अरे अरे ज्ञाना..
( राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगांमध्ये बहुतांश वेळा समाधी अवस्थेचे वर्णन आलेले आहे. कारण समाधी तो त्यांचा स्वभाव आहे, स्थायीभाव आहे. त्यांचे मन त्या ध्यानावस्थेत रमते. त्यांचा स्वतःशी होणारा संवाद हा आत्मिक समाधान देणारा असल्यामुळे माऊली बरेचदा समाधी अवस्थेबद्दल बोलताना आढळतात. मुळात ते योगी आहेत. लौकिकापासून अलिप्त झालेले,देहाचे सगळे सोस सोडलेले पण अखंडपणे वैश्विक रहस्याचा भेद घेणारे माऊलींचे मन खऱ्या अर्थाने विश्वात्मक होते. आपण ज्या सहजतेने आपल्या दिनचर्येत रमतो तितक्याच सहजतेने माऊली योग क्रियेत तल्लीन होतात. त्यांना मनाची एकरूपता साधण्यास अजिबात वेळ लागत नाही.
समाधी अवस्था ही योगक्रियेतील शेवटचा टप्पा. षडरिपूंना आवर घालत मनाचा साधलेला तोल योगियाला त्या निश्चल अवस्थेत घेऊन जातो. माऊलींचे साहित्य वाचत असताना असे सातत्याने वाटते की माऊलींनी समाधी अवस्थेचा अनेक वेळा अनुभव घेतला आहे. सामान्य जनांना भावव्याकुळ करणारा तो क्षण योगियासाठी मोक्षाच्या द्वारी जावून आल्याचा आभास असतो. संत तुकारामांचा शब्दात सांगायचे म्हणजे ‘ आपुले मरण पाहिले म्या डोळा जाला तो सोहळा अनुपम्य..’ त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊलींनी अनुभवलेली अनुपम अवस्था सदर अभंगात मांडली आहे. आणि अभंगात व्यक्त झालेले ते माऊलींचे बोल मी ललित लेखनातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो आहे. )
अरे अरे ज्ञाना..
राघववेळेलाच घराबाहेर पडलो होतो. एकटाच चालत निघालो. उजाडायचे होते तरीदेखील पायाखालची वाट नित्याचीच असल्यामुळे कुठेही अडखळलो नाही. मातीला पाय लागले की, तो मायस स्पर्श अंगभर जाणवतो. ती पायाखालची वाट मला अगदी सुखरूपपणे पानाफुलांच्या गावात घेऊन जाते. तो गाव माझा असतो. माझ्या एकट्याचा असतो. माझ्यातील एकांताचे तिथे रमणीय राऊळ असते. मनातल्या मनात दूरवरचा प्रवास सुरु होतो. तुम्ही काहीही म्हणा, मला स्वतःशी बोलायला अतिशय आवडते. माझं मन अखंडपणे माझ्याशी संवाद साधत असतं. माझं अंतर्मन माझा अतीव नितळ आणि सच्चा सखा आहे. त्या राऊळाच्या पारावर मी माझ्या त्या सख्या समवेत संवाद साधायला बसतो.
हे जे निबीड आहे ना, हे निजलेल्या पाखरांचे गोकुळ आहे. हलकेच उमलू पाहणाऱ्या कळ्यांचे माहेर आहे. पंख मिटून झोपलेल्या फुलपाखरांची शांत नीज आहे हे निबीड. मी पावलांचा जराही आवाज न करता त्यांच्या समवेत एका खडकावर येऊन बसलो आहे. माझाच श्वास मला ऐकू येत आहे. मनातील गायनाचे आरोह अवरोह अपार तृप्ततेचे दान देत आहे. माझ्यातील ओंकार मला ऐकू येत आहे. ही ओंकारलय कित्ती सहजतेने निनादते ना मनात! मन निलय निशांत झालं आहे. पावन झालं आहे.
अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान, कळो आले
झुंजूमुंजू फिटायला लागलं होतं. पाखरं जागी झाली होती. पानांफुलांतील चिवचिवाट वाढला होता. घरात, अंगणात खेळणाऱ्या लहानग्यांसारखे फुलपाखरांचे थवे अवतीभवती बागडायला लागले. पाखरांच्या इवल्या चोचींमधून उमटणाऱ्या लकेरी मला उंच दिगंतात चालायला खुणावत होत्या. घरट्यांमधील लगबग वाढली होती. फांदीवरील पंखांची फडफड वाढली होती. आळोखेपिळोखे देत जे उडण्यास सज्ज झालेले ते रुपडे अतिशय आतुर जाणवायला लागले. मी त्यांच्यासमवेत काय भरारी घेणार? पण त्यांचा आग्रह मोठा भारी! ‘आमच्या समवेत चलच तू..’ ही त्यांनी घातलेली गळ माझ्या चेहऱ्यावर स्मित उमटवत राहिली.
त्यांचा आग्रह देखील मोडवेना. पाखरांना म्हणालो,” तुम्ही घ्या भरारी! मीदेखील तुमच्या समवेत असल्याचा आभास तुम्हाला होत राहील.” भारी भोळी पाखरं! लगेच माना डोलावत, किलबिलत पंख पसरून हवेवर स्वार झालीत. माझ्याकडं पंख नव्हते पण त्यामुळे फार काही अडलं नाही. मी मनाने त्यांच्यासोबत होतो. त्यांच्या सहवासात होतो. काय ती झेप! काय ते उड्डाण! कित्ती विलोभनीय! जे जे अवकाशाच्या अंतरंगात सामावायला लागलो ते ते उरलेसुरले दैहिक आभास मागे सुटायला लागले. ती नको असलेली पिसे गळून पडायला लागली. चांदण्या हळूहळू निमायला लागल्या होत्या. घराकडे परतायला लागल्या होत्या. परतीच्या वाटेवर त्यांचे लुकलुकणे लेकरांच्या गोड हसण्यासारखे भासत होते. आदित्याचे कोवळे किरण चांदण्यांची जागा घ्यायला लागले होते. एकीकडे विलय तर दुसरीकडे सृजन! कित्ती अद्भुत ना! द्वैत अद्वैत एकरूप होण्याचा तो सोहळा मनाला अपार सुखावत होता. ह्याच तत्त्वाच्या तर जवळ यायचे होते, हेच तर विश्वात्मक सुख मिळावेसे वाटत होते हाच तर शोध होता, आज तर प्रवास होता!
तुझा तूंचि देव, तुझा तूंचि भाव
फिटला संदेह अन्य तत्वी
हीच तर उजेडाची दीप्ती अपेक्षित होती, हेच तर उजळलेले गाव हवे होते, असेच तर स्वरेल भुपाळी गाणारे थवे हवे होते, हाच तर अट्टाहास होता! किरणांचे चमचमते रूप पंखांना जोजवायला लागले. मनावर जुईचा शेला पसरायला लागला. झेपावणारे मन वाकून अवनीकडे पाहत होते अधूनमधून. खाली सर्वदूर कोवळी निळाई आच्छादलेली दिसत होती. जे हवे होते ते मिळाले होते. मन तृप्त तृप्त झाले. हे कोणत्या जन्मीचे देणे असावे? ही कोणती पुण्ये फळाला आली असावीत?
.. काहीतरी पूर्वसंचित असावे. म्हणूनच तर विठुरायाने मनात कुठेही न्यून ठेवले नाही, उणीव ठेवली नाही.
मुरडुनिया मन उपजलासी चित्तें
कोठे तुज रितें न दिसे रया
मनाला फुटलेले पंख परतीच्या मार्गावर निघाले. स्थिरावलेली झेप राऊळाच्या दिशेने यायला लागली. पाखरांच्या आग्रहावरून केलेले हे वेडे धाडस अगदी अचाट होते. दिगंताच्या देवघरात निळुल्या बाप्पाचे दर्शन घडवणारे हे वेड होते. ह्या धाडसाची भरारतृप्ती घेऊन घराकडची वाट धरली. ह्या आत्मिक संवादाने मनाचे मौन तोडले होते, त्याला नवी पाखरभाषा दिली होती.
अंगणात पाऊल ठेवले. सडा शिंपलेला होता. त्यावर इवली इवली अल्पनेची दानपाऊले रेखाटलेली होती. कवठी चाफा खुलला होता, प्राजक्त घळघळून पडला होता, कोरांटीची फुलं काट्यांच्या सहवासात राहून देखील हसत होती. तीच तऱ्हा जर्द गुलाब फुलांची! काय दिलदार जगणे आहे!! गाईवासरांच्या बोलावल्याने भानावर आलो. त्यांच्या नजरा जणू माझीच वाट पाहत होत्या. कित्येक नजरांना माझी प्रतीक्षा असेल. कुणाच्या तरी प्रतीक्षेत माझीही नजर असेल.. एक धाव तिकडे देखील घेतली. गाईच्या वासराच्या स्पर्शात हरवून गेलो. थोडा हरखून गेलो. ती अवघी प्रेमाची, स्नेहाची अबोल भाषा! प्रेमाव्यतिरिक्त काहीही मागणे नाही. हे समर्पण कुठे मिळत असावे? त्या अवस्थेसाठी कोणते यत्न करावेत?
तो विचार मनात घेऊनच उंबरा ओलांडून घरात आलो. देवघराकडे नजर गेली. ते शुचिर्भूत स्वरूप अत्यंत लोभसवाणे दिसत होते. सुमनांचा घमघमाट आजूबाजूला दरवळत होता. जाऊन विठोबारायापुढे बसलो. तेवणाऱ्या समयांच्या उजेडात तो न्हाऊन निघाला होता. मनात आले की, बाहेर आदित्याचे रूप घेऊन हाच तर तळपत आहे. अवघ्या गावावर, शेत-शिवारावर ह्याचेच तर ऊन पसरले आहे. जो स्वयंप्रकाशित आहे त्यालाच ह्या समयांनी आपण उजळवत आहोत. हा मनोभाव लयविलयाच्या हिंदोळ्यावर झुलायला लागला.
दीपकी दीपक मावळल्या ज्योती
घरभरी वाती शून्य झाल्या
हे सुखाचे आगर आता सभोवताली होते. घर अंगण चैतन्याने भरलेले होते. आता काहीही मागणे नव्हते, काहीही उणीव नव्हती. विठू सन्मुख होता, मी त्याच्या समोर होतो. निळाशार विदेह प्रत्यय नेणीवेच्या वेशीवर घेऊन जात होता. वैकुंठाच्या द्वारावर पोहोचवत होता. विठू मिटल्या नजरेने उघडलेल्या काळजात कैवल्यगाथा लिहीत होता..
वृत्तीची निवृत्ती आपणां सकट
अवघेंचि वैकुंठ चतुर्भूज
कोणी ह्याला समाधीचे सुख म्हणेल. पण मी तर ही सहजवस्था मानतो. ह्याच तल्लीनतेचे अभंग मनोमन गातो. ह्या नितळ एकांतालाच गजबजलेली पंढरी समजतो. ह्यालाच निधीवन मानतो. हा निळासावळा अनुभव सदोदित असाच अंतरंगात पाझरत रहावा. आता अधिक काय मागावे? मला विठ्ठलपाय द्यावे!! मला विठ्ठलपाय द्यावे!!
निवृत्ती परम अनुभव नेमा
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो
© संतोष जगताप.