साडी हृदयातील ठेवा-मराठी लघुकथा
सौ. दर्शना भुरे हिंगोली
आज घरी बीसी चा कार्यक्रम असल्याने सकाळी उठल्यापासूनच चेतनाची कामाची घाई चाललेली.. सानिकाने तिच्या लेकीने पटपट घर आवरुन सोफ्याला कव्हर्स चढवले. जमिनीवर फुलाफुलांचा गालिचा अंथरून .. टवटवीत गुलाबफुले फुलदाणीत सजवून आईला दाखवण्यासाठी बैठकीत आवाज देवून बोलावले.
सानिकाने बैठक अगदी टकाटक केलेली पाहून तिने निश्चिंत होत दीर्घ श्वास घेतला. घर आवरून होईपर्यंतच १० वाजले.. अजून बरीच कामे राहिली स्वयंपाक, सर्वांची जेवणं बीसीसाठी लागणारा नाश्ता वगैरे वगैरे …ती पटपट हात चालवू लागली.भाजीला फोडणी घालून चपात्या करून घेतल्या. आज बीसीसाठी दालपक्वान बनवण्याचा बेत त्यामुळे सोबतच गॅसवर दुसऱ्या बाजूला कुकरमध्ये चणे वाफवायला ठेवले.. वेळेवर घाई व्हायला नको म्हणून पक्वान आदल्या दिवशीच तळून ठेवले होते. सानिका लिंबाच्या फोडी करून नाश्त्यासाठी लागणाऱ्या प्लेटस् पुसू लागली.. तशीही बीसीची वेळ दुपारी २ वाजताची त्यामुळे अजून तास दोन तास तरी वेळ शिल्लक होता.
तोपर्यंत स्वयंपाक वगैरे सर्व हातातील कामे आटपून ती तयार होण्यासाठी खोलीत गेली.
बीसी मध्ये आजच्या दिवशीचा साडीचा आकाशी रंग ठरलेला . एरवी ठरलेल्या रंगाची साडी चेतना आदल्या दिवशीच काढून ठेवते. पण आज घरीच कार्यक्रम असल्याने सकाळपासूनच्या घाईगर्दीत विसरली होती. तेव्हा तयार होण्यासाठी ती घाईघाईने कपाटातून साडी काढण्यासाठी कपाट उघडून तिला हवी असलेली साडी शोधू लागली.
तिचा आवडता रंग आकाशी त्यामुळे कपाटात आकाशी रंगाच्या बऱ्याच साड्या होत्या पण तिला तिच्या बाबाने दिवाळीला घेऊन दिलेलीच आकाशी साडी आज घालायची होती.
त्या एका साडी साठी तिने अख्खे कपाट पिंजून काढले पण साडी काही तिला मिळत नव्हती.. एव्हाना सानिका तिची कामे आटपून खोलीत येवून पलंगावर पडलेल्या साड्यांचा ढिगारा पाहून आश्चर्यचकीत होत म्हणाली,
आई काय हेॽ
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत चेतना म्हणाली,
सानू अग..यात आबाजीने दिलेली साडी दिसत नाही आहे. मला आज तीच घालायची होती.
झाला प्रकार ओळखून सानिका म्हणाली,
अग..आई तूच नाही का ती आठ दिवसांपूर्वी रोलप्रेसला टाकली.
आबाजीला जावून आज पंधरा वर्षे झाली. आजकाल त्या साडीची फॅशन नाही राहिली तरी तू अजूनही ती जुन्या पध्दतीची साडी वापरते..एवढी आठवण येते तुला आबाजीची..
तिच्या उत्तरादाखल चेतना अश्रूभरल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवत दाटल्या कंठानी म्हणाली..
दिवाळी सणाला आबाजीने मला घेऊन दिलेली ही शेवटची साडी.. .
आबाजी गेले आणि माझे माहेरही गेलं.अजूनही मला आठवते ह्या साडीच्या खरेदीसाठी आई मी आणि आबाजी एकत्र गेलो होतो.
त्यांनी चार दुकाने फिरून माझ्यासाठी कौतुकाने पसंत केलेली ही साडी ..दिवाळीनंतर मी तुम्हाला घेऊन निघाले असता डोळ्यात पाणी आणून माझ्या तोंडावरून हात फिरवत ते मला म्हणाले,
बाई उन्हाळ्याच्या सुट्टीत तुम्हाला घ्यायला येतो.आणि ते यायच्या आधीच त्यांच्या मरणाची बातमी आली. तेव्हा ही साडी हृदयाशी कवटाळून मी किती तरी वेळ रडले होते. या साडीत मला त्यांच्या हाताचा प्रेमळ स्पर्श,त्यांच्या मायेचा ओलावा आजही जाणवतो..
आता आबाजी परत साडी घेऊन द्यायला माझ्यासोबत पुन्हा कधीही येणार नाहीत म्हणून त्यांची आठवण म्हणून मी या साडीला जपते, अजूनही वापरते माझ्यासाठी खास आहे ही साडी..
वडीलांच्या आठवणीनेआईला इतके हळवे झालेले पाहून सानिका आईचा हात हातात घेत म्हणाली,
आई..अग तू माझी आकाशी साडी घाल ना मागच्या वर्षी मला तू तुझ्या हाताने तयार करून दिलेली सुंदर दिसेल ग तुला आणि मी तरी कुठे वापरते साड्या…
अग सानू..
काही बोलू नकोस आई घाल ही साडी…
म्हणत सानूने साडी आणून तिच्या हातात दिली. डोळे पुसून साडी घालण्यासाठी साडीची घडी उघडत चेतना लेकीला म्हणाली,
सानू…तू जेव्हा लग्न होवून सासरी जाशील न.. तेव्हा हीच साडी मी तुला माझ्याकडून माहेरची साडी म्हणून नेसविल बरं…तुला आवडेल न..
सानू तिच्या लग्नचा विषय ऐकून अजून चिडली कशी नाही म्हणून आश्चर्याने चेतनाने तिच्याकडे वळून पाहिले..
तर सानूचेही डोळे तिच्यासारखे आसवांनी डबडबले होते….
https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा








सुरेख,हळवी कथा
छान लिहिले
Chan bhauk post