मराठीकथा-अव्हेरलेले नाते
मनोहरच्या नातीचा आज पाचवा वाढदिवस.
पैशांची कमतरता नसणारा मनोहर नातीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात बिझी होता.केक कापायची तयारी झाली .नातीने आजोबांना आवाज दिला.
मनोहर उठून केककडे जाणार एवढ्यात खिशातला मोबाईल वाजला. मोहनचा,गीताच्या भावाचा फोन होता.
गीता दवाखान्यात अॕडमीट होती. तिला हार्टअटॕक आला होता.
मनोहर घाईघाईने हाॕलच्या बाहेर पडला.
मनोहरने आयुष्यातील वीस वर्ष समाजाच्या विरोधात जाऊन गीतासोबत घालवली होती.
नात्याचे स्वरुप समाजाने अनैतिक ठरवलेले. मनोहरने तिला आदर,सन्मान दिला तरी ती लग्नाची बायको नव्हतीच.
समाजाच्या नजरेत ती ‘ठेवलेली.’
गीता तीन भाऊ आणि एका बहिणीमध्ये सर्वात मोठी…दिसायला बेताची…पंधराव्या वर्षी लग्न झाले.स्वभावाने खरी आणि फटकळ असलेल्या गीताचे नवऱ्याशी पटले नाही म्हणून माहेरी परतली.
माहेराने अनिच्छेने तिला स्वीकारले.
घरची गरिबी होती.तिने नर्सिंगचा कोर्स केला आणि एका खाजगी दवाखान्यात कामाला लागली.
तिच्या कामसु स्वभावामुळे ती लवकरच सगळ्यांची आवडती बनली.
घरची परिस्थिती तिच्यामुळे हळूहळू सुधरु लागली.
भावांचे शिक्षण तिच्या मदतीने पार पडू लागले.
अनिच्छेने स्वीकारलेल्या तिला आता मान मिळू लागला.
घरात,समाजात मान मिळू लागला.पण तिच्या आयुष्यात ती एकाकी होती. आणि आता लग्नाचा विचार करणे म्हणजे भावांना वाऱ्यावर सोडण्यासारखे होते.तिने लग्न केले तर त्यांचे शिक्षण अर्धवट राहणार होते.
अशातच तिच्या आयुष्यात विवाहित मनोहर आला. तिच्या रुक्ष जीवनात हिरवळ आली. मनोहर श्रीमंत घरचा,मुले असलेला देखणा तरुण. घरच्या श्रीमंतीमुळे श्रीमंत व्यसने असलेला. घरी देखणी बायको होती.
प्रेम कोणी कोणावर करावे याचे काही नियम नाहीत.
गीता आणि मनोहरने एकमेकांवर जीवापाड प्रेम केले. गीतावरच्या प्रेमापायी त्याची व्यसने सुटली.
गीताने पै पै जमवून बहिणीचे लग्न लावले.काॕलेजमध्ये जाणाऱ्या भावांच्या खर्चाचा सगळा भार तिच्यावर होता.
सगळे ती आनंदाने करत होती.
सुरुवातीला तिच्या आणि मनोहरच्या नात्याला विरोध करणाऱ्या आईवडिलांनी सगळी जबाबदारी गीतावर असल्यामुळे मनोहरला स्वीकारले.
मनोहरची परिस्थिती वेगळी होती.
त्याचे घर गीताचा स्वीकार करणे कदापि शक्य नव्हते.
त्यांचे नाते समाजमान्य नसणारे.दोघांसाठी,दोघांपुरतेच राहणार होते.
गीताचे भाऊ शिक्षण संपवून नौकरीला लागले.गीताच्या मदत करण्याच्या स्वभावामुळे आणि मनोहरमुळे तिच्या खूप ओळख्या वाढल्या होत्या.त्या ओळखीतल्या लोकांकडे शब्द टाकून गीताने भावांसाठी नौकऱ्या शोधल्या.
गीताने तीनही भावांना सामावून घेईल एवढे मोठे घर बांधले.आता मोठया भावाच्या लग्नासाठी मुली शोधणे सुरु झाले.
गीता आणि मनोहरच्या नात्यामुळे लोकं मुलगी द्यायला बिचकत होते. गरीब घरच्या रमाचे आईवडील तयार झाले.
मोठ्याचे लग्न झाले.मुलगा झाला.कधीही आई न बनणाऱ्या गीताला जणू आईपण लाभले.
तिच्या दुसऱ्या दोन भावांनी आपापल्या मनाने लग्न केले.
भाऊ सोबत राहत होते.काही दिवस सुरळीत चालले.
भावाच्या मुलांनी घराचे गोकुळ केले. त्या गोकुळात आल्यावर गीताचा दिवसभरचा थकवा जाऊन प्रसन्नता यायची.
पण आता हळूहळू घरातील माणसे बदलायला लागली.भावांना नौकऱ्या मिळाल्यामुळे गीतावर असणाले अवलंबित्व संपले होते.घराला असणारी गीताची गरज कमी झाली होती.आता भावजयांना मनोहरने गीताला घरी भेटायला येणे आवडत नव्हते.शिवाय तिचे घरात असणारे वर्चस्वही भावजयांना खूपत होते. मनोहरने गीताला घरी भेटायला येणे त्यांना आवडत नव्हते.
सोबत राहायचे तर गीताने मनोहरला घरी भेटू नये ही अट सर्वांनी एकत्र राहावे म्हणून घर बांधणाऱ्या गीतापुढे टाकण्यात आली.
मुलांसारखे वाढवलेल्या भावांना सोडवत नव्हते.आयुष्यात अनेकवार मदत करणाऱ्या मनोहरला ती घरी येण्यापासून थांबवू शकत नव्हती.
तिने मनोहरला भेटता यावे म्हणून भावांच्या शेजारी दुसरे छोटे घर घेतले. भाऊ आता तिच्याकडून मदत हवी असेल तेव्हाच भेटायला यायचे.
मनोहरच्या मुली आता मोठ्या झाल्या होत्या.
मनोहर आणि गीताच्या नात्यामुळे त्यांची लग्न होण्यात अडचण येईल या भीतीपोटी मनोहरने गीताला भेटणे कमी केले.यथावकाश मनोहरच्या मुलींची लग्ने झाली,गीताच्या भावांचे संसार सुरळीत सुरु होते.
गीताला कुणाच्याही संसारात जागा नव्हती.
भावांबरोबर मुलांसारखे प्रेम केलेली भावांची मुलेही दुरावली होती.
मनोहरच्या मुलींवरही तिने प्रेम केले पण त्यांना त्यांची आई होतीच.
शिवाय मनोहरच्या पत्नीला आपण दुःख दिले ही अपराधभावनाही होतीच.
मनोहर गीताच्या आठवणीत घरी पोहचला.गीता गेली होती.
एक शापीत,समर्पित आयुष्य संपले होते.
गीता त्याला आता कधीही दिसणार नव्हती.
तिच्या आठवणी?
त्या सरणार नव्हत्या.
तिचा एखादा फोटो लावावा का घरात?
पण ते शक्य नाही.
कायम समाजाने अव्हेरलेले नाते लोकं निर्जीव फोटोमधूनही मान्य करणार नाहीच……
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
दर्जेदार साहित्य लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी शब्दपर्णला अवश्य भेट द्या.
Link
Email
whatsapp no,
9867408400