गजरा-मराठी प्रेमकथा – भाग-३
गजरा-मराठी प्रेमकथा – भाग-३

गजरा-मराठी प्रेमकथा – भाग-३

संदीपच्या हातात त्याने तिच्या मुलाच्या हातात ठेवलेल्या नोटा ठेवून निघून गेली.
संदीपला जाणवली त्याची चूक.
मानी मानिनी कुणी दिलेले पैसे स्विकारणार नाही हे आपल्याला कसे कळले नाही?
विमनस्क अवस्थेत संदीप घरी पोहचला.
त्याच्या मनात आले, मानिनी भेटलीच नसती तर किती बरे झाले असते.
किमान त्याने जपलेल्या तिच्या मधूर,सुंगधी आठवणी तरी तशाच राहल्या असत्या.
आता त्या मधुर आठवणींवर मळभ जमा झाले.
गढूळल्या त्या आठवणी तो मानिनीला भेटल्यामूळे.
तिच्या गोड आठवणीत कटू आठवणी जमा झाल्या आता.
कितीही प्रयत्न केले तरी आता त्या पुसणे शक्य नव्हते.
मन सतत धाव होते तिकडे.
मानिनी,झोपडीवजा घर,तिचा हतबल वाटणारा नवरा….
डोळ्यापुढे सतत हेच चित्र दिसत होते.त्या चित्रात ती फुलांचे गजरे माळलेली मानिनी कुठे होती?संदीप शोधत राहायचा.
त्याचे रोजचे आॕफिस सुरु होते.
तीच बस,तोच सिग्नल,तीच दुकाने,
फुलवालीचे गजऱ्याचे दुकान….
संदीपच्या जीवाची कासावीस व्हायची ते दुकान बघून.
डोळे मानिनी दिसते का म्हणून भिरभिरायचे.
पण नंतर मानिनी त्याच्या नजरेस पडली नाही.
कधीतरी दिसेल या आशेने तो खिडकीजवळच बसायचा.
मध्ये एक दोन वर्ष गेली.
संदीपने पैशांची सोय करुन वन रुम किचनचा फ्लॕट घेतला.
तिथे राहायला गेल्यानंतर काही दिवसातच त्याची आई गेली.
आता संदीप घरी एकटाच राहायचा. आॕफिसमधून घरी आला कि घर खायला उठायचे.
राहती जागा बदलल्यामूळे ती बस,खिडकी, फुलवालीचे दुकान सगळ्यांपासून सुटला तो.
बस,दुकान सुटले तरी मानिनीच्या आठवणींपासून सुटका झाली नाही त्याची.
उलट त्या दिवसागणिक घट्ट होत गेल्या.
मन तिच्याकडे धावत राहायचेच.
फुलवालीकडे चौकशी करावी का असेही विचार यायचे मनात. पण काय विचारणार तिला?
सगळे तर स्वतःच्या डोळ्यानी बघून आला होता.
काॕलेज,मानिनी,गजरा, झोपडी, तिचा हतबल नवरा
नुसता गोंधळ करायच्या आठवणी.
आॕफिस आणि आठवणी याशिवाय आयुष्यात काही उरले नव्हतेच.
घराजवळच समुद्र किनारा होता.तिथे फेरफटका मारायला जावे तर तिथेही त्याच आठवणी दबा धरुन बसलेल्या असायच्या.
मानिनी,तिच्यासोबतच्या भेटी, वाळूवर लिहिलेली आणि नंतर समुद्राच्या लाटेत वाहत गेलेली त्यांची नावे.
सगळ्या आठवणींचे एक गाठोडे बांधून समुद्रात बुडवून टाकावे असेही वाटायचे त्याला.
पण कित्येक गोष्टी पोटात सामावून घेणारा समुद्र याची एकही आठवण घ्यायला तयार नव्हता.
एकेक दिवस ढकलत आयुष्य पुढे रेटत राहिला.
मध्ये काही दिवस गेले.फुलवालीला न भेटण्याचा संयम हळूहळू ढळायला लागला.
आता मन मानायला तयार नव्हते.
एका सोमवारी आॕफिसमधून निघाला त्याच बसने, त्याच खिडकीतून बाहेर बघत. सिग्नलला बस थांबली. खिडकीतून बाहेर बघितले.
फुलवाली,तिचे दुकान,दुकानातील गजरे सगळे जसेच्या तसेच होते.
बसमधून घाईघाईने उतरुन फुलवालीच्या दिशेने चालू लागला.
क्षणभर त्याला त्या फुलवालीचाच रागआला.
तिच्यामूळेच मानिनीच्या कटू,गढूळ आठवणी जमा झाल्या.
फुलवालीच्या दुकानात पोहचला. आणि दिडमूढ होऊन उभा राहीला. फुलवालीने ओळखले त्याला.
थोडावेळ तो तसाच थांबला निःशब्द.
नंतर न राहवून त्याने मानिनीबद्दल विचारलेच. फुलवाली सांगू लागली,
साहेब काय सांगू तुम्हाला मानिनीच्या आयुष्याची परवड. तुम्ही मागे भेटून गेल्यावर काही दिवसातच तिच्या नवऱ्याने गळफास लावून घेतला. त्याच्या आयुष्याची बरीच वर्ष श्रीमंतीत गेली होती. शरीराला कष्टाची सवय नव्हतीच.
नंतर अचानक आलेल्या गरिबीमूळे झालेले हाल,
एकेक पैसा मिळवायला करावी लागणारी मेहनत. शिवाय मानिनीचे आयुष्य आपण वेठीस धरले ही अपराधीपणाची खंतही त्याला आतल्या आत पोखरत होती. खूप अस्वस्थ राहायचा तो.आशेचा एकही किरण आयुष्यात नव्हती. मानिनीचे हाल त्याला बघवत नव्हते.
ऐकता ऐकता संदीपचे डोळे भरुन आले.रक्त गोठतयं आत असे वाटायला लागले.
फुलवाली पुढे बोलायला लागली.
नवरा गेला तेव्हापासून मानिनी अधिकच कुढत आहे.तिचे कामे ,मुलगाआणि ती.बाकी जगाशी काही एक संबंध नाही आता तिचा. फुलवालीचे सांगणे सुरुच होते.पण संदीपला काहीही ऐकणे अशक्य वाटत होते.कान बधिर झाली त्याचे.
पावले आपोआप मानिनीच्या घराच्या दिशेने निघाली.
तिथवर कसा पोहचला काही कळले नाही.
मानिनी बाहेरच उभी होती. संदीप दिसल्यावर चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे बघायला लागली.तिच्या डोळ्यात ना कसली ओळख ना काही भाव.
संदीपनेच बोलायला सुरूवात केली.मानिनीला बोलते करणे कठीण होते.संदीप जड अंतःकरणाने परत फिरला. त्याच्या जीवाची तगमग सुरु होती.
त्याला त्याची पूर्वीची मानिनी हवी होती.
आता आॕफिस सुटले कि तो रोज मानिनीच्या घरी जात होता. थोडा वेळ थांबून त्याच्या घरी परतायचा हळूहळू मानिनी पूर्ववत व्हायला लागली.
सत्य परिस्थितीचा स्वीकार करण्यावाचून पर्यायही नव्हता.
संदीपही तिच्या घरी,तिच्या मुलात रमायला लागला.
आता मानिनी संध्याकाळ झाली कि संदीपच्या वाटेकडे डोळे लावून बसायची.काही दिवस गेले.
आज संदीप सिग्नलवर उतरुन आधी फुलवालीकडे गेला.तिच्याकडून एक मोगऱ्याचा गजरा घेतला.
आणि मानिनीकडे आला.
गजरा मानिनीच्या जुड्यात माळला.
दोघे क्षणभर काॕलेजच्या दिवसात पोहचले.
आयुष्यात पुन्हा एकदा कळ्या मोहरल्या.फुले बहरली. आता मानिनीचा गजरा कायम मानिनीजवळच राहणार होता.

 

प्रिती

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!