कवी- बा.भ.बोरकर – रसग्रहण(कविता आणि अभंग)
केशी तुझिया फुले उगवतील- कवी- बा.भ.बोरकर – रसग्रहण
प्रेयसीचे सौंदर्य प्रियकराच्या नजरेने बघितले तर ते कसे दिसेल? आणि प्रियकर कवीमनाचा असेल तर…
कविवर्य बा.भ.बोरकर यांची ‘केशी तुझिया फुले उमलतील’ कवीमनाच्या प्रियकराचे भाव व्यक्त करणारी ही कविता आहे.
सुंदरतेचे वरदान लाभलेली ,सौंदर्याचे सगळे निकष पूर्णत्वास नेणारी,लावण्याने समृद्ध असलेली प्रेयसी-तिला नकली,बेगडी सौंदर्याची गरजच काय हा प्रश्न तिच्या प्रियकराला पडला.
अवघ्या चराचराला ही लावण्यवती आकर्षित करते.
या लावण्यवतीचे सौंदर्य वर्णित करतांना कवीने स्त्रीचे जे सामान्यपणे सुंदरता मोजण्याचे मापदंड असतात(नाक,डोळे,रंग) ते टाळले.तिचे लावण्य असामान्य आहे.ती फुलात आहे,काळोखात सोनपिसोळू फुलवणारी आहे,निष्कलंक (अमल)आहे, पवित्र आहे.या आगळ्या सौंदर्यकल्पनांमुळे कविता एका वेगळ्या उंचीवर पोहचली आहे.
केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी ?
चांदण्यास शिणगार कशाला ?बसशील तिथे लेणी !
काळोख्यातही निळ फुलवशील,चमेलीत बनवटा
तळमळणाऱ्या पुळणीवर अन मोगरी लाटा
ही कवितेची पहिली दोन कडवी.
तू स्वतःच नाजूक ,सुरेख फुलांची राणी आहेस.तुला केसात वेणी माळायची गरज नाही.
चांदण्यांना बाह्य श्रुंगाराची गरज असते का? तू म्हणजेच एक सुंदर शिल्प आहेस.
काळोखातही निळ फुलवण्याचे आणि गर्द चमेलीच्या बनात वाट निर्माण करण्याचे सामर्थ्य तुझ्या लावण्यात आहे.
सागरकिनारी रेताड जमीनीवर सुगंधीत मोगरी लाटांची निर्मिती करण्याची सृजनशीलता तुझ्यात आहे.
पहाटशी तू अमल निरागस, संध्येपरीसही भोळी
जुन्या ओळी गुणगुणताना जमतील सोनपिसोळी
तुझी पावले भिडता येईल तीर्थंकाळ पाण्याला
तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल अर्थ नवा गाण्याला
पहाटेसारखी शुभ्र,निरागस,पवित्र असलेली तू संध्येसारखी भोळीही आहेस.
तू काहीही गुणगुणलीस तरी मधुरता असलेल्या आवाजाने सोन्यासारखी भासणारी पिवळीधम्म दिसणारी सोनपिसोळी फुलतील.
तुझ्या नाजूकशा पावलांच्या स्पर्शाने पाण्याचे तिर्थ बनते,तुझ्या स्वरांच्या स्पर्शाने गाण्याला नवअर्थ प्राप्त होतो.
वाळुंतीलाही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते
तुझ्या दिठीने क्षितिजीचेंहि अभ्र विटाळूनी जाते
अशा तुला का हवे प्रसाधन ? तूच तुझे ग लेणे
तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे !
वाळूत उगवणारे इवल्या इवल्या, कोवळ्या तृणपातीसमान नाजूक असलेली तू, तुझी मोहक सुंदरता बघून दूरवर दिसणारे क्षितिजही तुझ्या जवळ येते.
एवढे सगळे ललनेचे वर्णन केल्यानंतर कवी तिलाच विचारतात मुर्तिमंत सौंदर्य असणारी तू.
तुला कुठलेही आभूषणे माळण्याची गरजच काय? लावण्यवती असलेल्या तुला साजशृंगार हवेतच कशाला? तुला केवळ बघूनच आमचे जीवन कृतार्थ होते.
बोरकरांनी म्हटल्याप्रमाणे, त्यांनी कधी कविता केल्या नाहीत, बोरकरांना कविता झाल्या.
वरील कविता तशीच नैसर्गिक आणि तरल आहे. तिच्यात लय आहे नाद आहे.कवितेतील लावण्यवतीसारखीच सुंदर आहे.
बोरकरांच्या या कवितेला श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे.कवितेतील मोरपीसी हळूवारपणा आणत ही कविता त्यांनीच गायली आहे.
आवडत्या कवीची आवडलेली कविता आणि तिचे रसग्रहण करण्याचा केलेला हा प्रयत्न.
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
प्रिती










खूपच छान
खूपच… सुंदर ..लिहिले
सुंदर कविता
खूप मस्त ….
खूपच छान 👌
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
सफल प्रयत्न
सुरेख