अपराध- मराठी सिनेमा-movie review in marathi
१९६९ साली आलेला अपराध -मराठी सिनेमा. रमेशदेव,सीमा देव ,इंद्राणी मुखर्जी,राजा परांजपे याच्या बहारदार अभिनयाने सजलेल्या या सिनेमाची गाणीही अवीट चालीची ,मधूर आवाजातील,आजही ऐकावी वाटतात.
श्याम (रमेश देव) नभोवाणीवर गाणारा गायक.
त्याच्या आजारपणात नर्स वसुधा (सीमा देव)त्याची देखभाल करते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात..
श्याम-वसुधा जरी प्रेमात पडतात तरी दोघांच्या स्वभावात खूप अंतर असते.
श्याम प्रेमाला सर्वस्व मानणारा.भौतिक गोष्टीत कमी रस असलेला तर वसुधा श्याम बरोबरच भौतिक गोष्टींवरही प्रेम करणारी.ऐषोआरामात राहण्याची आस बाळगणारी.
श्यामच्या साधारण परिस्थितीमुळे श्यामवर प्रेम असूनही लग्नासाठी तो श्रीमंत होईल याची वाट बघणारी.
त्यांचे प्रेम फुलत असतांनाच वसुधाला आसावरी भेटते.आणि त्यांच्या प्रेमाला वेगळे वळण लागते. आजारी आसावरी काही दिवसांचीच सोबती असल्यामुळे वसुधेला श्रीमंत बनण्याची आशाच नव्हे तर खात्री वाटायला लागते.
तिच्या डोक्यात एक कल्पना येते. श्यामने आसावरीशी लग्न करायचे.थोड्या दिवसात ती गेल्यावर तिची संपूर्ण संपत्ती श्यामला मिळेल आणि वसुधा आणि श्यामचा सुखाचा संसार सुरु होईल.
पण दैवात काय दडले आहे हे वसुधाला कसे समजणार?
तिच्या इच्छेखातर श्याम आसावरीसोबत लग्न करायला तयार होतो.आसावरी श्यामच्या गाण्यावर,आवाजावर प्रेम करत असतेच.
दोघांचा विवाह होतो.बस् आता आसावरी काही दिवसांचीच सोबती या स्वप्नात ,भ्रमात वसुधा मग्न असते.
आसावरीसोबत प्रेमाचे नाटक करता करता श्याम तिच्या प्रेमात पडतो.
ह्या प्रेमाला विवाहाचे बंध लाभल्यामुळे ते अधिक घट्ट होत जाते.
पती-पत्नीचे प्रेम वसुधेच्या प्रेमापेक्षा वरचढ ठरते. श्याम आसावरीच्या प्रेमात अधिकाधिक गुंतत जातो.दोघांच्या च्या संसारवेलीवर एक फुल जन्म घेते.
श्यामवर जीवापाड प्रेम करणारी वसुधा एकाकी होते,एकटी पडते.ती श्रीमंतीची हाव बाळगत असली तरी श्यामवरही तिचे नितांत प्रेम असतेच. आसावरी-श्यामचा संसार नजर लागण्यासारखा सुरु असतो.
आणि एक दिवस नजर लागतेच संसाराला. श्याम-वसुधाचे प्रेम,तिच्याशी विवाह करण्याचा उद्देश सगळे आसावरीच्या लक्षात येते.
श्यामने तिच्यासोबत केलेला विश्वासघात ती सहन करु शकत नाही.वेड्यासारखी वागायला लागते.
श्यामला तिच्या वागण्याचे रहस्य कळत नाही.
वसुधेला आनंदाने भरते फुटणारी बातमी कळते.तिला तार मिळते आसावरी गेल्याची. हर्षवायु झाल्यासारखी ती धावत श्यामकडे येते.
त्यालाही तिच्याएवढाच आनंद होईल याची तिला खात्री असते.
श्याम वसुधेच्या तोंडून आसावरी गेल्याची बातमी ऐकतो आणि अतिशय दुःखी होतो.त्याचे प्रेम त्याला सोडून गेले असते.वसुधेचे त्याच्यावर प्रेम असले तरी तो आता आसावरीच्या प्रेमात आकंठ बुडालेला असतो.
ती गेली…त्याचा जणू श्वास,जीव गेला तिच्या सोबत.
तो दुःखात असतांनाच आसावरी,डाॕक्टर तिथे येतात.
आसावरीचा संशय दूर होण्यासाठी हे नाटक करण्यात येते.
श्यामला आसावरी,तिचे प्रेम परत मिळते.
पण वसुधा?
ती चूकीची वागली तरी तिचे श्यामवरचे प्रेम हे वास्तव असतेच. शेवटी ती गेल्यानंतर श्याम दार लावून घेतो तेव्हा आपल्या ह्दयाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही.वसुधाने अपराध केलेला असतोच.पण तिचा एकटीचाच अपराध असतो?
मग शिक्षा एकटीलाच का? मनाची तडफड तिच्याच वाटेला का?…हे प्रश्न पडतात.
रमेश देव यांनी सशक्त अभिनयाने श्यामची भूमिका जिवंत केली. वसुधेवर प्रेम करणारा गायक श्याम, विवाहबंधनात अडकल्यानंतर सर्वस्वी आसावरीचा बनलेला श्याम,आणि शेवटी वसुधेला एकटीला जातांना बघून दुःखाने दार लावून घेणारा श्याम.प्रत्येक दृश्यात रमेश देवचा समरसून केलेला अभिनय दिसतो.
प्रेमळ चेहरा लाभलेल्या सीमा देव यांनी खलनायिकेकडे झुकणारी ही व्यक्तीरेखा अभिनय सामर्थ्याने उत्तम वठवली आहे. श्यामच्या प्रेमात पडलेली ती, पैशांच्या हव्यासापायी मैत्रीणीसोबत लग्न करायला लावणारी आणि श्याम आसावरीच्या प्रेमात पडून दुरावत गेल्याने मनाची तडफड होणारी ती. भावनांचे विविध कंगोरे सीमा देव यांनी दाखवले.
याशिवाय इंद्राणी मुखर्जी,राजा परांजपे,बाळ कोल्हटकर यांचा सशक्त अभिनय आहेच.
पटकथा,अभिनय,गाणी आणि संगीत या चित्रपटाची जमेची बाजू आहे.
या सिनेमाची गाणी मधूसुदन कालेलकर यांनी रचली आहेत.
सांग कधी कळणार तुला….
गाण्यात वसुधेच्या चेहऱ्यावरील मुग्ध भाव,दोघांमधील अबोल प्रीत दाखवली आहे.
स्वप्नात पाहिले जे ते रूप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते
प्रत्येक शब्दात अर्थ दडलेला,प्रत्येक शब्द जादूने भरलेला…..संपूर्ण गाणे शब्दमोती टिपणारे.
मौनात अर्थ होता शब्दांहुनी सुरेल
त्यातील वरील ओळ तर केवळ अप्रतिम.
गाणे पडद्यावर दिसते तेव्हा आसावरी आणि वसुधा दोघींनाही श्याम आपल्यासाठीच गातोय असे वाटते.
सूर तेच छेडिता,गीत उमटले नवे…हे गाणेही अवीट आणि गोड.
तुझी प्रीत आता कशी स्मरु?
आसावरीला श्यामच्या प्रेमावर संशय आल्यानंतरचे हे गीत.
ती गाणे गात असतांना दोघांचा सुंदर भूतकाळही पडद्यावर दिसत राहतो.
एन.दत्ता यांच्या संगिताने रंग भरलेली ही गाणी आशा भोसले,महेंद्र कपूर,सूमन कल्याणपूरकर यांच्या मधूर आवाजाने अधिक श्रवणीय झाली आहेत.
सिनेमाची पटकथा,अभिनय,संगीत दर्जेदार असेल तर तो सिनेमा रंगीत आहे कि Black and white आहे,त्याचे बजेट किती आहे?…काही फरक पडत नाही हे हा सिनेमा बघितल्यानंतर लक्षात येते.
….प्रिती,…











वाह.. सुंदर लिखाण👌
वाह 👌
अप्रतिम च ग
खूपच सुंदर
Wahh 🌹🌹🌹
खूपच सुंदर 👌
सुंदर