मृत्यू- मराठी लघुकथा
व्हेंटिलेटरवर
थोडा थोडा शुद्धीवर आलेला निषाद.
समोर Cardiac Moniter दिसत आहे.
धक् धक् धक् धक्
दोन डाॕक्टरमधील हळू आवाजात होणारी कुजबूज ऐकू येत आहे त्याला.
‘घरच्यांना कळवायला पाहिजे,’
जास्तीत जास्त एक दिवस
चोवीस तास.
निषाद थरारला.
निवृत्त होऊन दोनच तर महीने झालीत.
आणि हे डाॕक्टर्स असे अभद्र बोलत आहेत.
पाच सहा वर्षांपासून निवृत्तीनंतर काय करायचे याची आखणी सुरु केली आपण शरयु सोबत.
आयुष्यभर अपुऱ्या राहलेल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत.
आणि मग हे काय?
भलतेच ऐकले.
निषादला अंधूकसे आठवत आहे
.परवा सकाळी शरयु बरोबर Morning Walk ला निघतांना छातीत दुखायला लागले.बस्स एवढेच आठवत आहे.
पुढे काय झाले?
माहीत नाही.
काही आठवत नाही आहे.
चोवीसच तास आहेत आपल्याजवळ.
फक्त चोवीस
निषाद हबकला.
निषादला न्यायला आलेला मृत्यू
दारात येऊन थडकला.
घाईत असल्यासारखा.
जीवाचा थरकाप झाला.
काय कमावले अन् काय गमावले?
ठरवलेले किती पूर्णत्वास गेले अन् किती अपूर्ण राहिले.
काय केले अन् काय करायचे राहले ?
डोक्यात सगळा गोंधळ उडालेला.
कित्येक गोष्टी वेळ आहे, ‘करु नंतर’ म्हणून सोडून दिलेल्या.
त्या आता कायमच्याच सुटणार.
काय काय करायचे होते निवृत्त झाल्यानंतर
आवडीचे राहून गेलेले सिनेमे,
नाटक,
गाणे(आॕफिसच्या धावपळीत साधी गाणी ऐकता आली नाही कधी)
गावाकडे असलेली शेती करायची,
लोन काढून घेतलेल्या टेरेस फ्लॕटची सजावट अजून राहली आहे टेरेसवर बाग तयार करायची आहे.
नदीशेजारी एक जागा घेतली,
तिथे फार्महाऊस बाधायचे आहे.
आंबा,चिकूची झाडे लावायचे आहे त्यात.
शर्वरीला स्वयंपाकात मदत,
नातेवाईकांच्या भेटीगाठी,
मिंत्रांसोबत मौज करायची आहे.
खूप फिरायचे आहे,
थोडे बिनधास्त जगायचे आहे,
थोडी धमाल करायची आहे.
वयाचा विसर पडून मौज करायची आहे.
यादी साधीशीच पण न संपणारी.
जिवापाड जपलेली माणसे निषादला आता कधीही दिसणार नाहीत.(या विचारानेच शहारला तो.)
आयुष्यातील एकेक दिवस संपतांना सगळेच संपणार हे कसे विसरलो आपण?
आयुष्यातील ५८ वर्ष कशी संपली?
आनंदात,दुःखात,मजेत,काळजीत
आता नाही सांगता येणार.
मृत्यू अचानक न येता सांगून आला तर एकही मनुष्य तृप्ततेने जाणार नाही.
इच्छा न संपणाऱ्या असतात.
एक पूर्ण झाली कि दुसरी हजर.
आनंदात किती क्षण जगलो ते आठवत नाही अशावेळी.
जे राहून गेले त्याचेच दुःख जास्त असते.
आयुष्यात मिळवलेल्या गोष्टींची वजाबाकी आणि
न मिळालेल्या गोष्टींची बेरीज होत राहते.
‘आता माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या. मी जायला मोकळा.’
हे बोल क्षणिक आणि फसवे.
मी मरणाला घाबरत नाही,
हसत हसत सामोरा जाईल असे अभिमानाने म्हणणारा निषाद आज हतबल आहे
मरणापूढे.
‘थांब ना थोडे दिवस
आत्ता आत्ता तर जगणे सुरु केले
तेवढ्यात तुला मला न्यायची घाई,
थोडे तर मनासारखे जगू दे’.
असे मृत्युला विनवित राहिला.
‘मी येतो नंतर,
तू हो पुढे’
असे मरणाला सांगता येत नाही.
निमुटपणे जावेच लागते सगळ्यांना एकएकटेच.
विचार करुन निषादला थकवा आला.
आयुष्यभर तक्रारी केल्या तरी आयुष्याच्या शेवटाला जगणे जास्त सुंदर दिसते,
ते संपूच नये असे वाटते.
विचार करुन थकला निषाद.
गाढ झोप येत आहे असे जाणवले त्याला.
सकाळी घरचा फोन वाजला.
शरयु जागीच होती निषादच्या काळजीत.
तिने धडपडत फोन उचलला.
पलीकडून नर्सचा आवाज आला.
निषाद गेले.
शरयुच्या किंकाळीने निषाद जागा झाला.
बाजूला शरयु शांत झोपून होती.
मी जागा कसा झालो?
म्हणजे ?
ते स्वप्न होते तर
दुःस्वप्न.
मी जिवंत आहे.
चाललोय जन्मापासून मृत्यूकडे
क्षणाक्षणाने अविरत
जन्माचा उत्सव सुरु असतो तेव्हाच काही क्षण,दिवस कमी झालेले असतात आयुष्याचे.
वेगवेगळ्या टप्प्यावर थोडावेळ थांबून पुढचा टप्पा गाठत शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहचायचे असते.यातून कुणाचीच सुटका नाही.
गरीब-श्रीमंत
स्त्री-पुरुष
जात-पात
हा भेद नसतो त्याच्याजवळ.
पण नेमके हेच विसरत राहतो आपण.
तिथे आपण पोहचणारच हे तर ठरलेले असतेच फक्त कधी? याबाबतीत मात्र आपण सगळे अनभिज्ञ असतो.
प्रत्येक सूर्योदयागणिक आपण ज्याच्या जवळ जात आहोत.
तिथवर पोहोचलो कि संपले सगळे….
हे माहीत असून स्वप्नातही आपण त्याला कल्पू शकत नाही…..
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा








वाहवा
मृत्यू अटळ आहे.. हे सत्य..खूप छान शब्दरचना
Khup chan 🌹
खुप छान लिहिलंय
मृत्यु हे सत्य असून सर्वांनी आनंदीत जगायला हवे .
छान लिखाण .
वा खरच स्वपनातही वास्तव मांडलत
उद्याची वाट न पाहता …आजच जगून घ्यावे… खूप वास्तववादी लिखाण …
खूप यथार्थ रचना केली.
खरे आहे तो कोणासाठी थांबत नाही. बघत नाही काहीच कोणाचं काय जगायचं राहील , कोणाचे किती स्वप्न , किती जबाबदाऱ्या किती कर्तव्ये, झालेली धावपळ, राहिलेले निवांत क्षण.
काही काही बघत नाही तो..
अगदी सत्य… अप्रतिम लिखाण 👌
सुंदर लिहिले