दाटून कंठ येतो
दाटून कंठ येतो

दाटून कंठ येतो

मिनाक्षीने सकाळी सकाळी लता वहिनी बागेतील फुले देवपूजेसाठी तोडतांना दिसताच विचारले,

वहिनी कशा आहात? खूप दिवसांनी दिसल्या,

छान ग…

एक गोड ..बातमी बरं का? मिनाक्षी ..

आपल्या अवनीची सोयरीक पक्की झाली कालच..

मिनाक्षी आश्चर्याने बोलली. .

काय सांगता? अरे वा!

वा..वा…अभिनंदन..वहिनी

लवकरच योग जुळून आले अवनीचे..

हो ग..सहज खडा टाकून पाहिला ..आणि त्वरित होकार मिळाला..

म्हणजे मला नाही समजले..

अग मुलगा नात्यातीलच .. यांच्या सख्ख्या बहिणीचाच आहे. पंकज..चांगला नामांकित डाॅक्टर आहे .. लग्नासाठी कधीपासून मुली पाहत होता. पण त्याच्या पसंतीस मुली उतरत नव्हत्या. आम्हाला ही पंकज पसंत होताच.

मग अवनीची सहजच गोष्ट काढली. तर पटकन होकार दिला त्यांनी . पंकजच्या पण मनात होती .आपली अवनी. .

मग काय ?चट मंगनी पट ब्याह..

हो ना वहिनी.. छान झाले की..

नात्यातीलच सासर मिळाले..

अवनीला काही अवघड जाणार नाही..आत्याबाईच सासू..आधीपासून सासरचे सर्व लोक परिचयाचे …शिवाय भाची तेच ..म्हणून तर मुलगा हातचा जाऊ दिला नाही. लता वहिनी म्हणाल्या.

तेवढ्यातच..

म.. म्मा…

असा पिहूचा घरातून ओरडण्याचा आवाज आल्याने मिनाक्षी धावतच गेली. पाहते तर तिच्या दोन्ही लाडक्या लेकी पाण्यात नाचत होत्या. सार घर पाणी मय झाले होते.

हे काय? चालले तुमचे पायल, पिहू..तो नळ बंद करा आधी पटकन,

मम्मा ने ओरडताच लहानग्या पिहू ने घाबरून लगेच भोकाड पसरले. तिला चूप करण्यासाठी मिनाक्षीने रव्याचा लाडू दिला. दोघी मुली अगदी खुश झाल्या. मिनाक्षीने काही लाडू एका डब्यात भरून पायलच्या हातून लता वहिनी च्या घरी पाठवले.

अवनीला तिच्या हातचे बनवलेले रव्याचे लुसलुशीत लाडू खूपच आवडीचे.. अगदी हक्काने मागून खाते नेहमी.. लतावहिनी आपल्या शेजारी राहायला आल्या तेव्हा अवनी दहावीला होती. बोर्डाची परिक्षा म्हणून आपल्या पाया पडायला आलेल्या अवनीला आपण हाच लाडू दिला होता.. तिने आवडीने खावून परत मागितला होता. गोरीपान, काळेभोर लांब सडक केस असलेली, मध्यम बांध्याची.. अवनी पाहता ..पाहता आता लवकरच विवाह बंधनात अडकणार होती.

जवळपासचा लग्न मुहूर्त पाहून अवनीच्या लग्नाची तारीख काढली . दारासमोर हिरवा मांडव सजला ..घरावर आंब्याची तोरणे लागली. त्यामुळे घराला दाराला शोभा आली ..लग्न घर अगदी उठून दिसत होते पाहूणेमंडळी जमू लागली. . एक एक लग्न विधी पार पाडत ..लग्नाचा मुहूर्त जवळ आला तसे नवरी नवरदेवाने जोडीने सनई चौघड्या च्या सुरात मांडवात प्रवेश केला. मोरपंखी काठाचा हिरवा भरजरी शालू खांद्यावर शाल, कपाळावर नाजूकसे मळवट आणि त्यावर बांधलेल्या मुंडावळ्या .. अवनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. नाकातील पुणेरी नथेने तिचे सौंदर्य अजूनच खुलले होते. अवनी पंकज चा जोडा अगदी दृष्ट लागण्यासारखा दिसत होता .

कुर्यात ..सदा..मंगलम् ..

मंगलाष्टकांना सुरुवात झाली. नवरदेव..नवरी च्या डोक्यावर अक्षदा टाकत असताना मिनाक्षीचे लक्ष लता वहिनींकडे गेले .त्या एका कोपऱ्यात अलिप्त उभ्या राहून डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत मुलीच्या डोक्यावर अक्षदा टाकत होत्या. एकीकडे मुलीच्या लग्नाचा आनंद तर दुसरीकडे ती आपल्या पासून आता दूरावणार ..याचे दुःख ..आपली मुलगी आज आत्याच्या घरात पूर्वीची अल्लड, खेळकर अवनी म्हणून नाही तर. त्या घरची जबाबदार सून म्हणून गृहप्रवेश करणार होती. आजपासून अवनी साठी त्या घरातील नात्याचे अर्थ संपूर्णपणे बदलणारे .. आत्या आज पासून अवनीला सून म्हणून स्वीकारणार .. त्यामुळे त्या घरची सून म्हणून अवनीची आज पासून जबाबदारी वाढणार . .आपली अवनी आपल्या कर्तव्यात. .कुठेही कमी पडू नये म्हणून..अवनीचे कन्यादान करून…सासरी तिची पाठवणी करताना जेव्हा वधूपित्याच्या नात्याने तिच्या (अवनीच्या )वडिलांनी नवरदेवाच्या आईसमोर

(मोठ्या बहिणीसमोर ) माझी लेक तुमच्या पदरात देतो. तिच्या कडून कळत..नकळत काही चूकले तर सांभाळून घ्या. . असे म्हणत हात जोडून विनंती केली..

तेव्हा वडिलांना बिलगून अवनी कितीतरी वेळ रडत होती.

लाडाकोडात वाढवलेला आपल्या पोटचा गोळा दुसऱ्याच्या स्वाधीन करताना त्या मायबापाच्या जिवाची होणारी घालमेल .बघून मिनाक्षीच्या मनात कालवाकालव होऊ लागली. आपल्या दोन्ही चिमण्या पण एक दिवस आपल्याला सोडून अशाच भुरकन् आपल्या घरट्यातून उडून जातील. त्या क्षणी आपली पण अशीच अवस्था होईल.. नुसत्या कल्पनेनेच मिनाक्षी च्या अंगावर शहारे आले आणि तिने पायल ,पिहूला छातीशी कवटाळून धरले..

 

सौ. दर्शना ओम भुरे (हिंगोली)

10 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!