घरटे-स्त्री कथा
तिने फिरुन एकदा मान वळवली आणि
घराकडे बघितले.
माझेही घर तकलादुच निघाले तर….
जोवर मी घरात होते
स्वतःला चार भिंतीत बंदिस्त करुन होते,
पंखांचा वापर करत नव्हते,
तोवरच घरटे मजबूत होते माझे
आतापर्यंत सगळ्या आशा आकांक्षा दाबून ठेवल्या
घरटे सुरक्षित ठेवण्यासाठी.
त्यासाठी किती आयुष्य घालवले
त्याची मोजदाद नाही.
मोजदाद करायचीही नाही
कारण मलाही घरट्याची उब हवीच होती.
आता घरटे मजबूत झाले.
पिलांनाही पंख फुटले.
आता मीही पंखातले बळ आजमवायला तयार झाले
पण…..
मी आकाशाचा ठाव घेणार
हे घरट्यात सांगायचाच अवकाश
घरट्याच्या भिंतींना तडे जाणे
सुरु झाले.
मी, मी घराला बिनपंखांची,
पंख छाटलेली,
स्वप्न हरवलेली,
भरारी घेण्याची ताकद संपलेली,
आणि त्यांच्यावर अवलंबून असणारीच हवी होती.
एकखांबी असलेले घर
मी साद घातली नाही तर
घरट्यात पहाटही उगवली नाही
सकाळचा चहा,नाश्ता,
दुपारचे जेवण,
संध्याकाळचा चहा,
रात्रीचे जेवण,
यांची दुखणी,
औषधांच्या वेळा,
पाहुण्यांचे स्वागत,
मुलांचे करियर,
त्यांच्या चांगल्या सवयी…
अवघे घर एकाच खांबावर अवलंबून
पण तो खांब असलेली
मी मात्र परावलंबी असावी
आणि मला हे माहीतच नसावे
अवघे घर मी चालवते
माझ्यामुळे घरटे शाबुत आहे
ह्या भ्रमात
घालवली कित्येक वर्ष
सगळा भास आभासाचाच खेळ होता तर
चित्रकलेत प्राविण्य असलेली,
कित्येक स्पर्धा जिंकलेली मी
माझी कला फक्त मुलांच्या प्रोजेक्टस् पुरती मर्यादित होती
तोवर सगळे कसे सुरळीत होते
माझ्या कलेचे कौतुकही व्हायचे
चार भिंतीत
पण जरा मी कलेच्या कक्षा वाढवायच्या ठरवले.
तर मी स्वार्थी ,बेजबाबदार, घर नीट
न सांभाळणारी ठरले.
अग तुला काय गरज आहे?
एवढी वर्ष घरातच होतीस ना?
काही कमी पडू दिले का?
मग आताच कशाला ?
आणि आम्ही करतोय ना तुझे कौतुक
मग कशाला हवा हा अट्टाहास?
काढून टाक बरे डोक्यातले
हे चित्रकारीचे खूळ.
मी घरट्याच्या बाहेर पडले तर
घरटे विखरुन जाईल आणि
त्याला जबाबादार मीच असेन
हे मला समजवण्यात आले
आधी प्रेमाने
आणि नंतर धमकीने.
तू,
तुझे चित्रकारीचे खुळ
संपवले नाही,
तुझ्या त्या रंगाना उधळण्यापासून
वेळीच आवर घातला नाही तर….
तर मग तू घरटे सोडून जाऊ शकतेस.
मी?
मीच काडी काडी वेचून
विणलेले घरटे सोडून जाऊ
कुठे ?कशी?
अन् मी गेल्यावर
घरटे राहणार कसे?
कोलमडेल कि लगेच.
कलेची उर्मी जिवंत ठेवू कि घरट्याची ऊब?
यात गोंधळलेली मी.
शेवटी एक निर्णय तर घ्यावाच लागेल.
घरट्यासाठी माझ्यातल्या कलाकाराला एवढी वर्षे
दडपून टाकणारी मी
आज घर आणि कला यांच्या उंबरठ्यावर उभी.
प्रश्न माझ्यातल्या कलेचा नाही.
ती तर एवढी वर्षे दडपली होतीच.
माझ्या अस्तित्वाचा आहे.
मला गृहीत धरण्याचा आहे.
पण असे का व्हावे?
शेवटी घरट्याचा उंबरठा ओलांडला मी.
माझ्याशिवाय घरट्यातील कुणाचे
पानही हलणार नाही या गुर्मीने
लगेच मला साद घालतील या आशेने
पाऊल जरा पुढे घेतले.
एकवार मागे वळून बघितले.
मी बाहेर पडल्यावर
घरटे सुरक्षित कसे राहिल?
घरटे नक्की कोलमडेल या आशंकेने.
पण छे.
घरटे तर शाबूत दिसतेय
माझ्याशिवायही.
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा







