वरूण हा मनसोक्त आनंद घेणारा,श्रीमंत घरातला पण अति लाडाने बिघडलेला मुलगा.आई वडील दोघेही मोठे प्रसिद्ध व्यवसायिकांपैकी एक, पैशालाच महत्व असल्याने वरुणवर हवे तसे संस्कार नसतात.वरुण मन करेल तसे वागत असतो,पैशाच्या जोरावर गरिबांची तोंड बंद करणे,वाटेल तसे बोलणे अशा प्रकारचा उद्धट स्वभावाचा तो बनतो.कॉलेजला जाऊ लागल्यावर वाईट मित्रांची संगत,दारू, सिगारेट्स,कारमधून जाणे येणे,हातात नको तितका उडवायला पैसा.कॉलेजमध्ये आल्यापासून तो आणखीनच बेशिस्त होतो.कॉलेजमध्ये किती तरी वेळा उर्मठपणे तो बोलत असतो, कितीतरी मुलींना तो आपल्या जाळ्यात ओढून त्यांचा गैरफायदा घेत असतो,कधी कधी तर वरूण शिक्षकांनाच कॉलेजमधून काढण्याच्या धमक्या पैशाच्या बळावर देत असतो. शिक्षकांबद्दल आदरही त्याला नसतो.
वरुणच्या घराजवळच एक वस्ती असते. हातावर पोट भरणारी मोलमजुरी करून घर भगवणारी माणसे त्यात राहत असतात.एक दिवस वरुण असाच त्याच्या गॅलरीत सिगारेट फुंकत उभा असताना, त्याची नजर चंद्रीवर पडते.चंद्री ही मोलमजुराची मुलगी आईविना वाढलेली पोर,वडीलांनी तिला लहानाचे मोठे केलेले असते.चंद्री नावाप्रमाणेच दिसायला सुंदर. चंद्रासारखा गोल चेहरा,लांब सडक मऊ केस,गोरीपान आणि नाजूक.पायात वाजणारे पैंजण.तिला बघताच वरुण वाईट हेतूने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो.आपल्या जाळ्यात तिला तो ओढण्याचा प्रयत्न करत असतो,पण तीही धडाकेबाजच, हुशार असल्याने वरुण चांगला मुलगा नाही हे तिच्या लक्षात येते.चंद्री आपल्या जाळ्यात येत नाही,हे त्याला समजल्यानंतर हळूहळू तो चंद्रीच्या वडिलांनाच आपल्या जाळ्यात ओढतो.त्यांना कुठे पैशांची मदत कर,तर कुठे दारू पाजून दारूचे व्यसन लाव असे प्रकार करू लागतो.काही दिवस झाल्यानंतर तो चंद्रीच्या वडिलांजवळ चंद्रीबद्दल बोलायला लागतो. चंद्रीला खोटीच लग्नाची मागणी घालतो.इतक्या मोठया घरचा जावई होणार म्हंटल्यावर चंद्रीचे वडील मागचा पुढचा विचार न करता दारूच्या नशेतच या लग्नाला तयार होतात.साधी भोळी माणसे असतात लगेचच त्यांचा वरुणवर विश्वास बसतो.लग्नाला काही दिवस बाकी असताना वरुण चंद्रीच्या वडिलांना म्हणतो,”लग्न ठरले आहे,तर चंद्रीला मुंबईला खरेदीला घेऊन जातो.” असं म्हणून खोटं लग्नाचं ढोंग वरुण रचतो.चंद्री या लग्नाला मुळातच तयार नसते.पण वडिलांच्या हट्टापायी तयार होते.”खरेदीसाठी इतक्या लांब कशाला जायचे?,इथंच जवळच्या दुकानातून खरेदी करूयात असं ती वडिलांना सांगते?”, पण तीचे वडील तीचे काहीही न ऐकता तिला वरुणसोबत पाठवतात.
वरुण सकाळी लवकरच कार घेऊन चंद्रीला घ्यायला तिच्या घरी येतो.चंद्री शेवटपर्यंत त्याच्या बरोबर जायला तयार नसते. वडिलांच्या आग्रहामुळे ती तयार होते.गाडीमध्ये वरुणसोबत ती एकही शब्द बोलत नसते.हो आणि नाही हे सुद्धा फक्त मान हलवूनच सांगत असते.खंडाळ्याच्या पुढे त्यांची गाडी येते.जरा शांत,निर्मनुष्य असा रस्ता लागल्यावर थोडं जंगल असल्याचे बघून,वरुण गाडी थांबवतो. तशी इतक्या वेळ गप्प असणारी चंद्री त्याला विचारते, “गाडी का थांबावली?”तसा तो तिला खोटेच सांगतो,”गाडी बंद पडली आहे,मी बघतो,इथे कोणी गाडी रिपेर करून देतंय का?” तो खोटेच गाडीच्या बाहेर येऊन फोन केल्याचे नाटक करतो.फोन बंद करून गाडीत येतो व चंद्रीला म्हणतो,”गाडी रिपेर होण्यासाठी वेळ लागेल,तोपर्यंत आपण त्या डोंगरावरच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन येऊ.”मंदिरात जाण्यासाठी जंगलातून रस्ता असल्याचे ओळखून चंद्री नकार देते, “परंतु देवाला जायचंय त्यात घाबरण्यासारखं काय आहे?”असे म्हणून वरुण तिला घेऊन निघतो.थोडा वेळ चालल्यानंतर वरुण तहान लागल्याचे नाटक करतो.आणि चंद्रीला म्हणतो, “तु इथेच थांब, मी पाणी मिळते का बघतो.”पाण्याच्या शोधात वरुण जातो.थोड्या वेळेनंतर चंद्रीला कोणी तरी आल्याची चाहूल लागते.तिला वाटते वरूणच आला आहे.इतक्यात तिच्या समोर वरूण आणि वरूणचे मित्र दारूच्या नशेत येऊन उभे राहतात.तिला काही समजतच नाही वरुण एकटा होता.मग हे सगळे आले कुठून?सर्वजण दारू पिलेले असतात.आणि अर्वाच्य भाषेत बोलत असतात.दारूच्या नशेत ते तिच्या बरोबर बोलू लागतात आणि बोलता बोलता तिला स्पर्श करू लागतात.ती त्यांना विरोध करत असते पण ते तीच काही न ऐकता तिच्या जवळ जातात.ते सर्व मिळून तिच्यावर पाशवी अत्याचार करतात.इतके अमानुषपणे अत्याचार करतात,की त्याला विरोध करत असताना ते नाराधम तिचा जीव घेतात.ती मृत झालेली पाहून त्याच जंगलात एका झाडाखाली तिचा मृतदेह पुरतात.ते सर्वजण आपापल्या घरी जातात.पाशवी वृत्तीमुळे चंद्रीचा बळी जातो.चंद्रीच्या घरी बातमी पोहचते,पण चंद्री बेपत्ता असल्याची.वरुण खोटेच सांगतो “आम्ही खरेदी करत असताना चंद्री हरवली,तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही
.” पोलीस तपासाला सुरवात होते.महिन्यांमागे महिने संपतात. तिच्या घरचे रोज पोलिसांकडे जाऊन चौकशी करतात, परंतु कोणतेच धागे दोरे हाती लागत नाही. इकडे वरुण हा निर्दयी असतोच त्याचबरोबर राक्षसी वृतीचाही असतो.चंद्रीचा मृत्यू होऊन बरोबर अकरा महिने होतात.वरुणचे मौज,मजा,मस्ती चालूच असते.
एक दिवस वरूण त्याच्या मित्राच्या लग्नाला जातो.तिथे चंद्रीसारखीच दिसायला सुंदर असणारी मुलगी वरूणला भेटते.वरुण मधला राक्षस गेलेला नसतोच,त्या तरुणीला बघून त्याच्यातला राक्षस परत जागा होतो.तो त्या मुलीची सगळी माहिती काढून तिला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करतो. तिचे नाव जान्हवी असते.आधी मैत्री मग त्याची राक्षसी वृत्ती हा त्याचा खेळ.शेवटी ती मुलगीही वरुणच्या जाळ्यात अडकल्यानंतर मैत्रीचे रूपांतर खोट्या प्रेमात आणि मग तिच्या घरच्यांकडे परत लग्नाची खोटी मागणी घालून वरुण तिलाही बाहेर जाण्यासाठी तयार करतो.त्याला त्याच ठिकाणी जाणे सुरक्षित वाटते म्हणून तो त्याच ठिकाणी जान्हवीलाही घेऊन जाण्याचे ठरवतो.
जाताना वाटेत उन्हाळ्याचे दिवस असून देखील तुफान, वादळ, वारा, पाऊस,वीज अचानकच चालू होते.वरुण तशीच गाडी चालवत नेत असतो.मध्येच भले मोठे झाड त्यांच्या गाडीसमोर आडवे पडते.ते झाड वरुण खाली उतरून गाडी जाईल इतके बाजूला करतो आणि गाडी तिकडून पुढे नेतो.थोड पुढे गेल्यानंतर अचानक गाडीचे लाईटस फुटतात.अचानक फुटलेल्या लाईटसमुळे आणि वादळामुळे रस्ता दिसेनासा होतो.कसा बसा वरुण कधी खड्यातून तर कधी चढावरून गाडी खूप वेगाने नेत असतो.रस्त्याच्या दोन्ही बाजूला दऱ्या असतात. जानव्ही या सगळ्या प्रकारणे घाबरलेली असते.ती वरुणला सतत घरी जाण्याचा आग्रह करत असते,पण वरुण तिचे ऐकत नाही.शेवटी तो एका हॉटेलमध्ये थांबायचे ठरवतो.एक हॉटेल बघून ते तिथे थांबतात.
दुसरा दिवस उजाडतो रात्री उशीरा झोपल्याने उशीराच दोघांना जाग येते.वरुण आपल्या रूममधून जान्हवी उठली की नाही हे बघण्यासाठी तिच्या रूममध्ये येतो.ती उठून तयार असते.वरुण तिला म्हणतो की,”चल आपण बाहेर फिरून येऊयात” पण ती नकार देते व आपल्याच रूममध्ये बसून आराम करणार आहे,असे त्याला सांगते. वरुण तिच्या रूममधून बाहेर पडतो व आपल्या मित्रांना फोन लावून त्यांना तिकडे बोलावून घेतो.दुपारी जेवण करून पुन्हा वरुण जान्हवीला बाहेर जाण्याचा आग्रह करतो,पण ती तयार होत नाही.कालच्या वादळ वाऱ्याने तिची तब्येत बिघडते म्हणून ती रूममध्येच आराम करत असते. वरुणचे मित्र त्या हॉटेलमध्ये पोहचतात.जानव्हीला यातलं काहीच माहित नसते.वरुण आणि त्याचे मित्र पुन्हा प्लॅन करतात.जानव्हीबरोबर सुद्धा हे सर्व मिळून अत्याचार करणार असतात,ती त्यांच्या जाळ्यात सापडलेली असते.
रात्री जान्हवी आपल्या रूममध्ये झोपलेली असतना तिला जोरात ओरडण्याचा आवाज येतो.ती काय झाले हे बघण्यासाठी आवाज येतो त्या दिशेने जाते आणि तिला तिथे वरुणच्या मित्राचे प्रेत दिसते. त्या प्रेताचे हात तुटून एका बाजूला,धड एका बाजूला डोके एका बाजूला पडलेले आणि अंगावर सर्वत्र जखमा बघून ती मोठ्याने ओरडते.तिचा आवाज ऐकून वरुण व त्याचे मित्र तिथे पळत येतात. त्यांनाही हे बघून धक्काच बसतो.पोलीस,पंचनामा चालू होते. जान्हवी घाबरलेली असते जान्हवी या धक्याने अजूनच आजारी होते.वरुण व वरुणच्या मित्रांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवले जाते.जान्हवी जेवण औषध घेऊन झोपलेली असतानाच अचानक पाण्याच्या जोराने येणाऱ्या आवाजाने ती उठते.बाथरूमधला नळ आपोआप चालू होतो.जान्हवी उठून नळ बंद करायला जाते,तर बाथरूमध्ये सगळीकडे रक्तच रक्त तिला दिसते.तिला सगळं बघून अजून धक्का बसतो.तिला काहीच समजत नाही.परत येऊन ती बेडवर बसते हे सगळ काय घडत आहे, वरुणच्या मित्राचे असं कस झालं? आणि हे सगळे इथं कसे आले याचा ती विचार करत असताना तीला भिंतीवर उलट्या पायांचे चिखलाचे ठसे दिसतात.ती ते बघून किंचाळते. नक्कीच काहीतरी विचित्र आहे.हे तिला जाणवते. कोणाला फोन लावावा तर रेंजचा प्रॉब्लेम असतो.वरुण व तिचे मित्र येतात जानव्ही त्यांना हे सगळं सांगते. आणि परत घरी जाण्याचा सारखा आग्रह करते.ते तिथं बघायला जातात पण कसलीच चिन्ह तिथे नसतात.त्या रात्री वरुण आपल्या एका मित्राला शोधत असताना त्याचेही प्रेत त्याच पद्धतीत वरुणला दिसते.वरुणच्या अजून एका मित्राचा मृत्यू होतो. कोणाला काही समजत नाही.वरुण,वरुणचे इतर मित्र,जान्हवी अजूनच घाबरतात.परत पोलीस,पंचनामा हे चालू होते.एकामागून एक वरुणच्या मित्रांचे मृत्यू होतात एकाच प्रकारे.वरुण आणि जान्हवी खूप घाबरतात.
तिसऱ्या दिवशी मध्यरात्री.जान्हवी आपल्या रूममध्ये झोपलेली असताना तिला कसल्या तरी पैंजणाच्या आवाजाने जाग येते.ती उठून बसते, तर तिला पाठमोरी उभी असलेली,एक सुंदर गोरीपान, लांब केस असणारी मुलगी उभी असलेली दिसते. जान्हवी तिची विचारपूस करते,पण ती काहीच बोलत नाही.ती जायला निघते.जान्हवी देखील एखाद्या धुंदीत असल्यासारखे तिच्यामागे जायला लागते.चालत चालत त्या हॉटेलच्या बाहेर पोहचतात.चालत चालत जवळ असणाऱ्या जंगलात पोहचतात.ती मुलगी जिथं चंद्रीचा मृतदेह पुरलेला असतो.तिथेच बरोबर जाऊन थांबते.चालून चालून दमल्यामुळे जान्हवी तिथंच एका दगडावर बसते.ती मुलगीही थांबलेली असते.पण पाठमोरीच जान्हवी तिचा चेहरा बघण्याचा खूप प्रयत्न करते,पण तिचा चेहरा दिसत नाही.जानव्ही खूप वेळा विचारते तेव्हा ती मुलगी बोलू लागते
,”ती तिला सांगते आपण इथं थांबलो आहे,तिथं एक हत्या झालेली आहे”
,हे ऐकून जान्हवी, घाबरते आणि तिला म्हणते
पण तु कोण?आणि मला तु इथे का आणलेस?
या प्रश्नांची काहीच उत्तरे न देता ती मुलगी तिला सांगू लागते
वरुणने आणि त्याच्या मित्रांनी मिळून एका निष्पाप मुलीचा बळी घेतला
.”हे ऐकून तर जान्हवीला भोवळच येऊ लागते.ती मुलगी पुढे बोलू लागते,
“वरुणने त्या मुलीसोबत तुझ्या सारखीच लग्नाची तयारी दाखवली होती,पण सगळं खोटं नाटक त्याने रचले होते.त्या मुलीची घरची परिस्थिती गरीब असल्याने वरुणने याचाच फायदा घेतला,त्या मुलीच्या वडिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्या मुलीचा बळी घेतला.”
मध्येच तिला थांबवून जान्हवी त्या मुलीला म्हणते,
“पण तु कोण आहेस? “
तेव्हा ती मुलगी तिला सांगते,
“ज्या मुलीचा वरुण आणि त्याच्या मित्रांनी बळी घेतला.ती मुलगी मीच आहे,माझे नाव चंद्री.मला वरुणने फसवले आणि माझा जीव घेतला. त्याला वाटले तो या सगळ्यातून सुटेल पण नाही.मी त्याला सोडणार नाही.देवाच्या काठीला आवाज नसतो,पण ती जेव्हा एखाद्यावर पडते तेव्हा मोठंमोठ्यांचा आवाज बंद करते.मुली,स्त्रिया म्हणजे या असल्या माणसांच्या हातातले खेळण झालंय. ज्यांची गरीब परिस्थिती आहे अशा लोकांना तर यांना शिक्षा देणे शक्यच नसते.अशांना मृत्यूदंडापेक्षा दुसरी मोठी शिक्षा नाही.माझ्या वडिलांना माझ्याशिवाय या जगात कोणीच न्हवते, ते आज वेड्यासारखे माझी वाट बघत आहेत.वरुण तुला त्याच्या जाळ्यात अडकवतोय,हे मला समजताच मी तुला त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते,रस्त्यात वादळ वारा चालू केला,तुझ्या रूममध्ये तुला जे दिसत होते,तेही मीच घडवले कारण तु घाबरून सुखरूप तुझ्या घरी जावे यासाठी.त्यानंतर वरुणच्या मित्रांनासुद्धा मीच मारले त्यांना मारून माझा बदला पूर्ण केला,आता वरुण. वरुणला मी नाही सोडणार.तुला वरुणचे खरे रूप समजावे यासाठी मी तुला इथे घेऊन आले आहे. मी वरुणचा बळी घेऊन माझा बदला पूर्ण करणार आहे.त्याशिवाय माझा आत्मा मुक्त होणार नाही,तु इथून सुखरूप घरी जा.मी तुला काही करणार नाही,पण मी माझा बदला घेणारच”.
असं बोलून ती मुलगी जंगलाच्या दिशेने चालू लागते.जान्हवी तिच्याकडे विजेचा धक्का बसल्यासारखं एकटक बघत असते.ती मुलगी दिसेनाशी व्हायला लागल्यावर जान्हवी शुद्धीवर येते. ती तिथंच थांबून विचार करते. वरुणने एका निष्पाप मुलीला फसवून तिच्यावर केलेल्या अत्याचाराला माफी नाही.ती तशीच त्या अवस्थेत रूममध्ये जाते.वरुणचा तिला प्रचंड राग आलेला असतो. वरुण तिला विचारतो,
“तु कुठे होतीस?,मी तुला किती वेळ शोधत होतो.”
जान्हवी काहीही न बोलता बॅग भरते आणि घरी जायला निघते.ती रूम बाहेर पडते,तसा वरुण तिला थांबवण्यासाठी तिच्या मागे जाणार इतक्यात आपोआपच रूमचे दार लागले जाते.जान्हवी कुठेही न थांबता तडक घरी सुखरूप पोहचते.दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात जाहिरात येते.एका बड्या उद्योगपतीच्या मुलाचा मृत्यू.मृत्यूचे कारण अदयाप समजू शकले नाही तपास चालू आहे.जान्हवी मनातून चंद्रीचे आभार मानते.आज तिच्या आत्म्याने जान्हवी सुखरूप घरी आणले होते.चंद्रीने घेतलेल्या या बदल्यानंतर चंद्रीचा आत्मा ही मुक्त होतो.
चैत्राली भिलारे.
पुणे.
2/20/2021
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा










बापरे!
थरारक
🙏धन्यवाद प्रीती मॅडम 🙏
थरारक
🙏धन्यवाद ज्योती मॅडम 🙏
🙏
भयंकर कथा, गुन्हेगाराला अद्दल घडली पाहिजे
🙏धन्यवाद मोहिनी मॅडम 🙏खरंय अशा गुन्ह्यांना माफी नाही
Chan
🙏धन्यवाद स्मिता मॅडम 🙏
अप्रतिम 👌
🙏धन्यवाद मॅडम 🙏
🙏धन्यवाद मॅडम 🙏