‘माहेरचा श्रावण’- कथा
‘माहेरचा श्रावण’- कथा

‘माहेरचा श्रावण’- कथा

‘माहेरचा श्रावण’- कथा

नॅशनल हायवे 6 वरुन गाड़ी वेगात धावत होती. गाडीची चालक एक तरुणी. तिचं नाव युगा! म्हणजे आजीने मोठ्या हौसेने कुलदेवीचे नाव ठेवले, ‘योगेश्वरी!’ पण व्यवहारात सगळे युगा च म्हणायचे. तसे तिच्या बिझनेस व्यवहारात ती ‘योगेश्वरी’ अशीच लफ्फेदार सही ठोकायची!

        गाड़ी वेगात धावत होती. सकाळी सातच्या सुमारास युगा अहमदाबादहून निघाली. सोबत फक्त गाण्यांची! गाण्याचे शब्द मनांत घोळवत मजेत प्रवास सुरु होता. आता साक्रीचा घाट सुरु झाला. हिरवेगर्द जंगल, उजवीकडे पहाडाचा उभा कड़ा, आणि डावीकडे दिसणारे मोठे मोठे पहाड़. अचानक पाऊस पडू लागला. एक मोठी सर पडली. पहाडावरुन पाण्याचे शुभ्र ओघळ वाहताना दिसू लागले. आणि लगेच उनही चमकू लागले. श्रावणाचा खेळ! युगाच्या मनांत आले. 

“अरे हो श्रावण महीना सुरु आहे नाही का!” या कामाच्या धबडग्यात काही कुठे लक्ष जात नाही. घाटातून गाडी धावत होती आणि युगाचे मन तिच्या जन्मगावीच्या लहानपणीच्या श्रावणात धावू लागले.

          युगा नागपूरची. धरमपेठेत तिच्या आजोबांपासूनचा परंपरागत मोठा बंगला. प्रचंड म्हणावे असे आवार. आवारात आंबा, बकुळ, जांभुळ, पेरू, बुच, पारिजात अशी मोठी झाड़े. फुलझाड़े तर असंख्य. घरच्या रोज ची पूजा, सण समारंभ सगळे घरच्या फुलांनीच साजरे होत. चमेली, जाई जुई, मोगरा, गुलाब ही तर नेहमीची मंडळी! पण आजी ने हौसेने शेवंती, कुंद, मे फ्लॉवर, जरबेरा हे ही जोपासलेले. युगाच्या मैत्रीणी रोज अगदी नंबर लावून चमेली जाई जुई ची फुले न्यायच्या. गजरे घालून मिरवायला!

             पावसाळा खूप आवडायचा तिला लहानपणी! पावसाच्या साचलेल्या पाण्यात युगा अन तिच्या मैत्रीणी किती हुंदडायच्या ते आठवून युगाच्या चेहऱ्यावर हसू उमटले!

       युगाच्या नव्या वहिनीच्या पहिल्या मंगळागौरीला केवढी धमाल केली होती. युगा आणि तिच्या मैत्रीणी आदल्या दिवशी संध्याकाळी वहिनीबरोबर पत्री तोड़ू लागल्या. जाई जुई, गुलाब, मोगरा, कन्हेरी, चमेली, कुंदा, तगर, दूधिमोगरा, जास्वन्द, हे तर झालेच पण मंगळागौरीला खास आघाडा, केना, रुई, बेल, धोत्रा ही पत्री हवीत. दूर्वा, तुळस तर रोजच्या पूजेला. रात्री वहिनीच्या आणि सगळ्या मुलींच्या हातांवर मेंदी रंगली.

       नव्या वहिनीबरोबर पूजेला पाच वशेळ्या म्हणजे पाच नविन लग्न झालेल्या मुली होत्या. सगळ्यांनी शालू दागिने गजरे वगैरे छान तयारी करून पूजा केली. पुरणाच्या दिव्यांनी मंगळागौरीची आरती झाली.  पाहुण्या बायका ही पुष्कळ होत्या. पुरणपोळी, वड़े भजी, कढी, पालकची

 

डाळभाजी, बटाट्याची सुकी भाजी, काकड़ीची कोशिंबिर, वाटली डाळ, पंचामृत असा नागपुरी मेनू होता.

             संध्याकाळी अत्तराच्या घमघमाटात, हास्याच्या फुलोऱ्यात, उखाण्यांच्या जोशात हळदीकुंकू पार पडले. फराळाला मटकीची उसळ, चिवड़ा आणि बेसन वडी असा पारंपरिक मेनू होता. आजी, आई आणि पाहुण्या बायका रात्री मंगळागौरीचे खेळ खेळायला तयार होत्या! युगा आणि तिच्या मैत्रीणी तर उत्साहाने नुसत्या निथळत होत्या!

  रात्री मंगळागौरीची आरती केली. मग खेळ सुरु झाले. सुप नाचवणे, फुगड्या, बसफुगड़ी, कोंबड़ा, फेर धरणे, खुर्ची का मिरची, सगळा बंगला आणि आवार दणाणून गेले होते.

         युगाच्या मनांत श्रावण झिम्मा खेळत होता. हिरवीगार वनश्री, पावसाची रिमझिम, पावसात भिजून चिंब होणे. बगिच्यात झुल्यावर खेळत राहणे. 

         आता नागपूर ला जातेच आहे तर बोरगांव ला नक्की जाऊन येइन. किती दिवसात शेतावर जाणं झालं नाही. आजी आजोबा एकेक करून गेले. मग बाबा. बाबांनी दादा ला अखेरच्या वेळी बोरगांव ची शेती विकू नको म्हणून बजावून सांगितले होते. आजोबांच्या, बाबांच्या हातची आंब्याची, पेरुची झाड़े होती. दादाने ते ऐकले. त्याला शेताकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. पण शिवाकाकाच्या भरवशावर चालले होते. शिवाकाका तिच्या आजोबांच्या वेळपासून विश्वासू गड़ी होता. आता त्याचा मुलगा राजू व सुनही शेतात कष्ट करायचे. शेतीचा हिशोबठिशोब वहिनीच बघायची.

        धुळ्यात जेवण करून युगा पुढे निघाली. 

रात्र अर्धी होता होता ती घरापर्यंत पोहोचली.

दादा वहिनीच्या भेटी झाल्या. जुई आणि ओम दोन्ही भाचरे ‘आत्या, आत्या’ करत तिला चिकटले होते. रात्री गोष्ट सांगायचे ठरवून ती मुलांच्याच खोलीत झोपायला गेली.

     सकाळी चहा घेतानाच, “वहिनी, आज तू मी आणि बच्चेकंपनी डबापार्टी करायला बोरगांव ला जाणार आहोत!” असे युगाने फर्मान काढले!

“य्ये य्ये” करत जुई व ओम नाचू लागले.

सगळी तयारी करून मंडळी निघाली. युगा गाड़ी चालवता चालवता वहिनीशी गप्पा मारत होती. तिच्या डोळ्यांपुढे आमराई, पेरू, जांभळीची झाड़े, लहरणारे शेत होते. गाड़ी शेताच्या कच्च्या रस्त्यावरुन आत वळली. शिवाकाका, राजू लगबग करून धावत आले. पडवीत खाट टाकली. त्यावर चादर टाकून बैठक केली. सून पाणी घेऊन आली. 

“काका काकी कसे आहात? राजू, वैनी कसे चालले आहे?”

युगाने आपुलकीने सगळी चौकशी केली. राजू च्या मुलांना खाऊ दिला.

“चला मला शेत बघायचे आहे. तिथेच छान जेवण करू.”

 शेतात तुर फुलांवर होती. कापूस वाढत होता. एकीकडे भाजीपाला होता. पण आंबा पेरू ची झाड़े कमी दिसत होती. युगाच्या डोळ्यांपुढे जे चित्र होते त्याच्या निम्म्यानेही हिरवाई नव्हती.

“शिवाकाका, आंबे पेरू ची झाड़े खूप कमी दिसताहेत?”

“हो  ताईसाहेब, तीन चार झाड़े तोडावी लागली. एक वादळात पडले. एकाला उधई लागली म्हणून तोडले. पेरू, पपई ची झाड़े माकडांच्या त्रासाने कमी केली बघा!” शिवाकाका बोलला.

      पण युगाला तिच्या मनातली बाग सापडत नव्हती. काहीतरी हरवले होते, जे तिला अस्वस्थ करत होते.

         नागपुरातले तिचे महत्वाचे काम दूसरे दिवशी आटोपले. निघताना दादा वहिनीशी खूप बोलणे झाले. तिच्या मनांत काही घोळत होते ते ती दोघांशी बोलली. काहीतरी खुणगाठ मनाशी बांधूनच परत आली.

      पुढच्याच वीकेंडला युगाने लगेच अमदाबादेत असलेल्या तिच्या शाळासोबती चंदू, सिव्हिल कॉन्ट्रेक्टर शी बोलली. प्लान पक्का झाला. बजेट ठरले. काम कधी पूर्ण होणार ते ठरले. तिला अचानक आठवले. वहिनीला फोन लावून विचारले, “अग, तिथे एक खानावळ चालवणारे कुटुंब होते, त्यांचे कसे काय आहे? माझी मैत्रीण होती ती कुठे आहे?”

वहिनीकडून माहिती घेऊन पुढील सगळे प्लान केले.  जिथे जिथे म्हणून तिचे शाळासोबती होते त्यांना बरोबर कामाला लावले!

         या सगळ्या धावपळीत दोन तीन वर्षे निघून गेली. एक दिवस चन्दूकडून काम फत्ते म्हणून निरोप आला.

आणि जाहिरात झळकली, “माहेरचा श्रावण”

        दोन लक्झरी बसेस उभ्या होत्या. एक आमंत्रित पाहुण्यांसाठी तर एक युगा, तिच्या बहिणी व त्यांचे कुटुंबिय!

श्रावण महीना लागला होता. युगाच्या भाचीची पहिली मंगळागौर बोरगांव ला होणार होती. 

“माहेरचा श्रावण” चे फलक झळकत  असलेल्या दोन्ही लक्झरी बसेस निघाल्या.

       बसेस बोरगांवला पोचल्या. पाहुण्यांचे स्वागत शिवाकाका, राजू व त्याच्या पत्नीने केले. भव्य वाडा बांधला होता. मध्यभागी मोठ्ठा हॉल, त्याच्या दोन बाजूंनी स्वतंत्र फ्लैटसारखे तीन तीन सूट, एका बाजूने काही सुट्या खोल्या, सर्व खोल्याना अटैच बाथरूम्स. एकीकडे मोठे किचन व लागूनच डायनिंग हॉल!  चंदुने युगाच्या कल्पनेप्रमाणे अचूक व दर्जेदार बांधकाम करून दिले होते. शिवाकाका व काकुला स्वतंत्र व सुसज्ज खोल्या. राजू व त्याच्या कुटुंबाला सुद्धा! तेच देखरेख करणार होते. 

       चार दिवसांच्या संपूर्ण जेवण, नाश्ता, चहापाणी, फराळ, वगैरे व्यवस्था; युगाची ती खाणावळ चालवणारी मैत्रीण व तिचे कुटुंब बघणार होते. तिला युगाने मैत्रीची आठवण देऊन मदतीचा हात दिला. 

       पाहुणे मंडळी आपापल्या खोल्यांमध्ये स्थिर झाली. दादा वहिनी आले होतेच! दादा भटजी ना पूजेसाठी सविस्तर सूचना सांगत होता. युगा मात्र वहिनीचा हात पकडून तिला शेता कड़े घेऊन आली. 

         शेतावर हिरवाई पसरली होती. कापसाच्या रांगेत मधली एकेक रांग तुरी ची झाड़े डोलत होती.

पिवळीधम्म फुले मिरवत करड़ी डोलत होती. भाज्यांचे वाफे बहरलेले होते. नवीन बांधलेली मोठी विहीर जाळीने झाकली होती. मोटरचा आवाज सुरु होता. युगा आणि वहिनी बोलत बोलत मंदिरात आल्या. सुंदर, प्रशस्त व देखणे शिवमंदिर बघून युगा प्रसन्न झाली.

“चंद्या, तुला पैकी च्या पैकी मार्क दिले बघ!”

युगा मनांत बोलली.

     आंब्याची झाड़े आता नीट निगा राखलेली दिसत होती. पेरू व पपईची बाग ही छान दिसत होती. मन्दिराभोवती आखीवरेखीव बाग होती. बकुळ, बेल, सोंनचाफ़ा ही दिसत होता.

जाई जुई, गुलाब, मोगरा, कन्हेरी, चमेली, कुंदा, तगर, दूधिमोगरा, जास्वन्द!

तुळशी चे तर बन होते. शिवाकाका उत्तम काळजी घेतो हे दिसत होते.

        सगळीकड़े हिरवाई बघून मन प्रसन्न झाले. युगा व वहिनी मंदिराच्या पायरीवर विसावल्या.

      ” काय योगेश्वरी माते, झाले ना तुझ्या मनासारखे?” वहिनी कौतुकाने बोलली.

“वहिनी!” युगाने तिच्या गळ्यात हात टाकले.

“गेल्या वेळी आले होते ना वहिनी, तर माझ्या डोळ्यांत लहानपणीचा श्रावण होता. पण प्रत्यक्ष पाहिले तर तो हरवला होता. मग मीच ठरवले. तो श्रावण पुन्हा परत आणायचा. पण फक्त मला एकटीला नको. ज्या मुलींना माहेर उरले नाही त्यांच्यासाठी माहेरचा श्रावण आणायचा. त्यांना माहेरपण उपभोगू द्यायचे. म्हणून हेसगळे उभे राहिले. आताही या सगळ्या माहेरवाशीणी आहेत; ज्यांना माहेरचे सुख मिळत नाही. त्यांनी फक्त प्रवासखर्च भरायचा. सोबत बहिणी, मैत्रीणी, अगदी आई, सासु ननंद आणली तरी छान! चार दिवस इथे बागेत, शेतात रमायचं, सण साजरा करायचा! श्रावणाचे झूले झुलायचे!

पुढच्या आयुष्य घालवण्यासाठी टॉनिक पिऊन जायचे! कशी आहे कल्पना?”

वहिनीने काहीच उत्तर न देता केवळ युगाला जवळ ओढुन तिच्या मस्तकाची पापी घेतली!

              “अग पण युगा, तुझा महादेव कधी प्रसन्न होणार गं?” वहिनीने कळीचा प्रश्न विचारला!

“अग, मी त्याला म्हणते की इथे काही प्रगती नाही तुझ्या गावात. तू तिकडे ये. तर तो त्याच्या घराला सोडून यायला तयार नाहीय.

पण वहिनी, मी विचार करतेय की काही वर्षात मीच इथे राहायला येईन. इथे किती शांत वाटतंय. मग आणीन त्याला इथे! तोपर्यंत वाट बघिन त्याची!!” युगाने विषय बदलला!

              माहेरच्या पाहूण्यांनी शेतात, बागेत खूप मजा केली. झोपाळ्यांवर खेळल्या. मंदिरात, झाडाझुंड़पात  हुंदडल्या.

      मंगळवारी युगाच्या भाचीची मंगळागौर झाली. झगमग साडया, दागिने, गजरे, अत्तर सगळा माहौल अगदी उत्सवी होता. थाटामाटात सगळ्याजणीनी पूजा केली.

पुरणपोळी, वड़े भजी, कढी, पाटोड़ी ची भाजी, बटाट्याची सुकी भाजी, काकड़ीची कोशिंबिर, वाटली डाळ, पंचामृत असा नागपुरी मेनू होता. दुपारी जेवणाच्या पंगती झाल्या.

रात्री जागरणासाठी नागपुरातले प्रसिद्ध मंगळागौरीचे खेळ करणारे महिलामण्डळ आले. हॉलमध्ये खेळायला सुरवात झाली.

मंद सनई चे सूर पसरत होते. सगळ्याजणी भान हरपून खेळत होत्या, हसत होत्या! श्रावणातली मंगळागौर उत्साहाने साजरी होत होती. माहेरवाशीणी स्त्रियांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.

        युगा कॉफीचा कप घेऊन व्हरांड्यात कट्टयावर बसली. रिमझिम पाऊस सुरु झाला. 

युगा डोळे मिटून पावसाचे तुषार चेहऱ्यावर झेलत होती. तिच्या डोळ्यांतले माहेरच्या श्रावणाचे स्वप्न पूर्ण झाले होते!! किती तरी माहेरासाठी झुरणाऱ्या स्त्रियांना आता हक्काचे माहेर मिळणार होते!!

©मीनाक्षी दामले आडे

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

 

           

 

2 Comments

  1. पद्मा दाबके.

    खूप छान संकल्पना व त्याची अंमलबजावणी. त्याची मांडणी करणारी भाषाही सुरेख.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!