८-आत्मचरीत्र-न लिहिलेले
सरु चल निघूया दादा म्हणत बाहेर आली.तिचे हात आपसूक माझ्या हातातून सुटले.
नंतरच्रा दोन दिवसात सरु रोज जायची सुगंधाला भेटायला.मला धीर झाला नाही.सुगंधाला आता भेटलो नसतो तर बरे झाले असते इतका बेचैन मी तिला भेटून झालो.
८भागआत्मचरीत्र-न लिहिलेले
आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले.मी माझ्या नव्या कामावर रुजू झालो. दोन खोल्या भाड्याने घेतल्या. सरुला बोलवले.तिची अॕडमिशन घेतली.तिने संगीत विषय घेतला.आई आता गावी एकटीच होती.तिनेही आमच्यासोबतच रहावे म्हणून आम्ही मागे लागलो.पण ती ऐकत नव्हती.
तिला आता सरुच्या लग्नाचे वेध लागले होते.
सरु बी.ए.झाल्याशिवाय लग्न नाही म्हणाली.पण माझ्या आॕफिसमध्ये काम करणाऱ्या एकाच्या नातेवाईकाचे स्थळ सांगून आले.मुलाला चांगली नौकरी होती.घरी शेती होती.
मुख्य म्हणजे सरुला पुढे शिकवायला तयार होते. लग्न जमले.नातेवाईक गावी असल्यामुळे लग्न अर्थातच तिथून झाले.सरुने आवर्जून सुगंधाला बोलवले.पण तिचे जमले नाही.अगदी लग्न लागेपर्यंत मी सुगंधाची वाट बघितली.
सरुचे लग्न झाले. आईला एका जबाबदारीतून मोकळे झाल्यासारखे वाटले.
पण आता सरु गेल्यामुळे माझ्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला.नागपूरला मी मित्रांसोबत राहायचो.ते जेवण बनवायचे.
आता आईला माझ्यासोबत राहावेच लागणार होते.
मी गावी जावून आईला घेऊन आलो.स्टोव्ह होता.आईला सुरु करुन द्यायचो.मग आई स्वयंपाक बनवायची.आईला करमायचे नाही पण इथे.
आॕफिसला सलग दोन दिवस सुट्ट्या असल्या की ती मला गावी घेऊन जायची.
आता ती माझ्या लग्नाच्या मागे लागली.माझे लग्न झाले कि ती गावी जाऊन राहणार होती.आई गावी गेली की मी विहिरीवर मोटर बसवून देणार होतो.
घरी येणाऱ्या माझ्या मित्रांना आईने माझ्यासाठी मुलगी शोधायला सांगितली.मी लग्नाला तयार नव्हतो.सुगंधा अजूनही मनात होतीच.पण आईसाठी लग्न करणे आवश्यक होते. मी लग्न करेपर्यंत ती निष्काळजी होणार नव्हती.
माझा मित्र रत्नाकरची बहीण लग्नाची होती.आईला त्याने तसे सांगितले.आई बघून आली.लग्न पक्के केले.मग मला दाखवायला घेऊन गेली.आईने त्यांना शब्द दिल्यावर मी नाही म्हणणे शक्य नव्हते.
लग्न झाले.कावेरी घरी आली.शहरात वाढलेली कावेरी माझ्यापेक्षा,सरुपेक्षा वेगळी होती. आमच्यासाखी छोट्या छोटया गोष्टीत आनंद शोधणारी नव्हती.
आईसोबत ती कधी वाईट वागली नाही .कर्तव्यात कधी कसूर केली नाही.पण आई ज्यासाठी आसुसलेली होती तो जिव्हाळा तिच्या वागण्यात नव्हता.
आई आणि सरुने कावेरीबद्दल कधीही तक्रार केली नाही.पण मला समजायचे ते. मुळात कावेरी जरा कोरडी होती.भावनांचा ओलावा कमी होता.
पण माझा संसार निगुतीने केला.माझ्या शब्दापलीकडे कधी गेली नाही.आयुष्यभर माझी काळजी घेतली. माझ्यावर प्रेम केले.
पण माझ्या मनातील सुगंधाची जागा नाही घेऊ शकली.
संसार गोडीगुलाबीने झाला पण सुगंधा सोबत असती तर…..हा विचार कायम मनात येत राहला.
कावेरीच्या प्रेमात बेहोशी कधी अनुभवली नाही.
सुगंधामुळे कावेरीवर अन्याय केला का….हा ही विचार येतो मनात खूपदा.माझ्या मनात सुगंधा नसती तर कावेरीशी माझे नाते अधिक सुंदर राहले असते….
माझे लग्न झाले.आता आईवर माझ्या जेवणाची असलेली जबाबदारी संपली. आई गावी गेली.मी काही दिवसांनी जावून विहिरीवर मोटर लावून देणार होतो.नंतर घरही बांधायचे होते.पण ती वेळ आली नाही.आई इथून गेली आणि काविळीचे निमित्त होऊन गेली.मी ,सरु अनाथ झालो.गाव आणि माझं नातं आईमुळे होतं.आई गेली.गावाचे बंध सैल होत गेले पण तुटले नाही. बाबा,आजी,आईच्या आठवणी तिथे जागोजागी होत्या.
मला नौकरी लागल्यानंतर आईसाठी काय काय करायचे याचे मानोरे बांधले होते.सगळे ढासळले.
नंतर कधी काकाकडे गेलो पण आमच्या घरी,जे काही वर्षापूर्वी नांदते घर होते तिकडे बघण्याचाही धीर होत नाही.माझी आई वावरली ते घर काही वर्ष तसेच राहिले नंतर काकाला ते दिले.
शेत प्रभाकर बघतो.
क्रमशः
पुढील भाग कृपया खालील लिंकवर वाचा.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









वाचनीय, उत्तम साहित्य