पाहुणे येती घरा-बालसाहित्य
निरोप……. निरोप हा शब्दच किती भावनेनं ओथंबलेला आहे. निरोप द्यायचा म्हटलं की नकळत कोणाच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या होतातच. मग तो *बाप्पाला द्यायचा असो*, *नववधूला द्यायचा असो*, की *अखेरचा असो*.
देताना हमखास आवाज कापरा झाल्याशिवाय राहणार नाही.
पण एक निरोप देणे राजुला खुप आवडायचे.
तो म्हणजे *पाहुण्यांना द्यायचा निरोप*.
सकाळपासून आईची लगबग चालू होती. राजु पाहुण्यांच्या म्हणजे त्याच्या आत्याच्या अवती भोवती घिरट्या घालता घालता बघत होता. आई पाहुणचाराचे गोडाधोडाचे स्वयंपाकात होती. मधूनच फराळाचे चिवडा, लाडू चे डबे भरून ठेवत होती.
आत्याच्या सोबतचे आठ दिवस धम्माल करण्यात कसे गेले त्याला कळलेच नाही. आठ दिवसात आत्यानी निरनिराळे खायचे पदार्थ केले होते. शिवाय आत्या आली की एक-दोन दिवस शाळेला बुट्टी ठरलेली असायची त्याची. म्हणून त्याला सगळ्यात जास्त आत्या आवडे.
आज आत्या तिच्या गावी वापस जाणार होती.
त्याने कालच ठरवून ठेवलं होतं, उद्या शाळेत जाणार नाही ते. आई रागावली राजु आवर शाळेला उशीर होतो.
राजुने आशेनं आत्याकडे पाहिलं.
“आई राहु दे ना ग आज शाळा, आत्या चालली ना”. आत्या राजुची बाजु घेत म्हणाली, “राहु दे न ग वहिनी! दुसरीत तर आहे , उद्या करेल तो राहिलेला अभ्यास.
हो ना रे राजु “.
राजुने लगेच मान डोलावली.
सकाळपासुन राजुने आत्याला दोनदा नमस्कार केला होता. ती गावी वापस जायची म्हणून.
ती आली त्यादिवशी पण तो असाच तिच्यामागे गोंडा घोळत होता. तिच्या बागेतून आपल्यासाठी काय काय निघते, याची उत्सुकता होती त्याला.
आत्याने नेहमीप्रमाणे त्याच्या आवडीचे आणलं होतं.
आज त्याने नमस्कार केला अन तसाच थांबला.
मागल्या वेळेस हात पुढे केला म्हणून आईचा धपाटा खाल्ला होता त्याने पाठीत.
पाहुण्यांचा पुरणपोळीचा पाहुणचार झाला. फराळाचे डबे, आत्याला साडी, सगळं झालं. आत्याचे सामान पण बाहेर आणुन ठेवलं . तसा राजुचा जीव कासावीस झाला.
आत्या सगळ्यांच्या पाया पडली आजी-आजोबा आणि बाबांच्या. राजुने आत्याला तिसऱ्यांदा नमस्कार केला.
आत्याचा हात पर्समध्ये किंवा मामांचा खिशात जातो का? हे पाहिले त्याने चोरट्या नजरेने आणि हिरमुसला.
आता त्याला शक्यता कमी वाटायला लागली.
आत्याने पायात चप्पल सरकवत “अरे राजु” हाक मारली.
तसा राजु झटकन धावला आत्याने पर्समधून एक कोरी करकरीत शंभरची नोट काढून त्याच्या हातात ठेवली. “खाऊ घे ह “.
राजुचा आनंद ओसंडून वाहत होता.
पटकन आत्याच्या पायाकडे तो झुकला.
आमच्याकडे पाहुणे आले
पुरणपोळी खाऊन गेले
आम्हाला पैसे दिले नाही
आम्ही काय त्यांना मागत होतो ?
जगाची रीत सांगत होतो .
मोहिनी राजे पाटनुरकर
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
खूपच छान 👌
वातावरण सुंदर g
विनोदी,मजेदार.