नाते तुझे माझे-भाग.. १ स्त्री कथा
टवटवीत फुललेल्या लालभडक गुलाबावर छोट्या अबोलीची कधीची नजर होती. त्यामुळे काटे टोचत असतानाही ते फुल तोडण्यासाठी तिची हात उंचावून केविलवाणी धडपड चालू होती. शेवटी मोठ्या प्रयत्नाने गुलाबाचे फुल तिच्या हाती आले…आवडते फुल आपल्या हातात येताच त्याला निरखून पाहत ती मनाशीच आनंदाने खुदकन् हसली.तिचे हसणे ऐकून तिथेच बाजूला बागकाम करणाऱ्या सतीशची म्हणजे अबोलीच्या वडीलांची गुलाबाजवळ उभ्या असलेल्या अबोलीवर नजर पडली. ते लगेच तिला विचारले,
अबोली…गुलाबाचे फुल पाहिजे का बेटा…मी देतो तोडुन.. तुला काटा टोचेल …वडिलांचे बोलण कानावर पडताच त्यांच्याकडे बघत तिने आपल्या हातातील फुल त्यांच्या जवळ जात त्यांना आनंदाने दाखवले. तिच्या हातातील फुल पाहून सतीशने लबाड…असे म्हणत कौतुकाने तिचा गालगुच्चा घेतला तशी खुदकन् हसत ती पैंजणचा छुनछुन आवाज करत पळत घरात जात थेट सुजाताच्या पुढ्यात जावून उभी राहिली.. लाडकी लेक पळूत गेलेल्या दिशेकडे कौतुकाने पहात सतीश परत आपल्या बागकामात गुंतला.. सतीशला झाडांची फुलांची खूप आवड त्यामुळे त्याने घराभोवती छान छोटीशी बाग फुलवली होती सुट्टीच्या दिवसाची सकाळ तो बागेतील कामे करण्यात घालवत असे.. अबोली सुजाता आणि सतीशच्या संसारवेलीवर लग्नाच्या बऱ्याच वर्षांनी उमललेले फुल..त्यामुळे ती त्याच्या गळ्यातील ताईत होती. दोघेही तिला जिवापाड जपत..
सकाळची वेळ असल्याने नेमकीच आंघोळ वगैरे आटपून सुजाता आपल्या लांबसडक केसांची आरशासमोर उभी राहून वेणी गुंफत होती. आपल्या आईच्या लांबसडक केसांकडे अबोली कौतुकाने पाहत किती तरी वेळ उभी राहिली. व लागलीच आपल्या पाठीमागे लपवलेले गुलाबाचे फुल हळूच आईसमोर धरून तिला इशाऱ्याने घे म्हणून खुणविले.. सुजाताने तिच्या हातून फुल घेऊन कौतुकाने आपल्या लांब सडक वेणीत लावून अबोली कडे पहात विचारले…
कशी दिसते मी? आईने असे विचारताच अबोलीने लगेच खुश होत.. अंगठा आणि तर्जनीचा गोलाकार करत मान हलवत डोळे मोठे करून ओठाचा चंबू केला. आईच्या वेणीत फुल बघून ती खूप खुश झाली आणि खेळायला निघून गेली सुजाताने आपली वाचलेली कामे आटपून दुपारच्या वेळी निवांत पेपर वाचायला हाती घेतला..तोच दारावरची बेल वाजली. कोण आलं असावं या वेळेला.. अशा विचारात तिने पेपर बाजूला ठेवून दार उघडले समोर कावेरी उभी होती.
बाई येऊ का घरात.. तिने सुजाताला विचारले..
अग हो हो ये ना..असं म्हणत तिला घरात घेवून पाणी वगैरे दिले.
काही काम होत का? बाई निरोप धाडला म्हणून विचारले.. कावेरीने पाण्याचा प्याला हाती घेत सुजाताला विचारले..तेवढ्यातच सतीश घरात आला कावेरीला बघून त्याचा चेहरा एकदम पडला..का कोणास ठाऊक त्याला हल्ली कावेरीचे घरी येणे मनापासून आवडत नव्हते हे त्याने बऱ्याचदा सुजाताला बोलूनही दाखविले होते . अबोलीला पण तिच्यापासून दूर ठेवण्याची त्याची सतत धडपड असायची..
क्रमशः..
दर्शना भुरे.. हिंगोली






सुरेख कथा
सुंदर लिखाण
सुंदर लिहिले
उत्तम.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
Khup chan surwat