|
स्वप्न— सूर्य मावळतांना उजाडणारी अन् सूर्य उजाडल्यावर मावळणारी.
रात्र झाली कि स्वप्नांचे जग सुरु होते.
स्वप्नाचे इमले बांधायला उजेडाची गरज नसते.
उलट अंधाऱ्या रात्री डोळे बंद केल्यावरच दिसतात ते.
काहीही बंधने नसतात या स्वप्नांना.
नैतिक अनैतिकतेच्या सीमा सहजतेने पार करतात स्वप्ने.
स्त्री -पुरुष
गरीब-श्रीमंत
जात-पात असा कुठलाही भेदभाव नसतो.
बालकांना मोठे झाल्याचे,
मोठ्यांना बालपणीच्या रम्य दिवसाचे,
प्रेमीजणांना विरहाचे,
विरहात असणाऱ्यांना मिलनाचे,
मजेत जगणाऱ्यांना मृत्यूचे,
मृत्यू समीप असलेल्यांना जगण्याचे…..
विविधरुपी अन् विविधरंगी
काही आनंदी तर काही दुःखी
कधीही पूर्णत्वास न जाणारी.
आयुष्यात काय काय अधूरे राहिले त्याची सतत आठवण देणारी.
जे आपल्याजवळ नाही तेच आठवणारी.
रात्र झाली कि कुठल्याही स्वप्नांवर हक्क आपलाच.
असेच बघितलेल
एक स्वप्न फक्त स्वप्नातच ,स्वप्नापूरते
दिवसभर माझ्या आसपास नसणारी तू
रात्र झाली कि येतेस हळूच
झुळझुळणाऱ्या
नदीवरच्या खडकावर ,
चांदण्याच्या धवल प्रकाशात
उभी
ओली चिंब
चंद्राची चांदणी बनून
हिरवाकंच शालू नेसून
गळ्यात मोगऱ्याची माळ
माळलेली,
आरसपानी सौंदर्याने नटलेली
मी उभा
बकुळीच्या झाडाखाली
गंधाने धुंद झालेला,
गात्रं न् गात्रं रोमांचित
तू देतेस हाक
नदीवरच्या खडकावर
पुनवेच्या चंद्रात दिसते मला
तुझ्या हातावर गोंदण केलेले माझे
नाव
विसावतेस माझ्या मिठीत
अधीर झालेले तुझे अधर
टेकतात माझ्या अधरांवर
विरहाचा दाह सोसलेल्या
मला विझवतेस हळूहळू
चांदण्या फिकट होताहेत आता
सुर्यकिरणांनी चंद्रही झाकोळला गेला.
बकुळीचा गंधही संपला
तूही माझ्या मिठीतून दूर दूर
क्षितिजा पलिकडे
गळसुत्र ल्यालेली,
कपाळावर ठसठसीत कुंकु
अंधूकसे दिसते आहे
कुणीतरी तुझा हिरवा चूडा ल्यायलेला
हात हातात घेऊन
तुला घेऊन जातांना
मी इथेच झुळझुळणाऱ्या
नदीजवळ भरलेल्या नेत्रांनी
बकुळीच्या झाडाखाली बेधूंद उभा,
पुन्हा तुझ्या स्वप्नाची वाट बघत .
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
|










सुंदर …
Kitti chhan g
सुंदर लिहिली… आहे
खूपच यथार्थ
खूप सुंदर स्वप्नांची दुनिया
Chan