२० गुंता एका स्त्री मनाचा
२० गुंता एका स्त्री मनाचा

२० गुंता एका स्त्री मनाचा 

 

सुमी च्या आठवणी च्या रस्त्याने एक वळण मागे घेतले.

तिला आठवले , माझा मोठा मुलगा शेवटच्या वर्षाला असताना कॉलेजमधून कॅम्पस सिलेक्शन होऊन त्याला नोकरी लागली होती. त्या वेळी मला खूप आनंद झाला होता. कार्यालयात व घरी शेजारी लोकांना पेढे वाटून ही गोड बातमी मी सर्वांना अभिमानाने सांगितली होती. आता त्याचे लग्न करावयाचे होते. त्याने त्याच्या कॉलेजमधली मुलगी निवडली होती.

सुंदर, बुद्धिमान, सुस्वभावी असल्याने मलाही ती पसंत पडली होती. तिच्या घरच्यांनाही मुलगा आवडला होता. त्यामुळे लग्नाची तयारी सुरू होती . पत्रिकेवर बापाचे नावही टाकायला मुलगा तयार नव्हता. तिरस्काराची आग माझ्यासारखीच मुलांच्या मनातही तेवढीच तीव्र होती. याची जाणीव झाली. मला ही त्याची सावली नकोशी होती. त्यामुळे लग्नात त्याला आम्ही बोलविले नाही. किंवा निरोपही दिला नाही.
परंतु लग्नाच्या दिवशी तो मंडपात आला. केस पिकलेले, चेहऱ्यावर तीच घाणेरडी भिरभिरती नजर, साधारण कपड्यात आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर आला. माझ्या नजरेत आपोआप तिरस्काराची भावना आली ती चेहऱ्यावर उमटून गेली. तो माझ्याकडे बघून लगेच बाजूला गेला.

माझ्या बहिणीसोबत राहत असतानाच त्याचे दुसऱ्या बाईसोबत सुत जुळले व त्यामुळे त्या दोघांचे भांडण होऊन आता तो त्या दुसऱ्या बाईकडे राहतो असे कळले.

माझ्या दुसऱ्या मुलाने त्याला जेवण करू दिले आणि लगेच मंडपाच्या बाहेर काढले. असे त्याने नंतर सांगितले .त्याचा घरात प्रवेश करण्याचा, आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न विफल झाला.
लग्न आटोपले सर्व काही सुरळीत पार पडले. काही दिवसात मुलगा व सून त्याच्या नोकरीच्या ठिकाणी निघून गेले. लहान मुलगा कॉलेजला निघून गेला .मी ,माझी नोकरी आणि माझे एकटेपण हेच माझे जीवन होते .मुलांचे सर्व सुरळीत होत होते याचे समाधान होते.

मला एकांतात विचार आला ,स्वतःच्या मुलाच्या लग्नात एक बाप म्हणून त्याला काय वाटत असेल. त्याच्या कृत्याचा त्याला पश्चाताप वाटत असेल का, त्याच्याकडे बघून तर असे वाटत नव्हते.

तो इतका निगरगट्ट आणि बेशरम स्वार्थी अन् वासनांध आहे की, मी व माझ्या मुलांच्या दूर जाण्याचा त्याला काही फरक पडला नाही असेच त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होते. किती वर्षांनी बघितले त्याला .केवळ केसांचा रंग बदलून पांढरा झाला होता. त्याशिवाय शरीराने तर पूर्वीसारखाच सुदृढ दिसत होता. तो आधी पासून च स्वतःच्या प्रकृतीला खुप महत्त्व देत होता. प्रकृतीची काळजी घेणे व शरीराचे लाड पुरवणे हीच तर त्याची जीवनपद्धती होती. स्वतःला चिमटा काढत भूतकाळातून बाहेर पडली.

काही वर्षातच त्याला असाध्य रोग जडल्याचे कळले त्याच्या दुसर्‍या बायकोनेही त्याला घरातून हाकलून दिले होते. आता तो वेगळा एकटाच राहतो असे कळले. त्याचे भावंड आणि नातेवाईक यांनी पण त्याच्याशी संबंध तोडले होते. हे माझ्या मुलांनाही कळले. त्याच्या कर्माचे फळ त्याला भोगु दे , मुले म्हणाली. आधी त्याच्याबद्दल तिरस्कार होताच. कर्माचे फळ येथेच भोगावे लागते . हाच नरक हाच स्वर्ग याचा प्रत्यय आला.

एकदा भाजी आणायला मार्केटला गेले तर ते दृश्य बघून मनाला हादराच बसला . मुलगा कार मध्ये बसला होता. त्याला लगेच आवाज देऊन बाहेर बोलावले. समोर चे दृश्य बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. माझा नवरा, माझ्या मुलाचा बाप ,कोपऱ्यात बसून इतर भिकाऱ्यांसोबत बसून होता. डोळे खोल गेलेले, शरीर कृश झालेले ,अत्यंत केविलवाणे हावभाव करून तो हात पसरून भीक मागत होता.
मुलाने लगेच मला सावरले आई, काय विचार करतेस ..तो मला घेऊन माझ्या नवऱ्या जवळ गेला. त्याच्या हातावर रुपयाचे नाणे ठेवले . आणि त्याच्यावर जळजळीत नजर टाकून माझा हात धरून पुढे जाऊ लागला.

तोच त्याने, माझ्या नवऱ्याने माझे पाय धरले, मला माफ कर ,मला घरी घेऊन चल, मला तुझ्या नोकरा सारखे ठेव. मला घरी घेऊन चल. असे म्हणून विनवण्या करू लागला. इतरांच्या नजरा आमच्याकडे रोखण्याआधी तिथून निघायला हवे होते. म्हणून माझ्या मुलाने एक झटका देऊन त्याचा हात बाजूला केला आणि खबरदार, माझ्या आईला स्पर्श कराल तर. आतापर्यंत मजा मारली ना, आता भोगा. असे म्हणून मला ओढतच गाडीकडे घेऊन गेला.

माझ्या डोळ्यासमोरुन ते दृश्य हलत नव्हते. मी काहीच बोलू शकले नाही .माझा मेंदू बधीर झाला होता. किती भयंकर परिणाम…..कल्पनेनेच माझे अंतकरण गोठले होते.

क्रमशः

 

आधीच्या भागाची लिंक

https://marathi.shabdaparna.in/१९-गुंता-स्त्री-मना

सुमीच्या नवऱ्याने सुमीचे संपूर्ण आयुष्य नासवले.त्याची शिक्षा त्याला मिळाली आणि तिचे त्याच्या आयुष्यातील महत्वही त्याला समजले पण तोवर खूप  उशीर झाला….
पुढे वाचा….

https://marathi.shabdaparna.in/२१-गुंता-स्त्री-मना

गुंता….कथामालिका कशी वाटत आहे….नक्कीच कळवा.

error: Content is protected !!