा.. सकाळी उठायची…
हो…ग.. राधा.. हळूहळू होईल सवय..
बाहेरचे खाऊन कंटाळला होता ग जीव .आई आजारी पडली.. तेव्हा आईच्या हाताच्या स्वयंपाकाची किंमत कळली..बरे ते जाऊ दे.. आता तर मला छान टिफिन मिळणार.
राधाची साखरझोप केव्हाच पळाली.. आता तर पाच वाजता दचकून जाग येतेच …आधी टिफिन.. नंतर सर्व.
हे बघ..रौनक.. रविवारी मला अजिबात उठवायचे नाही. मनसोक्त झोपून राहायचे आहे मला…
बरे बाईसाहेब… रौनक हसला…
रविवार उजाडला … सवयीप्रमाणे जाग आली तिला .. स्वयंपाकघरात भांड्याचा आवाज येत होता…
बाबा… काय करत आहात? मला आवाज द्यायचा..
अग राधा काही नाही.. काल रात्री आम्ही सिनियर सिटीजन गप्पा मारत होतो.. बोलता बोलता त्यांनी ट्रीपचे ठरवले आज.. त्या सर्वांचे फक्त रविवारी जमणार आहे.. रोज त्यांना नातू सांभाळावे लागतात.
अहो पण बाबा.. तुम्हाला गोळ्या घ्याव्या लागतात…
बी..पी.. डायबिटीज.. आहे तुम्हाला..थांबा तुम्ही मी टिफिन करून देते..
अग राधा… मी खाईल बाहेर.. दर रविवारी ट्रीपला जायचे आहे.. तू झोप निवांत ..
अहो बाबा… तुम्हाला बाहेरच्या खाण्याची सवय नाही राहली आता..मी देते टिफिन ..
रोज नवा दिवस.. उगवत आहे. राधाची तिचं धावपळ..
साखरझोप स्वप्नवत झाली.. झोपाळ्यावर बसून आरामात चहा पिण्याचे राहूनच जात आहे..सकाळी खिडकीतून मंद स्पर्श करणारा पाऊस फक्त स्वप्नात येतो .. टिफिन पासून झालेली सुरवात… उद्या काय द्यायचे इथे थांबत आहे…
आता तर काय दीपचा पण टिफिन..
रोज.. त्यांच्या आवडीचे…आयुष्य जणू टिफिनमय झाले आहे… त्यातून सुटका नाही..पण त्यांच्या आवडी जपणे.. किती सुख देऊन जाते..दुसरे काय हवे असते?
सर्व किती आंनदाने करते नं राधा… रौनकला आश्चर्य वाटायचे.. तिची आवड कधी व्यक्त नाही करत ती..
घरात सर्वांना जे आवडते तेच तिला आवडते..
कसे शक्य आहे हे… तिच्या पण काही आवडी असतीलच …पण खरेच हे समर्पण फक्त स्त्री करू शकते..
राधा.. अग आज टिफिन नको मला. बाहेर जेवण करिल. आज मस्त फिरायला जा ..
अरे बाबा… आजकाल तुला एसिडिटीचा किती त्रास होतो.. डाॕक्टर काय म्हणाले आठव जरा… बाहेरचे खाणे बंद ..घरचे साधे जेवण करा … मला तुझ्या प्रकृतीची काळजी वाटते..
आणि रौनक… मी फिरत जाईल.. आपल्या दीपचे लग्न झाल्यानंतर मी फिरायला मोकळी .. तुझी रिटायरमेंट आहेच आता…
दिपचे लग्न ठरले.. त्याच्या सोबतच नोकरीवर असलेली नेहा घरात आली.दोघेजण छान फिरायला गेले..
लवकरच दोघे कामावर जाऊ लागली.सकाळची सातची लोकल .. घरातून सहा वाजता निघायलाच हवे…नेहाची तांराबड होत होती. स्वयंपाकाची सवय नसल्यामुळे चिडचिड व्हायची. तशी राधा सकाळी तिला मदत करायची..
नेहाला दिवस गेले.
अग नेहा… दगदग करू नको..सकाळचा दोघांचा टिफिन मी करत जाईल…राधाने कौतुकाने नेहाकडे बघितले
राधा पुन्हा त्याच चक्रात अडकून गेली… आता तर अजून एक टिफिन वाढला.. नातवाचा.. रोज तीन टिफिन..
करते आहे आई.. मग करू द्या ..काय होते?
एक दिवस दीप आंनदात घरी आला.त्याला अमेरिकेत मोठ्या पगाराची नोकरी मिळाली होती.
आई .. बाबा….तुम्हाला दोन महिन्यात घेऊन जाईल…असे सांगून निघून गेला… सहा महिने झाले.. दीप आला नाही.
अरे दीप… सहा महिने झाले…मी वाट बघत आहे… आता कामे नाही होत रे… स्वयंपाकाला बाई लावली ती कधी येते… कधी नाही… मी अशी व्हील चेअरवर…
आई … माझे येणे होणार नाही….
तुम्ही टिफिन लावून घ्या…
राधा.. हसायला लागली… असंख्य विचूंनी एकदाच दंश करावा .. रक्तबंबाळ करावे.. असे तिला वाटू लागले… अरे दीप काय बोलून गेला…मी तर आयुष्यभर टिफिनमध्येच जगली रे… तुमचे टिफिन करता.. करता.. बघ कधी म्हातारी झाली कळलेच नाही.. फक्त रौनकलाच टिफिनची किंमत माहिती आहे. आयुष्यातील मधुमास केव्हाच हरवला … आता फक्त आठवणीचा पिसारा…
समोर आता फक्त आणि फक्त टिफिनची वाट …
ज्योती रामटेके
वर्षानुवर्षे टिफिन देणाऱ्या स्त्रीची कथा आणि व्यथा अचूक टिपली मॕडम
शेवटापर्यंत टिफीन सोबती, छान कथा व्यथा
Wah
खुप छान लिहिलीय
Khup chan
खूप छान लिहिलं