समर्पण कथा पाझर
आज मोठ्या आईचा म्हणजे काकुचा स्मृती दिवस.
सगळी भावंडे जमलो, मोठ्या आईच्या आठवणीत रमलो. पुजाही आली. चाळीस वर्षाच्या पुजाला तिसरीतील पुजा आठवली….
पुजा छोटीशी, आपल्या विश्वात रमणारी पण भावनेत बुडणारी. तिच्या मोठ्या आईवर खूप प्रेम करणारी.
तिसऱ्या वर्गातली पुजा आज खुप शांत शांत वाटत होती. नेहमीची बडबडी चांभारचौकशा करणारी पुजा आज कुठे हरवली ?
घरच्यांनाही प्रश्न होता .
छोट्याशा पुजाच्या डोक्यात मात्र गोंधळ माजला होता. कोणाला समजु न देता, ती कोपऱ्यात लपुन छपून रडून पण घेत होती .
कोणाला सांगावे ?कुणाला विचारावे?
पुजा संभ्रमात होती. आपल्या मनातला गोंधळ कोणाला कळला तर….
तिच्या इवल्याशा बुद्धीची कीव करून घरचे मोठे हसतीलही . याचा तिला संकोच वाटत होता.
तिला आज नव्यानेच एक गोष्ट कळाली होती.
त्याच गोष्टीचे राहुन राहून तिला दुःख वाटत होते.
ती जिला ‘ आई ‘ म्हणते , ती तिची सख्खी आई नव्हती.
जे बाबा तिचे लाड कौतुक करायचे , ते तिचे सख्खे बाबा नव्हते .
ही गोष्ट मान्य करणे तिला खुप जड जात होते .
तिचे आई-बाबा खरे तर तिचे काका-काकु होते .
काकु तिच्या सख्ख्या आई पेक्षा मोठी असल्याने पुजाचे मोठी भावंडे तिला मोठी आई म्हणायचे , म्हणुन बाकीचे ही तेच म्हणायचे , म्हणून पुजाला ती तिची ‘आई ‘नाही असे कधी वाटलेच नाही . इतकी पुजा काकुशी आईमय झाली होती.
तिला आश्चर्य वाटले की इतक्या दिवसात ही माझी आई नाही हे मला जाणवलं कसं नाही?
मोठ्या आईला मूलबाळ नव्हते . लहान्या जावेचे मुले तिने आपले मानले . स्वतःच्या मुलांसारखे सांभाळले. छोटी पुजा हे सगळे समजायला खुप लहान होती, म्हणूनच ही गोष्ट तिला उशीराने कळली होती . आणि तिला हे सांगावे, हे घरच्यांना कदाचित इतके महत्त्वाचे वाटले नसावे.
मुलांच मोठी आई समर्पित होऊन सगळं करायची.
मोठी आई दिसायला एकदम पिवळीधम्मक गोरी , उंचीला कमी पण कोणत्याही कामात कमी नव्हती.
पुजा आणि तिची बहीण पण गोऱ्या होत्या, मोठ्या आई सारख्या, म्हणुन तिनेच ठरवून टाकले होते की,
‘ आम्ही दोघी मोठ्या आईच्या ‘.
इतर कोणाला सांगतानाही मोठी आईच तिची आई आहे असे पुजा सांगायची.
नेहमी आनंदी हसतमुख राहायची मोठी आई.
आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते.
हीच कला पुजानी मोठ्या आई कडून घेतली.
ती असली की स्वयंपाक घराचा ताबा तिचाच असायचा. सगळ्यांच्या खाण्याच्या वेळा ,नाश्ता, जेवणे ,बाबा , काका ऑफिसमध्ये जायच्या आधी घरातले सगळे आवरणे याचे नियोजन ती बेमालूम करायची.
पारंपारिक पदार्थ तिनेच करावे आणि तिच्याच हातचे खावे . कोणतीही काम ती जीव ओतून करायची .मग ती घरातली जुनी तांब्या-पितळेची भांडी चमकवणे असो की सणावारांचा पुरणाचा स्वयंपाक असो.
तिला मिक्सर लावता येत नव्हते. ती पहाटे लवकर उठून पाटा-वरवंटा वर पुरण वाटायची. तिच्या हातची पुरणपोळी म्हणजे पुजाच काय सगळ्यांचाच वीक पॉईंट.
कोणतीही आई आपल्या पोटच्या मुलांपेक्षा जास्त दुसऱ्या कोणाच्या मुलांवर प्रेम क्वचितच करू शकते.
“आई उदरातून निघालेल्या मुलांएवढी माया कोणावरही करत नाही”….
अशी वाक्ये ऐकली की पुजावर भरभरून प्रेम करणारी मोठी आई तिच्या डोळ्यासमोर येई.
ही मुलं आपली नाहीत ही भावनाच मोठी आईच्या मनाला कधी शिवली नव्हती . म्हणूनच पुजा संभ्रमात होती आणि तिला ‘आई ‘ न म्हणे तिला जीवावर आले होते.नुसतेच आई समजणे आणि आई होणे यात फरक आहे पण मोठी आई पुजाची पुर्णपणे आई झाली होती .इतके समर्पण तिने घरासाठी मुलांसाठी दिलं होतं.
तिने पुजाला उदरातून नाही,ह्दयातून जन्म दिला होता.
यात पुजाच्या सख्या आईलाही तेवढेच श्रेय जाते. तिनेही मोठ्या जावेला आईपणाचे सुख मिळावे म्हणून इतके दिवस हे गुपित ठेवले होते.
चांगली नाती झाडासारखी असतात , सुरुवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते…. पण एकदा बहरली की आयुष्यभर कोणत्याही परिस्थितीत सावली देतात.
मोठ्या आईच्या झाडावर कधी मोहर आलाच नाही, तरीपण पुजाला तिच्या प्रेमाचे गोड फळे चाखायला मिळाली होती, ती कायम पुजाची सावली बनली.
मोठ्या आईच्या आठवणीत पुजा मनातल्या मनात हसली,
कौतुकाने, अभिमानाने, तृप्ततेने.
आज तिच्या मुलांना मोठ्या आईचे समर्पण सांगितले तर कदाचित् त्यांना विश्वास वाटणार नाही. पण हे सत्य आज सांगायचे हे पुजाने मनोमन ठरवले आणि मोठ्या आईच्या तसविरेपुढे नतमस्तक झाली.
आजही पुजा माहेरी जाते तेव्हा जुने घर आणि घरात राहणारी मोठी आई आणि तिचे समर्पण आठवत राहते आणि डोळे आपोआप पाझरायला लागतात.
मोहिनी राजे पाटनुरकर
खुप छान कथा
Thanks
❤️❤️
सुरेख
Khup chan relation 🌹🌹🌹