कुणी तरी आहे तिथं १  भयकथा
कुणी तरी आहे तिथं १ भयकथा

कुणी तरी आहे तिथं १ भयकथा

ही पूर्णपणे एक काल्पनिक भयकथा आहे.तरी वाचकांनी एक मनोरंजन म्हणून वाचावी..कथेतील पात्रांची नावे व घटनाही काल्पनिक आहे..तरी वास्तवात याचा संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग राहिल..
वाचकहो हि माझी भयकथा लिहिण्याची पहिली वहिली वेळ आणि प्रयत्नही !.
या कथेतून अंधश्रध्देचा प्रसार करण्याचा माझा जराही उद्देश्य नाही.काही चुकल्यास आपल्या सूचनांचे स्वागत राहील …...

उन्हाळ्याचे दिवस होते …….
संध्याकाळी गरम हवेच्या वाफा जाणवत होत्या.परंतु पौर्णिमा असल्यामुळे एक आल्हाददायक वातावरण निर्माण झाले होते..आकाशाने पांघरलेल्या अंधारमय चांदण्यांच्या चादरीवर तो पौर्णिमेचा पूर्ण चंद्र ठळक उठून दिसत होता..त्याचा त्या शितल प्रकाशाखाली बसण्याचा मोह आम्हाला आवरता नाही आला . म्हणून आम्ही सर्वजणांनी मस्तपैकी गच्चीवर जाऊन बसण्याचा प्लॕन केला. वाड्यात माझे दोन भाऊ दोन वहिन्या, त्यांची मुले आणि माझी मुलगी……

आमचा वाडा तसा खूप मोठा.रेल्वेची डब्बे जसे एकामागे एक असावे त्याप्रमाणे आमच्या घरातील खोल्या.ते म्हणतात न् दोन घास सुखाचे व शेजार चांगला असावा..अगदी तसाच शेजार आम्हाला मिळाला होता.उजवीकडून कुळकर्णी काकांचे घर होते.काका तर सज्जन होतेच पण कुटूंबातील सर्वजण सुशिक्षितही होते.पण डावीकडून मात्र जो शेजार होता..म्हणजे जे घर होते ती एकच भव्य बिल्डिंग होती.पण ती बिल्डिंग निर्जीव होती..म्हणजे गेल्या सहा ते आठ वर्षीपासून तिथं कोणी राहत नव्हते.. ती बंद..निस्तेज..अंधाराने आच्छादलेली होती.अगदी दिवसाही कोणालाही भयभीत करण्यास भाग पाडेल असं चित्रविचित्र रूप होत त्या बिल्डिंगच.सर्वत्र धूळ,नको तिकडे आपसूकच वाढलेली झाडे,वेली,,भिंतीवर पावसाळ्यतील ओलाव्यामुळे वाढलेले शेवाळ,थोडीफार बूरशी लागलेली ,मधनूच कुबट वास यायचा.आमच्या घरी कुणीही पाहूणा किंवा बाहेरचा व्यक्ति आला कि एकच प्रश्न करायचा….तुम्हाला भिती नाही वाटत ह्या जागेची ……?
पण आम्हाला सवय झाली होती.कारण आमचं घर माझ्या वडिलांनी खूप कष्टाने उभे केले होते..ते नेहमी म्हणत कि

ही वास्तू खूप चांगली आहे.हिला कधीच अंतर देऊ नका ….म्हणजे ही वास्तू सोडून दुसरीकडे राहायला जाऊ नका….

.बस्स… वडिलांचा ह्या शब्दांचा आधार व विश्वासावर आम्ही इथं सर्वजण मजेत नांदतोय.

मी सर्वदा व माझी मुलगी पालवी सोबत माझा मोठा दादा प्रमोद व वहिनी प्रज्ञा त्यांना दोन मूले मोठा मयंक व धाकटा मानव ,,लहान भाऊ विनोद व विनिता ह्यांचा एकच मुलगा श्लोक…असे आम्ही एकूण नऊ लोकांनी हे घर भरलेले….अर्थात मुलांनी व त्यांच्या कलकल करण्याने ह्या घराला खरं घरपण आले होते.आणि म्हणूनच आमच्याच घरातल्या गोंधळामुळे शेजारच्या या बंद बिल्डिंगचे अस्तित्व असूनही आम्हाला जाणवायचे नाही.

मुलांनी केलेल्या प्लँन प्रमाणे प्रत्येकाने भेळपार्टीचे सामान गच्चीवर नेले..गच्चीवर जाण्यासाठीचा जिना मात्र हा बाहेरून होता. प्रत्येकाने एक एक सामान हातात घेऊन गच्चीकडे मोर्चा वळवला…..
मुलांसोबत प्रमोद दादा व विनोद भाऊ पुढे गेले..मुलं खूप खूश होती…..कारण आम्ही सर्वजण असे गच्चीवर एकत्र खूप दिवसांनी जमणार होतो.
मी आणि दोन्ही वहिन्या मिळून भेळसाठी लागणारे पुदिना चटणी,चिंचेचे पाणी खालूनच तयार करून वर नेण्याचे ठरवले….
वर गच्चीवर भेळपार्टी सोबत गप्पा रंगणार ..मग उशीर हा होणारच पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात बसायचे आहे म्हणून प्रज्ञा वहिनीने बाहेरची लाईटे बंद केली व खाली घराला कुलूप लावले…
सर्व मँनेज करत करत एव्हाना बराच काळोख झाला होता..म्हणजे साडेसात वाजून गेलेत आम्हाला गच्चीवर जात.

वाड्यात अंधार झाल्याने विनिता वहिनीने वर जाण्यास टाँर्च घेतला..घरात तशी मी खूप घाबरट..मला रात्री खिडक्या जरी उघड्या ठेवल्या तरी अर्धी रात्र माझी घाबरण्यात जाते…म्हणून दोन्ही वहिन्यांना रिक्वेस्ट करत मला आधी चढू द्या मग तुम्ही मागावून या..असे म्हणत मी गच्चीवर चढले……आमची गच्ची पण घराप्रमाणेच ऐसपैस…चारही बाजूंनी कठड्यांनी बंदिस्त केलेली.आम्ही गच्चीवर पोहचतोच तोपर्यंत दादा व विनोद ने छानपैकी मँट टाकून ठेवली होती. दोघं भाऊ मँटवर लोळत आपापल्या मोबाईल मध्ये मग्न होते…सर्व मुलं एका बाजूला खेळत होती.
हवेत मस्त गारवा जाणवत होता…खाली वाड्यात होणारा उकाड्यातून वर आल्यावर थोडं फ्रेश वाटत होते.

आमची भेळची तयारी होतेच इतक्यात मयंकला पिण्याच्या पाण्याची आठवण झाली….
मयंक— अरेच्चा, आपण पिण्याचे पाणी आणायचे तर विसरूनच गेलो…
विनोद -हो…..रे…..ते तर लागेलच कि..
प्रमोद – काहीही काळजी करू नका..मी आता जातो खाली आणि पिण्यचा पाण्याचा जार घेऊन येतो….आलोच लगेच..
प्रमोद दादा उठणार इतक्यात मयंकही म्हणतो
मयंक-बाबा चला मी येतो तुमच्या सोबत..
प्रमोद – अरे..एवढे दोन जण कशाला लागताय एक पाण्याचा जार आणण्यासाठी..? तू थांब इथेच मी घेऊन येतो….आणि मयंक बाळ खाली वाड्यात अंधार आहे..तू उगाच घाबरलास तर……?
मयंक-बस का बाबा ..म्हणजे मी काय इतका भित्रा वाटला की काय तुम्हाला ? मला नाही हो वाटत कशाची भीती वैगेरे..आणि अंधाराशी काय भ्यायचे ?
प्रज्ञा -अहो,तो इतकं म्हणतोच आहे तर घेऊन जा कि सोबत त्याला …..
प्रमोद– बरं..बाबा..
चल…..
मयंक आणि प्रमोद दादा खाली जातात…दादा घराचे कुलूप उघडून आतून पाण्याचा जार घेऊन बाहेर येतो…..
प्रमोद – चल ..जाऊया वरती..हा बघ घेतला जार…….
दोघेही गच्चीवर जाणार तेवढ्यात मयंक टाँयलेटसाठी जायचे विचारतो..
मयंक -बाबा तुम्ही व्हा पुढे गच्चीवर मी येतोच टाँयलेट ला जाऊन..
प्रमोद -नाही रे मी तुला असा एकट्याला टाकून नाही जाणार…..तू जाऊन ये बघू ..मी थांबतो इथेच…..जा…..
मयंक – बाबा ..असे हो काय करता?मी काय लहान आहे का आता ? माझं ऐका जा तुम्ही गच्चीवर मी आलोच पाच मिनटात.
प्रमोद -नाही रे…मी थांबतो.. तू जाऊन ये..एकतर वाड्यात बघ किती काळोख आहे..आणि त्यात हे स्ट्रिट लाईट्स् देखील बंद आहे त्यामुळे अजूनच जास्त अंधार वाटतोय बघ….ते काही नाही तू जाऊन ये मी थांबतो तूझ्यासाठी…..
मयंक– ( आता मात्र रागावून ) बाबा ..मी खूप धीट मुलगा आहे….मला नाही हो कशाची भीती वाटत..तुम्ही जा गच्चीवर सर्व जण पाण्याचीही वाट बघत असतील…।।
प्रमोद -Ok …ये मग लवकर वरती….
प्रमोद इकडे गच्चीवर यायला निघतो .तिकडे मयंक टाँयलेट मधे जातो….

टाँयलेट मध्ये जाण्याअगोदर मयंकची नजर शेजारच्या ओसाड ,अंधारलेल्या बंद बिल्डिंग वर पडते…तो स्वतःशीच पुटपुटतो…
कसलं हे चित्रविचित्र रुप दिसतय ह्या बिल्डिंगचं! हिच्यावर दिवसा सूर्यप्रकाश पडल्याने थोडी तरी बरी दिसते ..पण ही बिल्डिंग रात्री पहिल्यांदाच अशी बघायला मिळते आहे….
मयंक टाँयलेट मधे जातो…..
आतमध्ये गरम होण्याऐवजी मयंकला थंड वाऱ्याची झूळूक दरवाजाच्या फटीतून आलेली जाणवली….
त्याला वाटले बाहेर थंड हवा सुटली असेल…
इतक्यात त्याला शूक शूक असा आवाज कानावर पडला…मयंकने सुरूवातीला दुर्लक्ष केले..पण पुन्हा तोच शूक शूक आवाज जरा जास्त जोरात ऐकू आला….त्याला वाटले हा कदाचित त्याला भास होत असेल.पण लगेच तेवढ्यात तोच शूक शूक आवाज थोडा लांब सुरात येऊ लागला.त्या सोबत कुणीतरी टाळ्या वाजवत आहे असा टाळ्यांचा ..व टाळ्या वाजतांना होणाऱ्या बांगड्यांचा आवाजही त्याला ऐकू येऊ लागला.आता मात्र त्याला काय करावे हे सूचत नव्हते..थोड्यावेळापूर्वी अनुभवलेली थंड वाऱ्याची झूळूक कधीच त्या दरवाजाच्या फटीतून आत शिरत त्याला छेदत पलिकडे निघून गेल्यासारखी त्याला वाटली…..तो शूकशूक आवाज ,टाळ्या आणि बांगड्यांचा आवाज त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला जाणवत होते..तसा मयंकला दरदरून घाम फुटला..त्याचे शरीर थंड पडले….कधी न घाबरणारा मयंक आता मात्र पूर्णपणे गळून पडला….पण मोठ्या हिंमतीने चाचपडतच त्याने टाँयलेटच्या खिडकीतून बाहेर झाकले आणि आवाज नेमका कुठून येतो आहे…त्या दिशेने त्याची नजर शोध घेऊ लागली…..वाडा अंधारलेला त्यात हे सर्व आवाज एकत्रितपणे त्याच्या कानावर इतक्या जोरात पडत होते…आता मयंकने दोन्ही कानावर आपले हात ठेवले जेणे करून तो विचित्र आणि कर्रकश्श् आवाज ऐकू येणे तरी बंद होईल….त्याचा भीतीने थरकाप व्हायला लागला.पाय लटलट करायला लागले…तसाच तो पुन्हा खाली बसला….

हळूहळू त्याने आपल्या कानावरील हात काढले हे बघण्यासाठी कि त्याला ऐकू येणारे आवाज गेले कि आहेत..पण जेव्हा त्याने कानावरून हात काढले.आता बाकीचे आवाज थांबले होते…मात्र कुणीतरी पायात घुंघरू घालून त्याच्या दिशेने येत आहे असे त्याला वाटत होते…..

आता मात्र मयंक …कुणीतरी आहे तिथं...ह्या विचाराने पूर्ण घाबरला होता …

 

क्रमश:

भाग 2 ची लिंक

https://marathi.shabdaparna.in/भयकथा-कुणीतरी-आहे-तिथं

पोर्णिमा शिंपी

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!