प्रेमाचे समर्पण- समर्पण कथा
प्रेमाचे समर्पण- समर्पण कथा

प्रेमाचे समर्पण- समर्पण कथा

प्रेमाचे समर्पण- समर्पण कथा

नकुलचे ऑफिसचे पेंडींग काम करायचे बाकी होते. त्याच्या मित्रांचे कामे आटपून ते ऑफिस बाहेर पडले.

पावसाळ्याचे दिवस होते.

नकुलचे कॉलेजच्या ऑफिसचे काम संपेपर्यंत आभाळ बरेच दाटून आले होते, मुसळधार पावसाची दाट शक्यता होती.

नेमके आज तो रेनकोट छत्री विसरला होता.

ढगाळ वातावरण असल्याने अंधार पसरल्यासारखे वाटू लागले. एव्हाना पावसांच्या सरी पडायला  सुरू झाल्यात सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी पाऊस जोर धरेल म्हणून जसे जमेल तसे कुणी कुणाचे सायकलवर, कुणी कुणाच्या गाडीवर,तर कुणी कुणाच्या गाडीत होईल तेवढे लवकर निघून गेली.

नकुलचे  काम संपेपर्यंत सर्व मित्र आधीचं निघून गेलेले होते.

“अरेच्चा! माझ्यासाठी कोणीच थांबले नाही”,

असे म्हणत नकुल  इकडे तिकडे नजर फिरवत कोणी मित्र दिसतो का बघतांना त्याची  नजर पायर्‍यांकडे गेली ,तर नलिनी पायऱ्या उतरत-उतरत स्वतःच्या बॅग मधून छत्री बाहेर काढतांना दिसली.

छत्री उघडतांना नलिनीची नजर नकुलवर  पडली आणि लागलीच  म्हणाली,

“अरे नकुल तुला सोबत कोणी थांबले नाही वाटतं “?

“हे काय! तुझी चारचाकी दिसत नाहीये आज”.

“हो ग नलिनी, गाडी आज  सर्व्हिस सेंटरमध्ये सर्विसिंग साठी जमा केलेली”.

“यारssss…पावासाला पण  आत्ताच यायचे होते का?”

“बस स्टॉप पर्यंत तू माझ्या छत्रीमध्ये माझ्यासोबत चल. बस स्टॉप पर्यंत सोडते मी तुला”.

ते दोघं एका क्लासमध्ये नव्हते. पण एक दिवस एक मुलगा तिची छेड काढत होता म्हणून नकुलने त्यावेळी नलिनीची मदत केलेली होती. पण त्यानंतर नलिनी आणि नकुलची  आताच भेटली झाली होती.

दोघेही एका छत्रीमध्ये सोबत चालू लागले.  रस्त्याने चालत असतांना  ती मला खूप काही कॉलेजच्या गोष्टी सांगू लागली. तिचे ते अवखळ हसणं, चालता-चालता तिचा माझ्या हाताला होणारा स्पर्श त्याला तिच्याकडे आकर्षित करीत होता. हा स्पर्श तिने केलेल्या निखळ मदतीचा नकुलला तिच्या प्रेमात पाडून गेला.बघता बघता बस स्टॉप कधी आला कळलेच नाही.

नकुल बसने घरी पोहचला पण त्याचे मन नलिनी सोबत पावसातच फेर धरू लागले.  नलिनी ने केलेली मदत तिच्या प्रेमात पडून गेली. तिचा तो अचानक झालेला  हातचा स्पर्श मनाला मोहक वाटू लागला होता.

नकुलची नजर आता रोज कॉलेजमध्ये नलिनीला शोधू लागली. नकुलला नलिनी दिसली की, आनंद होत होता.

नकुलला  एव्हाना लक्षात आले होते की, आपण नलिनी च्या प्रेमात आहोत. नकुलने  खुपदा ठरवले होते  मनाची गुलाबी व्यथा नलिनीला सांगायचे, पण माघार घ्यायचा.

नकुल मुळातच तापट स्वभावाचा, न जाणो नकार मिळाला तर त्याच्या हातुन काही आघटित घडेल म्हणून तो दर वेळेला मनाला आवर घालायचा.

एक दिवस नकुलने नलिनी जवळ  हिम्मत करून स्वतः चे मन उघड केले.

पण नकुल माझे वरूणवर प्रेम आहे.

आणि लवकरच वरूण- सोबत माझे लग्न होणार आहे.

नकुल मी तुझ्या बद्दल असा विचारच केला नव्हता, तू माझा चांगला मित्र आहे आणि चांगला मित्र राहशील.

नकुलला नलिनीचे बोलणे ऐकून खुप वाईट वाटले आणि रागही आला.

नकुल नलिनीला रागाच्या ओघात म्हणतो की,

“नलिनी तु मला ओळखत नाही,’मी खुप श्रीमंत व्यक्तिमत्व आहे,

माझी समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून प्रतिमा आहे’.

नकुलचा स्वभाव उफाळून आला.

नलीनीने त्याला खूप समजावून सांगण्याचा असफल प्रयत्न केला.

नकुलला आता खुप राग आला होता. कारण नकुलला लहानपणापासूनच  जी वस्तू हवी ती मागण्याच्या आधी मिळात असे पण ह्या क्षणाला त्याची सर्वात प्रिय व्यक्ती त्याच्या जीवनातून दूर जात होती.

“मग नलिनी माझ्या खुशी चे काय?”

“नकुल , तु चुकीची जिद्द करतो आहेस”.

नकुल रागारागातच घरी येतो. हाॅलमधे भिंतीवर  लावलेल्या म्याॅनामधून तावातावाने तलवार उपसून काढतो आणि बाहेर जाण्यासाठी फिरतो. तर नकुल समोर त्याचे आजोबा उभे असतात. नकुलचे रागारागाने लाल- लाल झालेले डोळे बघून आजोबा नकुलला विचारतात,

नकुल काय झाले?

तु एवढा रागात कुठे जातो आहेस?आणि हे काय?

तलवार म्याॅनामधून बाहेर का काढलीस?

…आजोबा माझ्या रस्त्यातून बाजूला सरका. मला वरूणला मारायचे आहे.

अरे हा वरूण कोण आहे?

आजोबा नलिनी चे वरूण सोबत लग्न होणार आहे आणि मी  नलिनी शिवाय राहू शकत नाही.

नकुल शांत हो बाळ…..

तू खूप रागामध्ये आहेस.

रागांमध्ये एखादं चुकीचं कृत्य तुझ्या हातून होऊ नये.

हत्या करणे चुकीचे आहे.

नकुलने आजोबांना नलिनी विषयी सर्व काही सांगितले.

बोलता बोलता आजोबा नकुलला घराच्या बाहेर बगीच्यात घेऊन जातात. बगीच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुले होती. फुलांनी बहरलेली बाग…..सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळत होता. नकुलचा राग कमी करणे गरजेचे होते.

नकुलला कमळाचे फूल लहानपणापासूनच खूप आवडत असे म्हणून त्या बागेमध्ये एक छोटासा  जमिनीलगत हौद बांधलेला होता. हौदामध्ये दोन कमळाची फुले उगवलेली होती.

चालता चालता त्याने एक कमळाचे फुल हौदातून तोडले.

आजोबा मला कमळाची फुले खूप आवडतात. माझे प्रेम आहे कमळाच्या फुलांवर.

ठीक आहे नकुल, तू तोडलेले कमळाचे फूल तुझ्या हातात आहे ना ! ते सांभाळून ठेव. कारण तुझं प्रेम आहे त्या  कमळाच्या फुलांवर.

तीन दिवसांनी हे फुल घेऊन तू माझ्याकडे येशील.

तीन दिवसानंतर नकुल आजोबांच्या सांगण्यावरून आजोबांकडे तेच फुल घेऊन जातो.

तोडलेले फुल कसे आहे नकुल?.

आजोबा काहीतरीच काय विचारता?  हे कमळाचे फूल आता कोमेजून गेले…सुकले…आजोबा आता या फुलाला सुगंधही येत नाही. आणि आता या  फुलाची सुंदरता पण कमी झाली आहे.

नकुल तू अजूनही ह्या कोमेजलेल्या फुलांवर तेवढेच प्रेम करतो जेवढे प्रेम हेच कमळाचे  फूल ताजेतवाने… तू तोडले तेव्हा होते.

नकुल कोमेजलेल्या फुलाकडे बघून..

नाही आजोबा.

आजोबा नकुलला घराबाहेर बगीच्यात घेऊन जातात आणि जिथे एक कमळाचे फूल अजून ताठ मानेने स्वच्छंद विहार करत होते.

आणि नकुलला समजून सांगतात की,

जे प्रेम तू करतो आहेस ते  तुझ्या हातात आहे.  बघ त्या फुलाचे काय हाल झालेत? आणि ज्या  प्रेमाबद्दल मी बोलतो आहे ते अजूनही तुझ्या हौदात ताठमानेने स्वतःच्या विश्वात खुशीने  उभे आहे.

बघ नकुल हौदातील कमळाचे फूल अजूनही स्वच्छंद स्मित हास्य करीत आहे.

आजूबाजूच्या परिसरात त्याचा सुगंध दरवळतो आहे.

तुझी इच्छा असेल तर, तू हे ही हौदातील फुल तोडू शकतोस कारण तुझे कमळाच्या फुलावर प्रेम आहे.

ते फूल तुला नाकारणार नाही.

नकुलला स्वतःची चूक लक्षात आली होती. नकुल क्षणातच स्तब्ध होऊन हौदामधिल कमळाच्या फुलाला हलकेच कुरूवाळत…

“आजोबा मी वरूणची हत्या करून खूप मोठी चूक करणार होतो. मी चुकलो मला माफ करा.

आजोबा मी माझ्या आयुष्यात काही इच्छा,आकांक्षा,स्वप्न, सुख, ध्येयाचा निश्चय केला होता. पण नलिनीने लग्नाला नकार दिला आणि एका क्षणात सर्व विश्व शुन्य झाले.पण मी नलिनीला विसरू शकत नाही.

माझ्या मनात नलिनीसाठी असलेल्या एकतर्फी प्रेमासाठी मी स्वतःच्या  जीवनाचे समर्पण करेल.

आजोबा मी ठरवले की, नलिनीला मी कधी त्रास देणार नाही आणि कुठलेही नुकसानही कधी करणार नाही.

या उलट नलिनी आणि वरूणला  कधी गरज भासली तर मी नक्की मदत करेल.

असे म्हणून तिथुन निघुन जातो.

नकुल ची अवस्था पाहून…

आजोबांच्या डोळ्यातून हलकेच  अश्रूं तरळले . मनातच स्वतः शी बोलतात की,

….नकुलने नलिनीच्या खूषीसाठी स्वतः च्या प्रेमाचे समर्पण केले.

कालांतराने नकुल एक सुप्रसिद्ध डाॅक्टर बनतो.रुग्णांच्या सेवेत स्वतःला झोकून देतो.

 

...स्मिता औरंगाबादकर…

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!