भूतकथा- ती आणि चिता
राजन आणि मयुरीचे लग्न होऊन महिनाच झाला होता.मयुरीचे आईवडील खेड्यात राहायचे.शेतीवर आणि खेड्यावर असणारे प्रेम त्यांना शहरात जाऊ देत नव्हते.
मयुरीचा भाऊ अजय नौकरी निमित्य शहरात राहायचा. मयुरीचे लग्न शहरात त्याच्या घरुन झाले.राजनने अजून मयुरीचे खेडे कृष्णापूर बघितले नव्हते.ह्या आठवड्यात शनिवार,रविवारला जोडून दोन सुट्ट्या आल्या.
राजनने मयुरीसोबत चार दिवस कृष्णापुरला जायचे ठरवले.त्याने सोबत त्याचा मित्र सागरलाही घेतले.अजयलाही यायला सांगितले.
राजन प्रथमच खेडे बघत होता.शुद्ध हवा,प्रशस्त घरे,घरापुढे अंगण,सगळीकडे झाडे….सगळे बघून खूप प्रसन्न वाटले त्याला.
कृष्णापूरला सिनेमाची टाँकीज नव्हती.बाजूला एक गाव होते.तिथे टुरींग टाॕकीज आली होती.अजय,राजन आणि सागर यांनी रात्री नऊ ते बाराचा शो बघायला जायचे ठरविले. अजयही कधी टुरींग टाॕकीजवर सिनेमा बघायला गेला नव्हता.
मयुरीचे बाबा श्रीधरराव म्हणाले,
एवढ्या रात्री नका जाऊ. परत यायला खूप उशीर होईल.अमावस्येची रात्र आहे.
पण राजनला जायचे होते.नवीन जावयाला कोण थांबवणार?
तिघेही सिनेमा बघायला गेले.
बरोबर बारा वाजता सिनेमा सुटला. अमावस्या असल्यामुळे सगळीकडे काळोख पसरला होता. टाॕर्चशिवाय काहीही दिसत नव्हते.
मध्ये एक आमराई लागायची. तिघेही तिथवर पोहचले.
राजनसाठी हे सगळे नवीनच होते. चालून चालून थकलेही होते तिघे.तो बोलला,
जरा वेळ थांबू यार इथे. थकलो.आंब्याच्या झाडाला आलेल्या मोहराचा मस्त सुगंध येतोय.हवा पण किती छान सुटली.
अजय,सागर,राजन तिघेही बसले झाडाखाली.
तेवढ्यात तिघांनाही जरा दूर चिता जळतांना दिसली.
शेतात चिता कशी काय या विचारात असतांनाच
कोणीतरी धावत चितेकडे जातांना दिसले,.सागरने टाॕर्चचा उजेड पाडला.एक पाठमोरी स्त्री धावत होती. अजय ओरडला,
अहो बाई एवढ्या रात्री कुठे निघालात? थांबा थांबा.
अजय तिच्या मागे धावला.
राजनने अजयला थांबवायचा प्रयत्न केला. पण त्याने ऐकले नाही. ती स्त्री धावत चितेजवळ गेली चितेजवळ पोहचताच तिने मागे वळून बघितले. चितेच्या उजेडात तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता.अतिशय देखणी आणि तरुण स्त्री होती. अजय समीप आल्याचे लक्षात येताच तिने क्षणार्धात चितेत उडी घेतली. अजयने तिला थांबवायला हात पुढे केला आणि …आणि तोही चितेत गायब झाला.
समोर काय घडत आहे हे समजण्याच्या आत सगळे घडून गेले होते.
आपल्या समोर एका स्त्रीने चितेत जीव दिला आणि अजय…..
राजन आणि सागर दोघेही वेड्यागत् समोर बघायला लागले. चितेपर्यंत जाऊया असा विचार करत दोघे दोन पाऊले पुढे आलेत.समोर बघितले.समोर चिता नव्हती,पूर्ण अंधार होता. आता मात्र दोघेही घाबरले.
अजsssय
अजsssय
त्यांनी जोरात अजयला आवाज दिले.पण अजयचा काहीही प्रतिसाद येत नव्हता.
आत्ता पाच मिनिटापूर्वी सोबत असलेला अजय कुठे गेला.
ती चिता,ती बाई कुठे गायब झाले?
दोघेही इथे नवीन होते.आधी घरी जाऊन हे सांगायला हवे असा विचार करुन ते घराकडे निघाले.
रस्त्याने अजय कुठे दिसतो का शोधत होते.
पण रस्त्यावर अंधाराशिवाय काहीही नव्हते.
तिथे अनोळखी असणारे हे दोघेही घाबरले होते. आंधार रातकिड्यांचा किर्र किर्र आवाज याशिवाय कशाचेही अस्तित्व तिथे नव्हते.
कसेतरी टाॕर्चच्या मंद प्रकाशात घरापर्यत पोहचले.
मयुरी,आईबाबा वाट बघत जागेच होते.
सागर आणि राजन दोघांनाच बघून बाबांनी विचारले,
जावईबापू अजय कुठे आहे?
आणि तुम्ही एवढे घाबरल्यासारखे का दिसता?
राजनने कसेतरी घडले सर्व सांगितले.
बाबा राजन,सागर आणि गावातील दोघातिघांना घेऊन आमराईच्या रस्त्याने निघाले.एव्हाना तांबडं फुटायला सुरुवात झाली होती.काळोख कमी झाला होता.
रस्त्याने चालता चालता श्रीधररावांना खूप वर्षापूर्वी स्वप्नात आलेली सुगंधा आठवत होती.
सुगंधा – शेतमजूर असणाऱ्या रामुकाकाची मुलगी.लग्नाआधी श्रीधर तिच्या सौंदर्यावर भाळले होते. वीस वर्षाचे श्रीधर आणि सतरा वर्षाची सुगंधा.
जमिनदार वडील गरीब सुगंधाशी लग्न करायला कधीही परवानगी देणार नाहीत ही जाणिव हे भाळणे कमी करत गेले.
वडीलांनी पसंत केलेल्या तोलामोलाच्या घराण्यातील महानंदेशी श्रीधररावांचे लग्न झाले.
श्रीधररावांना संसारात रमण्याशिवाय पर्याय नव्हता.त्यांच्या लग्नाला तीन महिने झाले आणि एक दिवस सुगंधाने आमराईतील विहीरीत जीव दिल्याची बातमी आली.
श्रीधरला वाईट वाटले.त्या दोघांशिवाय त्यांचे प्रेमप्रकरण कुणालाही माहीत नव्हते.
महानंदाला दिवस गेले.अजयचा जन्म झाला त्याचदिवशी श्रीधरच्या स्वप्नात सुगंधा आली.
श्रीधर तू अपराधी आहेस. माझा आणि माझ्या बाळाचा जीव तुझ्यामुळे गेला. तू मला सोडून महानंदेशी लग्न केले तेव्हा दिवस गेले होते मला. तुझ्या प्रेमाच्या मोहात पडून किती विश्वासाने स्वतःला तुझ्याहाती सोपवले होते मी. पण नंतर लग्न करतांना तुला आपल्यात असलेले अंतर आठवले. तुझे लग्न झाल्यावर लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा विहीर जवळ करावी लागली मला.
तू केलेली फसवणूक विसरणार नाही मी.
सुगंधाने माझ्या अजयला….
हा विचार येताच श्रीधररावांचा चेहरा पांढराफटक झाला.त्यांना दरदरुन घाम फुटला.
श्रीधरराव आणि सगळे आमराईत पोहचले.
चिता तिकडे होती असे म्हणत राजनने बोट दाखवले.श्रीधररावांनी
विहीरीत बघा
असे सांगितल्यावर सगळे विहीरीकडे धावले.
वर अजयचा निष्प्राण देह तरंगत होता….
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा