१८-स्वप्न तहानलेले-ज्योती रामटेके
का तुला सोडवे न गाव तुझे?
सकाळ झाली. दादा, वहिनी उठले होते. आंनदी आरामात उठली. आज दादाला सुट्टी. आज काढेल तो शेतीचा विषय. असे तिला वाटत होते.तेवढ्यात वहिनीने छान गरम चहा आंनदीला दिला.आठ दिवस किती केले वहिनीने. सर्व केले प्रेमाने. दादा पण मी आहे म्हणून घरी लवकर येत होता.
आठ दिवस कसे निघून गेले कळले नाही. जुने लोक म्हणतात तेच खरे.. दोन दिवसांचे माहेर प्रत्येक मुलीला हवे. आज आई असती तर.. आंनदीच्या डोळ्यांत पाणी आले.
दादा, वहिनी उद्या निघते मी. आठ दिवस झाले. घरी धवल कंटाळला आता. मुले रमली इकडे.जायचे नाव नाही काढत आहेत. धवल मात्र रोज कधी येणार म्हणून विचारतो. दादा ते सहीचे काम राहूनच गेले.
दादा, वहिनी हसायला लागले.
हसायला काय झाले दादा? आंनदीला कळेना.
अग आंनदी, तुला बोलावण्याचे कारण होते ते.आई, बाबा गेले आणि तू माहेर सोडले. तू का येत नाही हे कळलेच नाही मला.तुझी आठवण येत होती. आई नेहमी सांगायची
आंनदीला कधी अंतर देऊ नको. तिच्याकडे लक्ष ठेव.
आईचे शब्द आठवायचे. मग आम्ही ठरवले या वेळी तुला बोलवायचेच.शेती तर तुझ्या नावाने मी केव्हाच केली.
आंनदीचे डोळे अश्रूंनी डबडबले.
आंनदीने बॕग भरुन ठेवली. आज कनकला घेऊन त्याची शाळा सुरू करण्यासाठी तिला वाड्यात जायचे होते.
कनकला नवी उभारी , उत्साह भरुन द्यावयाचा होता तिला.
सुरवातीला कनक शाळा सुरू करायला तयार नव्हता.पण आंनदीला दुखवायचे नव्हते त्याला.किती तरी वर्षांनी आंनदी भेटली होती त्याला. ती पण परत जाण्यासाठी.
आयुष्याच्या एका वळणावर ती मला सोडून निघून गेली. पण या नव्या वाटेवर मात्र तिची सोबत हवी आहे. तिचा अप्रत्यक्ष सहवास प्रेरणा देणारा असेल. आता पण तिच्या चेहऱ्यावर हसू दिसायला हवे. माझ्या कडून आंनदी दुःखी होईल असे आता तरी होणार नाही.
कनक स्वतःला समजावत होता.
कनक, आंनदीने शाळेचे दार उघडताच आंनदीचा चेहरा फुलला. आज तिचे, व कनकचे स्वप्न पुर्ण झाले होते.
आंनदी, वाडा सोडल्यावर आश्रमात राहायला गेलो. दुःखाचा विसर पडावा म्हणून खूप प्रयत्न करायचो पण नाही जमले. ते जखमेसारखे टोचत राहायचे.मला माझ्या जबाबदाऱ्या.. कर्तव्य या गोष्टींचा विसर पडला होता.
तू पुन्हा आली आणि माझ्या आयुष्याला पुन्हा एक नवे वळण मिळाले. समाजसेवेचे. मर्म मला कळले. सर्व संपायच्या आत नवी दिशा मिळाली मला. तुझ्या मनातली सल आता कायमची संपू दे.जे झाले ते नियतीचा खेळ होता.माझ्यामुळे तुझे माहेर तोडले तू. पण आता समोर चार दिवस माहेरपणाला येत जा… सुखाचा संसार आहे तुझा.
अजून काय हवे आहे मला. तुझे सुख ते माझे सुख.
मी खूष आहे कि नाही याचा विचार तू करु नकोस आंनदी.
मी आता वाड्यातच राहणार. वाडा सोडून कुठेही जाणार नाही.तुला दिलेला शब्द आयुष्यभर पाळणार.
कनक, तू लग्न कर आराधना सोबत. तुझी वाट बघत आहे ती.
आंनदी,ते शक्य नाही. माझ्या स्वप्नाच्या हिंदोळ्यावर फक्त तू आणि तू आहेस.ते स्वप्न माझ्यापासून हिरावून घेऊ नको.
कनक वेडा आहेस तू.अरे,असे कुणाच्या आठवणीत किती दिवस जगायचे. तू तुझा मार्ग शोध आता.अरे निसर्ग सुद्धा वेळेनुसार आपले ऋतू बदलवतोच ना. आपण काय वेगळे आहोत. तू विचार कर कनक,आंनदी जीव तोडून सांगत होती. चल,बराच वेळ झाला आहे आंनदी. दादा घरी वाट बघत असेल.ऊद्या तुला सोडायला येऊ का.. म्हणजे स्टेशनवर. तू म्हणशील तर येतो.
कनक विचारत होता.
आंनदीच्या डोळ्यात अश्रू आले.
दिवस उजाडला.आज संध्याकाळी निघायचे म्हणून वहिनी ने बरेच काही सामान भरून ठेवले.आंनदी काय हवे ते घेऊन जा..
वहिनी सारखे सांगत होती.
काही नको वहिनी.
तुम्ही जे प्रेम दिले ते खुप मोठे आहे माझ्यासाठी.आयुष्यात अजून काय हवे असते.
संध्याकाळ झाली.. आकाशात मेघांनी गच्च गर्दी केली होती. थोड्या वेळात जोराचा पाऊस सुरू झाला. आंनदी स्टेशनवर जायला निघाली. दीपा, आराधना रस्त्यावर वाट बघत होत्या.
आंनदी कनक वाड्यात परत आला हेच माझ्यासाठी खूप आहे. बोलता.. बोलता.. आराधना चे डोळे पाणावले.
कनक स्टेशनवर उभा होता. पाऊस जोरात सुरू होता.कनक पावसात भिजत होता.आंनदीला सारे कळत होते. त्याचे अश्रू पाण्यासोबत वाहत होते. ती फक्त बघत होती. आंनदीला निरोप देण्याचे धाडस कनकला शक्य नव्हते. तेवढ्यात ट्रेन आली.
कनक फक्त बघत होता…
का तुला सोडवे न गाव तुझे?
मी मला सोडले तुझ्यासाठी
आंनदी गाडीत चढली. तेवढ्यात धवलचा फोन आला. आंनदी गाडीत बसली नं. बरोबर ये…
गाडी सुरू झाली.कनक पावसात उभा होता. हळूहळू तो धूसर होत गेला.. आतातर दिसेनासा झाला…
पावसाने आता जरा जास्तच जोर धरला…
कनक दूर गावी जाणाऱ्या आनंदीच्या गाडीकडे बघत राहला.
समाप्त
स्वप्न तहानलेले—प्रिय वाचक तुम्ही कथामालिकेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
कथामालिका आवडल्यास प्रतिक्रिया द्या,तुमची प्रतिक्रिया लेखकांसाठी प्रोत्साहन आहे.
Previous Part
https://marathi.shabdaparna.in/१७-स्वप्न-तहानलेले
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा





कनक-आनंदीची प्रगल्भ प्रेमकथा…कथामालिका सुरेख साकारली.
स्वप्न तहानलेले टायटल Perfect
शेवटच्या ओळी 👌👌कथा अप्रतिम
खुप परिपक्व प्रेम होते कनक आनंदी चे.
कथा मालिका आवडली.
Chan