१४-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-राधा
१४-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-राधा

१४-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-राधा

४-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या

Written by-ज्योती रामटेके

राधा

मावसभाऊ जावून आठ दिवस झालेत. चंदनाने भरपूर मदत केली त्यांना. स्वयंपाक करून घेऊन जायची. हळूहळू पाहुणे निघून गेली. राधा सावरली होती. मुले फार लहान नव्हती. मुलगा दहावीत होता. मुलगी बारावीत होती. चंदनाला राधाकडे बघून बरेचदा आश्चर्य वाटायचे.
काही घडलेच नाही असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसायचे.
काल किती कुरकुर करत होती ती चंदना जवळ,चार लाख लागले. जाता.. जाता हा माणूस कर्ज करुन गेला. कसे करु मी आता?

अहो पण ताई.. सारे गाव त्यांचे नाव काढत आहे. कशाचेही व्यसन नव्हते. तुम्हाला सुखात ठेवले. तुमच्या वर खूप प्रेम केले त्यांनी, अजून काय पाहिजे आयुष्यात. कर्ज फिटेल हळूहळू.पाच एकर शेती आहे. एक एकर शेती विकून कर्ज फेड, असे भावजी सांगून गेले. त्यांची बचत पण आहे.घ्या काळजी.. आम्ही आहोतच.

चंदनाला राधा स्वार्थी वाटत होती.घरी आल्यावर पुन्हा ती कामात गुंग झाली. बाजुचे मजूर तिच्या पोळ्याची तारीफ करु लागले.
इतक्या सुंदर पोळ्या आम्ही प्रथमच बघत आणि खात आहोत हे आजूबाजूला सांगायचे, त्यामुळे आपसूकच तिच्या पोळ्या प्रसिद्ध झाल्या. ते लोक आता पुर्ण स्वयंपाक सांगायला लागले. ‌ तिच्या हाताला चव होती.मेहनत करायची तयारी होती. आईची मदत होती.

जोडीला शिक्षण सुरु होते. तारेवरची कसरत करायची ती.
संसारात तडजोड होती पण ती आनंदात होती.

आजकाल शेती आधी सारखी पिकत नव्हती. उत्पादनापेक्षा पैसे अधिक लागून जायचे. घरात खर्च वाढला होता. बी,एड झाले होते पुर्ण. कुठे नौकरी करायची म्हटले तर पगार कमी. स्थायी जागेसाठी पैसे खूप मागायचे. बाबा दहा लाख द्यायला तयार होते.त्यांच्या मागे अपर्णाची, अपूर्वची जबाबदारी आहे अजून. बाबा आजकाल आजारी असतात. आजारपणासाठी बरेच पैसे लागतात.

पियूष तिला प्रोत्साहन द्यायचा. त्याला बरेचदा वाईट वाटायचे. चंदनाची आईकडून फसवणूक करण्यात आली होती. तो बारावी होता.पण तो पदव्युत्तर शिक्षण घेत आहे असे सांगण्यात आले होते पण या सर्व गोष्टी त्याला उशिरा कळल्या होत्या. चंदना सर्व विसरली होती. तिने नंतर तो विषय काढला नाही. आता तिला स्वयंपाकाच्या ऑर्डर येत होत्या.

राधा एकदा घरी येऊन गेली होती. आता मुलांना घेऊन शहरात राहायला यायचे आहे असे म्हणत होती.
शहरात? चंदनाला नवल वाटले. ताई.. आजकाल घराचे भाडे भरपूर वाढले आहेत. तुम्हाला झेपेल का खर्च?
खेड्यात निभाव लागतो. शेतीवाडी आहे. मुले तर येणे.. जाणे करत आहेत.तुम्ही काय करणार शहरात.

राधाला जरा रागच आला.तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पियूष तिला सोडायला त्या खेड्यावर गेला. जवळच होते.
आठ दिवसांनी सामान घेऊन आली ती. पियूषनी दोन खोल्यांचे घर बघितले होते. घर शहराच्या बाहेर होते.
भाडे कमी होते तिकडे. खेड्यातील आठवणी राधा लवकर विसरली. रमली शहरात.तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही दिसत नव्हता. चंदनाला आश्चर्य वाटायचे, आणि कौतुक पण वाटायचे.

खरेच राधाची दाद द्यायला हवी. संकटात, कसा मार्ग शोधायचा हे तिच्याकडून शिकावे.किती लवकरच सावरले स्वतःला. चंदना जायची कधीतरी.
तिलाही वेळ नसायचा.मुलांचा अभ्यास.. तिची बी.. एडची तयारी, घरातील कामे. आजकाल तर माहेरी जायला नाही मिळत आहे. बाबांची तब्येत बरी नसते. आई‌ येते पैसे घेऊन. तेवढाच संसाराला हातभार लागतो.

सासू.. सासरे करतात मदत.. पण अपेक्षा ठेवून. निरपेक्ष प्रेम फक्त आईवडील करु शकतात. बाबांना अपराधीपणाची भावना आहे. चंदनाचे समोर कसे होणार याची काळजी मनात नेहमी वाटते. आपल्या कडून किती भंयकर चुक झाली या गोष्टीचा नेहमी खेद वाटतो.तेव्हा आपण सुमनताई वर आंधळा विश्वास कसा ठेवला याचे वाईट वाटते त्यांना.

चंदना त्यांना समजावते,बाबा का इतकी काळजी करता. मी सुखात आहे. काही दिवसांनी नौकरी लागेलच मला. पियूष पण दुकान शोधत आहेत.श्रींमत असणे म्हणजे सर्व काही आहे का? पियूष सारखा नवरा मिळणे म्हणजे माझे भाग्यच आहे. असा काळजी घेणारा नवरा शोधून सापडणार नाही.तुमचा किती आधार आहे मला.मुलांना किती छान सांभाळता तुम्ही.होईल सर्व ठीक.
आता अपर्णाच्या लग्नाचे बघा.वय होत आहे. नौकरी पण आहे.

चंदना तू होती म्हणून मला माफ केले. अपर्णाच्या बाबतीत असे काही घडले असते तर? मला तर कल्पना करवत नाही.आकाश,पाताळ एक केले असते तिने. तू आमच्या जवळ राहावी म्हणून मी हा खटाटोप केला. चुकलेच माझे.
बाबाला गहिवरून आले.
बाबा, हा विषय पुन्हा काढू नका. मी खूप सुखी आहे. तुम्हाला त्रास होईल अशा गोष्टी विसरून जा.मी तर केव्हाच विसरून गेली जुन्या गोष्टी. आता समोर बघायचे. नव्याने स्वप्न बघायला हवी आता. अजून माझी काय,काय प्रगती होते ते बघा. आता फक्त तब्येत सांभाळा. माझे चांगले दिवस बघायचे आहेत तुम्हाला.मला तुमची गरज आहे बाबा. तुमच्या छत्रछायेखाली सुरक्षित वाटते मला. माझे सासरे पण मला मुलीसारखे सांभाळून घेतात. जगायला पैशापेक्षा आपली जवळची माणसे हवीत बाबा. माझे सोनेरी दिवस बघायला माझ्या जवळची माणसे हवीत मला.

 

चंदना त्या सोनेरी क्षणांचा मी साक्षीदार बनेल. मी आता  तब्येत सांभाळेल. आणि हो,मला  नातू सांभाळायचे आहेत.
मुलांना सुट्टी आहे तोपर्यंत जरा तुझ्या आईला घेऊन जातो फिरायला. आयुष्यभर तिला कुठे नेले नाही.बाहेरचे जग तिला कधी कळले नाही, किंबहूना मी कळू दिले नाही.
सतत कामात  खपवून घेतले तिने स्वतःला. आता कळते सर्व.   गेलेला काळ नाही वापस येत पण समोरचे काही क्षण आपल्या हातात आहेत. चंदना जेवण करून जा.
आईने आवाज दिला.
क्रमशः
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!