Get Together -marathistory
पक्ष पंधरवडा संपून उद्या अश्विन मास आरंभ होणार होता….उद्या प्रतिपदा, नवरात्रोत्सवाची सुरुवात….शारदीय नवरात्र….!!वसुधाताई ची 50 शी जवळ आली होती….तरी उठत बसत का होईना पण त्यांची जय्यत तयारी सुरु होती.देवघराला रंगरंगोटी झाली होती,समया स्वच्छ होऊन जागेवर नेटनेटक्या विसावल्या होत्या.आता 9 दिवस नंदादीपाची भूमिका त्यांना विनातक्रार पार पाडायची होती…
वसुधा ताईचे यजमान विश्वासराव झेंडूच्या फुलांच्या जणू ताटव्यात बसले होते असे ते फुलांच्या माळा चे काम हाती घेऊन बसले होते…वसुधाताईची दोन्ही मुले परदेशात…कुलदेवतेचे नवरात्र…..वय झाले तरी उत्साह दांडगा….सारे व्यवस्थित व्हावे ,कुलदेवता प्रसन्न राहावी ,मुले बाळे आनंदात नांदावी…हीच यामागची भूमिका…!!
कामाची लगबग सुरु होती…इतक्यात मोबाईल चे ओरडणे सुरु झाले…गुडघ्यावर हात टेकून उठेपर्यंत आणि त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत त्याला दम नव्हता…कशाबशा वसुधाताई त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तोवर त्यानं आवाजच बंद केला…!! चष्मा लावून पाहिलं तर तो उर्मिलेचा फोन होता…
“अहो,काय हे?फोन वाजत होता,घेतला नाहीत तुम्ही?” वसुधाताई ने इथेही बोलायची संधी सोडली नाही…..
“अहो,मी एवढ्या फुलांच्या गराड्यातून उठलो असतो,तर पुन्हा सुई शोधायला तुमचाच 1 तास गेला असता ना?”
“हो,ते हि खरंच म्हणा..!!” म्हणतं वसुधाताई मिश्किल हसल्या…..व म्हणाल्या,उर्मिलेचा फोन होता…हे ऐकताच विश्वासराव म्हणाले,”आधी आम्हाला 1 कप चहा द्या…अन् मग लावा उर्मिलेला फोन,म्हणजे 1,2 तास चालू देत तुमच्या गप्पा,मी नाही करणार distrub….!!”
“बरं…!आणते लगेच…”म्हणत त्यांची स्वारी किचन कडे…
उर्मिलेचा बऱ्याच दिवसात फोन नव्हता…आता काय काय बोलायचे ,सांगायचे याचा तपशील मनात क्रमवार चहासोबत उकळत होता…किती तरी गोष्टी सांगायच्या होत्या तिला…..उर्मिला जिवाभावाची मैत्रीण…40 वर्षांपासूनची बालमैत्रीण…
चहाचा कप श्री च्या हाती सुपूर्त केला,अन् उर्मिलेला फोन लावला…”बोल गं, ….उर्मिले…उठून फोन घेइपर्यंत बंद झाला मेला….
बोल आता….”
तिकडून आवाज आला,”अगं, फोन मुद्दामच केला ….नवीन बातमी होती माझ्याकडे…आपल्या कॉलेज चे Get Together ठरले आहे,मला निमंत्रण आलंय, तुलाही येईल….जाऊ या का आपण? पुढच्या आठवड्यात आहे म्हणे…भेटी होतील साऱ्यांच्या….तुला जमेल ना? “
तिने एका दमात सारे प्रश्न आणि उत्तर दोन्ही संपवले…
पण वसुधाताई ची मनःस्थिती वेगळी होती….तिला भूतकाळ आठवला…. म्हणजे भविष्य पुसट वाटत होतं…. ती मनातून कचरली….कधी नव्हे ते दोघीच्या गप्पा लवकर संपल्या…याच विश्वासरावाना पण नवल वाटलं….!!फोन संपला पण भूतकाळातील वादळ मात्र चक्रीवादळा गत मनात फिरायला सुरुवात झाली…
प्रभाकर….वसुधाताई ची जोडी छान होती…प्रभाकर त्यांना मनातून आवडायचा….उंचापुरा,सुदृढ,पि ळदार शरीरयष्टीचा प्रभाकर…नव्याने मिसरूड फुटलेला…नौजवानच…!त्याचे सैन्यात जाण्याचे स्वप्न होते….तसा चंगच बांधला होता त्याने जणू…!वसुधा ताईची इच्छा नसताना तो स्वतःच्या स्वप्नपूर्तीसाठी सैन्यात जाणारच होता…4-5 वर्ष यांची जोडी कॉलेजात सर्वांनाच आवडत असे…कितीतरी एकत्र घालवलेले क्षण,आठवणी,त्यांच्याकडे होत्या….दोन्ही घरातूनही विरोध असा झाला नाही..
.दोघे एकमेकांना साजेसे होते….सारे काही मनाप्रमाणे होत गेले…आणि अश्यातच प्रभाकरला सैन्यातली order आली, नोकरी आणि छोकरी एकत्रच …कुलदेवतेची कृपा म्हणून त्याने वसुधा सह देवीला नमस्कार केला होता.पण प्रभाकर ने सैन्यात भरती होऊ नये असे वसुधाताई ला मनोमन वाटे…
.त्यांनी कित्येकदा त्याला अडवण्याचा प्रयत्न केला होता…पण त्याने आपला हट्ट सोडला नाही.join होऊन येतो,म्हणत Training पूर्ण केली…आणि पहिलीच joining ‘कारगिल युद्धासाठी’सीमेवर जावे लागले….त्याचा काही फोन,पत्र, निरोप काहीच नाही,…6-7 महिने उलटले,वसुधाताई त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या…
वय वाढतच चालले होते….याचा मनावर जबरदस्त परिणाम होत होता….पोर हातची जाईल,असे वाटून वडिलांनी समजूत घालून विश्वास रावांचे ठिकाण पाहून वसुधा ला बोहल्यावर चढवले
होते….त्यांच्या आयुष्याची घडी पुन्हा नव्याने बसली आणि त्या संसारात रमल्या तसा त्यांच्या वडिलांचा जीव भांड्यात पडला….!
आज वाढदिवस असल्याने या साऱ्या गोष्टी त्यांना आठवत गेल्या…एका वाढदिवसाला प्रभाकरने त्यांना आवडत्या pink colour ची साडी पण भेट दिली होती…30-35वर्षात साडीचा रंग जरी फिका पडला होता तरी त्यात ले प्रेमाचे घट्ट धागे जशास तसे होते…
.वसुधा ताईने न राहवून उर्मिलेला फोन केला…”मी नाही गं येत Get Togethar ला..तू जा ,हवं तर….!” थकलेल्या स्वरात त्या बोलल्या…
“असं कसं वसू…!का नको? जाऊया की….भेटी होतील साऱ्यांच्या….या उतारवयात…!!
सुमती,शारदा, प्रतिभा…इनामदारांचा शशी…आणि आला तर प्रभाकर…भेटी होतील साऱ्यांच्या…” अशी आठवण करून दिली उर्मीलें नं…. आणि आपण दोघी नक्की जाणार हे ठासून सांगितलं सुद्धा.
वसुधा ताई उठल्या….देवघरातील नंदादिपात तेलाची धार धरली आणि देवीसमोर हात जोडले व म्हणाल्या,”अंबामाय,आज वयाच्या 60 ठी त प्रवेश करते आहे…आजवर सारं सांभाळून घेतलंस, इथुंन पुढेही अशीच पाठीशी राहा गं बाई.
पाहता पाहता दसरा उलटला आणि देवीची यथासांग सांगता झाली….आज Get Together साठी निघायचे होते….उर्मिला वसुधाताई ला pick up करणार होती….ठरल्याप्रमाणे दोघी निघाल्या… 150-200 की.मी.चा प्रवास करून दोघी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचल्या.
‘माहेश्वरी भवन’ मध्ये ठेवलेल्या या कार्यक्रमात आता सारी शिक्षक मंडळी नवतरुण दिसत होती….तरी त्यांच्यातला दांडगा उत्साह कार्यक्रमाची रंगत वाढवत होता….
जुने शिक्षक मात्र कोणीच नव्हते….मोठया हॉल मध्ये 200 खुर्च्या ready होत्या …त्यातल्या 100-150 एव्हाना भरल्या पण होत्या…खूप सारी मित्रमंडळी गप्पा मध्ये गुंग होती…60 ठी त ली सारी मंडळी पण केसांना रंग रंगोटी करून कशी तरुण झाली होती सर्वाना भेटून खूप आनंद झाला…पण तरी वसुधाताईची घालमेल सुरूच होती.त्यांची नजर काहीतरी शोधतच होती…!
कार्यक्रमाला सुरुवात झाली,अन् कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी ‘लेफ्टनंट कर्नल प्रभाकर’ यांचे नाव घेण्यात आले….तश्या वसुधाताई चमकल्या…..त्यांनी मान वर केली तोच…स्टेजवर उंचापुरा,पिळदार मिशांचा,वयाने अजूनही तरुणच वाटणारा प्रभाकर ….सैन्यात उलट प्रकृती सांभाळून होता….आणि आता कर्नल ची पदवी पण.
आज त्याला स्टेज वर पाहून वसुधाताई ला आनंदच भरतचं आलं जणू….!त्यांचे डोळे आपसूकच पाणावले….!तसा उर्मीलें न त्यांचा हात घट्ट धरला…चष्मा सरकवून त्यांनी हलकेच डोळे पुसले…आपण उगाच आलो,असं हि क्षणभर वाटून गेलं.लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधतात हेच खरे!असे वाटून गेले….!
प्रभाकर चे दणदणीत भाषण होऊन कार्यक्रमाची सांगता झाली…लाजरा प्रभाकर खरंच सैन्यात जाऊन पूर्णपणे बदलला होता…त्यांचा विश्वासच बसेना या साऱ्या गोष्टीवर.
आता जेवणाच्या अस्वादाची वेळ आली….पण वसुधाताई ना सारे बेचव वाटू लागले….त्या प्रभाकरच्या नजरेत येऊ नये, याची कटाक्षाने काळजी घेत होत्या….पण उर्मिलेच्या मागे मागे लपण्याचा त्यांचा अयशस्वी प्रयत्न….! शेवटी प्रभाकर सैन्यातील माणूस….युद्धात हार मानणारा नव्हताच मुळी….!हळूच कुठून तरी अवतरलाचं,
“वसू, थांबशील ना…!बोलायचे आहे.” तिला स्वतःला आवरता आले नाही…
“खूप वाट पाहिली प्रभाकर…! थांबलेच तर होते….!” पुन्हा त्यांचे डोळे पाणावले….!!
सर्वांच्या नजरा लपवत एका टेबल वर यांचे संभाषण सुरु होते.
प्रभाकरने बॅगेतून एक पार्सल काढले,….”मला माहित होत,तू येणार…म्हणून तुला वाढदिवसाच Gift आणलंय… तुझी आवडती pink colour ची साडी….!आता निखळ मैत्रीचं प्रतीक म्हणून….!”
वसुधाताई शांत बसल्या होत्या…
“मी तुझा अपराधी आहे वसू….! मला क्षमा कर…पण मी त्याची शिक्षा भोगली आहे,भोगतो आहे…तुझे लग्न झाल्याचे समजले,आणि मी स्वतःला देशसेवेसाठी वाहुन घेतले….नको होते मला दुसरे कोणी आयुष्यात तुझ्याशिवाय……!मी राहिलो एकटाच…माझ्या तिरंग्याच्या सोबतीने.
आता वसुधाताई ने मान वर करून पहिले….
डोळ्यातील आसवं आपसूकच गालावर ओघळली….उर्मिला एकमेव साक्षीदार होती आजवर साऱ्या गोष्टीतली… ती मधेच बोलली…,”वसू,…आयुष्याच्या उतारवयात आता काय गं हवे…? निखळ मैत्रीचं नातं सुद्धा किती आनंद देऊन जातं… एकदा मनाला विचारून बघ….!हाच आनंद उर्वरित आयुष्य सुंदर बनवतो. मैत्रीचे सुखद रेशमी धागे पुन्हा नव्याने गुंफूया. मुलांच्या आयुष्यात दखल दिल्यापेक्षा आपणच आपलं आयुष्य बिनधास्त जगूया. आता आणखी काही नको…!!”
वसुधा ला उर्मिलेच म्हणणं पटलं…. तिने पुन्हा प्रभाकर पुढे मैत्रीचा हात केला…आणि त्याने आणलेली आवडत्या pink colour ची साडी गोड स्मितहास्य करून स्वीकारली…..उतारवायतला प्रभाकर नव्याने चांगला निखळ मैत्रीत पुन्हा एकदा उठून दिसत होता…पुन्हा एकदा मैत्रीचे सूर जुळले .आयुष्याच्या या वळणावर….!
सौ.प्रिया देशपांडे
(नांदेड)
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा.









सुंदर ..
खूपच सुंदर 👌
Khup chan