कर चले हम फिदा’ देशभक्तीगीत रसग्रहण
कर चले हम फिदा’ देशभक्तीगीत रसग्रहण

कर चले हम फिदा’ देशभक्तीगीत रसग्रहण

 ‘कर चले हम फिदा’ या गीतात देशभक्ती आणि बलिदानाची भावना शिगेला पोहोचली आहे. हकीकत चित्रपटातलं हे गीत १९६२ सालातल्या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर लिहिलं गेलं आहे. या गीताचे गीतकार आहेत कैफी आझमी. संगीताचा साज चढवला आहे मदन-मोहन यांनी तर या गीताचं गायन केलं आहे, आपल्या आवाजाने सर्वांना मोहून टाकणाऱ्या मोहम्मद रफी यांनी. या गीताद्वारे आझमी यांनी जवानांच्या मनात आपल्या मातृभूमीविषयी असणाऱ्या भावनांना योग्यरित्या टिपले आहे. या गीतात आझमी यांनी अतिशय सुंदर वर्णन केलं आहे की हे जवान स्वतःच्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत बलिदानाकरिता कसे सुसज्ज राहतात; आपला जीव टांगणीला लावून प्रत्येक क्षणी फक्त भारतभूमीच्या रक्षणाचाच विचार मनी बाळगून दुश्मनांशी कसे दोन हात करतात. या व्यतिरिक्त आझमी यांनी या जवानांद्वारे एक संदेश जनमानसात पोहचवला आहे की मातृभूमीचं रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. थोड्या-फार जवानांच्या शहीद होण्याने ही लढ़ाई अर्धवट थांबू नये, तर आणखी जवानांच्या पुढे येण्याने चोख कामगिरी बजावली जावी. आझमी यांच्या अत्यंत जोशपूर्ण अशा शब्दांत जवानांनी आपल्या साथीदारांचा हुरूप वाढवला आहे आणि ते खूप विश्वासाने या देशाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर टाकून या दुनियेचा निरोप घेण्याबाबत बोलत आहेत.
कर चले हम फ़िदा जान-ओ-तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियो ।
या गीताची सुरुवात खूपच सुंदर ओळींनी झाली आहे. या ओळी आपल्यासमोर युद्धात प्राणपणाने लढणाऱ्या आपल्या जवानांचं जिवंत चित्र उभं करतात जे आपल्या शेवटच्या क्षणी आपल्या साथीदारांना संबोधित करून त्यांच्या मजबूत खांद्यांवर या देशाचा भार टाकून या दुनियेतून निघून जाण्याबद्दल बोलत आहेत. वर-वर असं वाटू शकतं की हे जवान फक्त आपल्या साथी जवानांनाच संबोधित करत आहेत. पण आपण जर थोडं खोलात डोकावून पाहिलं तर असं नक्की जाणवतं की हे संबोधन देशाच्या प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक देशभक्ताला आहे. या ओळींमधून जवानांनी आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देशरक्षणाच्या जबाबदारीचा उल्लेखही केला आहे जी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने निभावली आहे. त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या साथींनी (किंवा सगळ्या देशवासियांनी) त्यांच्याप्रमाणे ही जबाबदारी पूर्ण निष्ठा आणि ईमानदारीने निभावावी. देशाची खरी काळजी वाहणारे हे वीर तेव्हाच निश्चिंत होऊन धराशायी होऊ शकतील.
साँस थमती गई नब्ज़ जमती गई
फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया
कट गये सर हमारे तो कुछ ग़म नहीं
सर हिमालय का हमने न झुकने दिया
मरते मरते रहा बाँकापन साथियो, अब तुम्हारे…
हे वीर भारतमातेच्या कुशीत कायमचं डोकं ठेवून झोपी जाण्यापूर्वी आपल्या देशवासियांना हे सांगत आहेत की कसं त्यांनी प्रत्येक वेळी मृत्युलाही हरवून आपल्या मातीचं रक्षण केलं आहे. ते सांगतात की हिमाच्छादित प्रदेशात शत्रुशी लढताना त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायचा. त्यांच्या नाडीतलं रक्त सुकून जायचं. अशा विपरीत परिस्थितीलाही त्यांनी कधीच जुमानलं नाही. या देशरक्षणाच्या लढाईत कित्येकांची मुंडकी उडवली गेली, कित्येकांचे बळी गेले. इतकं सगळं होऊनदेखील त्यांचा उत्साह जराही डळमळला नाही. ते पर्वताइतकेच कणखर उभे राहिले, लढत राहिले. त्यांच्या मनात या देशासाठी लढल्याबद्दल, घरच्या सुख-सोयींना, आरामाला मुकल्याबद्दल अजिबात दुःखं नाही, उलट खरा आनंद आणि अभिमानच आहे की त्यांनी भारतमातेची आन-बान-शान कायम तशीच ठेवली, जिवंत असेपर्यंत तिच्यावर कोणतंही संकट येऊ दिलं नाही. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की ते खूपच कमी वयात मृत्युला आलिंगन देणार आहेत आणि म्हणूनच ते मृत्युपूर्वी आपल्या साथीदारांवर या देशाच्या सुरक्षेचा भार सोपवू इच्छितात.
ज़िंदा रहने के मौसम बहुत हैं मगर
जान देने की रुत रोज़ आती नहीं
हुस्न और इश्क़ दोनों को रुसवा करे
वो जवानी जो खूँ में नहाती नहीं
आज धरती बनी है दुल्हन साथियो, अब तुम्हारे…
या ओळींमध्ये या मातीचे वीर सुपुत्र आपल्याला हे समजावत आहेत की देशासाठी कटून मरण्याची भावनादेखील का आणि किती महत्वाची आहे. ते सांगतात की जिवंत राहण्यासाठी तर अनेक संधी उपलब्ध आहेत, परंतू मातृभूमीकरिता सर्व काही पणाला लावण्याची सुवर्णसंधी पुन्हा-पुन्हा दार ठोठावत नाही. रक्तबंबाळ शरीर तरुणांचं आभूषण आहे. तरुणावस्थेत असं काही न करणं म्हणजे या अवस्थेच्या दोन मुख्य बाजू – सौंदर्य आणि प्रेमभाव, यांचा जणू काही अपमानच होय. वीरांच्या रक्ताने भारतमातेचे ललाट जणू कुंकवाने परिपूर्ण आहे, तिला वीरांमुळे सौभाग्य प्राप्त आहे. त्यांच्याचमुळे ही भारतभूमी नववधुप्रमाणे सजून साजिरी-गोजिरी दिसते. तिला नववधुप्रमाणे सजवणं वीरांचं परम कर्तव्यच आहे.
राह क़ुर्बानियों की न वीरान हो
तुम सजाते ही रहना नये क़ाफ़िले
फ़तह का जश्न इस जश्न के बाद है
ज़िंदगी मौत से मिल रही है गले
बाँध लो अपने सर से कफ़न साथियो, अब तुम्हारे…
हे रणवीर आपला उत्साह आवर्धित करत आपल्याला पुढे समजावतात की बलिदानाची वाट कधीच सुनसान नसावी. एकापाठोपाठ एक प्रत्येक व्यक्ती मातृभूमीच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती देण्यास हसत-हसत पुढे सरसावी. बलिदानाच्या या वाटेवर अग्रेसर होण्यासाठी अनेक जवान, अनेक लोकांनी पावले पुढे टाकावीत. या जवानांच्या मते बलिदानसुद्धा एक पर्व आहे, एक उत्सव आहे. ते ही बाब फार विश्वासाने सांगतात की या बलिदानाच्या उत्सवानंतरच विजयाचा आणि स्वातंत्र्याचा उत्सव आहे. मृत्युला हसत-हसत आलिंगन देणं म्हणजे जणू जीवन आणि मृत्युचा अनोखा संगमच, जो कोणत्याही उत्सवापेक्षा कुठेच कमी नाही. देशरक्षणाच्या या समररूपी अग्निकुंडात स्वतःला झोकण्याकरिता प्रत्येक देशभक्तालाच आपल्या डोक्यावर कफनरूपी पगडी बांधून तयार राहायला पाहिजे, अर्थात् स्वतःला शारीरिक आणि मानसिक, दोन्ही रूपांत कटिबद्ध ठेवायला पाहिजे.
खींच दो अपने ख़ूँ से ज़मीं पर लकीर
इस तरफ़ आने पाये न रावण कोई
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे
छूने पाये न सीता का दामन कोई
राम भी तुम तुम्हीं लक्ष्मण साथियो, अब तुम्हारे …
शेवटच्या ओळींमध्ये हे जवान आपल्या भारतमातेच्या शालीनतेच्या रक्षणाबाबत बोलत आहेत. ते सांगतात की आपल्याला आपलं रक्त सांडून दुश्मनांना या भूमिपासून दूर ठेवायचे आहे, त्यांना इथून पळवून, हुसकावून लावायचे आहे. या भूमिवर होत असणारी आक्रमणं, अत्याचार यांना थांबवायचे आहे. आता रावणाच्या रुपात कोणताही शत्रू आपल्या सीता मातेप्रमाणे पवित्र मातृभूमिकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करता कामा नये. या भूमिवर ताबा मिळवण्याच्या हेतुने या प्रदेशाच्या सीमेला हात लावणाऱ्या प्रत्येकाचा हात आपल्याला तडक कलम करायाचा आहे. हे फक्त योग्यच नव्हे तर तितकंच गरजेचंसुद्धा आहे. जेव्हा आपण असं करू तेव्हाच आपण विदेशी आक्रमणांपासून आपल्या देवीतुल्य भारतमातेची अब्रू वाचवू शकू. हे जवान शेवटी आपल्या सर्वांना संबोधून हे सांगतात की या धरतीचे आपण शूर-वीर आहोत, आपणच राम आणि आपणच लक्ष्मण आहोत. आपल्यात या पावन भूमीचं रक्षण करण्याची पूर्ण क्षमता आहे. या ओळींसोबतच स्वतःच्या प्राणांची बाजी लावणारे हे वीर जवान आपल्या खांद्यांवर या युद्धाची जबाबदारी सोपवून भारतमातेच्या पावन भूमीत मिसळायला तयार आहेत.
हे गीत वीररसाने समृद्ध आहे. या गीताच्या ओळी प्रत्येक देशवासियाच्या मनात उत्साह, जोश आणि स्फूर्तीचा संचार करतात. या गीताची ही खास बाब आहे की इथे जवान फक्त स्वतःची हकीकत सांगत नाहीत, तर प्रत्येक साथीदाराला हे सांगून प्रेरित करत आहेत की त्यांनी ही हकीकत आपली स्वतःची हकीकत, स्वतःची कहाणी बनवावी. या देशास्तव जगावं आणि याच देशास्तव मरावं. या गीताच्या ओळी इतक्या भावपूर्ण आहेत की त्या आपल्या काळजाला भिडण्यात सफल होतात. या गीतात असलेली भावनात्मकता, संगीतात्मकता, लयबद्धता आणि जवानांची तळमळ, यामुळे हे गीत फार प्रसिद्ध झालं आहे. मला असं खरोखर वाटतं की या गंभीर आशययुक्त गीताची प्रासंगिकता युद्धाच्या प्रत्येक वेळी आणि प्रत्येक परिस्थितीत टिकून आहे आणि टिकून राहील.
– शीतल कोकाटे, ठाणे.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!