बकुळी

 

छोटुशी बकुळी, आठ दहा वर्षाची असतानाच आई-वडील दोघेही देवाघरी गेले. प्रेमाला पारखी. मामानी सांभाळ केला तिचा.तिला लहानपणापासून पक्षी प्राणी खूप आवडायचे. खेळायची त्यांच्यासोबत. हरवून जायची त्यांच्यात, ते पण.

उमज आली तसे आई-वडिलांचे प्रेम माया कशी असते? हे माहितीच नव्हतं. पण एक आठवते तिला, तिच्या आईलाही प्राणी खूप आवडायचे. आपली आई त्यांच्याशी बोलते असे वाटायचे तिला कधी कधी. हेच तिला आईकडून मिळालं. आईची माया कदाचित त्या प्राण्यांमध्ये शोधायची. तिचा मामाही तिला जीव लावायचा, पण तो आई थोडीच होऊ शकणार. पण मामी म्हटलं की बकुळी थरथर कापायची. मामा घरी असेपर्यंत मामी तिच्याशी खूप गोड गोड वागायची बोलायची. बिचाऱ्या मामाला हायसं वाटायचं, आपली बायको बकुळीला आईची माया लावते.  पण मामीचं खोटं वागणं मामाला कुठे ठाऊक ? त्यात तिने बकुळीला धमकी दिलेली,  मामा जवळ काही बोलली ना,  तर गाठ माझ्याशी आहे. म्हणून ती चुपचाप असायची.  मामा कामासाठी बाहेर पडला की मामी तिला घरकामाला जुंपायची, त्या लहानगीच्या वयाचा सुद्धा विचार करत नव्हती. मामीने तिला दिलेली कामे म्हणजे भयंकरच!

एक दिवस डाळ तांदूळ मुद्दामुन एकत्र केले  आणि दिले निवडायला. निवडले तरच जेवण मिळत असे. एकत्र झालेले डाळ तांदूळ घेऊन बकुळी रडत बसली तिकडून एक चिमणी आली.

काय झालं बकुळीताई रडायला?

बघ न, मामीनी मला काय काम दिलं.

चिमणी भुर्रकन उडून गेली आणि पुन्हा आली सोबत चिमण्या मैत्रिणी घेऊनच. पटापट दाणे टिपून चिमण्यांनी डाळ तांदूळ वेगवेगळे करून दिले. मामीला आश्चर्य वाटलं.

दुसऱ्या दिवशी मामीने तिला पांढऱ्या कपड्यांना डांबर लावून दिलं आणि नदीवर जायला सांगितलं आणि धुवून आण नाहीतर जेवण नाही मिळणार.  बकुळीने कपडे धुवायचा खूप प्रयत्न केला. कपडे स्वच्छ व्हायच्या ऐवजी अजूनच काळे झाले मग बसली रडत.

तिकडून एक बदक आले. आणि म्हणाले ,  काय झालं बकुळीताई रडायला?

मामीनी बघ न मला काय काम दिलं ?   बदक लुटू लुटू पावलं टाकत पळून गेले आणि सोबत येताना अनेक बदक मित्र सोबत आणले.  बकुळीने  सगळे कपडे नदीकाठी अंथरले.  बदके त्या कपड्यांवर लोळले आणि गंमतच झाली, सगळे कपडे पांढरे स्वच्छ झाले. अगदी धुतल्या सारखे.

मामी खूप विचारत पडली. मनात म्हणाली, उद्या बघतेच हिला. डोकं खाजवायला लागली की उद्या हिला काय काम देऊ ? आणि अजूनच भयंकर  काम तयार केलं.

एका माठाला खालून छिद्र पाडलं आणि  त्यात पाणी भरायला सांगितलं . माठ भरून झाला तर जेवण मिळेल. बकुळीने त्यात छोट्या छोट्या भांड्यांनी पाणी भरायला घेतलं पण त्यात पाणी थोडंच साठणार होते,  पाणी माठात टाकलं की वाहून जाऊ लागले. मग काय बसली रडत.

तिकडून एक बेडूक दादा आले आणि म्हणाले काय झालं बकुळीताई रडायला ?

बघ ना बेडूक दादा!  मामीने मला काय काम दिले. मग बेडूकदादा टुणकन उडी मारून माठाच्या तळाशी चिकटून बसले. मग काय , बकुळीने भराभर पाणी भरले. मामीचा असा तिळपापड झाला.  मग चुपचाप जेवायला दिले.

 

एक दिवस बकुळी मामीच्या रोजच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून गेली.

घर सोडून बकुळी जंगलात रडत रडत एका झाडावर चढून बसली . झाडाच्या पानाचे दोन द्रोण तयार केले आणि डोळ्यावर ठेवले.  खूप रडल्याने द्रोणात अश्रू जमा झाले होते.  मामा घरी वापस जाताना विश्रांतीसाठी नेमका त्याच झाडाखाली बसला . बकुळीने द्रोण्यात भरलेले पाणी खाली टाकले ते मामाच्या अंगावर पडले. मामाने दचकून वर पाहिले. त्याचा विश्वास बसेना.

बकुळी झाडावरून उतरली. रडत रडत सगळी कहाणी मामाला सांगितली. मामा रागाने लाल झाला होता.

मामा घरी यायची वेळ झाली होती पण आज सकाळपासून बकुळी घरात नव्हती. मामीने आजुबाजूचा  सगळा परिसर पालथा घातला पण सापडली नाही. आता मामी घाबरली.  नवरा जर घरी आला, तर काय सांगायचे ?

 

मामा रोजच्या वेळेपेक्षा थोडा उशिरा घरी आला. हातपाय धुतल्यानंतर त्यांनी बकुळी कुठे दिसत नाही विचारलं. त्याला आता तरी बायको खरे बोलते का  हे बघायचे होते. मामीचे धाबे दणाणले. तिला काहीच कारण सापडेना.  काहीतरी खोटं नाटं सांगितलं.  मामा प्रश्नावर प्रश्न विचारत होता आणि मामी एकावर एक खोटं सांगत होती. मामा एकदम ओरडला , अगं ! किती खोटं बोलशील.

त्यांनी बकुळीला आवाज दिला.  ती हळूच दाराच्या बाहेरून दबकत दबकत आत आली. मामीला खूप आश्चर्य वाटलं. मामीच्या लक्षात आलं की बकुळीने मामाला सगळं सांगितलं असणार. ती थोडी वरमली.

मामाने शिक्षा म्हणून मामीला माहेरी पाठवायचं ठरवलं.

बकुळी ही माझ्यासोबतच राहणार आहे. तुला हे मान्य असेल तरच तू वापस ये. तुझ्यात बदल झाला तर मी तुला घरात घेईल नाहीतर नाही.

मामी माहेरी गेली. केलेल्या चुकीबद्दल तिला वाईट वाटत होते. तिला खूप पश्चाताप झाला.

ती वापस आली. बकुळीला कवेत घेऊन रडत म्हणाली,आजपासून मी तुझी आई.नंतर मामीने कधीही  त्रास दिला नाही.मामा, मामी, बकुळी सुखात राहू लागले.

आजीच्या आठवणीतील कथा

शब्दांकन : मोहिनी शैलेश पाटनुरकर

6 Comments

  1. Shivakumar deshmukh

    बऱ्याच दिवसानंतर तुमच लेखन वाचलं.
    शब्द ना शब्द सहह्रदय भावनेतून लिहिता तुम्ही.
    बकुळी वाचत असताना कुठे तरी आमचं बालपण त्यात दिसून आलं.

    अत्यंत सुंदर लेखण!!!….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!