सतीशला आपण हल्ली घरी आलेले आवडत नाही.. हे कावेरीला लक्षात येत होत… त्यामुळे ती स्वतः हून त्यांच्याकडे येण्याचे मुद्दाम टाळी पण .. सुजाता घरातील काही छोटे मोठे काम निघाले तर निरोप पाठवून कावेरीला बोलावून घेत होती. त्याचप्रमाणे आजही तिला बोलावून घेतले म्हणून कावेरी आली होती. आपल्या कावेरीमावशीला समोर उभे बघून अबोली खेळता खेळता हातातील खेळ सोडून धावत येऊन पटकन तिला बिलगली …तशी तिच्या डोक्यावरून मायेने आपला हात फिरवत कावेरी सुजाताला म्हणाली ,
बाई.. काय काम काढले..मला बोलावले ..
अगं.. हो..उद्या आमच्या शाळेत एका समारंभासाठी मला जास्त वेळ थांबावे लागणार आहे. तेव्हा उद्याच्या दिवस अबोलीला सांभाळशील का? हे विचारण्यासाठी बोलावले होते…सतीशही उद्याच कामानिमित्त बाहेर गावी जाणार आहे..
एरवी तिची काळजी नसते..आई असतात तर त्याच सांभाळतात तिला.. बघ तुला जमेल न म्हणजे वेळ मिळेल न..
का नाही वेळ भेटणार बाई ..तुम्ही अबोलीची काळजी करू नका. तिला सांभाळायला मी कधी नाही म्हटले का तुम्हाला..
म्हणून तर तुला विचारले ग.. आणि अबोली पण तुझ्यासोबत किती छान राहते तिच्यासोबत तू असली की मला तिची काही काळजी राहत नाही.
कावेरीला दिवाणखान्यात बसवून सुजाताला बोलत बोलत
स्वयंपाकघराकडे जाताना पाहून लागलीच कावेरी तिला म्हणाली,
काही कामे शिल्लक असतील तर सांगा येते मी मदतीला..
काही नाही ग ..बस माझी सर्व कामे केव्हाच आटोपली पोहे बनवायला म्हणून उठले.. तुही खाऊन जा गरम-गरम.. म्हणत तयारीला लागली..पोहे भिजत घालून फोडणीसाठी मिरची, कडीपत्ता घेण्यासाठी फ्रिजजवळ जाऊन तिने सहजच बाहेर डोकावले तर..बाहेर अबोली कावेरी सोबत चांगलीच रमलेली होती. बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या कावेरी मावशीला ती आपली एकेक खेळणी पिशवीतून बाहेर काढून दाखवित सर्व एका रांगेत मांडून ठेवत होती. कावेरीही तिचे एक एक खेळणे हात लावून बघत कौतुकाने न्याहाळत होती.दोघींच्या चेहऱ्यावरून आनंद अगदी ओसंडून वाहत होता. मध्येच त्या दोघी एकमेकींना टाळ्या देऊन मोठ्याने हसत होत्या. हे बघून सतीश सुजाता जवळ येत म्हणाला,
सुजाता तुला किती वेळा सांगितले कावेरीला सारखे घरी बोलावू नको तरी तू..
तरी तू ..काय सतीश..
सतीश चे बोलणे मध्येच तोडत सुजाता बाहेर कावेरी कडे बघत हळू आवाजात म्हणाली, सतीश मला एक कळत नाही तुला हल्ली कावेरीचे येणे का? खटकते.. अबोली बघ किती खुश आहे आणि…तू आधी तर असा वागत नव्हता आता एकदम असं काय झाले तुलाही माहित आहे ..आपल्या अबोलीला प्रेमाने, विश्वासाने सांभाळणारे कावेरीसारखे दुसरं कोणीही नाही आणि उद्याचाच तर प्रश्न आहे.
अग पण..
पण बिन काही नाही सतीश थोडे समजून घे ना.. आई बाहेरगावी गेल्या म्हणून.. शिवाय कावेरीचे दुकान माझ्या शाळेजवळच आहे. त्यामुळे अबोली वर माझेही लक्ष राहिल.. घरी परतताना मी तिला सोबत आणील.. कावेरीची मुले मनीष, मनोज पण तेथे आहेत.. खेळेल ती थोडावेळ त्यांच्यासोबत.. बाळंतपणानंतर जेव्हा पूर्ववत मी शाळेत जायला लागले.. तेव्हा छोट्या अबोलीला तिनेच तर सांभाळले.. हे तू विसरला का?
सुजाताचे बोलणे ऐकून निरुत्तर होत सतीश म्हणाला,
बर ..बघ तुला योग्य वाटेल तसे ..
क्रमशः
- सौ. दर्शना भुरे..
पुढे काय? उत्सुकता वाढली.
Chan
छान कथा
पण पुढचा काहीच अंदाज लागत नाही.
उत्सुकता प्रत्येक भगा सोबत वाढतेय.