मराठी कथामालिका-उलटे पडले फासे
प्रिय वाचक,यापूर्वीच्या भागात आपण वाचले, सुरुवातीला अनोळखी असणारे राहूलविनय,मनिष सोबत राहत असल्यामुळे एकमेकांचे मित्र बनतात.राहूल आणि मानिष मस्तीखोर,अभ्यास न करणारे तर विनय गंभीर आणि अभ्यासू वृत्तीचा असतो.आता पुढे वाचा विनयच्या डायरीत काय आहे ते.
दिनांक
शाळेत बाईंनी अभ्यासक्रम संपवून उजळणी सुरु केली होती.
काल बाई मला म्हणाल्या
विनय तू असाच अभ्यास केला तर दहावीतही तू प्रथम येशील.तुझे भवितव्य उज्वल आहे बेटा.
बाईंच्या शब्दांनी अभ्यास करण्याचा हुरुप अजून वाढला.
दिनांक
आज परीक्षेचे वेळापत्रक आले.
परीक्षा आहे म्हणून अभ्यासासाठी एक आठवडा सुट्ट्या दिल्या. आम्ही तिघेही अभ्यास करत होतो.मला प्रथम यायला हवे ही काळजी तर आणि राहूल,मनिषला पास तरी झालो पाहिजे ही काळजी.
वर्षभर अभ्यास न केल्यामुळे दोघांनाही आता खूप मेहनत घ्यावी लागत होती.
दिनांक
आज परीक्षा संपली. मोकळे वाटत आहे आज. यावेळी आम्ही तिघांनाही एकेकटे आपापल्या गावी जायचे ठरवले होते.बाबा घ्यायला येणार नव्हते.
बाबांचे पत्र आले कालच.सांभाळून ये.मध्येच बसमधून उतरु नको.बसच्या खिडकीतून हात बाहेर काढायचा नाही.अशा सुचना होत्या.
आम्ही परवा परत जायचे ठरवले.
राहूलला आमच्या दोघांसोबात सिनेमा बघायचा होता.
दिनांक
आज आम्ही सिनेमा बघायला गेलो. अमिताभ बच्चनचा.मारामारीवाला. राहूलला खूप आवडतात असे सिनेमे.
सिनेमा बघून खोलीवर वापस आलो.राहूलने त्याचे एक गुपीत आम्हाला सांगितले. त्याला आठवीत शिकत असलेली अर्पिता आवडायला लागली होती.
(मनिष- अरेच्चा मला पण तिच्यासोबत असणारी तिची मैत्रीण कविता खूप आवडायची तेव्हा. गोरीपान,लांबसडक केस आणि अभ्यासात हुशार असलेली. पण माझे हे गुपीत मनातच राहले.कारण,तिला मी मुळीसुद्धा आवडत नव्हतो.तेव्हा वाईट वाटले मला.पण चलता है …..)
दिनांक
आज सामानाची बांधाबांध केली. दोन महिने सुट्ट्या होत्या.राहूल,मनिष,मी दोन महिने एकमेकांना भेटू शकणार नव्हतो. तिघांनाही आता एकमेकांची सवय झाली होती.
आम्ही आपापल्या घरी गेल्यावर पत्र पाठावायचे ठरवले.
उद्या पहाटेच आम्ही निघणार.स्टँण्डवर सोबत जाऊ,मग आपापल्या दिशेने..….
दिनांक
घरी येऊन तीनचार दिवस झाले पण डायरी लिहिण्याची इच्छाच झाली नाही.आधी राहूल,मनिषला पत्रे लिहीली.
आठवण येते त्यांची.
कविता पण आठवत राहते मध्येमध्ये.
पंकज आणि विजयशी खेळण्यात वेळ निघून जातो.
ते पण नववीत आहेत.आम्ही एकाच वर्गात होतो पहिलीपासून.मी होस्टेलमध्ये राहून शिकतो याचे त्यांना खूप अप्रुप वाटते.
दिनांक
परिक्षेचा निकाल लागला.पोस्टाने आला.
मी सगळ्यांच्या अपेक्षेप्रमाणे पहिला आलो.
घरी सगळ्यांना आनंद झाला.बाबांनी पेढे आणले.आईने पुरणपोळी बनवली.आजीने दृष्ट काढली.
विणाने पण सगळ्यांना तिच्या दादाचे कौतुक सांगितले.
आमच्या शेजारच्या काकु आईला म्हणाल्या आज
वहिनी तुम्ही नशिबवान आहात.विनय,विनासारखे मुलं आहेत तुम्हाला.
आईला किती छान वाटले असेल.
पण आई तसे दाखवत नाही.तिला वाटते जास्त कौतुक झाले तर मुले अभ्यास नाही करतील.
राहूल,मनिषचा निकाल अजून समजला नाही मला.
पास झालेच असतील.
दिनांक
आज आम्ही सगळे विजयाताई,माझ्या चुलतबहिणीच्या लग्नाला गेलो होतो.
तिथे पण सगळे माझे कौतुक करत होते. दहावीत चांगला निकाल यायलाच हवा असे म्हणत होते.
दिनांक
आज राहूल आणि मनिष दोघांचेही पत्र आले.दोघेही पास झाले. सुट्ट्या संपायची वाट बघत होते.आता पंधराच दिवस सुट्ट्या बाकी होत्या.मलाही आता होस्टेलवर जावे वाटत होते. राहूल,मनिष ला भेटायचे होते.आणि कविताला पण.
दिनांक
उद्या निघायचे आहे. सामान बरेच आहे सोबत म्हणून बाबा येत आहेत सोडायला. आज खूप वेळ पंकज आणि विजयसोबत घालवला.
दहावीचे वर्ष असल्यामुळे आता कधी येणे होईल माहित नाही.
आईचे डोळे तर आजपासूनच पाणावत आहेत. मी विचारले तर आई म्हणाली, तुला नाही कळणार आईचे मन’
दिनांक
काल आलो.बाबा आले होते सोडायला.
जातांना उदास वाटले.थकले आता बाबा.
लहानपणी आजोबा गेले. बाबा सगळ्यात मोठे.बहिणभावांची जबाबदारी बाबांवरच होती.
लोकांकडे कामे करता करता शिक्षण घेतले.छोट्या मोठ्या
नौकऱ्या करत आता सेल्स टॕक्स आॕफिसमध्ये कनिष्ट लिपिक आहेत. कमी पगारात सगळे व्यवस्थित करतात.
राहूल,मनिष माझ्या आधीच पोहचले होते.
उद्यापासून शाळा सुरु होणार.
दिनांक
आज दहावीचा पहिला दिवस.बाईंनी अभ्यास कसा करायचा? किती तास करायला हवा हे सगळे समजवून सांगितले.
मेहनत करा,महत्वाचे वर्ष आहे हे पण सांगितले.
पहिला दिवस असल्यामुळे आज फार कमी शिकवले.
मी सुरु केला अभ्यास आजपासूनच.
राहूल आणि मनिषलाही सांगितले पण ते पुढील आठवड्यात सुरु करणार आहे
विनय,मनिष,राहूल जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेत? विनयने दहावीचा अभ्यास सुरु केला
काय होईल तिघांच्या आयुष्यात?
Next Part
याआधीचा भाग वाचा खालील लिंकवर.
Next Part
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whats app no.
9867408400
शब्दपर्णचे इतर साहीत्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
छान कथा
छान लिहिले
छान कथा मालिका आवडली