हळदी कुंकू-स्त्री कथा
हळदी कुंकू-स्त्री कथा

हळदी कुंकू-स्त्री कथा

हळदी कुंकू-स्त्री कथा

हळदी कुंकू ही हिंदू महिलांशी संबंधित एक धार्मिक संकल्पना आहे . यामध्ये विशिष्ट पूजा सण या निमित्ताने स्त्रियांना आमंत्रित करून कपाळावर हळदी कुंकू लावले जाते . तसेच घरी कोणी स्त्रिया किंवा कुमारीका आल्यास घरातून बाहेर पडताना हळदी कुंकू लावण्याची प्रथा आहे. वर्षभरातले काही सण , जसे चैत्रगौर, संक्रांत ,नवरात्री या दिवशी हळदी-कुंकू केले जाते.
आजकाल घरातून बाहेर पडताना लावायचे हळदीकुंकू लोप पावत आहे.
पुर्वी स्त्रियांना घरातून बाहेर पडायची विशेष मुभा नव्हती. मोठ्या कुटुंबात त्यांचा वेळ घरकाम स्वयंपाक जेवणे मुलं सांभाळणे यात व्यतीत व्हायचा .
मनोरंजन किंवा मैत्रिणी शेजारणी एकमेकांना भेटण्याची काही कारण साधन नव्हते. त्या काळात स्त्रियांना ठराविक काळानंतर एकमेकींना भेटणे, गप्पा मारणे, सुख दुःख वाटून घेणं यासाठी ही प्रथा अस्तित्वात आली असावी. त्या निमित्ताने स्त्रियांना ठेवणीतल्या साड्या साजशृंगार करण्याची संधी मिळत होती . अशी हळदीकुंकवाला सुरुवात झाली.
मुलगी जन्माला आल्यापासूनच तिच्या कपाळी लाल गंध लावायचे. लाल रंग हा शक्तीचे प्रतीक आहे . पुढे येणाऱ्या प्रसंगासाठी तिला आधीपासूनच तिच्यातल्या शक्तीची जाणीव केली जाते.
विधात्याने सृष्टी निर्माण केली जीव उत्पत्ती केली .
प्रथा परंपरा रूढी जाती-धर्म मानवाने तयार केल्या.’ त्या’ने त्याच्या कलाकृतीत जीव ओतला म्हणजे कधीतरी तो जीव त्याच्याकडे वापस जाणार. हा सृष्टीचा नियम .
कोण आधी, कोण नंतर हे एक गूढ आहे . त्या गोष्टीबद्दल आपण अज्ञानी असतो म्हणूनच जगण्याचा आनंद उपभोगू शकतो.
(जीवनाचा आनंद घेतांना ) पुरुष जोडीदाराला आधी ‘बोलावणं ‘ आलं तर स्त्रीला जोडीदाराला काही अलिखित नियमांचा घडोघडी सामना करावा लागतो. त्यापैकी एक __ हळदीकुंकू.
चारचौघीत असताना समोरचीचा हात तिच्या कपाळाकडे जाताना अडखळतो.
(समोरच्याला तिची कृती सहज वाटते पण जोडीदार गमावलेल्या स्त्री तिचा अपमान भासतो . )
एका क्षणात ती सौ ची श्रीमती होते . पण या सौ ते श्रीमती च्या प्रवासात तिला कितीतरी गोष्टीं सामोऱ्या येतात. आता तिच्या सोबत तिचा जोडीदार नाही, याची पदोपदी तिला कुंकू सारख्या गोष्टीतून जाणीव करून दिल्या जाते.
कुंकू लावणे हा तिच्यासाठी महत्त्वाचा भाग असतो. लहानपणापासून कपाळावर मिरवलेले ही कुंकू एका झटक्यात तिच्यापासून तुटते . पण का ? (निरुत्तर करणारा प्रश्न )
लहानपणी नवरा नसतो , कुठेतरी असतो म्हणून कुमारिकेला आपण कुंकू लावतो . मग अशा स्त्रियांचा पण जोडीदार त्यांच्या मनात कुठेतरी असतो मग त्यांना का नाही ?

अघटित घडल्याने तिच्यावर पडलेल्या कामगिरी तडीस नेण्यासाठी तिला लहानपणापासून बाळगलेल्या या लाल गंधाच्या शक्तीची आता जास्त गरज असते. (आणि नेमकी तीच शक्ती तिच्या कडून हिरावण्याचा प्रयत्न होतो.)

ती जर वयस्क किंवा सत्तरी ओलांडली असेल तर अशा गोष्टी ती सहज मान्य करते . पण अर्धवट संसारात अचानक झालेल्या आघाताने कुंकू सारख्या गोष्टी तिला पचवणे कठीण जाते. तिच्या मैत्रिणी सख्या शेजारणी कडून अशा प्रकारे करून दिलेला जाणीवेतून ती अजून कोलमडते.
त्यामुळे ती चार चौघात कुठल्या कार्यक्रमात जाणे टाळते. याउलट एकट्या पुरुषाला कसलेही बंधन नसते .घरच्या अडचणी विविध गरजांनुसार तो दुसरे लग्नही करतो .पण क्वचितच स्त्रीने दुसरे लग्न केल्याचे ऐकण्यात येते.
तिची समजूत काढण्याचे प्रकार बघा …

आता तुलाच आईवडील दोघांचीही काम कर्तव्य करायचे, त्यांचा व्यवसाय सांभाळायचा, त्यांच्या आई-वडिलांचा मुलगा व्हायचं , सगळी जबाबदारी सांभाळायची खंबीर व्हायचं पण हळदीकुंकू सारख्या प्रसंगाने तिने खचून जायचं नाही. त्याचे राहिलेले हीने सगळे करायचे पण त्याच्या वाट्याला येणारी देवाची पूजा मात्र करायची नाही. हा कसला भेद ?
पत्नीविना एकटा पुरुष सर्व धार्मिक कार्ये करू शकतो. मग ती का नाही ???
तिच्या समजुतीने देवानी तिच्यावर अन्याय केला असतो त्यात तिचे म्हणणारे आजूबाजूचे त्यात प्रसंगानुरूप भर घालत असतात. का????

आज काल लग्न झालेल्या मुली नवरा असून नसल्या सारख्या दिसतात . कोणाला कुंकू लावल्याने ऍलर्जी येते तर कोणाला गळ्यात , हातात काही घातले की कामे सुचत नाही . फॅशन किंवा पोशाखनुसार कपाळी कुंकू अथवा टिकली लावायचे की नाही ते ठरवतात. कोणी तर चक्क कुंकू नका लावू म्हणून सांगतात. असो , तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कुणालाही त्यांच्या खाजगीत ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. मग तिच्या बाबतीत काही गोष्टी सार्वजनिक कशा असू शकतात ? तिने कसे राहावे कोणत्या रंगाची साडी बांगड्या घालू नये किंवा घालावे या बाबीसुद्धा तिच्या वैयक्तिक असू नये का ?
कोणाचा नवरा कितीही दारू पिऊन तिला मारहाण करु दे तरी ती वटपौर्णिमेची पूजा करणे सोडत नाही. का ??अनेक कारणांपैकी एक कारण समाजातल्या विकृत वाईट नजरेतून वाचायला तिला हक्काच्या जोडीदाराची आवश्यकता असते.

काही जणी असतात ज्या त्यांच्या अशा मैत्रिणींना आवर्जून सगळ्या कार्यक्रमात सहभागी करून घेतात.
त्या थोडा हटके विचार करतात. खरोखरीच कौतुकास्पद. परंतु काही त्यांनाही वेगळे बोल लावतात.
स्त्रीच स्त्रीची वैरी म्हणावयास भाग पडतात.

तुम्हाला काय वाटते?
जोडीदार निघून गेल्यावर स्त्रीने कुंकू लावू नये?
तिने तिचे संपूर्ण जीवन बदलावे?
अवश्य सांगा.
आपले मत अभिप्रेत आहे.

लिखाणातून कोणाच्या भावना नकळत दुखवल्या गेल्या असल्यास क्षमस्व.

मोहिनी पाटनुरकर राजे.

19 Comments

  1. Preeti

    ह्दयस्पर्शी लिखाण.
    विचार करायला लावणारी पोस्ट.
    काही गोष्टींवर नव्याने विचार व्हायला हवा.

    1. Veena

      खुपच छान लिहिलंय तुम्ही कोणीतरी असं लिहायला बोलायला सुरुवात केलीच पाहिजे

  2. Veena

    खूपच छान लिहिलंय तुम्ही, जास्तीत जास्त स्त्रिया जर अशा लिहीत किंवा बोलत जातील तर ही कुप्रथा सुद्धा मोडीत निघेल

  3. दिपाली संजय कुलकर्णी

    जेव्हा लोकं आपल्या दुःखात सोबत नसतात तेव्हा त्यांचा विचार करून आपण का जगावं?? अपल्याला जे पटेल जस राहाव वाटेल तसंच आपण राहावं

    1. Mohini1408

      Thanks rohini, आपल्या आजूबाजूला कोणी असे असल्यास आपल्या कृतीतून त्यांना आधार मिळावा.

  4. Mrunal

    खूप छान व्यक्त केले वहिनी आणि मी तुमच्या मताशी अगदी सहमत आहे. स्त्रीचा मान आहे तो आणि त्यात जोडीदार असला आणि नसला तरी तो तिला मिळालाच पाहिजे. समाज फक्त जबाबदारीची जाणीव करून देतो त्यापलीकडे कितीतरी गोष्टीचा त्याग हा स्त्रियांना करावा लागतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!