कथामालिका-हरवून गेल्या जाणिवा
विनायकसोबत न जमणाऱ्या वैकुचे त्याच्यासोबतच लग्न होते.
त्या काळानुसार बालविवाह झालेल्या विनायक-वैकुंठाचा संसार फुलतो कि…..
हरवून गेल्या जाणिवा
भाग-१५
सतत विनायक च्या खोड्या काढणाऱ्या, त्याला चिडवणाऱ्या वैकुंठा च्या डोक्यावर आज त्याच्याच नावाच्या अक्षदा पडल्या होत्या.वैकुचे लग्न लागले ..अंतरपाट हटला… विनायकसोबत नजरानजर झाली.
भातुकलीत रमणारी इवलीशी खोडकर लेक…
कन्यादानासाठी तिच्या वराचा (विनायकचा) हात पकडून पाटावर बसली … विधी संपन्न करण्यासाठी विमल,मधुकरराव पुढे आले..
आधी साखरपुडा, नंतर कांताप्रसादच्या अंतिम इच्छेप्रमाणे घाईघाईने उरकलेले लाडक्या लेकीचे लग्न… सगळेच अनपेक्षित.
वैकुंठाच्या बाबतीत एवढे पटापट सर्व योग जुळून येतील याचा मधुकर राव ने कधी विचार ही केला नव्हता..
पूर्व कल्पना नसल्याने कपडा , दागिने कशाचीच तयारी करून ठेवली नव्हती..
त्यामुळे विमलने ऐनवेळी वैकुला कन्यादानात गळ्यातील ठुशी टाकली.
आईवडिलांच्या तसेच तेथे उपस्थित सर्व जेष्ठमंडळींच्या आशिर्वादासाठी नवदांपत्य पुढे सरसावले.
अगदी सहजपणे लेकीला नवरीच्या वेषभूषेत वावरताना बघून आईवडिलांना तिचे कौतुक वाटु लागले.
वैकुंठातील हा बदल..तिचे हे नवे रुप,
पाहून आईला आज ती अचानक मोठी झाल्यासारखी भासत होती. ..विमलच्या डोळ्यात पाणी तरळले.
१९३० चा काळ त्याकाळी एकेका घरी किमान पाच-सहा तरी भावंडे असायची पण विमल च्या माहेरी ती आणि तिचा लहान भाऊ अशोक असे दोनच भावंडे त्यामुळे वैकुचा एकुलता एकच मामा -अशोकमामा .
तिच्या मामाची लाडकी लाडोबाई आज नवरी बनली होती पण मामा तिच्या लग्नात नव्हता.. .
एकुलती एक भाची वैकुंठा.. मामा म्हणून तिच्या लग्नात मिरवायची किती हौस होती त्याला..पण लग्नात तिच्या आईवडिलांशिवाय कोणताही नातेवाईक हजर नव्हता..
तिचा सख्खा मामा तरी तिचे कौतुक पाहायला आज इथे असायला हवा होता.. भावाच्या आठवणीने विमल निराश झाली..
लग्नमंडपातील सर्व विधी आटोपून नवदांपत्यांना आजोबांच्या खोलीत पाया पडण्यासाठी नेले.. लक्ष्मी नारायणासारखी दिसणाऱी जोडी कांताप्रसाद डोळे भरून पाहत होते.
नव जोडीला आशिर्वादासाठी हात उंचावताना त्यांचा चेहऱा अगदी समाधानाने फुलला होता..
त्या दोघांना आजोबा शेजारी बसवून..आप्पासाहेब बाहेर आले..बाहेरील मंडपात वऱ्हाडी मंडळीची जेवणं चालू होती.. आप्पा साहेब स्वत: सगळीकडे जातीने लक्ष घालत होते.
व्याही मंडळींच्या आहेरांच्या देवाणघेवाण, भेटीगाठी संपूष्टात आल्या होत्या. नवरदेव-नवरीला निरोप देवून पाहुणे निघत होती. वैकुंठाच्या आईवडिलांचीही घरी परतण्याची तयारी सुरु झाली.. रीतीरिवाजांप्रमाणे सासरचे देवकार्य संपवूनच वैकुची माहेरी पाठवणी होणार होती. तो पर्यंत तिला सासरी राहणे भाग होते आईला सोडून कधीही एकटी न राहणारी वैकुंठा.. आता सासरी राहणार..वैकुंठा पाठराखीण शिवाय सासरी एकटी पडेल..कोण सांभाळेल,कशी राहिल …नानाविध चिंता विमलच्या डोक्यात येत होत्या.ती जसजशी विचार करत होती.वैकुची काळजी वाढत होती. विमल लेकीच्या सासरी राहणे योग्य नव्हते..
विमलच्या जिवाची लेकीसाठी होणारी ही सर्व घालमेल विनायकांच्या चुलतीच्या लक्षात आली.
ती विमल जवळ येत तिला धीर देत म्हणाली,
तुम्ही काही काळजी करू नका..वैकुची पाठराखीण म्हणून मी घेईल काळजी.हे तिचे सासर असले तरी तिला माहेरची उणीव आम्ही भासू देणार नाही.शिवाय आप्पा साहेब खुप प्रेमळ आणि दिलदार आहेत.. वैकुच्या चुलत सासूचे, हरीप्रसादच्या बायकोचे बोलणे कानावर पडले तेव्हा कुठे विमलच्या जिवात जीव आला माघारी परतण्यासाठी ती निश्चिंत झाली असे वरवर वाटत असले तरी लहानग्या,अबोध लेकीसाठी तिचा जीव तुटत होता.मधुकररावांचेही मन वैकुला सोडून जाण्यासाठी तयार नव्हते पण उपाय नव्हता.
फाट्यापासून गावात जाण्यासाठी कच्ची सडक होती..त्यामुळे त्याकाळी वाहनांची सोबत फाट्यापर्यंतच असे..पुढील अंतर पायीच पार पाडावे लागत होते. मधुकरराव विमल दिवस उजाडताच प्रवासाला लागले..आई आबाला निरोप देताना वैकंठा खूप रडत होती.त्या बालमनाला लग्न,सासर….काहीही माहित नव्हते.
भातुकलीत बाहुला-बाहूलीचे लग्न लावणाऱ्या वैकुला काल स्वतःच्या लग्नातही मजा आली.पण आई-बाबा तिला सोडून जातील हे तिला माहितच नव्हते. रडून रडून तिचे डोळे सुजले होते.
तिला सोडून निघताना विमलला खूप अवघड जात होते..घरी काका, काकू, आत्याबाईला किंवा इतर कोणालाही वैकुंठाचे लग्न लावून दिल्याची कल्पना नव्हती..खूप जुना काळ होता.इकडून तिकडे ताबडतोब निरोप मिळेल.. अशी टेलीफोनची सुविधा त्या काळात नव्हती..
विमल-मधुकरराव घरी जाऊनच वैकुच्या लग्नाची बातमी सगळ्यांना देणार होते….
Previous Part Link
https://marathi.shabdaparna.
नवदांपत्याचे आयुष्य पुढे काय वळण घेते…..वाचत रहा हरवल्या जाणिवा
Next Part Link
https://marathi.shabdaparna.in/१६-हर
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा




कथामालिका सुरेख साकारली.
वाह
छान कथा मालिका