अटळ- मराठीकथा
अविनाशनी विचाराच्या तंद्रीतच धाडकन घराचं दार उघडलं . पायातली चप्पल सरकवली. पंख्याची स्पीड वाढवून त्याने स्वतःला पलंगावर झोकून दिलं .
त्याला जरा अस्वस्थ वाटत होतं म्हणून ऑफिसमधून अर्धी सुटी घेऊन तो घरी आला होता. आज घडलेल्या त्या प्रसंगाने त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं. अचानक बी. पी. वाढल्या सारखं वाटलं त्याला अन् घामाघूम झाला होता.
अविनाश अगदी तिशीतला उमदा तरुण . दोन वर्ष झाले नोकरी लागून. लग्नाळू – वधुच्या शोधात असलेला.
नास्तिक नाही पण कुंडली ग्रहतारे राशिभविष्य यावरही त्याचा विश्वास नव्हता , श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नको या नवविचाराचा नवतरुण .
पण आजच्या घटनेने तो अगदीच प्रश्नार्थक होता, मनातून घाबरला होता
इच्छा नसताना त्याचा मित्र राजन स्वतः च्या कामासाठी त्याला सोबत म्हणून एका गुरुजी कडे घेऊन गेला . गुरुजींचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास दांडगा, नुसती फेस रिडींग घेऊन ते अख्खी कुंडली मांडत .
राजनची कुंडली पाहता पाहता त्यांनी एक नजर अविनाश वर फिरवली आणि तो ‘धरून ‘आणल्या सारखा बसलाय हे त्यांनी हेरले . गुरुजींनी अविनाशचा परिचय करवून घेतला. त्याची चौकशी केली आणि राजनची कुंडली पाहता पाहता त्यांनी चक्क अविनाशच्या भविष्यात घडणारी आणि तीही आजच , अशी एक धक्कादायक बाब मांडली आणि ते ऐकल्या पासूनच तो अस्वस्थ झाला होता.
‘आज तुझ्या आयुष्यात खूप मोठं गंडांतर येणार आहे. एक सहा महिन्याचा मुलगा तुझा जीव वाचवणार:आहे’.
तसा तो चपापला. विश्वास नसला तरी कोणी मरणाची भाषा करावी हे जरा त्याला अस्वस्थ करून सोडणारे वाक्य त्याच्या कानात घुमलं, जणू आकाशवाणीच होती ती.
त्याचा चेहरा कावराबावरा झाला. दुसरं म्हणजे सहा महिन्याचे बाळ जीव वाचवणार ?
हे कसं शक्य आहे?
विचाराने त्याचं डोकं सुन्न झालं होतं.
पलंगावर आडवा होऊन फिरत्या पात्यांकडे पाहत राहिला. फिरणाऱ्या पात्यांच्या बरोबरीने विचारचक्र चालू होते .
अशातच दारावरची बेल वाजली.
घरकाम करणारी विठा होती . तिला आश्चर्य वाटलं, यावेळेस साहेब घरी कसे ? अविनाश घरी नसेल तर तिच्या जवळ असलेल्या चावीने दार उघडून काम करत असे.
विठा आत आली . तिचे छोटे बाळ तिनं बैठकीत तिच्या जवळच्या दुपट्यावर झोपवलं . पोटापाण्यासाठी विठा
बाळंपणानंतर सव्वा महिन्यातच कामाला लागली होती. लेकराला सोबत घेऊन काम करत असे. घरी कोणी सांभाळणार नव्हतं अन् नवरा शुद्धीत असेलच याची खात्री नव्हती म्हणून ती त्याच्या भरवशावर बाळाला सोडत नसे. अविनाश बैठकीतच होता तिने बाळाला झोपवले आणि कामासाठी किचन कडे गेली .
‘ साहेब, काम होईपर्यंत इथे झोपवते बाळाला ध्यान ठेवा बरं का !’ असं अगदी हक्कानं सांगितलं.
पण विठा काय बोलली याकडे अविनाशचे अजिबात लक्ष नव्हतं मुळी. तो गुरुजीचा विषय त्याच्या डोक्यातून जात नव्हता.
विठा कामात मग्न झाली अविनाश विचारात.
तिकडे विठाने भांडे संपवून कपड्यांच्या बादल्या उचलल्या होत्या , तसा बाळाच्या रडण्याचा आवाज तिला आला पण साहेब आहेत समोरच म्हणून जरा निश्चिंत होती .
तोवर बाळ रांगत रांगत टेबलाच्या खाली गेला होता आणि त्याच्या पायातील वाळा टेबलाच्या खाली अडकून त्यातून पाय बाहेर निघत नव्हता. अर्थात टेबलाखाली पाय अडकला गेला होता तसा तो जोरजोरात रडू लागला. त्याच्या रडण्याने अविनाश भानावर आला त्याने पाहिले आणि तो बाळाकडे धावला. तोवर बाळाची पाय काढण्यासाठी झटापट चालू होती.
एवढेसे मुल ते पण संकटातून सुटण्यासाठी प्रयत्न करत होते पण आपण संकट येण्यापूर्वीच अस्वस्थ का होतोय ? हा विचार क्षणात अविनाशला स्पर्शून गेला.
त्याच्या रडण्याने अविनाशने त्याच्याकडे धाव घेतली आणि एवढ्यात पलंगावर धाडकन आवाज आला . त्याने मागे वळून पाहिले तर पंख्याचे पाते पलंगावर येऊन झोपले होते . फुल स्पीड मधील पंखा जशास तसा सिलिंग मधून तुटून धाडकन पलंगावर आदळला होता पण अविनाश मात्र सहीसलामत या गंडांतरातून बाहेर आला होता. बाळाचा पाय आधी त्याने काढला पण मनातला थरकाप कायम होता.
पंख्याची पाती मात्र माना खुपसून गादीमधे गुंडाळून बसली होती.
विठा धावतच आली. बाळाला साहेबांच्या कडेवर पाहून विठाचा जीव भांड्यात पडला तिने बाळाला उराशी घट्ट धरलं . ती एकदा साहेबांकडे आणि एकदा पंख्याकडे पाहतच राहिली. अविनाश मात्र निरुत्तर.
गुरुजीची भविष्यवाणी खरी की माझी आयुष्याची दोरी बळकट…….
आणि खरंच गंडांतर टळलं होतं, तेही सहा महिन्याच्या बाळामुळेच.
क्षणात त्याने बाळाला पोटाशी घट्ट धरले आणि त्याच्या डोळ्यातील आसवे आपसूकच बाळाला धन्यवाद देऊन गेली.
मोहिनी पाटनुरकर राजे.








छान लिखाण
छान..
Wahh apratim
खूप मस्त
Wah