मंगलकार्यालयात लगबग सुरु होती. प्रसन्न वदनाने इकडून तिकडे एकमेकींना न्याहळत चाललेल्या स्त्रिया, खूप दिवसांनी एकमेकांना भेटलेल्या नातेवाईकांच्या गप्पा, मोठे गप्पामंध्ये ,कामामध्ये व्यस्त असल्याने त्याचा फायदा घेऊन मस्तीत बागडणारी लहान मुले,
लग्नाची जबाबदारी घेतलेल्यांची धावपळ सगळे वातावरणच आनंदी वाटत होते.सनईचे मंद आवाजातील सूर वातावरणातील प्रसन्नता अजूनच वाढवत होते.
घरचे स्त्री आणि पुरुष येणाऱ्यांचे स्वागत करण्यात मग्न होते. सर्वांचा यथोचित मानपान करत होते.चेहऱ्यावर कार्य व्यवस्थित आटोपले पाहिजे ही चिंता दिसत होती.
वंदनाताई , नवरीची आई मात्र वेगळ्याच विंवचनेत होती.
लग्नाचा मुहूर्त आता अगदी एका तासावर आला.
वर आणि वराकडील मंडळी मंगलकार्यालयाच्या दरवाज्यापाशी पोहचली होती.
वधूकडील वडीलमंडळी घाईघाईने त्यांच्या स्वागतासाठी बाहेर गेली. वराकडच्या मंडळीचा थाट वाखाणण्याजोगा होता.
वर मिहिर देखणा, चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता.त्याचेआईवडील दोघेही डाॕक्टर.बुद्धी चेहऱ्यावर झळकत होती. श्रीमंती दिसत होती पण तोरा नव्हता श्रीमंतीचा.
मानसन्मानासह वर आणि मंडळीचे कार्यालयात आगमन झाले.
सगळ्यांना नवरदेव कसा दिसतो ही उत्सुकता होतीच.
लग्न मुहूर्तावरच लागले पाहिजे हा आग्रह दोन्हीकडील मंडळींचा होता.मुहूर्ताची वेळ आता झालीच होती.
वंदनाताई आत जाऊन त्यांच्या लाडकीला उर्वशीला घेऊन आल्या.
उर्वशी,वंदनाताईंनी तिच्या सौंदयामूळेच तिचे नाव उर्वशी ठेवले होते.
आज नवरीच्या मेकअपमध्ये तिचे आरसपाणी सौंदर्य अधिकच खुलले होते.
ती बाजूला येऊन उभी राहताक्षणी मिहीरची नजर खिळली तिच्या चेहऱ्यावर.
किती सुंदर दिसते उर्वशी
तो कुजबुजला.
लग्न मुहूर्तावर आटोपले. सप्तपदी झाली.
कन्यादान झाले आणि उर्वशीची पाठवणी करण्याची वेळ झाली. वंदनाताईंनीआतापर्यंत महत्प्रयासाने आवरलेला हुंदका आता थांबवणे कठिण होते.
उर्वशी दहा वर्षाची असतांनाच तिचे वडील श्रीकांतचे अपघाती निधन झाले होते.तेव्हापासून उर्वशीची आईही तीच आणि बाबाही तीच होती.
एका शाळेत शिक्षिकेची नौकरी करुन उर्वशीला वाढवले.
दिर,जाऊ शेजारीच राहायचे.आणि सोबत सासुबाई होत्या. दोन वर्षापूर्वी त्याही गेल्या. सासर,माहेर दोन्ही नातेवाईकांनी वंदनाताईंना खूप आधार दिला.
त्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांना मदत केली.एकप्रकारे वंदनाताईवर त्यांचे उपकारच होते.
घरात दोघीच होत्या आजवर.
उर्वशीशिवाय एकटीने राहायची कल्पनाही करु शकत नव्हत्या.
वंदनाताई हमसून हमसून रडायला लागल्या.
उर्वशीचाही बांध तुटला. आईला बिलगून तीही रडायला लागली.मिहीरला उगाचच अपराध्यासारखे वाटायला लागले. वंदनाताईंनी काळजाचा तुकडा मिहिरच्या स्वाधीन केला.
उर्वशीची पाठवणी झाली.
बरीचसे पाहूणे याच शहरातील असल्यामूळे आपापल्या घरी निघून गेली. वंदनाताईंना सोबत म्हणून त्यांची जाऊ थांबली.वंदनाताई उर्वशीची पाठवणी करुन घरात आल्या.उर्वशीशिवाय घर उजाड,भकास वाटत होते.
घराचे घरपण उर्वशी सोबत घेऊन गेली होती.
वंदनाताई उर्वशीशिवाय घरात कधी राहल्याच नव्हत्या.आता शेवटच्या दोन वर्षात उर्वशीच्या एमबीए मूळे त्यांना एकटीला राहावे लागायचे पण वेळ मिळेल तेव्हा तिला भेटून यायच्या. आता उरलेले आयुष्य उर्वशीशिवाय कसे घालवायचे? ह्दयात कालवाकालव झाली.
उर्वशीच्या हुकूमानुसार हे घर चालायचे. तिने जे म्हंटले ते,जसे म्हंटले तसे.
घराच्या भिंतींचा रंग,सोफ्याची डिझाईन ,पडद्याचे कापडजेवणाचा बेत,सगळे सगळे ती ठरवणार.
तिने काही म्हंटले आणि झाले नाही असे या घरात कधी झाले नाही. पण तिच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय मात्र तिचा तिला घेऊ दिला नाही. खूप दुखावली ती. पहिल्यांदा तिला आईकडून नकार मिळाला होता.
वंदनाताईचे डोळे परत पाण्याने भरले.
तिचे बाबा असते तर कदाचित् उर्वशीच्या बाजूने निर्णय झाला असता. मी सगळ्यांना डावलून निर्णय नाही घेऊ शकली. निर्णय चूक कि बरोबर माहित नाही.पण माझी पोर आनंदी नाही हे नक्की.
वंदनाताई हळूहळू चालत बाहेर बागेतल्या झोपाळ्यावर येऊन बसल्या.
झोपाळा उर्वशी साठीच लावला होता. झोपाळ्यावर बसल्याबसल्या परत आठवणी जाग्या झाल्या.
घरात उर्वशी एकटी असल्यामूळे मैत्रिणी खूप असायच्या तिला.दिवसभर नुसता हैदोस चालायचा घरात. बागेत,घरात सगळीकडे धुडगुस घालायच्या या पोरी.
उर्वशीचे वर्णन कसे करु?ती माझाच एक भाग आहे. पण माझ्यापेक्षा ती तिच्या बाबांसारखी जास्त आहे.
हट्टी पण प्रेमळ. स्वच्छ,निर्मळ मनाची.
किती छान आयुष्य सुरु होते तिघांचे.
सुख,समाधान ओसंडून वाहत होते घरात.
आम्ही दोघे आणि दोघांचे प्राण असलेली उर्वशी.
भरभरुन आनंद होता घरात. पण अकस्मात उर्वशीचे बाबा गेले घरातला आनंद सोबत घेऊन.
केवळ उर्वशीसाठी मी सावरली. तिच्या बाबांशिवायचे दोघींचे वेगळे जग बनले. आणि आज ती पण गेली.
सुखाने गेली असती तर यातही आनंदच होता तिचे नवीन जीवन सुरु झाल्याचा. पण तसे झाले नाही.
आयुष्यात एकदाच मी तिला समजून घेऊ शकले नाही.नव्हे तिच्या भावना समजत होत्या पण दुर्लक्षित कराव्या लागल्या.
ग्रॕज्युएशन होईस्तोवर सर्व व्यवस्थित सुरु होते.एमबीए करायला गेली नी दूर होत गेली आईपासून,घरापासून.
जावेदने जादू टाकली होती तिच्यावर. जावेदच्या प्रेमात वेडी झाली होती.
मी जेव्हाही जायची माझ्या लक्षात यायचा तिच्यातला बदल. तिची मोहरलेली पण हरवलेली नजर.माझ्यासोबत असूनही माझ्या सोबत नसलेली ती. माझी लेक प्रेमात पडल्याचे संकेत कळले होते मला. मीही मनोमन सुखावले.
कोणी का असेना आपण लग्न लावून द्यायचे असे मनात ठरवून टाकले.
कोण असेल तो?
उत्सुकता शिगेला पोहचायची कधी कधी पण ती सांगेलच या विश्वासाने काही दिवस वाट बघण्याचे ठरवले.आणि त्यादिवशी तिने सांगितलेही.
क्रमशः
विधिलिखित भाग-२ वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे लिखाण marathi,shabdparna.in वर पाठवू शकता.
आमचे साहित्य आवडत असल्यास नक्की
like,comment,share करा.
प्रिती








मस्तच
खूप छान
छानच