स्वयंसिद्धा- भाग २
माझे माहेर पंढरी
मोहिनी पाटनुरकर राजे
सुप्रिया एक सर्वसामान्य स्त्री. कथा कविता रचण्याचा छंद असलेली. मुलींच्या पुढाकाराने तिचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला. तिच्या कवितांमधून तिच्या आयुष्यातील व्यथा डोकावतात. काय आहे तिचं आयुष्य ?
वाचा पुढे.
प्रकाशनाचा कार्यक्रम अपेक्षेपेक्षा जास्त चांगला झाला ना आई ?
तिकडून आल्यापासून सुप्रिया …. सुप्रियामधे नव्हती असं सईला वाटलं. जिकडे तिकडे निजानीज झाली, सुप्रिया मात्र जागीच. खुप दिवसांनी अपूर्ण इच्छा मुलींमुळे पूर्णत्वास आली म्हणुन आनंदी असलेली सुप्रिया त्या क्षणापुरती उरत नाही . पार मागे मागे जाते, अगदी बालपणापर्यंत….
पुस्तकाचं एक एक पान ती पुढे करत होती तो तो ती जीवनाच्या भूतकाळात चालली होती.
अगदी चित्रपटातील flash back सारखं.
सुप्रियामध्ये जो साहित्य कलेचा गुण उपजला तो माहेरून. तशीच पार्श्वभूमी आहे तिच्या गावाची.
आद्यकवी मुकुंदराज , नाथ पंचकातील सर्वाधिक वांग्मयीन लेखन करणारे कवी संत श्री दासोपंत यांच्या पिढीतील ही सतरावी वंशज. अशा सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहास लाभलेल्या जन्मभूमीत तिचं बालपण गेलं. ती याबाबतीत स्वतःला धन्य समजते.
काहीच आठवणी वेचण्यासारख्या
बाकी सारा फापट पसारा
माहेरची परिस्थिती बेताचीच. पाच भावंडे . शेतीवर उपजीविका . त्यात सगळे आनंदात राहत. शिस्त समाधानी वृत्ती, शिक्षणाची कास , माणुसकीची शिकवण आंदणात आणलं होतं तिने . या आंदणामुळेच तर ती आज उभी आहे .जीवनात आलेल्या अनेक कडु गोड अनुभवांना हिंमतीने ती सामोरी जाऊ शकली ती या संस्करमुळ्यांमुळेच.
बालपण आणि माहेर म्हणजे स्त्रियांच्या हृदयातला हळवा कप्पा . आणि हे दोन्हीही एकमेकांसोबत निगडित आहेत. बालपणाच्या रम्य आठवणी माहेरातच असतात. बालपण म्हणजे मोरपिशी दिवस. नेहमी हृदयाच्या कप्प्यात बसणारे, बाकी कितीही आठवणी जमा झाल्या तरी तिथले बालपण कोणी हलवू शकत नाही.
अनेक आठवणी कडू गोड सुखद दुखऱ्या अनेक रंगछटांच्या तिच्या डोळ्यासमोर नाचु लागल्या. संसाराच्या रगाड्यात कितीतरी घटना तिला आता नीट आठवतही नाहीत . काही पुसटशा तर काही लख्ख आठवतात.
अशीच एक नेहमी आठवणारी आठवण
आठ दहा वर्षाची असताना तिच्या आत्याच्या गावी एक कार्यक्रम होता. अंगणात चुलीवर मोठ्या कढईत गरम पाणी होते. थंडीचे दिवस होते म्हणून स्त्रिया चुली भोवती बसल्या होत्या. गप्पांमध्ये मग्न होत्या. माणसांचा सोस असलेली गपिष्ट सुप्रिया गप्पा ऐकण्यासाठी चुलीजवळ जाऊन उभी राहिली .मागून येणाऱ्या वासराने तिला ढकलले. मग काय कढईत पडेल म्हणून घाबरून तिने गरम पाण्यात हात टाकून दिला. चेहरा वाचला मात्र हात गंभीर भाजला . गावात दवाखाने नको. प्रचंड आग वेदना होत होती. सुप्रिया जोरजोरात रडत होती . आजीनी घरगुती उपाय केले. बैलगाडी जुंपून तालुक्याच्या दवाखान्यात जाईपर्यंत भोकाड पसरलेलं होतं. आजही त्या आठवणीने तिच्या हातावर ठसा ठेवलाय.
लहानपणी आई बाबांचा सगळ्यात जास्त मार तिने खाल्ला.
खोडकर सुप्रिया शाळेत असतानाच संमेलनात मात्र आवर्जून सहभाग घ्यायची. आठवी नववीत लिखाणाची गोडी अजून वाढली . कुठून कुठून पुस्तके मिळवुन ती वाचु लागली. तिच्या शाळेच्या दफ्तरात कायम एक पुस्तक असायचे , अभ्यास सोडुन पुस्तके वाचते म्हणुन कायम ओरडा खायची.
दहावीत काव्य स्पर्धेत दुसरे बक्षीस मिळवले आणि उत्साह द्विगुणीत झाला . लेखनासाठी वाचन वाढविले. शाळेच्या ग्रंथालयातून पुस्तके अक्षरशः पिंजून काढली. लेखनाला धार आणि दृष्टी काव्यात्मक बनली . भाषासौंदर्य वाढले. कॉलेजमध्ये असताना पुण्यात प्रतिभा संगम ला जाण्याची संधी मिळाली .
त्यानंतरच्या कॉलेजच्या काव्य लेखन कथाकथन निबंध स्पर्धेत प्रथम बक्षीस कधी सोडले नाही .
कडू सोबतच्या गोड आठवणी.
लहानपणापाूनच ती बाबांची शेतीतील मेहनत आणि आईची खर्चाची तोंड मिळवणी जवळून बघत आली आणि बाबांना मदत होण्यासाठी आपणही हातभार लावावा म्हणून काम शोधु लागली. एक जाहिरात वाचण्यात आली. एक काम मिळवलं. पहिलीच नोकरी म्हणून खुप आनंद झाला. जास्त चौकशी न करता तयार झाली. स्वत:च्या मेहनतीचा पगार मिळणार फक्त एवढाच आनंद.
गरजू महिलांसाठी गृह उद्योग होता तो. दोन-तीन महिने काम व्यवस्थित सुरू होते. सुप्रियासोबत बाकी स्त्रियाही होत्या . सगळ्याच मेहनती होत्या. मालकही सगळ्यां सोबत चांगला वागत होता. पहिल्या पगारात आई-बाबांसाठी कपडे घेतले. सुप्रियासारखी खोडकर मुलगी समंजस झाली हे बघून त्यांनाही आनंद झाला. दुसऱ्या महिन्यात बहीण भावांना कपडे घेऊन दिले . त्यांना काही देताना त्यांच्यापेक्षा सुप्रियाच जास्त आनंदली. आता येणाऱ्या महिन्यात ती तिच्या आवडीचे पुस्तक घेऊन उरलेले पैसे आईला घर खर्चासाठी देणार होती……
क्रमशः
Previous Part
नोकरीमुळे आनंदी असणाऱ्या सुप्रियाचा आनंद टिकतो का? ….वाचत रहा……
https://marathi.shabdaparna.in/स्वयंसिद्धा
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Akdm mst pn pudhil bhagasathi khup utsukta aahe
Waiting for next part
Chhan katha
छानच पुढिल कथेच्या प्रतिक्षेत
खूप छान…i hope her happyness is everlasting ..