आजीबाईच्या म्हणी
आजी, ए आजी, मला मराठीतल्या काही म्हणी सांग नं. आमच्या शाळेत म्हणींची स्पर्धा आहे”,
नेहा प्रमिला आजीजवळ जाऊन म्हणाली.
आजी : ‘म्हणी’? त्या काय असतात? मला फणी माहिती आहे.
नेहा : “असं काय करते आजी “?
‘मला मराठीतले एवढं येत नाही ना. तुला येतात ना म्हणी’
प्रमिला आजी : “नेहा मला कुठे येतात ग ?” मी कधीच शाळेत गेली नाही मला नाही येत म्हणी न बिणी .
नेहा बिचारी हिरमुसून नुसतीच वही-पेन घेऊन कोपऱ्यात बसली. नेहाला माहिती आहे, आजीला नक्कीच म्हणी येतात. तिने बरेचदा आजीच्या बोलण्यातून म्हणी ऐकल्या होत्या.
एवढ्यात आजोबांचा आरडा ओरडा चालु झाला.
माझा चष्मा कुठे आहे ? एक वस्तू माझी कोणी नीट राहू देत नाही. मला पेपर वाचायचा आहे.
ओरडत आजी कडे आले, आजीनी त्यांच्या डोक्यावरचा चष्मा काढून त्यांच्या हातात दिला आणि जोरात म्हणाली ‘घ्या’.
नुसता
*काखेत कळसा, गावाला वळसा*.
कोणाला दोष द्यायचा अव्यवस्थितपणाचा ?
*आपलेच दात अन आपलेच ओठ*. आजोबाची पाठ वळली की पाठमोर्या आजोबाला हात जोडून म्हणाली, *आलीया भोगासी असावे सादर*
नेहाच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला.
तिने लगेच म्हणी लिहून घेतल्या. गालातल्या गालात हसली म्हणाली,
“आजी तर इतक्या म्हणींचा वापर करते आणि तिलाच माहिती नाही”.
नेहाच्या बाबांना सकाळपासून मळमळ उलट्या होत होत्या. आजी म्हणे,
“अरे पित्त वाढले तुझं, थांब घरगुती औषध देते”.
बाबा म्हणाले नको,
डॉक्टर कडे जातो. तर म्हणते कशी, जा बाबा जा
*सोनारानेच कान टोचावे*
नेहाने लगेच लिहून घेतली म्हण.
आज नेहा आजी च्या आसपास घिरट्या घालत राहणार होती. आजी जरी अशिक्षीत असली तरी बोलताना म्हणी चा वापर बेमालूमपणे करत असायची.
इतक्यात बंड्या नेहाचा धाकटा भाऊ आला.
बंड्या : “आई भुक लागली थोडं खायला दे न”.
आजी : “बंड्या, अरे आंघोळ करून आला ना, देवाला नमस्कार कर , हात जोड , बुद्धी माग, सुखी ठेव म्हण.”
बंड्या : “करतो ग, खाणं झालं की”.
आजी : “हे बर आहे तुझं,
*आधी पोटोबा मग विठोबा*.
लगेच नेहाच्या वहीत एका म्हणीची नोंद झाली. जरी प्रमिला आजीला लिहिता-वाचता येत नव्हतं, निरक्षर होती, तरी लहानपणापासून कानावर पडलेले श्लोक, स्तोत्र ,ओव्या ,आरत्या अगदी मूकपाठ होत्या तिच्या.
आजीला देवाच्या फोटोला हार तयार करायचा होता. पण आजी सत्तरी ओलांडलेली. सुईत दोरा काही घालता येईना. तिने नेहाला आवाज दिला. ‘बाळ, माझं एवढं काम कर ना गं ‘.
काय करणार, हसून म्हणाली,
*अडला हरी गाढवाचे पाय धरी* नेहाचे गाल लटक्या रागाने टम्म फुगले. पण आनंदली कारण एक नवीन म्हण मिळाली होती, लगेच पळाली नोंद करायला.
नेहाच्या आईचं अन् बाबांचं काहीतरी बिनसलं असणार, आई थोडी घुश्शातच स्वयंपाक खोलीत काम करत होती. त्यातच तिने एक भांड आदळलं. लगेच प्रमिला आजी म्हणते कशी, “सुनबाई, जरा धीरानं घे, उगीच
*वड्याचं तेल वांग्यावर काढू* नको .
दुपारी सगळे काम आटोपले की शेजारची एक आजी, प्रमिला आजीची मैत्रीण, मिना, गप्पा मारायला येत असे कधीकधी. आणि दोघी मिळून सोबतच वाती फुलवाती पण करत.
बारीक आवाजात त्यांच्या गोष्टी चालू असायच्या. आज नेहाला चांगली लॉटरी लागली. दोन आज्या एकत्र. मग काय बसली तिथेच वही-पेन घेऊन. मीना आजी : “तुला काय सांगू पमे, आमच्या घरची कथा,” असं म्हणून काहीतरी कुजबुजली. प्रमिला आजी : “नाहीतर काय, *घरोघरी मातीच्या चुली*
आणि तसंही मिने,
*पळसाला पाने तीनच* न ग शेवटी, सगळीकडे परिस्थिती सारखीच”.
“मिने, काल मी तुझ्या नातवाला थोडं रागावलं, आमच्या बंड्या सोबत नुसता धुमाकूळ घालत होता, तसं आमच्या बंड्यालाही रागवलं मी, नाहीतर म्हणशील ,
*आपला तो बाब्या लोकाचं ते कार्ट*.
बघता बघता नेहाला चांगली दहा-बारा म्हणींची मेजवानी मिळाली होती. जाम खुश होती स्वारी.
नेहा : ‘आजी, मी खूप अभ्यास केला आज ‘, माझा हात दुखतोय ग.
आजी : ‘कसला डोंबलाचा अभ्यास, नुसता माझ्या मागे मागे
*गोंडा घोळत होती*’.
नेहा : ‘आजी हात दुखतोय ग, जरा चेपून दे ना’.
आजी : ‘नेहा, कार्टे,. मला काम सांगते. मी मोठी आहे ना तुझ्यापेक्षा . मोठ्यांना कामे सांगू नये’. आजीने सुरू केलं , मुलींनी ‘असं’ असू नये, ‘तसं’ असू नये, ‘हे’ करू नये ,’ते’ करू नये.
नेहा म्हणाली, ,’आजी,
- *भिक नको पण कुत्रा आवर
आणि खिदळत पळाली ….
मोहिनी राजे पाटनुरकर .
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
मस्त.आजीबाईच्या म्हणी
खूप छान म्हणी रचना केली.
Thanks
Wah…khup chan story….🌹👍🏻
Thanks smith
Waah…very nice
.
Thanks manu
Mast Mohini tai
Ty
Very nice
Thanks dear
खूप छान मोहीनी