अनु आज सकाळीच उठली. बाहेर प्रसन्न वातावरण होते.किती तरी महिने झाले सकाळचा सूर्योदय बघितला नव्हता.तिला आवडणारा सूर्योदय आता तिला नकोसा वाटत होता.रात्रीची झोप निघून गेली होती.रात्रभर जागरण.मनात विचारांचे थैमान चालायचे.आयुष्यात मरगळ आली होती. मनाचा आक्रोश फक्त आणि फक्त तिला माहिती होता.पण आज उठायचेच आणि सूर्योदय बघायचाच हे तिने ठरविले होते .बाहेर सुंदर वातावरण दिसत होते.सूर्याची लालीमा पसरली होती.तो हळूच टेकडीमागून बघत होता व हळुवारपणे समोर येत होता.पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता . प्रत्येक जण नव्या आशेने नवीन दिवसाकडे बघत होता.
प्रत्येक नवीन दिवस आशेचे किरण घेऊन येतो पण नेहमीच असे नाही होत कधी…कधी तो एक दिवस आयुष्यात भयानक वादळ निर्माण करतो.
अनु सारखी सूर्याकडे बघत होती.त्याने आता टेकडीच्या मागून डोकावणे बंद केले होते.तो पूर्ण बाहेर आला होता.
त्याची कोवळी आभा लुप्त झाली होती.आता तो हळूहळू प्रखर होणार.आणि पुन्हा रात्र झाली कि अस्तास जाणार.त्याचा दिनक्रम ठरलेला.
निसर्गाचे हे बरे असते…सर्व गोष्टी त्याच्या मनासारख्या करतो तो ..ना कुणाचा धाक ना कुणाची पर्वा.आपल्या मस्तीत जगायचे.
फोनची रिंग वाजली.कुणाचा फोन असेल एवढया सकाळी? अनु मनाशी पुटपुटली.तिने मुद्दामच नाही उचलला.बघू नंतर , आजकाल फोनवर बोलणे पण नको वाटते.तेच.. .तेच..कंटाळा आला आता या गोष्टींचा.या सर्व गोष्टी पासून कुठेतरी लांब निघून जायचे जिथे मनाची मरगळ दूर होईल.निसर्गाच्या कुशीत कुठेतरी हरवून जावे सारे दुःख एखाद्या पाण्याच्या धारेत मोकळे करुन टाकावे…मनाचा कोंडमारा मनाची , व्यथा…त्याची पोकळी
कुणाला कळणार ?
मुलांच्या आग्रहाने आज कितीतरी दिवसांनी अनु सकाळीच उठली होती…रात्री झोपण्यापूर्वी दियाने बजावले होते आईउद्या लवकर उठायचे बर का.
तुला सकाळचा सूर्योदय बघायला आवडतो नं.
अनुचे डोळे भरुन आले…मुली लहान होत्या पण आईच्या भावना तिचे दुःख त्या बघत होत्या.दिया..पीहु लवकरच झोपी गेल्या .अनु झोपण्याचा प्रयत्न करत होती पण कसली झोप अन् कसले काय.या सहा महिन्यात झोप पार उडाली होती.दिवस तर कसाही जातो पण रात्र ही खूप जीवघेणी वाटते.रात्रीच्या नीरव शांततेत विचारांचे थैमान सुरू होते. आता सर्व विसरायचे नवीन आयुष्य सुरू करायचे..म्हणणे सोपे पण तसे करणे सोपे थोडीच आहे?
रातराणीचा सुंगध वातावरणात पसरला होता.अनु खिडकीतून बाहेर बघत होती.आता पाहण्यापलीकडे काय उरले होते.पारसला आता कधीच आठवायचे नाही असे ठरवून सुध्दा तो आठवलाच.कधीकाळी पारस माझ्या शिवाय एक क्षण सुध्दा राहू शकत नव्हता , तो मला मुलांना सोडून एका परक्या स्त्री सोबत निघून गेला.
पारस आणि अनु सोबत एकत्र शिकले.घरून लग्नाला विरोध. तरी दोघांनी मंदिरात लग्न केले.कमी पैशात सुरू झालेला संसार हळूहळू स्थिर झाला होता.अनु..पारस कमी पैशात सुखी होते .अनु समजदार होती.पैसा ..पैसा जोडून त्यांनी लगेच सुंदर घर बांधले .वास्तूपुजनाच्या दिवसी अनु आंनदात होती.तिचे एक स्वप्न पूर्ण झाले होते .अनुची तडजोड …तिने नकळत…तर कधी मुद्दामच दाबून टाकलेल्या इच्छा अपेक्षा सर्व पारसला कळत होत्या.त्या रात्री दोघेही आंनदाने झोपलेच नाही.पारसला झाडांची खूपच आवड , त्याने आधीच रातराणी.मोगरा लावून टाकला होता.सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता.आसमतांत चांदणे फुलले होते.चन्द्र आपला एकटाच शीतल प्रकाशात न्हाऊन निघाला होता.पारस…अनु रातराणीच्या सुगंधाने हरवून गेले. दोघेही निवांत बसले
पारसले हळूच अनुचा हात हातात घेतला.
अनु…तुझी साथ होती म्हणून हे सर्व वैभव आपल्याला लवकरच मिळाले .पण तुला खूप त्याग करावा लागला ग.पण आता …आपण आपल्या सर्व इच्छा …अपेक्षा पूर्ण करायच्या.समोर सुंदर जीवन जगायचे या रातरानीच्या फुलांसारखे.पीहु….दिया दोघींना खूप मोठे करायचे.धुंद वातावरणात दोघे बराच वेळ बसून होते.
सकाळ झाली.अनु कामात गुंग झाली.पारस आॕफीसला निघून गेला.सर्व छान सुरू होते.दिवस आंनदात चालले होते.पण अचानक पारसचे वागण्यात बदल दिसू लागला.
आजकाल पारस आॕफीसमधून जरा उशीरा येत होता.अनुला त्याची काळजी वाटायची.किती थकतो पारस..आला कि झोपतो..आधीसारख्या ना गप्पा ना मुलीसोबत खेळने.
अनु आॕफीसमध्ये खूप कामे असतात ग.अनु नेहमीप्रमाणे शांत राहायची.आता तिने सवय करून घेतली होती.
पारस मधील बदल आता तिला जाणवायला लागला होता.पारसला काहीतरी सांगायचे आहे असे अनुला वाटायचे.आॕफीसमध्ये काही कुणाशी वाद तर नसतील झाले…काय झाले असेल. अनुला काळजी वाटायची
पण हळूहळू काही गोष्टी तिच्या लक्षात येत होत्या.कोणत्या तरी दडपणाखाली तो वावरत होता.रातराणीचा सुंगध….फुललेला मोगरा…कशाकडेच तो लक्ष देईना.कुठेतरी हरवलेला वाटायचा.
आज त्याला विचारायचेच अनुने ठरविले होते.आपल्याला सोडून एक क्षणभर त्याला करमायचे नाही , तो आज परक्यासारखा वागतो.
कुणी दुसरी स्त्री पारसच्या आयुष्यात ..छे…छे कसे शक्य आहे हे , नुसत्या कल्पनेने किती हादरली अनु.काहीही असो आज विचारायचेच.
पारस त्याच वेळेवर घरी आला.अनु त्याला जबरदस्तीने अंगणात घेऊन गेली.तोच सुगंध पसरला होता.
पारस…कोण आहे रे ती?
अनपेक्षित प्रश्न , पारस हादरुन गेला.
तुला कसे कळले?कोणी सांगितले तुला ?
म्हणजे माझा अंदाज खरा आहे.
अनुच्या पायाखालची जमीन हादरली होती.तिचा आक्रोश सुरू होता.कुणी तरी बाण मारून तिचे ह्दय चुर…चुर केले होते.
पारस तू का केले असे…सांग ना?मी कुठे कमी पडले ते तरी सांग.काय चुकले माझे ?
अनुचा आक्रोश सुरू होता.
पारसकडे एकाही प्रश्नाचे उत्तर नव्हते.एका घरात दोघेही अनोळखी सारखे वावरत होते.मुली अजून लहान होत्या.पण घरातील वातावरण त्यांच्या लक्षात येत होते.
काही दिवसांनी पारस घर सोडून तिच्याकडे राहायला गेला.अनुनी त्याला अडवले नाही.
जिथे मन तुटले तिथे सर्व संपले.
सर्व मनाचा खेळ.पारस गेल्यानंतर अनु एकाकी झाली होती,आयुष्यातील सर्व सुंदर गोष्टी ती विसरली होती.रातराणी बहरली होती पण आता तिला काहीच इच्छा उरली नव्हती.दिवस चालले होते.मुली आईचे दुःख बघत होत्या.
एक दिवस अनु अशीच झाडाकडे बघत होती.झाड पूर्णपणे निष्पर्ण झाले होते.पण पावसाची एक सर पुन्हा त्या झाडाला सुंदर ..कोवळी पालवी देईल .पुन्हा ते उमेदीने जगायला लागेल. खरेच आयुष्य खूप सुंदर आहे.मला माझ्यासाठी मुलींसाठी जगायलाच हवे. मी पण अशीच जगायला शिकणार माझ्यासाठी, मुलींसाठी.
पारस चुकला त्याची शिक्षा मी का भोगू?पुन्हा मोगरा गंधाळेल.वातावरण धूंद करून टाकेल.
त्या सुंगधात पुन्हा भिजायचे.चादंण्या रात्री मनसोक्त फिरायचे.सुवासाने बेधुंद व्हायचे.
अनुच्या मनातला मोगरा फुलायला लागला………
ज्योती संजय रामटेके
वाह..मोगरा फुलला 👌👌
सुंदर
Wah
मस्त
अप्रतिम
Khup chan