एका गावात एक जोडपे राहत होते. त्यांना एक. छान इटुकली पिटुकली लांब केसांची मुलगी होती. गौरी तिचे नाव होते. गौरी चे आईबाबा गौरीचा खूप लाड करीत असत, गौरी होतीच तितकी गोड गोरी गोरी ठुमकत ठुमकत चालायची ,म्हणून तिचे नाव ठमी पडले होते . लाडाने सगळे जण तिला ठमीच म्हणत.. अशी ही ठमी मुलखाची हट्टी आणि आळशी होती.तिला खेळणी खेळायला खूप आवडायची म्हणून तिचे बाबा तिला खूप खेळणी आणून देत
, ती दिवसभर नुसती खात राहायची आणि तिच्या खेळण्यांसोबत खेळत असायची. ती एवढी आळशी होती की स्वतः चे जेवण केलेले ताट स्वतः उचलत नव्हती, का स्वच्छ आंघोळ करत नव्हती का आईला वेणी घालू देत नव्हती नुसती घाणेरडी राहत होती. तिचे आईबाबा तिला खूप समजावयाचे पण ती कुणाचेही ऐकत नव्हती, तिला कोणी जरा काहीही बोलले की ती लगेच रागात येवून गाल फुगवून खोलीत जाऊन बसायची..
कोणाशी बोलत सुध्दा नसायची..
तिचा आळशीपणा दिवसेंदिवस वाढत चालला होता.
तिची आई तिला नेहमी समजावयाची…स्वच्छता पाळायला सांगायची पण ठमीच ती नुसती आळशी… कधी हात धुत नव्हती, दात घासत नव्हती, कपडे स्वच्छ ठेवत नव्हती.
एकदा काय झाले ठमीच्या घरी तिच्या वाढदिवसाला आत्या, मामा, काका, काकू असे खूप पाहूणे आले होते.वाढदिवस असल्याने घरी खूप सारा खाऊ खाण्यासाठी बनवला होता .लाडू चिवडा चकली बालुशाही करंजी शेव अजून बरेच काही काही बनवून तयार होते. ठमीला पहिलेच खाण्याची खूप खूप आवड हे सर्व बघून तर ती आनंदून गेली, लाडू तिच्या पार आवडीचा लाडू पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटले होते.. तिला धीरच धरवत नव्हता .. म्हणून तिने बाहेरुन येताच हातपाय न धूता लाडू खाण्यासाठी डब्यात हात घातला..
डब्यात हात घातला तसाच तिच्या पाठीवर आईने एक जोरदार धपाटा लावून दिला … आईने पाठीत धपाटा लावला म्हणून ती राग राग रागावली.. आणि मुळूमुळू रडून रडून तशीच झोपून गेली.. तिने किती दिवसापासून आंघोळ केलेली नसल्याने तिचे सर्व अंग चिकट झाले होते. त्याच्या वासाने तिच्या अंगावर हळूहळू मुंग्या चढू लागल्या, किती दिवसांपासून केस न धुतल्यामुळे तिच्या केसात मकडी जाळे विणू लागल्या, माशा नाकात घुसू लागल्या, मुंग्याची तिच्या अंगावर पटापटा मोठमोठी वारुळे तयार केली ,माकोडीची केसात जाळे विणले ,नाकाकानात माशा घुसल्या होत्या. तिला आता हालता येत नव्हते.. की हातपाय उचलता येत नव्हते.. अगदी डोळे सुद्धा उघडता येत नव्हते .. मुंग्या नी अंगावर वारुळ केल्यामुळे तिचे सर्व अंग जड पडले होते.नाकात कानात माशा गेत्यामुळे तिचा जीव गुदमरून जाऊ लागला होता . तिला जसं आहे तसेच निपचित पडून राहावे लागत होते. ती खूप घाबरली, आणि भीतीने किंचाळतच झोपेतून उठून बसली, तिचे किंचाळणे ऐकून तिची आई तिच्या कडे धावत आली आईला समोर बघून ती लगेच तिला बिलगत म्हणाली आई मी खूप घाण राहते ना.. हट्ट करते,तुझं काहीही ऐकत नाही, आता मी तुझं सर्व ऐकणार.. आळस पण करणार नाही, रोज स्वच्छ राहील..मला आताच्या आता आंघोळीला पाणी काढून दे.. आणि केंस विंचरून तुझ्या हाताने छान छान दोन वेण्या घालून दे.ठमीत अचानक झालेला बदल पाहून आईला आश्चर्य वाटले.आणि आनंद ही झाला.
त्यानंतर, ठमीने स्वच्छता पाळायला सुरुवात केली.
तिला आता स्वच्छतेचे महत्त्व कळले होते. ती आता नियमित आंघोळ करु लागली आईच्या हातून तेल लावून छान छान दोन वेण्या घालून घेऊ लागली आता. ती नेहमी स्वतःही स्वच्छ राहू लागली होती आणि तिच्या मैत्रिणींना सुद्धा स्वच्छतेचे महत्त्व सांगू लागली.
मग काय छोट्या दोस्तांनो राहणार ना मग तुम्हीही स्वच्छ?
नियमित आंघोळ करणार ना दात घासणार ना ..ठमी सुधरली तसे तुम्ही ही सुधरणार ना?
लेखिका
सौ.दर्शना ओमकुमार भुरे हिंगोली…











आळशी ठमी .. छान
ठमक ठमक ठमी मस्तच बालकथा.
आळशी ठमी मस्तच रंगवली