गुढ चाफा—भयकथा
गुढ चाफा—भयकथा

गुढ चाफा—भयकथा

गुढ चाफा—भयकथा

सरकारी नोकरीत असलेल्या मानवला राहण्यासाठी मिळालेले घर गावापासून लांब अंतरावर होते.घर तसे जुनेच …चारी बाजूंनी शेती.. समोर भलेमोठे अंगण… अंगणात आंबा, चिकू ,व अनेक प्रकारच्या फुलांची झाडे.. तेथील चाफ्याच्या फुलांचे झाड तर दूरवर पसरलेल्या त्याच्या मनमोहक सुगंधाने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. बैठकीलाच लागून असलेल्या खिडकीतून बाहेरचा पूर्ण परीसर दिसत होता. उजव्या बाजूस बेडरूम,मागे स्वयंपाकघर, जिना,

घरात राहणारे तीनच सदस्य.. मानव,त्याची पत्नी दिशा व छोटी मुलगी स्वानंदी..

आणि त्यातही मानव त्याच्या ऑफीसच्या कामानिमित्त अधूनमधून रात्री-बेरात्री घराबाहेर रहात असल्याने..दिशा व स्वानंदी दोघीच घरी असत.

शेजारीपाजारी नवीन त्यामुळे सोबत बोलायला कोणी नाही..

घरातील कामे उरकता-उरकता तिचा दिवसभराचा वेळ तर निघे ..

पण रात्र फार मोठी वाटे..रात्रीची भयाण शांतता , निर्मनुष्य रस्ते..

आणि कुत्र्यांचे अधूनमधून भेसूर आवाजातील ओरडणे ..

ऐकून दिशाचा भीतीने थरकाप उडत असे.. एक दिवस मानव असाच नेहमीप्रमाणे बाहेरगावी गेला असताना…

अर्धी रात्र उलटली तरी झोप येत नसल्यामुळे बैठकीत बसून दिशा पुस्तक वाचत होती. तेव्हड्यात बाहेरील अंगणात कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला म्हणून तिने उठून खिडकीतून वाकून बाहेर पाहीले

तर त्यांच्या खिडकी पासूनच काही अंतरावर असलेल्या चाफ्याचा झाडाजवळ हातात बॅटरी घेऊन जाणाऱ्या आजी तिला दिसल्या.. आजीची नजर चालताना दिशावर पडली. तेव्हा वळून ती आजी दिशाकडे बघून हसली.. सुनसान ठिकाणी आजीला पाहून दिशाने आतूनच हात उंचावून आवाज दिला .आजी तिच्या आवाजाने खिडकीजवळ आली.आजीचा क्षीण चेहरा, भकास डोळे आणि कपाळावर ओघळणारे लालभडक कुंक पाहून दिशा क्षणभर गोंधळली.. तिला मनोमनी वाटले..आपण या आजीला हाक मारून काही चूक तर केली नाही ना?

मला आवाज दिला का?

आजी खिडकी जवळ उभ्या राहून विचारु लागल्या ..

हो ..मीच आवाज दिला.. इथे काय करत आहे एवढ्या रात्री .. आजी तुम्ही?

अग.. आम्ही शेतकरी लोकं शेतात राबणारे आम्हाला रात्र काय ?आणि दिवस काय?आमचा दिवस पहाटेच सुरू होतो.आता तीन वाजले पहाटेचे.. आणि तू का जागी?एवढ्या रात्री.. झोप नाही येत आहे काय?

तुम्ही कुठे रहाता आजी..

इथेच….चाफ्याकडे बघत आजी उत्तरली..

म्हणजे…

अग… म्हणजे तुझ्या घरामागे... आजी एकदमच म्हणाली,

हो का? मग थोडावेळ थांबता का इथे.. मला भीती वाटत आहे.

अग मी रात्रीची इथेच राखण करत असते. भिऊ नको निवांत झोप..

आजीचे बोलणे ऐकून दिशाला बरे वाटले… आणि ती झोपायला गेली. सकाळी गाढ झोपेतून जागी होताच.. आजीची आठवण झाल्यामुळे तिने खिडकीतून बाहेर पाहीले.. तर आजी तेथे नव्हत्या… कोण असतील? कुठुन आल्या असतील? कोठे रहात असतील? या विचारात असताना दिशाला त्याच आजी दाराबाहेर अंगण झाडून स्वच्छ करीत चाफ्याच्या झाडाजवळील कचरा उचलून टाकताना दिसल्या..

आजी तुम्ही हे काय करत आहे… दिशाने विचारले पण…

आजी उत्तरादाखल दिशाकडे बघून नुसती हसली.. चहाची वेळ झाली म्हणून दिशाने आजीला पण चहा दिला .. आजीने एका घोटात पटकन गरमागरम चहा संपवून कप-बशी धुवून स्वयंपाकघरात जागेवर नेवून ठेवली… लगेच सोफ्यावर पडलेले सर्व कपडेही व्यवस्थित घडी करून ठेवले. आजीचा हात अगदी यंत्रवत चालत होता. एकूणच आजीला स्वच्छतेसोबत कामाची खूपच आवड दिसत होती. परक्या घरात आजीला अगदी सहज वावरताना पाहून दिशाला नवल वाटले..

आजी स्वभावाने पण प्रेमळ वाटली.. हळूहळू दिशाला आजीबद्दल ओढ वाटू लागली..घरकामात आजीची तिला मदत मिळू लागली..आजीच्या सहवासात दिशाला आता करमू लागले.

तिची आणि आजीची हल्ली रोजच भेट होत होती. पण स्वानंदी का कोणास ठाऊक???आजीला पाहूनच घाबरत होती. आजीजवळ जात नव्हती… तेव्हा आजी हसून म्हणायची, अग..लहान पोर आहे ओळख नाही ना अजून माझी…

चाफ्याचे झाड तर आजीला खूप प्रिय त्या झाडाला त्या खूप जपत..चाफ्याजवळ जास्तीत..जास्त वेळ घालवत, त्याची काळजी घेत, तिथेच रमत.. आणि रोज स्वता:च्या हाताने ओंजळभर चाफ्याची फुले तोडून त्या दिशाला देत…दिशाचा आजीला चांगलाच लळा लागला होता. दिशाची आता शेजारच्या राऊत काकूंशी पण चांगली ओळख निर्माण झाली होती. काकू बऱ्याच वर्षापासून इथे रहात होत्या. पण आजीला दिशा त्यांच्या सोबत बोललेली मुळीच आवडत नसे.. दिशा रहात असलेल्या घरातील कोपरा न कोपरा आजीच्या ओळखीचा होता.आपुलकीने अगदी स्वता:चे घर असल्यासारखे आजी त्या घरात वावरायची.. घरा-दाराची निगा करायची..आजी नेहमी घरी यायची पण घरात मानव किंवा इतर कोणीही आले तर गायबच राहायची..आजीचे वागणे दिशाला आता कधी चमत्कारिक तर कधी भितीदायक वाटू लागले. त्यांना या भागात कोणी सुध्दा पाहीले नव्हते.. अगदी मानवने सुध्दा.. एक दिवस दिशा राऊतकाकूंशी दुपारी गप्पा मारत जुने फोटोचे अल्बम पाहत बसली असता एका फोटोवर दिशाची नजर खिळली..फोटो दिशाच्या घरातच काढलेला दिसत होता. फोटोमध्ये ती आजी तिच्या अंगावर तेच नववारी पातळ, कपाळावर तसेच लालभडक कुंकू,चेहऱ्यावर तेच हसू … आपल्याला रोज भेटणारी आजी…आपल्या घरात कशी? दिशा विचारात पडली….तिने तो फोटो राऊत काकूंना दाखवत त्या फोटोतील आजीविषयी विचारले.. तर त्या म्हणाल्या,

अग…ह्या कावेरीआजी …तू रहाते ना ..तिथे काही वर्षापूर्वी या रहात होत्या..ते घर यांचेच पोटी मुलबाळ नव्हते कावेरीआजीला… नवरा व्यसनी, मोठ्या कष्टाने कावेरीआजीने स्वतः चे घर उभारलेलं.. पण नवऱ्याने व्यसनापायी मातीत घातले.. घरावर सरकारने कर्ज झाले म्हणून जप्ती आणली.. आपले रहाते घर सरकारी ताब्यात गेलेले पाहून कावेरीआजीने हताश होत समोरच असलेल्या चाफ्याखाली स्वतःचा प्राण सोडला.. आज 20 वर्षे झाली.. त्यांना मरून..

राऊतकाकू बोलत होत्या….आणि दिशाला त्यांचे बोलणे ऐकून काहीच सुचत नव्हते..

कारण समोरच चाफ्याखाली त्या आजी हातातील ओंजळीत चाफ्याची फुले घेऊन तिच्याकडे बघून तिला बोलवित होत्या…..

 

सौ. दर्शना ओम भुरे…

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

7 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!