९  – शलाकाची डायरी
९ – शलाकाची डायरी

९ – शलाकाची डायरी

९ – शलाकाची डायरी
तू तुझा संसार सोडून येणार माझ्यासोबत? 
आकाशात स्वच्छंदपणे उडणाऱ्या पक्ष्याला धाड्दिशी कोणीतरी जमीनीवर आदळावे तसे वाटले मला श्रीकांतचा प्रश्न  ऐकून.
मी सोडून जाऊ सगळे?मानसला?मुलांना?
माझे बाबा आम्हाला सोडून गेले तसे .घराची वाताहत करुन जाऊ शकेन मी श्रीकांतसोबत?
नाही.
कधीही नाही.
श्रीकांत मला समजवत होता.
भाग-९
‘ शलाका आपल्या नात्याला  आपण काहीही अर्थ देऊ शकणार नाही.
नात्यातील  गुंता अजून वाढवण्यापेक्षा इथेच थांबू या.
मैत्री होती तोवर ठीक होते. आता मैत्रीच्या सीमा पार करुन वापस मैत्रीपर्यंत येणे कठीण आहे.
मी  उद्यापासून काॕलेजमध्ये येणार नाही.’
दुसऱ्या दिवसापासून श्रीकांत काॕलेजमध्ये दिसला नाही. त्याच्याशिवाय माझेही काॕलेजमध्ये  मन लागत नव्हते.मी मानसला सांगितले ,
मी नौकरी सोडत आहे’
मुले मोठी होत होती.स्वानंद तिसरीत आणि सुखदा पहिलीत होते.  मी दोघांची शाळा,अभ्यास याच्यात स्वतःला गुंतवून घेत होते. पण मनाचा एक कोपरा रिकामा राहत होताच.
 मी अशी एकटी नाही राहू शकणार असेच वाटत होते मला.
मानससोबत असूनही मी एकटी का आहे? मानसशी खूपदा बोलायचा प्रयत्न केला मी.पण त्याला माझ्या  मनाची घालमेल समजत नव्हती.आणि  तेवढा त्याच्या जवळ वेळही नव्हता. तो मला दुसरी नौकरी शोध म्हणून मागे लागायचा. एकटेपणा घालवण्यावर नौकरी हाच एकमेव उपाय त्याला वाटत होता.
मलाही कधी कधी वाटायचे
माझेच काही चुकते का?
माझ्यासारख्या एकट्या असणाऱ्या खूप जणी असणार.मग त्या काही परपुरुषांकडे आकर्षित नाही होत.माझी आई -कित्येक वर्ष तिने एकटीने काढले.
मग मी अशी का?  मी बाबांसारखी आहे का?
आई मी लहान असतांना एकदा बोलली होती
तू तुझ्या बाबांसारखी आहेस.कधीच तृप्त नाही होत. पण मानस जरा वेगळा असता तर मी तृप्त झालीच असती. 
बाबा तृप्त का नव्हते?
आई पण मानससारखी कोरडी वागली असेल का बाबांसोबत?
ओलावा नसेल का  त्यांच्या संसारात?
आज पहिल्यांदा मी बाबांच्या बाजूने विचार करत होते. बाबांनाही आम्ही सगळे असून आईमुळे एकटे पडल्यासारखे वाटत असेल.मनात खूप गोंधळ वाढत होता.
मी नौकरी शोधली.काॕलेज जरा लांब होते.
दिवस जात होते. संपत होते.आयुष्यात तोचतोपणा होता. पण घरी आले कि मुलांमध्ये वेळ जात होता. त्यांना रोज थोडे थोडे मोठे  होतांना पाहणे हे खूप आनंददायी वाटायचे. माझ्या मुलांनी नेहमी मला फक्त आनंदच दिला.मुलांच्या बाबतीत मी नेहमी स्वतःला  नशीबवान मानते.
नौकरी सुरु होती. मुले मोठी झाली होती.त्यांचे आपापले  मित्र,मैत्रिणींचे गृपस् बनले आता. माझी त्यांना  वाटणारी गरज स्वाभाविकपणे कमी झाली.
मधल्या काळात त्यांच्यात स्वतःला गुंतवलेली मी आता परत सुटी झाली. एकटी झाली आधीसारखी.
शलाका एकेक आठवण लिहिण्यात गुंग होती तेवढ्यात बेल वाजली.तिने बाहेर बघितले.संध्याकाळ झाली होती. दरवाजा उघडायला ती खोलीबाहेर आली. दारात सुखदा आणि  मानस दोघेही होती.
आई अग केव्हाचे बेल वाजवतोय.
कुठे  हरवलेली असते ग आई तू?
सुखदाने नाराजीनेच विचारले.
तु दिलेल्या डायरीत.
शलाका हसून उत्तरली.
अरे वा! तू डायरी लिहितेस.छान.एवढे बोलून मानस आत गेला.
शलाका कॕमेरा घेऊन टेरेसवर गेली.मावळतीचा सूर्य बघायला. आजचा सूर्यास्तही नवीन वाटत होता. रंगांची तीच उधळण पण वेगळेपण जपणारा सूर्यास्त. सूर्याच्या विविध छटांचे फोटो काढून ती खाली उतरली. जेवायची वेळ झाली होती.
सगळ्यांची जेवण आटोपून शलाका खोलीत जाऊन डायरीच्या पुढील पानावर लिहायला लागली. 
दिनांक …..
आज दुपारी काॕलेजमध्ये असतांना सईचा फोन आला.
‘शलाका बाबा गेले’
सईने रडत रडत सांगितले. मी थोडावेळ तशीच हातात फोन घेऊन स्तब्ध बसून राहिले. आतून आतून काहीतरी तुटले. शरीराच्या आत काहीतरी निखळल्यासारखे वाटले.
सईचा पुन्हा फोन आला. ती बाबांच्या घरी जायला निघाली होती बाबांना शेवटचे बघायला. मला चल म्हणाली.
मी जाऊ का? यानंतर बाबांचा चेहरा कधीही दिसणार नव्हता. मी काॕलेजमधून निघाले.जाता जाता आईला घेऊन जावे म्हणून आईकडे गेली. आई बाबांना शेवटचे बघायला नक्की येईल ही खात्री होती मनाला. आईकडे पोहचली.आई बाबांचा फोटो हातात घेऊन एकटक बघत होती.
मी चल म्हणाले आईला.
आई नाही येत म्हणाली.
आयुष्यभर ज्याच्यासाठी आसवे गाळली. ज्याला एक नजर बघायला व्याकुळ होते, जो एकदा तरी येईल म्हणून नजर भिरभिरत राहायची त्या माणसाला आता ह्या अवस्थेत मी नाही बघू शकणार.
आई निर्विकारपणे बोलत होती.
मी निघाली तिथून बाबांच्या घरी पोहचले.अंगणात गर्दी होती. मी तशीच मागे फिरली.आत जायची हिंमत मी नाही करु शकली.  आईकडे आली. आई आताही तशीच बसून होती फोटोकडे एकटक बघत.
मला तिने काहीही विचारले नाही. सईपण तिथून आईकडे आली. आम्ही दोघीही  दोन दिवस आईकडेच थांबलो.आई काहीच  बोलत नव्हती. काय विचार येत असतील तिच्या मनात? तिने ह्या घरात बाबांसोबत गृहप्रवेश केल्यापासून कितीतरी आठवणी दाटलेल्या असतील तिच्या  मनात. सईने आईच्या हातातून बाबांचा फोटो  घेतला आणि तिला जरा पडायला सांगितले. आता मात्र आईचा आवरलेला बांध फुटला.
‘तुमचे बाबा गेले ग’
असे म्हणत आईने टाहो फोडला.
सई आईला आईची आई बनून थोपटत होती,समजवत होती. मी फक्त  बघत होते. 
बाबांच्या आठवणी आठवत होते. एवढी वर्ष बाबा घरात नव्हते पण कुठेतरी होते.
आता बाबा कुठेही नव्हते.
लिहिता लिहिता शलाकाचे मन भरुन आले.तिच्या  आसवांनी डायरीचे पान ओले झाले.शलाकाला अक्षरे  
अस्पष्ट ,धूसर दिसायला लागली. ती आता जरा वेळ लिहायची थांबली.
थोडावेळ थांबून  पुढच्या पानावर लिहू लागली.
दिनांक …..
क्रमशः
Next Part

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!