.. अखेर चा निरोप.. 
.. अखेर चा निरोप.. 

.. अखेर चा निरोप.. 

 

सायंकाळचे पाच वाजत आले तरी

अजूनही पोहचली नाही मेघना.

दुपारपर्यंत पोहचेल असं म्हणाली होती मला फोनवर ती. स्वतःशीच पुटपुटत स्वातीने दरवाज्याचे कुलुप उघडून आतील कडीला लटकवले आणि हात पाय धुवून स्वयंपाक घरात जावून सोबत आणलेल्या दुधाच्या पाकीटातून दुध काढून ते गॅसवर तापवत ठेवले. संध्याकाळच्या जेवणासाठी सोबत आणलेला पोळी-भाजीचा डबा ओट्यावर ठेवत पर्समधून मोबाईल काढून मेघनाला फोन लावला तर तो बंद येत होता. तिने परत दोन चार वेळा लावण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन अजून पण बंदच येत होता. बहुतेक तिने चालू प्रवासात अडथळा नको म्हणून फोन बंद करून ठेवला असावा. एव्हाना स्वातीला खूप भूक लागली होती. पण नेहमीप्रमाणे मेघना सोबतच जेवण करावे म्हणून तिने थोडावेळ तिच्यासाठी थांबायचं असे ठरवलं. आणि पुस्तक उघडून वाचत बसली. मेघना आणि स्वाती दोघी मैत्रिणी शिक्षणासाठी गावापासून लांब नाशिक शहरात खोली करुन राहत होत्या. मेघनाचे तिच्या आई-वडिलांनी गेल्याचं महिन्यात लग्नं ठरविले होते. तिला इतक्यात लग्नं करायचे नव्हते. परंतु त्यांच्या आग्रहामुळे ती लग्नाला तयार झाली आणि तिने महेशला पसंत केले होते. महेश गावातीलच असल्याने मेघना गावाकडे गेली, की त्यांची नेहमी भेट होत असे.

कधी-कधी तर तो तिला नाशिकला त्याच्या स्वताःच्या गाडीमधून आणून सोडीत असे. हाॅटेलचा व्यवसाय असल्यामुळे बऱ्यापैकी पैसे बाळगुन होता. आजही मेघना ने महेश सोबतच नाशिकला यायला सकाळीच निघाली असे कळवले होते. पण अजूनपर्यंत काही पोहोचली नव्हती. शिवाय तिचा फोनही बंदच येत होता. नविन लग्न ठरले म्हणून थोडी मौज-मजा करीत असेल जोडी.

पण इतका जास्त वेळ तिने कधीच लावला नव्हता. एव्हाना रात्रीचे दहा वाजले होते. स्वातीचे जेवण आटोपून बराच वेळ झाला. डोळ्यात झोप दाटून येऊ लागली. थोडा वेळ पडावे या विचाराने तिने पलंगावर अंग टाकले.

तोच दारावरची बेल वाजली. आल्या वाटतं बाईसाहेब असे म्हणत उठून तिने दार उघडले. मेघना दारात उभी होती.

का ग?.

इतका उशीर?.

हं…. असे म्हणत तिला सरकवून मेघना लगबगीने आत आली.

का ग?.

इतका उशीर का केलास?.

स्वातीने तिला परत प्रश्न विचारला. मेघनाने कुठलंही उत्तर न देता तिच्याकडे नुसतेच एकटक पाहीले.

तिचे डोळे सुजून लाले-लाल झालेले होते. बहुतेक खूप रडली असावी. डोक्याला भले मोठे बेंड आलं होतं. ओठांजवळ मार लागला होता.हे पाहून स्वातीला काळजी वाटली.

कां ग?.

काय झाले?.

बरी आहेस ना तू?.

मार लागलेला दिसतो पडली होती का कुठे?.

काही नाही ग. म्हणत तिचा हुंदका दाटून आला. पाणी पी थोडं बरं वाटेल.

नको मला पाणी तू माझ्याजवळ बस. मला तुला थोडं बोलायचं आहे.

अग आता आराम कर रात्र खूप झाली. उद्या निवांत बोलू आपण स्वाती म्हणाली,”उद्या पर्यंत खूप उशीर झालेला असेल मला आताच बोलावं लागेल”. असं म्हणून मेघनाने स्वातीचा हात गच्च पकडून ठेवला.

“बरं बोल बाई”,

असं म्हणत स्वाती तिच्या बाजूला बसली. तुला तर माहीतच आहे ना की, मला इतक्यात लग्न करायचे नव्हते.

पण..

आई-वडिलांच्या इच्छेमुळे मी महेशला पसंत केले. पण महेश चांगला मुलगा नाही ग. तो मला फसवत होता. त्याने माझ्या सारख्या बऱ्याच मुलींना लग्नाचे आमिष दाखवून आपल्या नादाला लावून विकले.

त्याने माझ्या आई-वडिलांना पण विश्वासात घेऊन खोटं ..खोटं बोलून माझ्याशी लग्न जमविले.

तुला माहित आहे, हाॅटेलच्या व्यवसायाआड‌ तो मुली विकण्याचा धंदा करतो.

काही दिवसांपूर्वीच ही बातमी माझ्या कानावर पडली होती. म्हणून मी त्याचा शहानिशा केला. तेंव्हा हे खरे आहे याची मला खात्री पटली.

मी त्याला प्रश्न विचारला तर तो मला बेशरमपणे हसत म्हणतो कसा “बरोबरच आहे तू ऐकले ते हाच तर माझा खरा व्यवसाय आहे. यानेच तर मी मालामाल झालो. तयार रहा आता तुझा नंबर” मी त्याला विरोध केला. आई-वडीलांना, तसेच पोलिसांना सांगण्याची धमकी पण दिली.

आमची यावर खूप भांडणं झाली.

त्याने तर माझ्यावर रागावून हात सुध्दा उचलला..

माझं एक ऐकशील.

तो चांगला माणूस नाही आहे.

हा निरोप माझ्या घरी देशील… ‘अगं तूच देना तुझ सुध्दा ऐकतील ना ते’. स्वाती म्हणाली, नाही गं मला सांगता येणार नाही. नाराज होतील ते. मला शक्य नाही.

थांब मी तुला फोन लावून देते, तु आताच बोल त्यांच्या सोबत असं म्हणत स्वातीने फोन आपल्या हातात घेतला. तोच मेघना तिच्या हातातून फोन हिसकावून घेत मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडली,”एकदा सांगिलेले तुला समजत नाही का”?. तु फोनवर सांगायचे म्हणजे तूच सांगायचे मी नाही सांगणार कळले तुला.

हे सर्व बोलतांना तिचा चेहरा अंधारात एकदम पांढरा फटक आणि भेसूर असा पडलेला स्वातीला जाणवला.

ती एकदम घाबरली आणि मेघना ला समजावत म्हणाली,

“बरं .. बरं शांत हो बाई मी सांगते फोनवर ठीक आहे”.

तेव्हा ती थोडी शांत झाली आणि पुढे बोलू लागली आणि त्यांना सांग उद्या मला काहीही झाले तरी त्याला

महेशच जबाबदार असणार आहे.

मी मरणार नाही. असे म्हणत ती बाथरुकडे जाण्यासाठी निघाली आणि पुन्हा मागे वळून पाहत म्हणाली… “आणि आत्महत्या तर मुळीच करणार नाही”. एवढे बोलून पटकन बाथरूममध्ये शिरली.

काय झाले हिला असं काय विचित्रच बोलून गेली. काय बरं अर्थ काढायचा हिच्या बोलण्यातून.

मेघना बाथरूममध्ये जाऊन नळ चालू करून तोंडावर पाणी मारतं मोठ्या मोठ्या भेसूर आवाजात हुंदके देत रडू लागली.

तिला समजावायला म्हणून स्वाती तिच्याकडे जाण्यासाठी उठणार तोच लाईट जावून सर्वत्र काळोख पसरला. त्यातच तिच्या मोबाईल बेल वाजली. अंधारात चाचपडत तिने मोबाईल आपल्या कानाला लावला तर फोनवरुन तिच्या कानावर शब्द पडले.

“मेघना सोबत घात झाल्याचा संशय आहे. रस्त्याच्या कडेला तिचे जखमी अवस्थेत तिचे प्रेत मिळाले ”

 

 

” काय ?केव्हा ? “…!

” दुपारी चार वाजता ”

हे ऐकून स्वातीला एकदम घाम फुटला..

आता तर तीच आपल्या सोबत होती.मेघना..मेघना तू ..तू आहे स ना ग? असा आवाज देत स्वाती घाबरत तिला आवाज देत बाथरूम जवळ आली.पण आतून मेघना चा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने ..

बॅटरीचा प्रकाशात बाथरूममध्ये जावून तिला सर्वत्र शोधले. पाण्याचा नळ तसाच चालू होता.पण मेघना बाथरूममध्ये कुठे च नव्हती.

म्हणजे ..आतापर्यंत आपल्यासोबत मेघना नव्हती तर, तिचं….या विचाराने स्वाती घाबरून चक्कर जमीनीवर धाडकन पडली.

…… दर्शना भुरे जैन…..

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!