रंगाची उधळण-बालकथा
रंगाची उधळण-बालकथा

रंगाची उधळण-बालकथा

रंगाची उधळण-बालकथा

 

रजनी ताईंची मुले परदेशात स्थायिक झालेली… मुलांच्या आग्रहाखातर रजनीताई परदेशात मुलांकडे गेल्या पण…करमत नाही म्हणून रजनीताई स्वदेशी परतल्या.

रजनीताईच्या घरासमोर ऑटो थांबतो…खिन्न, थकलेल्या रजनीताई हळुवारपणे ऑटो मधून खाली उतरतात.

रजनीताई : दादा माझे सामान उतरवण्यास मदत कराल का जरा?

ऑटोवाले दादा :  हो ताई…करतो मदत. आणि सर्व सामान उतरवून रजनीताईच्या गेट मध्ये ठेवून देतात.

रजनीताई : हे घे दादा तुझे पैसे. उरलेले राहू दे तुझ्याकडे…लेकरांना खाऊ घेऊन जाशील घरी.

ऑटोवाले दादा : ताई माझ्याकडे सुट्टे पैसे आहेत. हे घ्या परत उरलेले पैसे.

रजनीताई स्मितहास्य करीत स्वच्छंदपणे घराच्या चारही बाजूने नजर फिरवत असतात. आपल्या देशात, आपल्या घरी आल्यावर एक वेगळाच आनंद रजनीताईंच्या चेहर्‍यावर असतो.

त्यावेळी समोरच्या घरातली एक चिमुकली मुलगी शाळेच्या बसमधून उतरते आणि खांद्यावर चे दप्तर…हातातली पाण्याची बॉटल सांभाळत-सांभाळत फाटकात प्रवेश करणार…तोच तिचे लक्ष रजनीताई कडे जाते आणि मनातच म्हणते

इथे तर कोणीच राहत नव्हते. घराच्या फाटकाला कुलूप असते नेहमी मग हया आजी कोण?

असा मनातच प्रश्न करते आणि रजनीताई कडे बघत असते. त्याच वेळेला  रजनीताईंचे लक्ष त्यांच्याकडे  बघत असलेल्या चिमुकल्या मुलीकडे जाते आणि रजनीताई खुशीने चिमुकल्या मुलीला बघून हसतात.

पण… हे काय.. छे….छे….

चिमुकली मुलगी थोडीशी चलबिचल होऊन घरात निघून जाते. कारण आईने सांगितलेलं असते की, अनोळखी व्यक्ती सोबत बोलायचं नाही…पण घराच्या खिडकीतून कुतूहलतेने बघतच राहते.

तेवढ्यात चिमुकल्या मुलीच्या आईचे लक्ष चिमुकल्या मुलीकडे जाते… जी कुतूहलाने घराच्या  खिडकीतून एकटक समोरच्याघराकडे  बघत असते.

लक्ष्मीची आई :  लक्ष्मी अगं शाळेतून आली बेटा?… काय झाले?…. असे शाळेतून आल्या-आल्या दप्तर खांद्यावर ….पाण्याची बॉटल हातात घेऊन एवढे मन लावून खिडकीतून बाहेर काय बघतेस?. उंटांचा कळप आला कि काय.. लहान मुलांची पाळी करणारा.

लक्ष्मी :  नाही आई.

लक्ष्मीची आई : मग काय झाले बेटा?

लक्ष्मी :  समोरच्या घरासमोर एक आजीबाई आहेत आई.

लक्ष्मीची आई : कायss आजीबाई ! लक्ष्मी : हो आजीबाई, आई तू इकडे ये ना तुला दिसेल..

लक्ष्मीची आई : आलेच बेटा.. हो की ग लक्ष्मी.” ह्या कोण?”… चल आपण बोलू त्यांच्याशी.

लक्ष्मी आई सोबत बाहेर येते आणि आजीच्या घरासमोर येऊन थांबते.

लक्ष्मीची आई : काकूss….

रजनीताई ला आवाज देऊन…

रजनीताई बागेतील झाडांवरून हळूच मायेनी  हात फिरवत असतात.

रजनीताई : कोण?.

म्हणून दोघींकडे आश्चर्याने बघतात.

लक्ष्मीची आई : आम्ही इथे समोरच वास्तव्यास आहे… रजनीताईला सांगतात.

रजनीताई : हो का?.

मी इथेच राहते. काही दिवस परदेशात राहून आले मुलांकडे….आत्ताच आले. अजून सामान सुद्धा घरात नाही नेले…हे काय बाहेरच आहे. आल्या-आल्या माझ्या बागेतील सर्व फुलझाडे बघत होते. माळीला व्यवस्थित काळजी घेण्यास सांगून गेले होते ना.. छोट्या-छोट्या रोपट्यांना हळुवारपणे कुरवाळत…माझा खूप जीव आहे. झाडांवर. मला झाडांसोबत गप्पा मारायला खुप आवडते.

लक्ष्मीची आई : हो काकू , तुमचा माळी रोज न चुकता सकाळी बागेची साफसफाई करून पाणी देत होता.

लक्ष्मीची आई : चला  काकू मी तुम्हाला सामान घरात नेण्यास मदत करते.

रजनीताई::  नको बेटा…नेईल मी हळूहळू आणि होss तुझ्यासोबत ही चिमुकली परी, तुझी मुलगी ना ?

लक्ष्मीची आई : होयss  ही.. लक्ष्मी.

रजनीताई::  अरे वाs छानच नाव आहे तुझे. लक्ष्मीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत…तरीच लक्ष्मी सारखी तेज आहे चेहऱ्यावर. पण मघाशी काहीच बोलली नाही माझ्याशी.

लक्ष्मीची आई : आपण पहिल्यांदाच भेटलो आहे ना…लक्ष्मी ला फुलझाडाची खुप आवड आहे. तुमच्या बागेत छान मन रमेल तिचे.

रजनीताई : छानच की…येशील?

लक्ष्मी : हो येईल की.

रजनीताई :  bye..bye

लक्ष्मीची आई : चला…. येते काकू… तुम्हाला काही अडचण असेल तर मला निसंकोचपणे सांगा.

रजनीताई घरात जातात.

दुसऱ्यादिवशी लक्ष्मी शाळेतून..आल्यावर जेवन आटोपून   रजनीताईकडे जाते.

रजनीताई : लक्ष्मी शाळेतून आलीस का बेटा?.

लक्ष्मी : होss आजी. मी बागेतील फुलझाडांसोबत खेळू का आजी?.
रजनीताई : हो खेळ ना?.
लक्ष्मी : आजी ही झाडांखाली गळालेली…वाळलेली पाने काढून साफ करते.
असे म्हणत लक्ष्मी सर्व साफ करते.
लक्ष्मी : बाग स्वच्छ दिसते ना आजी?.
रजनीताई : हो बाळ. गुणाची पोर आहेस.
लक्ष्मी : आजी या छोट्याश्या रोपट्याचे मी चित्र काढू?.
रजनीताई : अरे वाss तुला चित्र काढायला आवडते?.
लक्ष्मी : होय आजी.
रजनीताई : बेटा समोर टेबलवर वही आहे. घे चित्र काढण्यासाठी.

…लक्ष्मी समोरच्या टेबलावरील चित्रकलेची वही आणते आणि
लक्ष्मी : चित्रकलेच्या वहीतील चित्र बघुन..आजीss किती सुंदर चित्र !.

किती छान चित्रं काढता तुम्ही?. हुबेहूब तुमच्या बागेतील फुलझाडे अशीच आहेत.

रजनीताई : हो बेटा मला. लहानपणापासूनच आवड आहे, चित्र काढण्याची.

लक्ष्मी : आजी मला पण चित्र काढायला आवडतात.

रजनीताई : होय दाखवशील… बघूss

लक्ष्मी : आजी मी घेऊन येते घरून.

लक्ष्मी वही आणण्यासाठी जाते.

रजनीताई :अगं अगं.. हळू यायचे ना थोडे…दम लागलाय तुला..

लक्ष्मी :  हे घ्या आजी… माझी चित्रकलेची वही. रजनीताई : चित्रे बघून वाहss खूप सुरेख… चित्र काढतेस तू लक्ष्मी.

लक्ष्मी :  होss आजी… आमचे सर पण म्हणतात की, लक्ष्मी तू खूप सुंदर चित्र काढतेस.

रजनीताई : हे काय? लक्ष्मी तू… दसऱ्याचा सण किती सुंदर रेखाटला, लक्ष्मी : हो आजी…आमच्या सरांनी सर्वांना दसरा हा विषय दिला होता. आणि सर्वांना वेगवेगळे चित्र काढून आणण्यास सांगितले होते… मी सोने देताना चित्र काढले.

रजनीताई : छान संकल्पना आहे. लक्ष्मी : आजी तुम्ही मला एक गोष्ट सांगता?

रजनीताई : हो सांगेल ना… मग तू.. त्या कथेला अनुसरून चित्र काढशील?

लक्ष्मी : हो आजी… नक्की काढेल. तुम्ही पण काढाल चित्र माझ्या सोबत?.

रजनीताई : हो काढेल बेटा.

असे म्हणून रजनीताई लक्ष्मीला गोष्ट सांगत आणि दोघीही कथेला अनुसरून चित्र काढतात.

….असेच काही दिवस सुरू असते… रजनीताई गोष्ट सांगणार आणि रजनी ताई सोबत लक्ष्मी गोष्टीला अनुसरून चित्र काढणार.

नातवंडांच्या सुखासाठी पारख्या झालेल्या  रजनीताईंना लक्ष्मीचा लळा लागला होता आणि लक्ष्मीच्या आयुष्यातील आजीची उणीव रजनीताई भरून काढत होत्या.

एक दिवस लक्ष्मीचीआई लक्ष्मीचे शाळेचे दप्तर आवरत असतांना…. लक्ष्मीच्या दप्तरातील चित्रकलेची वही बघून..

लक्ष्मीची आई : “लक्ष्मी बेटा…. किती सुंदर चित्र काढलेस?”.

“कोणी शिकवले तुला एवढे सुंदर चित्र काढायला?”.

लक्ष्मी : समोरच्या आजीने शिकवले आई.

लक्ष्मीची आई : वाह खरच खूप सुंदर काढलेस सर्व चित्र एकाहून एक सुरेख आहेत. चल आपण आजीला बोलूत.

…..लक्ष्मी आई सोबत रजनीताई कडे जाते.

रजनीताई : लक्ष्मी.. आई सोबतss..

या ना या.. बसा.

लक्ष्मीची आई : आजी आज न मी लक्ष्मीचे  शाळेचे दप्तर आवरत होते. तर मला लक्ष्मीची चित्रकलेची वही बघून तुम्हाला भेटल्या शिवाय रहावले नाही.

रजनीताई : “खूप सुरेख चित्र काढते लक्ष्मी”.

लक्ष्मीची आई : लक्ष्मी पण सांगत होती, की आजी मला शिकवतात. तसेच चित्र मी काढते आणि आजीची चित्रकला खुप सुंदर आहे.

…. तेवढ्यात लक्ष्मी आजीची चित्रकलेची वही आईला आणून देते. आणि …..

लक्ष्मी : हे बघ..आजीची चित्रकलेची वही.

लक्ष्मीची आई : अरे वाह..!.

“किती बोलके चित्र आहेत?”.

काकू तुम्ही काढलेली चित्र मला तर खूप आवडली. “कुठे शिकलात काकू तुम्ही एवढी सुंदर चित्र काढायला?”.

रजनीताई : अग मला लहानपणापासूनच आवड आहे. मला थोडी सवड मिळाली की, मी चित्र काढायची.

लक्ष्मीची आई :  मग काकू…. तुम्ही क्लासेस का नाही घेत?.

रजनीताई : “अगं आता कुठे..वय आहे का ग माझे क्लासेस घेण्याचे?”.

लक्ष्मीची आई : आजी तुम्ही क्लासेस घेताल तर मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना तसे सूचित करते आणि तुम्हालाही विरंगुळा होईल.

रजनीताई : तुला योग्य वाटत असेल तर तू शाळेतील विद्यार्थ्यांना सुचित करशील.
लक्ष्मीची आई : होय. आपण नक्की असेच करू.

ठरल्याप्रमाणे लक्ष्मीच्या आईने शाळेत विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या क्लास विषयी सर्वांना सांगितले आणि आता रजनीताईच्या चित्रकलेच्या… क्लासेसचा श्रीगणेशा झाला.

रजनीताईनी सर्व विद्यार्थ्यांना एक वेळ ठरवून दिली आणि सर्व विद्यार्थी ठरलेल्या वेळेत येऊन चित्रकलेचा क्लास करू लागलेत.

……सोबतच रजनी ताईंचा देखील स्वतःचा चित्र काढण्यातील रस वाढू लागला आणि रजनीताई देखील मुलांसोबतच नवनविन चित्र काढत. आता रजनीताईंनी आणि रजनी- ताईच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचा खूप मोठा संग्रह झाला होता. रजनीताई आणि रजनीताईंचे विद्यार्थी खूप मन लावून चित्र काढू लागली.

………एक दिवस लक्ष्मीची आई आणि रजनीताई दोघी काही चर्चा करत असतांना…

लक्ष्मीची आई : रजनीताईला बोलते की, काकूss आपण तुम्ही काढलेल्या आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवू या का?.

रजनीताई : अग, चित्र-प्रदर्शन घेण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी  आपल्याला सुरुवातीला जाहिरात करावी लागेल.

लक्ष्मीची आई : हो काकू..आपण सर्व मिळून करूयात.
आणि सर्वांनी मिळून चित्र-प्रदर्शनाचे आयोजन केले.
बघता बघता चित्र-प्रदर्शनामधिल…
रजनीताई आणि रजनी ताईंच्या सर्व विद्यार्थ्यांच्या रंगीबेरंगी चित्रांनी बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

“सगळीकडे जणू रंगाची उधळण झालेली…..”

  • स्मिता औरंगाबादकर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!