ज्ञानेश्वर महाराज-जीवाचिया जीवा-अभंग निरुपण
( केशवाचा वैष्णव कोण नाही? सर्वच आहेत! त्याचे चालते-बोलते स्वरूप सदैव आपल्या आसपास हवे असे प्रत्येकालाच वाटते. राधेला वाटते की, तो सखा होऊन आपल्या भोवती राहावा, वारकऱ्यांना वाटते की तो विठ्ठल स्वरूपात सदैव आपल्या नजरेपुढे राहावा, मिराबाईला वाटते की, तो कान्हा तानपुरा छेडण्यातून प्रकट व्हावा, तर तुकाराम महाराज नीरेच्या काठी बसून त्याला आळवतात त्यात देखील तोच उत्कट भाव असतो. तर असा हवाहवासा गोडुला आपला लेक होऊन आपल्या अवतीभवती खेळत राहावा असे यशोदेला देखील निरंतर वाटते. मित्रांनो,अशी ही प्रत्येक वैष्णवाची केशवाप्रती असलेली अनन्यभक्ती मला सदर विराणीत आढळली.
कृष्ण किशोरवयीन झाला. त्याने यथावकाश तारुण्यात पाऊल ठेवले आणि द्वारकेस निघून गेला परंतु यशोदामाईसाठी तो लाडका कान्हाच होता. आणि आईला लेकरू दूर गेल्यानंतर जे विभ्रम तिला होतात, जी आस लागते. तोच निदिध्यास सदर वीराणीतील भावार्थमधून मला जाणवला; तो निरूपण स्वरुपात मांडतो.)
जीवाचिया जीवा
अरे कान्हा, तुला काय सांगू आज अगदी सकाळीच जाग आली. सकाळी म्हणजे उत्तर प्रहर नुकताच उलटला होता बघ! उठून बसले. डोळ्यातील झोप गेली ती गेलीच. सारखी तुझी आठवण यायला लागली. कितीतरी वेळ उगाच बसून राहिली अंथरूणावर. नजरेपुढे तुझा चेहरा तरळला. कुठे असशील तू? काय करत असशील? एवढेच नव्हे तर तुझ्या व्यस्त आयुष्यात मला विसरला देखील असशील असे नानाविध प्रश्न मनात यायला लागले. मनातील काहूर क्षणोक्षणी वाढायला लागले. ती बेचैनी काही केल्या मनातून हटेना.
गाई वासरांच्या हंबरण्याचा आवाज कानी पडला आणि किंचित भानावर आले. कुणाला हाका मारत असावीत ती? मला ती तुला? कदाचित तुलाच! त्या मुक्या जीवांकडे हंबरण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नाही ना! बरं, एक करते तुझ्या वतीने मीच त्यांच्याकडे जाते. नंदघराची कवाडे उघडली. अजून अंधारच पसरलेला होता. जणू अंधारात कृष्णच सामावलेला होता. त्या गडद अंधारात गाई वासरांचे लकाकणारे डोळे दिसले. त्या डोळ्यांतील कारुण्य दिसले आणि हो, त्या डोळ्यांमध्ये तुझ्याच आठवणींचा हंबर जाणवला.
घराच्या पायऱ्या उतरून त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या गळ्यातील घंटानादाने त्यांचा बोलावण्याचा आभास मला अधिक जवळ नेत होता. गाईवासरांच्या अंगावरून हात फिरवायला लागले, तोच त्या स्पर्शातून तुझ्या स्मरणाचे प्रतिबिंब मनात उमटायला लागले. तू अगाध आहेस कान्हा! अरे लाडक्या, तू कोणत्या स्वरूपात नाहीस ते तरी सांग?
जीवाचिया जीवा प्रेमभावाचिया भावा ।
तुज वांचूनि केशवा अनु नावडे ॥ १ ॥
अगदी हलकेच झुंजूमुंजू व्हायला लागलं होतं. गाईवासरांना वैरण टाकली. पाणी आणायला घागरी घेऊन आडावर गेले. पोहरा रहाटेवर ठेवला. तो पोहरा गरगरत खाली गेला. पाण्यापर्यंत पोहोचला. पोहऱ्याला जलाचा झालेला तो स्पर्श! कृष्णील स्पर्श!! जणू मीच रिकामी घागर होऊन स्वतःतील मातृत्व तृप्त करून घेण्यासाठी माझ्या कान्हाजवळ पोहोचली असा भास झाला रे! रिकामी घागर जलात बुडायला लागली. तृप्ती काठोकाठ यायला लागली. कसा वर्णावा तो अनुभव!! ती नितळ हाक त्या घागरीत सामावायला लागली. खेप भरली. घागरी डोईवर, काखेत घेतल्या. घराकडे निघाले. पावलांच्या हेलकाव्याने घागरीतून आवेगाने बाहेर येणारे जल अंगाखांद्यावर पडायला लागले. वाटले, तुझाच तो स्पर्श आहे! इतका नितळ आहेस रे तू सोनुल्या!
जीवें अनुसरलिये अझून का नये ।
वेगी आणा तो सये प्राण माझा ॥ २ ॥
आल्यावर दुधाच्या धारा काढायला बसले. गाईंच्या धारोष्ण उबदार पायस स्पर्शातून तू आला बरं! मी धारा काढायला बसले की, तू जवळ उभा रहायचा. मी गाईच्या दुधाची धार थेट तुझ्या मुखात रिचवायची तेव्हा काय धमाल यायची! नाही? अरे कान्हा, मी रांधायला बसले तरी तू मागे पुढे असायचा. खोड्या करत रहायचा. तुझे ते नटखट आभास अजूनही माझ्या अवतीभोवती आहेत रे!
…. पण आता केवळ आभास नकोत. केवळ तुझे आभासी स्पर्श देखील नकोत. आता लेकरा तूच प्रत्यक्ष हवा आहेस! एकदा ये नजरेपुढे. डोळे भरुन बघू दे. खूप दिवस झालेत रे! सय वेडी असते रे बाळा! तिला वेळ काळ कळत नाही. वळीवाच्या पावसासारखी ते कधीही येते. .. आणि तू तर काळीज आहेस. ह्रदय आहेस माझं. ह्या ह्रदयाचं प्रत्येक स्पंदन देखील तुझ्यापर्यंत पोहोचतं ना! तू तुटलेल्या ताऱ्यासारखा खळकन् माझ्या आसमंतात येतोस. तर कधी अर्णवासारखी तुझ्या सयेची गाज मनावर उमटतो तेव्हा मनाची होणारी ती स्थिती तुला काय कळणार? त्यासाठी बाळा वैष्णव व्हावं लागतं रे!
सौभाग्यसुंदरु लावण्यसागरु ।
बापरखुमादेविवरु श्रीविठ्ठलु ॥ ३ ॥
तू ह्या यशोदेचं काही देणं लागतो म्हणून एकदा ये. तुझ्या सवंगड्यांसाठी ये, तुझ्या लाडक्या राधेसाठी ये, गवळणींसाठी ये, नव्हे नव्हे अवघ्या गोकुळासाठीच ये! तुझं लोभसवाणं रुप पुनश्च पाहायचं आहे. मला, राधेला, गाईवासरांना, पानाफुलांना, जे जे तुझ्यावर जीव लावतात त्या सर्वांना एकदा बघू देत तुला. दह्यादुधाला, दहीकाल्याला हात लावला की तुझी सय येते, नवनीतात तू दिसतो, देवघरात तू दिसतो, अंगणातील बकुळबहरात, पुनवरातीच्या चांदण्यांत तुझेच लावण्य दिसते रे कान्हा! मी गायलेली अंगाई तुला फार आवडायची ना! ये एकदा, पुन्हा तीच नीज देईन तुला.
ये एकदा घरी. नंदघरी, गोकुळद्वारी. अवघे ऋतु तुझ्या प्रतिक्षेत आहेत. येशील ना?
© संतोष जगताप.
अभंगाचे निरुपण आवडल्यास अवश्य प्रतिक्रिया द्या.
https://marathi.shabdaparna.in/आठवणीतील कविता