marathi criminal story  फसवे नातं
marathi criminal story फसवे नातं

marathi criminal story फसवे नातं

.छोट्या सईचे शालू काकू शिवाय पान हलत नव्हतं.अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत…

 

काकू हे.. काकू ते .. काकू असे.. काकू तसे  .. काकू .. काकू   आपलं सारखं चालूच ..

 

सई होती पण तेवढीच गोड आणि लाघवी, काकूलाही तीचा लळा लागला होता. शालूच्या लग्नाला बरीच वर्षे उलटली होती. तरीही… त्यांना स्वतःचे असे मुलंबाळं नव्हत.. त्यांच्या दोन्ही जावांना मात्र  त्यांच्या मागून लग्न होऊन मुलं झाली होती..  मधली जाऊ राखीला दोन मुले आणि   लहानी जाऊ रश्मीला एक मुलगा. एक मुलगी अशी तिच्या परिवारात एकूण चार  मुलं .. भावंडांमध्ये सई एकुलती एक मुलगी असल्यामुळे सर्वांची खुप लाडकी होती. घरात सासू-सासरे   दिर..जावा ..अगदी एकोप्याने राहत.. स्वत:चे असे मुलंबाळं नसल्यामुळे शालू जावांच्या मुलांनाच आपली मुले समजून त्यांची आपुलकीने देखभाल करीत होती. त्यामुळे सर्वच मुले तिच्या अंगावर झाली होती..

शालूच्या कुटुंबात दिर,जावा,सासू,सासरे अगदी खेळीमेळीचे वातावरण होते …सर्व जण एकमेकांना जीवापाड जपत..

एक आदर्श कुटुंब म्हणून त्यांची समाजात ओळख होती.

पण हल्ली मात्र राखी आणि रश्मी या दोघी जावांमध्ये मुलांवरून  अधूनमधून रोजच धुसफूस होवू लागली होती. अश्याच एके दिवशी दुपारी.. घरासमोरील अंगणात सर्व मुले खेळत होती .तेवढ्यात चिंटू धावत धावत येऊन बाहेरूनच त्याच्या आईला मोठ्यामोठ्याने  आवाज देऊ लागला..    “आई …आई… ए..आई  ..

आपल्या ऋषी दादाला बघ ना ग.. काय झालं..”

“काय झालं ?बघू .”

 

असं म्हणून त्याची आई बाहेर  धावत आली. शालू बाहेर  अंगणातच  कपडे वाळत घालत होती.  राखीला अंगणात पळत आलेलं पाहून तिने पटकन जाऊन ऋषीला सावरले. त्याच्या तोंडातून फेस  निघत होता. ऋषीला तशा अवस्थेत बघून त्याची आई खूप घाबरली.  वडिलांनी   त्याला ताबडतोब तसेच उचलून दवाखान्यात  नेले. डॉक्टरांनी तपासून सांगितले..

“याच्या संपूर्ण शरीरात विष पसरले हा वाचणं कठीण आहे.

काय खाल्ले याने?”

“काहीच नाही .. बाहेरच खेळत होती सर्व मुले..राखी  एकदम रडू लागली…

थोड्याच वेळात ऋषी गतप्राण झाला.पोटचं पोरं अचानक असे निपचित पडलेल पाहून राखीने हंबरडा फोडला.

हसत्या-खेळत्या परिवारावर एकाएकी च शोककळा पसरली..

 

एकदम राखीला रश्मीसोबतच आदल्या दिवशीच झालेले भांडण आठवल ..

 

रश्मीकडे रागाने बघत ती म्हणाली,

 

“मला माहित आहे कोणी मारल..तू..तूच मारलं माझ्या मुलाला..”

 

“मी का मारू माझ्या मुलासारखा होता तो..”रश्मी म्हणाली,

 

“मुलासारखा होता पण तुझ्या पोटचा तर नव्हता न ..राखी रडत म्हणाली..”

 

“काल मुला.. मुलांच्या भांडणात तूच माझ्या ऋषीला दूर लोटून दम दिला होता….आणि मारायला हात सुध्दा उचलला होता नाही का ?”

 

“हो ..पण मी असा एकदम  त्याचा जीव का घेईल  ?”

दोघीतील वाद वाढत चाललेला बघून शालू त्यांना समजावत म्हणाली,

“तुमच्या दोघींच्यात  काही तरी गैरसमज होतोय…शांत व्हा असे आपसात भांडू नका…पोलीस लावतीलच शोध..”

शालूच्या समजावण्यने दोघी शांत झाल्या.

ऋषीचा मृत्यू  संशयास्पद अवस्थेत झाल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोस्टमार्टम मध्ये त्याच्या  शरीरात विषारी द्रव्य आढळले. इन्स्पेक्टर अजिंक्य ने  हत्येच्या  तपासाची जिम्मेदारी आपल्या हातात घेवून लगेच कारवाईला सुरूवात केली.  त्याच्या काही खाण्यात आले का यासंदर्भात घरच्या सर्वांची चौकशी केली त्या सर्वांच्या साक्षी नोंदवून घेतल्या .. घटनास्थळी जाऊन पाहणी केली .

 

मुले  अंगणात खेळत होते  त्या ठिकाणावर  त्यांना काहीच  आढळले नाही.

 

“तुम्हाला कोणी काही खायला दिले का ?”

 

चिंटू म्हणाला,

“हो आम्हाला  रिंकू ताईनी चॉकलेट दिले होते..”

“रिंकू ताई ही कोण ?”

 

इन्स्पेक्टर अजिंक्यने विचारले.

“ती ताई आमच्याच घराशेजारीच राहते खूप लाड करते आम्हाला खाऊ पण देते…”

चला आपण रिंंकूताईला भेटूया.. असे म्हणून त्यांनी मुलांना तिच्या कडे नेले.

 

रिंकूची विचारपूस केली असता तिने भीत..भीत पोलीसांना सांगितले की,

 

“हो मी मुलांना केव्हा केव्हा एखाद्यावेळेस चॉकलेट बिस्कीट वगैरे देते…”

 

तिने दिलेल्या माहितीनुसार तिने आज सकाळी 11 वाजता चॉकलेट दिले होते पण ऋषीचा मृत्यू मात्र दुपारी चार वाजता झाला होता. म्हणजे यात रिंकूचा काही हात नव्हता. ती निर्दोष होती. एव्हाना घटनेला दोन-अडीच महिने उलटले. हाती काही गुन्हेगाराचा धागा दोरा हाती लागत नव्हता. तपास सुरूच होता.

ऋषी च्या घटनेनंतर तर

रश्मी आणि राखी  या दोघींनीही जवळपास एकमेकींंशी अबोलाच धरला होता. अशातच एके दिवशी

संध्याकाळचे जेवणे वैगरे  आटपून.. मुले  नेहमी प्रमाणे घरातच  लपंडाव खेळत होती. तिघी जावा घरकामात गुंतल्या होत्या खेळता खेळता सई आईला येवून म्हणाली,

“आई…आई… वेदांत दादा कुठे लपला सांग ना…”

“मला नाही माहित ग सई तू शोधना  मला काम करू दे…घरातच लपला असेल कुठेतरी जा…”

“नाही ना …मी खूप शोधले तो सापडत नाही आहे..”

“अग जा शोध घरातच कुठे  लपला असेल  मिळेल ..”

तेवढ्यातच वेदांतचा बाहेरून जोराने किंचाळण्याचा आवाज आला हा तर वेदांतचा आवाज वाटतोय ….

खेळता खेळता अचानक तो  बाहेर कसा गेला?

आवाज ऐकून रश्मी पटकन हातातील काम सोडून वेदांत कडे धावत गेली  तर

वेदांत बाहेरील झुडपात  डोक्याला मार लागून जखमी होऊन विव्हळत पडला होता .

राखीने त्याला पटकन जाऊन सावरण्याचा प्रयत्न केला तोच रश्मी तिला हाताने

 

ढकलून देत आरोप लावत म्हणाली,

बस पुरे झाली तुझी नाटकं….ऋषीचा  बदला घेण्यासाठी तुच मारलं न माझ्या मुलाला ?”

 

“नाही ग तुझा हा गैरसमज आहे मी नाही मारलं….”

शालू तिथे बाजूलाच झाडाला पाणी टाकत होती दोघींचा आवाज ऐकून धावत आली आणि त्यांना समजावत म्हणाली,

“ही आपसात भांडण्याची वेळ नाही… याला इलाजासाठी पहिले दवाखान्यात नेऊ…”

 

पण दवाखान्यात नेण्याआधीच त्याने जीव सोडला. वेदांत खेळता-खेळता  एकदम बाहेर झुडुपात कसा जाऊन पडला ?  बाकीची मुले तर घरातच  होती हाच एकटा कसा बाहेर गेला ?

 

पहिल्या मृत्यूचा उलगडा होत नाही तोच दुसरा संशयास्पद मृत्यू. आता पोलिसांसमोर खरंतर अजून एका खुनाचे  आव्हान उभे राहिले होते.

 

इन्स्पेक्टर अजिंक्यने रश्मीला  बोलावून विचारले,

“तुम्हाला कोणावर काही संशय ?” कोणाशी दुश्मनी ?

तिने राखीकडे संशयाने पाहिले, शालूने तिला चूप बस अस डोळ्यांनीच खुणावले ..

जिथे वेदांत पडला होता त्या झुडपात जाऊन पोलिसांनी नीट पाहणी केली असता त्यांना तिथे  दूरवर एक चेंडू पडलेला दिसला. तो रश्मीला दाखवत त्यांनी विचारले,

“हा चेंडू इथे कसा ?हा वेदान्त चाच आहे ना ?”

“नाही हा चेंडू तर वेदांतचा नाही…”

इन्स्पेक्टर अजिंक्य म्हणाले आम्हाला तर असा संशय येतो आहे की  वेदांतला मुद्दाम चेंडू देण्याच्या बहाण्याने कोणीतरी येथे नक्कीच बोलावलें असावे…”

दोन संशयास्पद मृत्यू  आणि तेही एकाच याच घरातील यांच्याच मुलांशी त्याची काय दुष्मनी असावी..

शेजाऱ्यांकडून  सुध्दा काही माहिती मिळते का पाहिले .

पण …पाहिजे तसा पुरावा अजूनही  मिळाला नव्हता.  दोन महिन्यात दोन मुलांचा संशयास्पद मृत्यू… सई आणि चिंटूची आता  काळजी लागली होती. या दोघा  सोबत पण काही घातपात होऊ नये. म्हणून त्यांना घरातील मंडळी  बाहेर एकटे खेळण्यासाठी सोडत नव्हती. राखी आणि रश्मी दोघीही आपल्या मुलांना जिवापाड जपू लागल्या.

पोलिसांचा तपास काढणे सुरू होता.

अशातच एक दिवस चिंटू शाळेतून घरी आल्याबरोबर पाणी..पाणी करत चक्कर येऊन जमीनीवर पडला. त्याला असे पडलेले बघून राखी एकदम घाबरून रडायला लागली. तिच्या आवाजाने सर्वजण धावत आले. चिंटूने शालूकडे बोट दाखवले…

तेव्हा  शालू रडत रडतच म्हणाली ,

“तरी मी मुलांना बजावले होते   रिंकू ने दिलेलं काही काहीच खायचं नाही….” बघा आता आपला चिंटू ही आपल्याला सोडून गेला न..

 

 

ईकडे  रिंकू ला ही बातमी समजताच .. ती खूपच घाबरली इन्स्पेक्टर अजिंक्य आता अजून सावध झाले  तिसरा संशयास्पद मृत्यू…”

खूनी खूप चलाख दिसत होता. रिंकू ला घेराव घालून तिची कसून चौकशी चालू केली.

त्यांनी रिंकूला दरडावले ,

“खरं सांग तू मुलांना  आज काय खाऊ घातले ?

” पे..पेढा पण.. मी नाही”

एकदम घाबरून ती म्हणाली,

”  काय दुश्मनी आहे तुझी मुलांसोबत तू असं का वागत आहेस ?”

“नाही … मी काहीच केलं नाही…. मी कशाला मुलांना मारू ?”

“मग खरं काय सांग…”

ती एकदम घाबरून रडू झाली.ते पाहून इन्स्पेक्टर अजिंक्य ने आपल्या साथीदारांना नजरेनेच खुणावत रिंकू ला सोडून द्यायला सांगितले. आणि त्यांना म्हणाले,

“मला नाही वाटत  रिंकूचा यात काही दोष असेल….नक्की या लागोपाठ होणाऱ्या हत्येमागे  दुसऱ्याच कोणाचा  तरी हात  आहे… रिंकूला यात विनाकारण फसवले जात आहे खऱ्या आरोपीला आता लवकरात लवकर पकडलं पाहिजे… रिंकू कोणाशी बोलते, कुठे जाते,काय करते तिच्या बारीक वर नजर ठेवा….आता उरली होती फक्त सई… तीन मुले तर गमावली. खुनीची नजर  आता नक्कीच सईवर असणार आहे…. कसेही करून आपल्याला सईचे प्राण वाचवले पाहिजे..   खुनी या घराच्या आसपासच मिळेल… सईला मारण्या च्या तयारीच आता असेल …”

इन्स्पेक्टर अजिंक्यने खून्याला

पकडण्यासाठी त्याला ओळखू येऊ नये म्हणून घरा भोवताली साध्या गणवेशातील  पोलिस तैनात ठेवली .जेणेकरून काही संशयास्पद हालचाल आढळली तर लगेच कारवाई करता येईल. चिंटूला मरून आठ दिवस होत नाही तोच सई शाळेतून बेपत्ता झाली. घरात एकच गोंधळ उडाला. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. रश्मी ची तर सई गायब झाल्याच्या बातमीने शुद्धच हरपली. पोलिसांनी सईच्या शाळेत जाऊन चौकशी केली तर तिथे कळले की ,

“सई तिच्या काकू सोबत केव्हाच घरी गेली….”

“पण  ती अजून पर्यंत घरी पोहचली नव्हती… नक्कीच काही तरी गोंधळ आहे … आपल्याला  सईचे प्राण वाचवले पाहिजे…”

क्षणाचाही विलंब न करता इन्स्पेक्टर अजिंक्य ताबडतोब घराकडे निघाले.

शालू  बाहेर ओट्यावर बसून काहीतरी निवडत होती पोलीसांना असे दारात पाहून ती घाबरून आवंढा गिळत म्हणाली,तुम्ही ईकडे..का..काय झाले ठीक आहे ना सर्व “नाही” इन्स्पेक्टर अजिंक्य म्हणाले,” सई शाळेतून गायब झाली. ”

“आली का घरी?”

“नाही अजून घरी आली नाही सई…का काय??कसं झालं.. कशी काय गायब झाली ती ”

 

” पण आम्हाला कळले की सई तिच्या काकू सोबत घरी गेली आहे…”

“कोणी ?सांगितले” तिने एकदम घाबरून विचारले.

“कळेल च लवकर”असे म्हणत,

त्यांनी शेजारीपाजारी इकडे तिकडे सईला शोधणं चालू केले.

पण मिळत नव्हती.

इन्स्पेक्टर अजिंक्य म्हणाले,

“असं कस होईल आम्हाला पक्की माहिती मिळाली की सई घरी आलेली आहे…”

त्यांना घराच्या आसपास रिंकू फिरतांना दिसली रिंकूला बोलावून त्यांनी विचारले,

“तू सईला घरी आणले का ?”

तिने नाही म्हणून एकदम घाबरून शालूकडे पाहिले. पोलिस आता घराची तपासणी  करण्यासाठी घरात शिरणार तोच..

शालू ने त्यांना बाहेरच अडवले आणि म्हणाली

सई घरातच असती तर मी सांगितले असते ना.

“आम्हाला आमचे काम करू द्या सईच्या जीवाला धोका दिसतो आहे… बाजूला व्हा…”

असे म्हणून इन्स्पेक्टर अजिंक्य घराची तपासणी करू लागले.त्यांनी घरातील कोपरा न् कोपरा तपासला पण सई घरात नव्हती . पूर्ण घर तपासले आता फक्त शालूची खोली तेवढी बाकी होती.

“मी सांगितले ना…सई घरी नाही आहे.. माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाहीत तुम्ही लोकं…”

शालू जरा रागानेच बोलली,

इन्स्पेक्टर अजिंक्यंना  तिची  वागणूक का..कोणास ठाऊक   आता जरा  संशयास्पद वाटू लागली . ते म्हणाले,

“तुमची खोली तपासू दिली नाही  तर आम्हाला  खूनाच्या आरोपाखाली नाईलाजाने तुम्हाला  अटक करावी लागेल…”हे ऐकून शालू बाजूला सरकली. त्या नंतर

त्यांनी दोन हवालदारांना शालूच्या खोलीमध्ये पाठवले संपूर्ण खोली तपासली पण त्यांना सई  काही तिथं ही मिळाली नाही. इतक्यातच बाहेर निघता निघता त्यांची नजर खोलीतील बंद कपाटाकडे गेली त्या कपाटा मधून कुणाचातरी रडण्याचा आवाज कानावर येत होता, म्हणून त्यांनी ते कपाट उघडले तर कपाटात सई होती. दार उघडल्या उघडल्या सईने पटकन जाऊन आपल्या आईला घाबरून गच्च मिठी मारली.

इन्स्पेक्टर अजिंक्यने शालूवर प्रश्नांचा भडिमार चालू केला. सई ईथे कशी?

तिला तू कोंडल ? म्हणजे? घरातील बाकी , मुलांना पण तूच?

शालू एकदम चिडली .. ओरडून म्हणाली,

“हो…हो.. मीच आहे खुनी.. हत्यारी….मीच घरातील एकेक मुलांना मारले… आज सईला पण संपवणारच होते पण वाचली ना ती…”

मग…

“तू रिंकू ला का यात अडकवत होतीस ?

“कारण तिने मला वेदांतला मारतानी झाडापाशी बघितले होते…. म्हणून…”

“एकापाठोपाठ एक आपल्याच घरच्या निष्पाप मुलांची तुम्ही हत्या केली…  तुमची काय मुलांशी  दुष्मनी होती?”

रश्मी,राखी रडून शालू ला विचारू लागल्या, ती सर्व तर  तुम्हाला आईसारखी मानत होती,

“आईसारखी ? हूं…”

असे म्हणून ती विचित्र हसली. आणि म्हणाली

“मी तर वांझ आहे वांझ…नाही का सासुबाई ?”  गप्प का? बोला ना आता ..

तिच्या प्रश्नाने तिची सासू एकदम चकित झाली,

“हो ना तुम्ही तर नेहमीच म्हणत होता ना,  मुलांची माया कळण्यासाठी पोटी मुलं असावी लागतात.तुला पोटी मुलबाळ नाही.. कुठली हौसमौज नाही.कुठे बाहेर जाण नाही .कोणत्याही शुभ कार्यात सहभाग नाही मग तो घरातला असो किंवा बाहेरचा काय तर अपशकुनी आहे.तू वांझ.. आहे… आहे…वांझ .. हो …मी …वांझ.. आहे यात माझा काय दोष ?सांगा ना वांझ …बाईला काय जगण्याचा अधिकार नसतो ? तिला काही मन नसते ? सुख दुःख नसतात ? प्रेम भावना नसते ? कोण्या स्त्रीला वाटते आपण वांझोटी राहावे ? मी जावांच्या मुलांनाच आपली मुले समजून त्यांना यशोदेच्या मायेने वाढवत होते .त्यांनाच आपल मानून जीवापाड त्यांना जपत होते… पण ही माझी सासू तिला हे माझ सुख पहावत नव्हते . ती मला पदोपदी अपमानित करीत होती… काय तर म्हणे तू वांझोटी … सततच्या अपमानाला मी वैतागले चिडले..  नवऱ्याच्या कानावर ही गोष्ट घातली तर ते पण म्हणतात कसं …

आहेच तू वांझ तर मग घे ना ऐकून सत्य. तेव्हापासुन मी ठरवले… मी आहे वांझोटी आता माझ्यासारखेच माझ्या दोन्ही जावांना ही…मी त्यांची मुले मारून वांझोटी करणार मग त्यांनाही कोणी मान देणार नाही.मला कोणी बोलणार नाही. टोमणे मारणार नाही…

आणि एक एक कारस्थान  रचून त्यांची मूलं माझ्या जाळ्यात ओढायला सुरुवात केली  त्यात मी यशस्वी होत

गेली…मला मजा येऊ लागली…

पण रिंकू ने मला वेदांतला झाडापाशी मारतानी बघितले ..मग काय मी तिला इथूनच.. घाबरवायला सुरुवात केली. चिंटूला  विषारी पेढा  मी जबरदस्तीने खाऊ  घातला . म्हणून शेवटी त्याने माझ्याकडे बोट  पण दाखविले . पण ही गोष्ट कोणाच्याही लक्षात नाही आली.

राखी ,रश्मीचे मुले मारण्याचा… मला  काहीही पश्चाताप  नाही .

असे म्हणून ती जोरजोराने  हसायला लागली…”

.

6 Comments

  1. डॉ. संगीता किशोर वळसे

    अपमान

    द्वेष

    गुन्हेगारी

    विदारक चित्र आहे… रोमांचित कथा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!