आज दिवाळी पाडवा. कोरोना नंतर चा पाडवा म्हटल्यावर कितीही काहीही जवळ असले तरी अजूनही हवे असे वाटणे स्वाभाविक आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच जण दिवाळी साठी कपडे वस्तू फराळ आपापल्या परीने आर्थिक डळमळीत असलेल्या सोशिक कुटुंबांना काही ना काही देताना दिसत आहेत. आम्ही सुद्धा दरवर्षी दिवाळी अशा काही कुटुंबीयांना मदत करून करत असतो. आज मात्र घडलेली घटना कोणत्याही महिलेच्या काळजात घर करणारी आहे.
अचानक साडेबारा एकच्या सुमारास मिस्टरांच्या मोबाईल फोनची रिंग वाजली. मी घर कामामध्ये व्यस्त होते. पण कान
मात्र मोबाईल वर… कोणाचा फोन आहे? याकडे होतेच. फोन मधील आवाजावरून फोन महिलेचा होता. मी काही विचारायच्या आतच मिस्टरांनी फोन माझ्याकडे दिला. फोनवरती शेजारील सौ अनघा वहिनी होत्या. त्यांना नीट बोलता येत नव्हते. फार गडबडीत आणि अस्वस्थतेत त्या बोलत होत्या.
“मला प्लीज घंटागाडी वाल्याचा नंबर देता का? मला काहीच सुचत नाहीये.”
यावर मी त्यांना शांत करत विचारले
” मी नंबर देते. पण काय झालंय?” त्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली
“मी कधीच गोंधळ करत नाही सर्वकाही शिस्तीत असते.” आणि या त्यांच्या शब्दाला मी स्वतः साक्षीदार आहे. पुढे त्या सांगू लागल्या
“आज पाडवा म्हणून थोडी गडबड होती. कचरावाला निघून जाऊ नये म्हणून गडबडीने कचरा टाकण्याकरिता कचरा एका पिशवीत भरला आणि घंटागाडीत टाकला.आणि आता माझ्या लक्षात आले आहे की माझा मोबाईल मला सापडत नाही. घरात कोणीही आलेलं नाही. पण मला असं वाटतंय की मी तो मोबाईल त्या पिशवीत कचऱ्यात टाकून दिला आहे. काहीच सुचत नाही काय करू ते.”
यावर मी त्यांना शांततेत विचार
“तुम्ही सबंध घर शोधलं का? कारण कदाचित इकडेतिकडे घरातच नजरचुकीने राहिला असेल.”
त्यावर मात्र अगदी घाईला येत त्यांनी सांगितले
“सकाळपासून सगळं घर शोधून झाले. आणि आम्ही सगळे घरातले शोधत आहोत. तो घरात नाहीये म्हणजे तो कचऱ्यातून गेला आहे. प्लीज काहीतरी करा.”
ही अर्जव त्यांच्या मनाची तळमळ मला अस्वस्थ करणारी होती. मी त्यांना घंटागाडी वाल्याचा नंबर दिला. आणि सांगितले
“तो फोन उचलतो का पहा. अन्यथा मला परत फोन करा.”
काही वेळातच पुन्हा वहिनींचा फोन आला.
“तो फोन उचलत नाही. त्याच्या बरोबर जो गाडीवर कामगार आहे त्याचा नंबर आहे का?”
आता मात्र मी त्यांना सांगितले “खरंतर वहिनी कामगार बदलत असतात. मी फक्त घंटागाडीवाल्या नंबर देऊ शकते पण आणिख एक करू शकते डेपोमध्ये तुमचा मोबाईल शोधण्यासाठी आपण प्रयत्न करू.”
माझ्या वाक्याने त्यांना रडूच कोसळले. त्यांना तसेच शांत करत मी दुसऱ्या मोबाईल वरून लगोलग श्री वायदंडे यांना फोन केला. त्यांना फोनवरून सारी हकीकत सांगितली. त्यावेळेला वायदंडे यांनी मला इतकेच खात्रीने सांगितले
“बर का मॅडम; तुमच्या महिला तिथे आहेत काही काळजी करू नका. फक्त त्यांना निरोप देतो.”
क्षणार्धात मला आठवण झाली ते डेपो मध्ये काम करणाऱ्या माझ्या सर्व भगिनींची. या महिलांसाठी गेले बरेच वर्ष आम्ही काम करत आहे. यामध्ये त्यांना सॅनिटरी नॅपकिन असतील, कपडे असतील, भांडी असतील, फराळ आदी दरवर्षी न चुकता आमच्याकडून दिले जाते. यावर्षी मात्र सासूबाईंच्या आजारपणामुळे अजून तरी काहीही देणे जमले नाही. या महिलांना लॉक डाऊन मध्ये त्यांची उपासमार होऊ नये म्हणून प्रशासनाशी वाद घालणारी एकमेव व्यक्ती म्हणजे मी हे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये नोंदवले गेले होते. क्षणार्धात माझ्या मनात पूर्ण विश्वास आला. मी लगेच पुन्हा सौ अनघा वहिनींना फोन केला
“वहिनी फोन जर कचर्यात गेला असेल, आणि रिंग येत असेल, तर तुम्ही निश्चिंत रहा फोन तुम्हाला शंभर टक्के परत मिळेल.”
माझ्या या शब्दांनी आणि दिलासा दिल्याने त्या अगदी हुंदके देऊन रडू लागल्या. तो पर्यंत कचरा डेपो मधून त्या सर्व महिलां मधील एक हुशार आणि चूनणचूणीत आहे अशी पूनम तिचा फोन आला
. “मॅडम निरोप मिळाला. महिला घेऊन ढिर्यागावर पोचतोय. फोनला रिंग येते का बघा? येत असेल तर फोन करत रहा. पण तरी मला एकदा सांगा कितव्या खेपेला त्यांचा कचरा घंटागाडीत त्यांनी टाकला.” त्यावर मी तिला लगेच उत्तर दिले “पहिलीच खेप होती.” पलीकडून पूनमने सुद्धा उत्तर दिले “मॅडम जेसीबी वाला सगळे ढिगारे सरकवत होता. पण तरीही रिंग येत असेल तर आम्ही उतरतो पटापटा ढिगार्यात.” मी लगेच दुसऱ्या मोबाईल वरून रिंग देऊन पाहिली आणि तिला सांगितले “पूनम रिंग येते आहे.” माझ्याशी बोलत बोलत या सगळ्या जनी ढिगार्यात मध्ये पोहोचल्या होत्या. मी फोन कट केला आणि सौ अनघा वहिनींच्या फोनवर रिंग देत राहिले. इकडे तोवर पुन्हा अनघा वहिनींचा फोन आला. “आम्ही डेपो वरती निघालो आहे. तिथे कोणी असेल का?” त्यावर मी त्यांना सांगितले “तिथे जावा आणि पूनम म्हणून विचारा” मी दुसऱ्या मोबाईल वरून तिच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहे. हा फोन ठेवे पर्यंत पुनम चा फोन येत होता. तिने पटकन सांगितले
“मॅडम फोन मिळाला. त्यांच्या मोबाईल ला पुन्हा रिंग करा.”
मी दुसऱ्या मोबाईल वरून रिंग केल्या केल्या तिने तो फोन उचलला. आणि सांगितलं “हाय बघा व्यवस्थित.” तो फोन कट करून लगेच मी सौ अनघा वहिनी यांना फोन केला आणि सांगितले “पोहोचा तिथे फोन सापडला आहे.” त्या एवढ्या जोरात आश्चर्यचकित होऊन ओरडल्या “काय??? खरंच फोन सापडला आहे का?”
आणि मी हो म्हणताच त्या जोरात पुन्हा रडू लागल्या. फोन हातात मिळायच्या आधीच त्यांनी “थँक्यू मॅडम….”” आणि बरंच काही आनंदात बोलत होत्या. त्यावर मी मात्र त्यांना एकच बोलले “असुदे! शांत व्हा! मिळाला ना! हे महत्त्वाचं. आणि माझ्यापेक्षा तिथल्या महिला ज्यांनी त्या कचरा मधून हा शोधून काढला त्यांचे आभार माना.” तरीही वहिनींचे मात्र एकच चालू होते “हे फक्त तुमच्यामुळे शक्य झाले आहे.” मी मात्र त्यांना सांगितलं “शांत व्हा आणि फोन मिळाल्यावर कळवा.” त्यानंतर मी पूनमला फोन केला “सर्व महिलांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही फोन शोधला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.” असे सांगितले त्यावर पूनमचे उत्तर नेहमीप्रमाणे हेच होते “मॅडम तुमच्या साठी काय पण…. तुम्ही डोंगर जरी शोधायला लावला असता तरी आम्ही शोधला असता..” तिच्या या वाक्यातील प्रेम विश्वास त्या क्षणाला डोळ्यात पाणी आणणारा होता.
त्यानंतर मी पुन्हा माझ्या कामाला लागले. डेपो वरती काय घडत होते माहित नाही. पण विश्वास होता तो मी पाहिलेल्या तिथल्या महिलांच्या माणुसकीवर. मला त्यावेळेला आठवत होते मी ज्या वेळेला या महिलांसाठी भांडत असते, त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा न्याय कसा मिळेल यासाठी कायम अग्रणी आहे हे पाहिल्यावर या लाॅक डाऊन मध्येच काही लोकांनी मला अगदी सहज विचारले होते “काय करायचं या महिलां साठी एवढं करून.. थोडी ना त्या मतदान करणार आहेत.. त्यांचं मतदान सातारा शहरात नाही.” आणि माझं एक आणि ठाम उत्तर होतं “मला कोणीही शहाणपणा शिकवायचा नाही. मतदान वगैरे गेले उडत. त्या महिला आहेत हेच खूप आहे आणि त्यावर त्या कष्ट करून स्वतःच्या जीवावर जगतात. त्यांच्या जीवावर घर चालते. गरीब आहेत म्हणून त्यांना न्यायाचा अधिकार नाही का ?” त्यांच्या गरिबीमुळे आणि कामामुळे त्यांच्यावर होणारी टीकाटिप्पणी ही मला कधीच मान्य नव्हती आणि आज तर त्यांनी स्वतःच ती खोडून काढली आहे. शंभर रुपयाची नोट रस्त्यावर पडली तर पुन्हा मिळत नाही अशा जगामध्ये अँड्रॉइड मोबाइल एवढा प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून शोधणे आणि तो सहीसलामत परत त्या व्यक्तीला देणे हे सामान्य लोकांचे काम नाही. असा विचार चालू असतानाच सौ अनघा वहिनी यांचा फोन आला “मॅडम फोन मिळाला आहे आणि पाच मिनिटात तुम्हाला भेटायला यायचं आहे. येऊ का?” यावर मी अगदी सहजच त्यांना म्हणाले “फोन मिळाला ना!! भेटायला नाही आलात तरी चालेल.” त्यावर त्यांच्या मिस्टरांनी मात्र “आम्ही पाच मिनिटात येतोय वहिनी…” असे सांगितले. आणि खरोखरच ते पाचव्या मिनिटाला घरामध्ये होते.
वहिनींचा हसरा चेहरा बघून मला खरोखर समाधान वाटले. सगळी हकिकत त्यांच्याकडून ऐकली. आणि “तुमचे खूप खूप उपकार झाले.” असे म्हटल्यावर मात्र मी म्हणाले “वहिनी मोबाईल एवढ्या कचऱ्यातून मिळणे हेच महत्त्वाचे. तुम्ही नशीबवान आहात. तो जेसीबी मुळे फुटला नव्हता. आणि थँक्स कसले उपकार कसले हो!!” त्यावर त्यांनी सांगितले “मॅडम यात माझ्या सर्व अकाउंटचे डिटेल्स आहेत. विशेष म्हणजे कशालाही लाॅक नाही. आणि मुलींना ऑनलाइन साठी हाच मोबाईल मी देते.” हे सारे काही ऐकून त्या फोनची आवश्यकता म्हणजे निव्वळ कॉन्टॅक्ट साठी नसून बऱ्याच गोष्टींसाठी याचा उपयोग कुटुंबाला कुटुंबाचा मोबाईल म्हणून होतो आहे. आणि असा मोबाईल गहाळ झाल्यावरती काय अवस्था होत असेल, याची मला त्या क्षणाला कल्पना आली. त्यांनी मला आवर्जून सांगितले “त्या महिला काहीच घेत नव्हत्या. मी त्यांना बक्षीस देण्याचा खूप प्रयत्न केला. पण त्यांनी स्पष्ट सांगितले नको आम्हाला… मॅडमना फोटो टाका. पण तरीही मी त्यांना बळेबळेच बक्षीस दिले आहे. फोन शोधण्याच्या मानाने कमीच आहे पण मला एक समाधान.” मी फक्त त्यांचे ऐकत होते. आणि जाता जाता त्या एक वाक्य आठवणीने म्हणाल्या “हा पाडवा माझ्या कायम लक्षात राहील. आणि त्या महिला सुद्धा. पुन्हा एकदा थँक्यू सो मच… तुम्ही होता म्हणून हे शक्य झाले. आत्ताच्या या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे याचे खरंच आश्चर्य वाटले.” त्यांचेही दोन शब्द आणि दिवाळीच्या शुभेच्छा मलाही कायम लक्षात राहणाऱ्या होत्या. त्यांच्या मिस्टरांनी जाता जाता मला आवर्जून सांगितले “मी फोटो काढले आहेत आणि तुम्हाला सेंड केलेत”
काही वेळ गेला असेल आणि पुनम चा फोन आला “मॅडम त्या खूप रडत होत्या. फोन मिळाला म्हणून तर त्या आनंदात होत्या पण त्यांना काय बोलावं काय करावं सुचत नव्हतं.” त्यांनी मला बक्षीस दिल आहे. मी नको म्हटलं होतं पण तरीही त्यांनी मला ते दिलं. म्हटलं तुमच्या कानावर आधी घालावं.” ती तोंड भरून बरंच काही बोलत होती. मी मात्र या महिलांची माणुसकी, माझ्या वरचे प्रेम आणि विश्वास बघून सद्गदित झाले होते. तरीही मी तिला त्यातून बोलले “पुनम तुम्हा बायकांना या वर्षी मला काही देता आलं नाही अजून तरी…. सासुबाई चा दवाखाना झाला की येऊन जाईन.” त्यावर सगळ्याजणी मागून फोनवर बोलत होत्या “असुदे, ते महत्वाच आहे… आणि पुनम म्हणाली तुम्ही आमच्यासाठी इतक करता आम्हाला एकदा संधी मिळाली. आणि नाहीतरी आमच्या महिलांच्या हक्काच्या एकच मॅडम आहात तुम्ही. सामान्यांसाठी गरिबांसाठी कोण भांडतय कोण लढतय… काय केले आम्ही तवा एवढं. मनाला फक्त एवढंच लागते का तुम्ही आम्हाला लय करून फोन करत नाही. कवा तरी दोन चार महिन्यातून एकदा फोन होतोय….”
आता काय सांगायचं होतं या महिलांच्या प्रेमावर माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नव्हते. खरंतर अनघा वहिनींचा मोबाईल परत मिळाला होता. पण मन मात्र माझे तृप्त झाले होते या महिलांचा माझ्यावरचा विश्वास, त्यांची पळापळ माणुसकी आणि प्रेम बघून.
दिवाळीमध्ये एकमेकांना दिलेली ही प्रामाणिकपणाची आणि माणुसकीची भेट माझ्यासाठी खरोखर अविस्मरणीय राहील.🙏🏻









प्रामाणिकपणाची शिकवण देणारी कथा
माणुसकी जिवंत आहे,
अनुभवाची शाळा.
छान कथा
Chan