१७-स्वप्न तहानलेले मराठी कथामालिका
ज्योती रामटेके
कनक, खरेच तू आला? आंनदी त्याच्याकडे बघत होती. पुर्वीचा कनक कुठेतरी हरवला होता. किती बदल झाला होता त्याच्यात.सुकलेला चेहरा,भावहीन डोळे…
आंनदीच्या डोळ्यात अश्रू आले.कनक किती बदल झाला तुझ्यात?
का स्वतःला इतका त्रास करुन घेतला?
त्याचे उत्तर नाही माझ्याकडे आनंदी.ते शोधता.. शोधता म्हातारा होणार मी. जोरात हसला तो. त्याचे ते केविलवाणे हसणे आंनदीला असह्य झाले.
खूप वर्षांनी वाड्यात आलो.आश्रमात,वाड्यातील तुझ्या सोबतीचा पाऊस सारखा आठवत रहातो मला.
आयुष्यभर त्या पावसाचा ओलावा आपल्याला मिळाला असता तर.. आयुष्य किती फुलले असते.
कनक, आताही तुला तसेच फुलायचे आहे.बंद पडलेली शाळा सुरू करायची आहे. आपले स्वप्न होते ते. तुला पूर्ण करायचे आहे ते.समोर या वाड्याची देखरेख करायची आहे. तू असाच वागला तर काही दिवसांनी भग्न होईल हा वाडा. ते तुला आवडेल का?मला तर मुळीच आवडणार नाही.
आंनदी, माझे जाऊ दे.. तू कशी आहेस तुझी मुले, नवरा सगळे कसे आहेत?
तू सासरी गेल्यानंतर आज इतक्या वर्षांनी भेट होत आहे आपली.
लग्नानंतर एकदाही मागे वळून बघायची इच्छा नाही झाली का? तू साधी चौकशी नाही केली कधी माझी.
मी मात्र सारखी दीपाकडे तू कशी आहेस म्हणून विचारत राहायचो. तू संसारात रमली कि नाही याची सतत काळजी वाटायची. तू लग्नानंतर दीपाला फोन करणे बंद केले.
मी वाड्यात रमण्याचा प्रयत्न केला. पण नाही जमले मला.
वेडा झालो होतो मी. कळत नव्हते काही.घरात असूनही अलिप्त राहायचो मी. माझा सारा आंनद तू घेऊन गेली.
तुझ्या सोबत खूप बोलायचे होते. पण तू भेटली नाही. बरेच दिवस मी आक्काला टाळायचो. आराधना मात्र मला खूप जपायची.माफी मागायची.आक्का पश्चात्तापेच्या आगीत जळत होती. आराधनाने लग्न न करण्याचा निर्धार केला होता. त्यामुळे तर आक्का अजूनच दुःखी झाली होती.तिचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले होते. काळ सरकत होता.तिचा तो रुबाब नाहीसा झाला होता. आता ती बोलायची नाही. शांत राहायची.काही दिवसांनी आजारी पडली.माझ्याकडे बघून रडायची. काही दिवसात गेली.
बाबाच्या वाट्याला लवकरच एकटेपणा आला होता.आईच्या आठवणीने आधीच ते थकले होते.नंतर माझा एकटेपणा बघत होते ते.मला दाखवत नव्हते पण आतून कोलमडले होते. लग्न कर म्हणून मागे लागायचे. त्यांचा व्याकुळ चेहरा सतत डोळ्यासमोर दिसायचा. हळूहळू त्यांना कळले मी लग्न नाही करणार म्हणून. वाड्यात खूप जीव होता त्यांचा.
या वाड्यात मी राहणार नाही हे त्यांना कळत होते.
कनक वाडयाचे काय होणार? पुर्वजांची निशाणी आहे हा वाडा… बाबा नेहमी सांगायचे आजोबा,
माझ्या वडिलांनी वाडा सांभाळून ठेवला कनक. या पिढीने दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द केला हा वाडा. मलाही माझ्या वडिलांनी खूप विश्वासाने हा वाडा सोपविला. मला आता तुझ्या हातात वाड्याचा कारभार द्यायचा आहे. आपल्या जीवावर या गावातील किती चुली पेटतात माहीत आहे का तुला?कनक त्यांना आयुष्यभर मदत करत आलो मी.
वाड्यात रोज दहा लोक कामाला असतात. त्यांचा रोजचा खाण्याचा प्रश्न मिटला वाड्यामुळे. शेतावर कितीतरी मजूर असतात….
बाबांनी खूप प्रयत्न केला मला तुझ्या आठवणीतून बाहेर काढण्याचा पण शेवटी हात टेकले त्यांनी.
मी माझ्या मनाला नाही सावरु शकलो.आठवणीचे मोरपीस सतत जवळ असायचे. त्या रंगीबेरंगी आठवणींना नाही सोडता आला मला.तू मला विसरली हे फार बरे झाले आंनदी. तू तरी सुखी आहेस.
तू अचानक का आली आंनदी?
अरे, माझे माहेर आहे हे. मी कधीपण येऊ शकते. गंमत आहे सगळी. आतापर्यंत दादा,वहिनीने कधी आग्रह नाही केला.पण या वेळी मात्र आग्रहाने बोलावले.
दादा, वहिनी खूप मागे लागले होते. सारखा फोन करायचे. मुले घरी राहून कंटाळली होती.बरेच झाले मी आली तर. मला भेटायला का होईना तू वाड्यात आला.
आंनदी, मी उद्या वापस जाणार. तुला फक्त एकदा भेटायचे होते. बोलायचे होते तुझ्या सोबत.
कनक, बस झाले आता तुझे बहाणे. उद्या पासून शाळा सुरू करायची आहे तुला. वाड्याला त्याचे वैभव प्राप्त करून देण्याची जबाबदारी तुझी. पळवाटा बस झाल्या आता.माझ्यासाठी कर रे हे सर्व.
दोन दिवसांनी परत जातांना मी आंनदाने जाऊ शकेल.
माझे हे स्वप्न पूर्ण कर कनक….असे बोलून आंनदी घरी निघाली. मुले घरी वाट बघत होती.
आई.. आता फक्त दोन दिवस राहायचे आहे मामाकडे.
शाळा सुरू व्हायला वेळ आहे. अजून थांबायचे का?
मुले विचारत होती. मुलांना मामाकडे करमत होते.
नाही.. बस झाले आता.. दोन दिवसांनी निघायचे आपल्याला. घरी बाबा वाट बघत आहे आपली…
आंनदीला घरचे वेध लागले. धवलची आठवण आली.
आता घरी लवकर जायला हवे.
क्रमशः
Next Part
https://marathi.shabdaparna.in/१८-स्वप्न
Previous Link
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा



