रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा-अभंग
माऊलींचे अभंग हे समस्त विश्वासाठी आहेत, चराचरासाठी आहेत, प्राणिमात्रांसाठी आहेत म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी मागितलेले पसायदान अद्भुत आहे. ते पसायदान स्वतःसाठी न मागता अवघ्या जगतासाठी विश्वात्मक देवाकडे मागितले आहे.
आज मी जो अभंग निरुपणासाठी घेतला आहे त्यात माऊली सुमनाभोवती गुंजारव करणाऱ्या भ्रमराला म्हणजेच आपल्या मनाला संबोधित करतात आणि त्याला आयुष्याचा आशय सांगतात तो खरोखरच अतिशय विलोभनीय आहे.
अभंगाच्या सुरुवातीलाच माऊलींनी अतिशय गोड ओळ लिहिली नव्हे ती अक्षरशः नादमय झाली. ते रुणझुणणे भ्रमराचे कमी आणि शब्दांचेच अधिक भासते. ही माऊलींच्या शब्दांची जादू आहे.
सौंदर्याची आसक्ती ही जन्मजात असते. मन विविध रंगांकडे, विविध सुमनांकडे आणि जी काही नजरेला सुखावणारे निसर्गाचे अभिजात लेणे आहे त्याकडे अगदी सहजगत्या आकर्षित होते. परंतु हे आकर्षण केवळ दैहिक राहून चालणार नाही तर त्याला ज्याचे आहे त्यास म्हणजेच विठुरायाला अर्पण करावे हा माऊलींचा मनोभाव मी मुक्तकाव्य रुपाने लिहून पाहतो.
रुणुझुणु रे भ्रमरा
मुक्तकाव्य
साद आली कुणाची ?
मनाची मनाची!!
रुणझुणले काही
चित्त थाऱ्यावर नाही.
बहु गोड ते असे काय?
अरे ते पाकळीचे पाय!
जाऊन येऊ तिथे जरा
मधुघट लावू अधरा.
पंख माझे इवलाले
ते आभाळभर झाले.
पाकळीचे काही रंग
दरवळणारे तरंग.
मधुबनाची आली हाक
हे राधे, देहाला झाक.
हाच एक कान्हारव
रुणझुणलेले रे दंव.
मन उडणारे मेघ
त्यास इंद्रधनू रेघ.
मोरपीस वर फिरे
अंतरात गोड झिरे.
येता पाकळीचा स्वर
मनी कमलिनी बहर.
धावे धावे गुंजारव
मन कालिंदी माधव.
फुलविती गोड वारे
राधा ती गोडवा रे.
सुखावले सारे रान
आकळले सारे भान.
परिमळलेली देहरात
राधा समईची वात.
तो कर्दमातला देठ
आला काळजात थेट
मन सुखावून फुले
तळ्याकाठी गंध झुले.
भ्रमराला हेच गाव
राधा राधा एक नाव.
हे अभंगाचे राऊळ
मना लागलेले खुळ.
हे मन केशरलेले
तळ्याकाठी उतरलेले.
विठो रान आबादान
आनुंदले भाव ज्ञान.
“ रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा
सांडी तू अवगुणु रे भ्रमरा
चरणकमलदळू रे भ्रमरा
भोगी तू निश्लळु रे भ्रमरा
सुमनसुगंधू रे भ्रमरा
परिमळु विद्रदु रे भ्रमरा
सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा
बापरखुमादेवीवरू रे भ्रमरा “
संतोष जगताप.
मोगरा फुलला अभंगाचे निरुपण वाचण्यासाठी कृपया खालील लिंक बघा.
https://marathi.shabdaparna.in/मोगरा-फुलला-mogara
https://marathi.shabdaparna.in/पैल-तो-गे-काऊ
https://marathi.shabdaparna.in/घनु
शब्दांनाही उमगले शब्दांच्या पलीकडले… अशी अनुभूती आली!