घाई लगीन गाठीची….मराठीकथा
मुलगी वयात आली की तिच्या लग्नाची चिंता आईवडिलांनपेक्षा नातेवाईकांना आत्या, मामा, काकांनाच जास्त सतावू लागते…
आता सेजलचेच बघा न तिने नुकतेच तर अठरा पूर्ण केले.पण तिची शोभाकाकू तर जेव्हा गावी येईल तेव्हा तिच्यासाठी नवीन स्थळ घेऊन येई. आजही नेहमी प्रमाणे ती स्थळ घेऊन आलेली..
दिवाळीचा सण म्हणून सेजल छान गुलाबी रंगाची साडी नेसून नटूनथटून आरशा समोर उभी राहिली.. तोच तिला न्याहळत शोभाकाकू सुरू झाली.
“झाली असेल ना ग? तुझी सेजल अठरा वर्षांची.. किती मोठी दिसते न साडीत..अगदी गोड.. एका नजरेत कोणीही पसंती देईल हो तिला…
काय ग आई हे .. दिवाळी चा सण आहे.. जरा छान सजावनटाव म्हटले तर..तर ह्या काकू..मला नाही आवडत आई …असे सारखे सारखे हटकलेल कोणी.. सेजल साडीचा पदर नीट करत जरा नाराजीच्या सुरात आईला बोलली.. तेव्हा आईने तिला डोळ्यानेच गप्प बस असे खुणवित.. चहा टाकण्यासाठी सांगितले.. ती गाल फुगवून चहा टाकायला स्वयंपाक घरात निघून गेली.,. तशी आई शोभाकाकूला म्हणाली,
हो ना ग झाली अठराची..
मग काय विचार आहे यंदा निलिमा लेकीचे लाडूबिडू..चारणार आहे का? अग तो श्यामरावचा मुलगा आनंद छान आहे बरं.. आपल्या सेजलसाठी छान सरकारी नौकरी निर्व्यसनी.. हौशी कुटुंब.. अगदी सुखात राहिल.. तुझी मुलगी..
कोण? श्याम राव.. अग हो हो आले लक्षात.. झाली दोघी मैत्रीणींची मला पाठवून द्यायची तयारी सुरू.. आई पण न.. सेजल त्यांच्यासमोर चहा ठेवून देवून..मनाशीच तणतणत खोलीत जावून साडी बदलून अभ्यासाला बसली.. पण तिचे अभ्यासात मन लागत नव्हते.. बाहेरचे बोलणे तिच्या कानावर पडत होते. बाहेर दोघींनी तिच्यासाठी बोलत बोलत आतापर्यंत ढीगभर पोरांची रांग लावली होती.. बराच वेळ गप्पा मारून चहापाणी झाल्यावर शोभाकाकूने परत येते हो..असे म्हणत निरोप घेतला. आता कशासाठी येणार परत ह्या.. सेजल मनाशीच पुटपुटत पुस्तक चाळू लागली.
आई काकूला निरोप देवून सेजलच्या खोलीत येवून नजर फिरवत म्हणाली,
काय हे? सेजल केवढा पसारा करून ठेवला तू खोलीत.. आणि ही साडी अशी का फेकली.. अग पोरीच्या जातीला शोभते का हे? सासरी गेल्यावर असेच वागशील का? जरा काम करायला शिक… आईने काहीच शिकवले नाही म्हणतील..आई साडीची घडी घालत म्हणाली..
आई काय हे सारखे सासर.. सासर मला नाही जायचे सासरी..शोभाकाकू गेली की तुझ झाल सुरू.. मला नाही करायचे एवढ्यात लग्नबिग्न .. आणि काकूला सांग असे माझ्यासाठी ऊठसूट नवीन स्थळे नको आणत जावू.. सेजल जरा चिडून म्हणाली,
अग मुलं पाहण चालू केले की लगेच जमते असे नसते बाळा..मनासारखे स्थळ मिळायला वेळ लागतो..
ते काही मला माहीत नाही पण..
बाबाला ऑफिसमधून आलेले बघून सेजल बोलता.. बोलता गप्प बसली.
पण काय? काय चर्चा चालू आहे. मायलेकी ची ..निलिमा हातपाय धुवून घेतो ग जाम भूक लागली.. वाढ पटकन. बाबा येताच बोलले..
निलिमाने ताटे वाढायला घेतली. बाबा हातपाय धुवून डायनिंग टेबल जवळ आले तेव्हा गप्प बसलेल्या सेजलला बघून म्हणाले, सेजलबेटा…गप्प का आहे काय झाले.
अहो…काही नाही शोभा आली होती. स्थळ घेऊन..
मग काय झाले सेजलला मुलगा पसंत नाही पडला का?काय करतो तो .. बाबा म्हणाले.
अहो..श्यामरावचा आनंद छान सरकारी नौकरी आहे त्याला..
निर्व्यसनी आहे.
हो ..का … अरे वा छान च की मग
ते काही नाही सेजलला लवकर पाठवून देवूत आता सासरी.. आनंद पसंत आहे मला जावई म्हणून .. स्वयंपाक वगैरे शिकव ग आता माझ्या लेकीला..
बाबाचे बोलणे ऐकून हे काय बाबा तुम्ही पण सुरू झाले असे म्हणत सेजलने डोक्यावर हात मारून घेतला.
तिला असे गोंळलेले बघून..गंमत ग म्हणत बाबा तिच्या डोक्यावर टपली मारत डोळे मिचकावून मोठ्याने हसायला लागले.
इथे शोभा काकू पुन्हा अजून एक नवीन स्थळ घेऊन येईपर्यंत.. सेजलच्या लग्नाची चर्चा तूर्तास तरी बंद झाली होती.
सौ. दर्शना भुरे.. हिंगोली
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
Chan
खुप छान लिहिलंय ,प्रत्येक घरात जिथे मूलगी थोडी मोठी झाली की असचं संभाषण चालु असतं
मस्तच
Mast….
छान लिहिले