सुधाकरराव एका कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर असतात.
विमलबाई सुधाकरराव यांच्या पत्नी…
सुधाकररावांना दोन मुले आणि दोन मुलां नंतर सात वर्षाच्या अंतराने झालेली तिसरी मुलगी…..तिचे नाव नम्रता……नावाप्रमाणेच नम्रता “मनमिळावू थोरा-मोठ्यांचा आदर करणारी, सर्वांमधे मिळून-मिसळून राहणारी, तशी…मानसासोबत माणसे जोडणारी”.
आई-वडिलांची एकटीच असल्याने नम्रताला जी वस्तू हवी….जेव्हा हवी, तेव्हा मिळायची.
आता नम्रताचे शिक्षण पूर्ण झाले होते.
आई-वडिलांनी एक चांगला जोडीदार बघून नम्रताचे लग्न करून दिले.नम्रता तिच्या घरी सुखाचा संसार करू लागली.
एक दिवस सुधाकरराव नम्रताला फोनवर बोलत असतानां…. अचानक छातीत दुखल्यासारखे जाणवू लागले….. कासावीस होऊ लागले.
सर्वांगाला दरदरून घाम फुटला आणि घामाने ओलेचिंब झाले. घरातील सर्व लोक घाबरून गेले. विमलबाई,दोघे
मुले सुधाकररावांना दवाखान्यात घेवून जाण्याच्या घाईत असतानां… अचानक सुधाकरराव बेशुद्ध झाले.
……घाई-गडबडीने सर्वजण तसेच सुधाकररावांना दवाखान्यात घेऊन गेलेत….. सर्व घाबरलेले होते.
“काय झाले असावे”?.
कारण सुधाकरराव काहीच बोलत नव्हते. अजून शुद्धीवर आले नव्हते. तातडीने डॉक्टर ने सुधाकरराव यांची तपासणी केली…
पण… काय…!
छे छे ..!
सुधाकरराव राहिले नव्हते.
सुधाकरराव सर्वांना सोडून गेले होते. तिकडे नम्रताला ही बातमी कळताच, नम्रता स्वतःच्या पती आणि दोन मुली सोबत तातडीने माहेरी पोहोचली.
नम्रता सुधाकरावांची लाडकी मुलगी, खुप जीव होता नम्रता मध्ये. एकही दिवस असा नव्हता की, नम्रताला सुधाकरराव फोनवर बोलले नाहीत. पण सुधाकरराव यांच्या शेवटच्या क्षणी लाडकी नम्रता तिच्या दादांच्या सोबत नव्हती.
नम्रता सुधाकररावांना दादा म्हणत होती.
अंतिम संस्कार झालेत, सर्व पाहुणे आपापल्या घरी गेलेत…. पण नम्रता आणि नम्रता च्या दोन मुली मात्र
थांबल्या होत्या. नम्रताच्या छोट्या मुलीचे नाव निकी. निकी तेव्हा चार वर्षाची असावी.
सुधाकरराव गेल्याच्या चौथ्या दिवशी रात्री एक वाजताच्या सुमारास निकी अचानक उठून बसली आणि एकटीच बोलत होती.
निकी: या ना दादा. आत या ना दादा. तुम्ही दरवाज्यात का बर ऊभे आहात दादा? तुम्ही मध्ये का येत नाही?
आणि निकी नम्रताला झोपेतून उठवू लागली….
की दादा आले ऊठ… पण तिच्या दादाने तिला सांगितले.
दादा: नको उठवू तिला झोपू दे.
दोघेच गप्पा मारू लागलेत….दोघेच खेळू लागलेत. चार वर्षाची निकी एवढ्या रात्री एकटीच खेळु लागली. हसत होती…खेळत होती. खेळतानां निकीच्या पायातील पैंजणच्या आवाजाने विमलबाईला जाग आली. आणि… विमलबाई आश्चर्याने बघतच राहिल्या की, निकी एकटी घरभर खेळते आहे. दादा दादा म्हणून गप्पा मारते आहे…. थोडावेळ त्यांना काही लक्षातच आले नाही…की काय होते आहे हे.
विमलबाई ला वाटले निकीचा, खेळण्याचा मुड असेल…. म्हणून एकटीच खेळत असेल….
असेही घरात दुःखाचे वातावरण असल्याने लेकरांना मोकळ खेळायलाही भेटत नव्हते.दिवसभर भेटण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांची ये जा सुरू होती. पण हे काय आता तर निकी जमिनीवर नव्हती.
अधरच बसलेली दिसली आणि म्हणत होती टुक-टुक घोडा…. टुक-टुक घोडा… चल रे घोड्या टुणुक-टुणुक आणि जणू काही हातात दोर पकडलेला आहे. विमल बाईला निकी एकटेच दिसत होती. मग निकी अधर…कशी बसली आहे हवेत.
विमल बाईने निकीला आवाज दिला…..
निकी बेटा!
“कोण आहे.तुझ्यासोबत?”.
“कोणासोबत खेळतेस?”.
“कोणासोबत बोलतेस?”.
तितक्यात निकी बोलली,
“दादा आले होते. माझ्या सोबत खेळत होते. आजी तू आवाज दिलास आणि दादा गेलेत”.
विमलबाई इकडे-तिकडे विस्फारलेल्या नजरेने बघू लागल्या.
पण कोणीही दिसले नाही..आणि दोन मिनिटे शांत बसून.
निकी बाळा आता तू झोप खुप रात्र झाली आहे.
सुधाकरराव गेल्याच्या नवव्या दिवशी दुपारी.. नम्रता एकटीच बसलेली
असते.
अचानक….
नम्रताला खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास होतो.
दचकून नम्रता,
“हा ss… ”
“कोण?”.
इकडे तिकडे बघते.. आणि नम्रताच्या तोंडून उद्गार निघतात…
“दादा तुम्ही! तुम्ही कधी आलात?”.
सुधाकरराव नम्रताला लाडाने बाई म्हणायचे.
सुधाकरराव: बाई.. बस….
मला तुला काही सांगायचे आहे.
नम्रता: बोला ना दादा… काय बोलायचे तुम्हाला? सांगा
सुधाकरराव: बाईss अर्बन बँकेत पैसे आहेत. पण बाई घरामध्ये बॅंकेतील पैशाविषयी कोणालाही माहिती नाही. बँकेचे पासबुक माझ्या कुर्ता पायजमा च्या खाली ठेवलेले आहे. दोनच दिवसापूर्वी बँकेत टाकलेले….दिनु काकांनी परतलेले पैसे होते ते.
नम्रता: बरं दादा..
आणि क्षणातच दादा नम्रता समोरून अदृश्य होतात.नम्रता भिरभिरत्या नजरेने इकडे-तिकडे लगबगीने बघू लागते, पण.. दादा कुठे दिसतच नाही. पण दादांची तिला भीती वाटत नाही.
नम्रता दादाच्या सर्व विधी आटोपून मुलींसोबत स्वतःच्या घरी जाते.
पण….
“हे काय!”
निकी कधी घराच्या व्हरांड्यात, तर कधी घराच्या अंगणात एकटीच गप्पा मारतांना दिसू लागली. निकी एकटीच खेळतांना दिसू लागली.
नम्रताच्या सासु-सासर्यांना… नवर्याला आता काळजी वाटू लागली. तिला विचारले की,निकी बोलायची….
“दादा आले होते”.
एक दिवस नम्रता आणि नम्रताच्या घरातील सर्व मंडळी निकीला घेऊन बसतात आणि निकीला विचारतात की,
“निकी दादा तुला काय म्हणतात?”.
“काय बोलतात?”.
आम्हाला पण सांग ना! दादा मला खूप दिवस झालेत, बोललेच नाहीत. मला पण दादा- सोबत बोलावसं वाटते.
तू दादाला सांग ना…’बाईला पण बोला म्हणून’.
निकी: आई ss आईss दादा विचारतात, “की मी येऊ का?”
नम्रता: “प्रत्येक वेळेस विचारतात का बाळ?”.
निकी: हो आईss..!
आल्यावर विचारतात की,” मी येऊ का?”.
घरातील सर्व मंडळी आता विचारांत पडतात. क्षणभंगुर प्रश्नार्थक पण भीती-दर्शक भयाण शांतता पसरते
घरात.. .सर्वजण प्रश्नार्थक नजरेने एकमेकांकडे बघू लागतात.
तेवढ्यात…..!
नम्रता: “माझ्या दादांचा माझ्यावर खूप जीव होता. माझ्या दादाने जिवंत असतानां सुद्धा कोणाला त्रास दिला नाही. मेल्यावर सुद्धा माझे दादा कोणाला त्रास देणार नाहीत”.
नम्रता तशी समजदार मुलगी दादांची.
नम्रता: निकी बेटा… पुन्हा दादा तुला भेटायला आले आणि तुला विचारले की,” मी येऊ का?” तर निकी बाळा तू दादांना म्हणायचे कि, ”
हो दादा….या तुम्ही आमच्या घरी या”.
दुसऱ्या दिवशी दुपारी हॉल मध्ये निकी टिव्ही वर कार्टून बघत बसलेली असतांना, निकी परत एकटीच बोलू लागली.
“दादाss तुम्ही आले … आपण आता खूप खेळूया”.
दादा: निकीला म्हणतात की,” मी तुमच्याकडे येऊ का?”.
तितक्यात निकी ने सांगितल्या प्रमाणे
हो दादा, “तुम्ही आमच्या घरी या ना”.
आणि इकडे नम्रताच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले.
नम्रताची तब्येत अचानक बिघडते… नम्रताला दवाखान्यामध्ये तपासणीसाठी घेऊन जातात.
…… …… ……
डॉक्टर सांगतात की,” नम्रता गरोदर आहे..त्या क्षणी नम्रताच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागतात….”
हलकेच ति पोटावरून हात फिरवते आणि…एक जोराचा हुंदका काढते.
मुखातून एकच शब्द बाहेर पडतो..
“दादा….”.
.स्मिता औरंगाबादकर









