मैत्री कथा
घरी नव्याच्या लग्नाची धावपळ सुरु होती.
तिचे बाबा…सुधीरराव (नव्या चे वडील) लग्नाच्या तयारीत कुठलीही कमतरता ठेवायला तयार नव्हते. एकुलत्या एक लेकीला मनासारखा जावई मिळाला होता. त्या खुशीत त्यांची धावपळ सुरु होती. जवळपास लग्नाची सगळी कामे आटपत आली…फक्त लोकांना निमंत्रित करण्याचे काम उरले होते. सुधिररावांनी पत्रिकेचा गठ्ठा टेबलवर ठेवला आणि त्या कामाची जबाबदारी नव्यावर सोपवली…
नव्या बेटा पत्रिकेच्या गठ्ठया
सोबतच निमंत्रितांची यादी ठेवलेली आहे. बेटा तेवढे सर्व तपासून नाव नोंदणी करते न बाळं.
हो बाबा..म्हणून नव्या निमंत्रितांची यादी टेबलावरून उचलते आणि यादी मधिल नावे वाचता-वाचता त्या यादीत विणाच्या नावावर बोट थांबले…आणि नव्याच्या भूतकाळातील आठवणी फेर धरू लागतात.
नव्या कॉलेजला जाण्यासाठी तयार होवून आली…
अगं विणा किती वेळ अजून चल ना यारss उशीर होतोय…
नव्या आलेच यारss टिफीन भरते आहे.
हुश्श! आली तू एकदाची. चल लवकर वेळ होतोय.
नव्या आणि विणा दोघीही अभ्यासात खूप हुशार….नव्याला सायंन्टिस्ट म्हणून भविष्य घडवायचे होते…तर विणाच्या जीवनाचे उद्दिष्ट शैक्षणिक क्षेत्रात काम करणे हे होते.दोघींची मैत्री काॅलेजमधे सगळ्यांना
माहित होती.
नेहमी दोघींकडून एकमेकींच्या आवडी-निवडींची जपवणुक होई, दोघीही एकमेकींच्या आवडीचे पदार्थ टिफीनमध्ये आणत, अभ्यास करतांना आलेल्या अडचणी मिळून सोडवत, खेळपण सोबत एन्जाॅय करत, सुख-दुःखात सोबतच असायच्या.
दोघीही दिवस-रात्र सोबत राहत…त्यामुळे नव्याला आणि विणाला एकमेकींच्या सोबतीची खूप सवय झाली होती.
अचानक विणाच्या निदर्शनास आले की, नव्याचे अभ्यासातील लक्ष कमी होत आहे. पण नव्याच्या जीवनाचे उद्दिष्ट सायंन्टिस्ट होणे हे आहे मग नव्याला अभ्यासही तसाच करावा लागेल न !.
आता विणा नव्याच्या सोबतीला टाळा-टाळ करू लागली. नव्या खेळतांना पण… विणा सहभागी होणे टाळायची. अभ्यास पण विणा स्वतः एकटी करू लागली.
पण मैत्रीच्या या अखंड विश्वात रमलेली नव्या मैत्रीत आंधळी झाली होती.
एक दिवस कॉलेज ग्राउंड वर खेळत असतांना…
अगं विणा तो चेंडू तुझ्याकडे आला आहे तो मला देना please.
यार विणा नुसते बघतेस काय ग…अगं फेक ना तो चेंडू तुझ्याकडे आलेला.
नव्याची काही चूक नसूनही विणा नव्यावर खूप जोरात ओरडली…
अगं नव्या हे काय तुझे…
” विणा असेच कर… विणा तसेच कर… विणा तू हे का केलेस?. विणा तू ते का केलेस?”.
तुझ्या म्हणण्या प्रमाणे सर्व कसे होणार. मला पण माझे आयुष्य आहे.
मलाही माझ्या काही इच्छा आहेत. आणि प्रत्येक वेळी मीच का तुझी मदत करावी?. आणि सतत तुझे काहीतरी सुरू असते.
अगं विणा मी तर फक्त तुझ्याकडे आलेला चेंडू मागितला. तू एवढी का रागावतेस यार?.
काही चुकले का माझे, “आय एम सॉरी डिअर”.
पण…विणा तू नेहमी माझी जपवणुक करणारी आज अशी का वागतेयस यार?. तुझी तब्येत ठीक आहे ना?.
म्हणता-म्हणता नव्याच्या डोळ्यात पाणी आले.
नव्या प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत असावे का?.
“मला माझे आयुष्य जगू दे. तू तुझे तुला हवे तसे जग”.
अगं विणा काय झाले यार तुला आज असे म्हणत..
.नव्या एखाद्या दगडाच्या मूर्तीसारखी उभी राहून विणाकडे बघू लागली.
विणा रागारागाने तिथून निघून गेली.
विणा खूप काही बोलली होती आज नव्याला.
“अशी ध्येयहीन मैत्रीन नको मला”.
विणाचे एक-एक शब्द नव्याच्या हृदयाला वेदना होतील असेच होते. नव्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.
नव्या पाणावलेल्या नजरेने…विणा दिसेनाशी होईपर्यंत बघू लागली.
नव्या रडत-रडत घरी गेली. कोपऱ्यात बसून ढसा-ढसा रडू लागली आणि रडत-रडत तशीच न जेवता झोपी गेली.
सकाळी नव्या झोपेतुन उठली आणि “अशी ध्येयहीन मैत्रिण नको मला”
हे वाक्य सारखे नव्याला आठवू लागले. नव्या आज एकटीच कॉलेजला गेली होती. सोबत टिफिनही घेतला नव्हता.
नव्याच्या स्वाभिमानी नजरेने विणाला कॉलेजमध्ये शोधले देखील नाही.
कालांतराने नव्याने सायंटिस्ट चे एज्युकेशन घेण्यासाठीच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि विणाने शैक्षणिक क्षेत्रासाठीच्या आवश्यक तरतुदी पूर्ण केल्यात.
पण नव्याला,
“अशी ध्येयहीन मैत्रीण नको मला”.
हे वाक्य स्वस्थ बसू देत नव्हते.
नव्याच्या स्वाभिमानाने विणापेक्षा जास्त यशस्वी होण्याचा निर्धार केला .
नव्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नव्याने प्राण पणाला लावून दिवस-रात्र अहोरात्र मेहनत करून अभ्यास करू लागली.
नव्या…खूप जास्त मार्क घेऊन एव्हाना शास्त्रज्ञ झाली आणि शास्त्रज्ञ होण्याचा जो निर्धार नव्याचा होता तो पूर्ण झाल्याने यशस्वी झाल्याची खुशी नव्याच्या चेहर्यावर उमटून दिसू लागली.
नव्याचे करिअर यशस्वी झाले.
आता..नव्याला शोभेल अश्या एका योग्य स्थळाबद्दल नव्या चे आई-वडिल नव्यासोबत बोलले
. नव्याला सुशान्त आयुष्याचा जोडीदार म्हणून आवडला.
सुशान्त व नव्याने आयुष्याची गाडी दोघांनी सह-मताने ओढण्याचा निर्णय घेतला.
“अशी ध्येयहीन मैत्रीण नको मला”,
हे वाक्यं नव्याच्या मनातील वेदना वाढवतच होत्या.
तितक्यात…!
नव्याबेटा तपासून झाले न… सर्व यादी बरोबर आहे न.
सुधिररावांच हे वाक्यं कानावर पडताच नव्या भानावर आली”.
आणि…!!!
हो बाबा…बरोबर आहे सर्व.
लग्नाचे निमंत्रण देण्याच्या निमित्ताने नव्या… विणाच्या घरी गेली.
विणाच्या आईने नव्याचे स्वागत केले.
विणा तिच्या रूम मध्ये आहे का काकू?.
मी रूम मध्ये जाते आणि तिला सरप्राईज देते.
नव्या बेटा… विणा बाहेर गेली आहे. मी तिला फोन लावते.
नको काकू मी विणाची वाट बघेल.
नव्या…विणाच्या रूम मध्ये गेली इकडे-तिकडे नजर फिरवून विणाची रूम बघु लागली.
रूम स्वच्छ दिसत होती रूम मधील सर्व सामान निट-नेटके ठेवलेले होते. होतीच मुळात विणा स्वच्छताप्रिय… शिस्तप्रिय. समोरच भिंतीवर एक फोटो लावलेला होता.
भिंतीवरचा फोटो बघून नव्या मनातच बोलली की,
“अभी-अभी एक लम्हा गुजर गया और वो लम्हा मुझे पुराणी यादों में ले गया”.
नव्या आणि विणा समुद्र किनारी बीच वर गेलेल्या… बीचवर खूप वेळ समुद्राच्या पाण्यात खेळल्या…
दमून समुद्राच्या काठावर निवांत बसल्या.
आपली मैत्री किती छान आहे विणा.
हो ना यार नव्या…”युनिक आहे”.
हमारी फ्रेंडशिप के नाम, असे म्हणत नव्याने समुद्रकाठच्या वाळूवर “नव्या” नाव बोटाने कोरले… खाली “बेस्ट फ्रेंड” असे लिहिले…त्याखाली विणाने स्वतःच्या बोटाने “विणा” नाव वाळूवर कोरले.
दोघींनीही स्वतः च्या मोबाईल मध्ये फोटो घेतला होता.
तोच फोटो भिंतीवर फ्रेम करून लावला होता आणि त्यावर लिहिले होते,
जपलेली मैत्री
नव्या त्या फोटोकडे एकटक मूर्तीमंत होऊन बघू लागली. नव्याचे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नव्याला त्या वर्षातील सर्व जुन्या गोष्टी आठवू लागल्या आणि एका मागून एक… सर्व आठवणींचा प्रवास नजरेसमोर फेर धरू लागला. नव्या खूप रडू लागली. मनातील राग अश्रुंसोबत कधीच वाहून गेला.
टेबलवर पत्र ठेवलेले दिसले. कदाचित विणाला…नव्याची आठवण आली की, विणा पत्र लिहीत असावी. त्यावर तारीख लिहिलेली होती त्यात सर्वात वर “ज्या दिवशी दोघी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या होत्या ना त्या दिवशीचा प्रसंग लिहिलेला होता.
“माझी लाडकी नव्या”,
आज मी तुला खूप कठोर बोलले ग.. एवढे कठोर बोलतांना माझ्या मनाला किती त्रास होत होता तो मलाच माहिती ग.. एकेक शब्द एक-एक घाव दिल्यासारखा वाटत होता. पण नव्या माझी खूप सवय झाली होती ग तुला. आपल्या मैत्रीत तू एवढी गुंतली होती की, तू खूप हुशार असूनही तुझे अभ्यासातले लक्ष कमी झाले होते. आणि प्रत्येक वेळी तुला माझ्या आधाराची गरज भासू लागली. परिणामी तुझे जीवनाचे ध्येय तू पार विसरून गेली होतीस. आणि मला तुझे उद्दिष्ट पूर्ण झालेले बघायचे होते. म्हणून मी कठोरपणे वागले तुझ्यासोबत.
शिंपल्याच्या कठोर आवरणासारखे रुक्ष वागले मी.कारण माझ्या मैत्रीणीला मोती बनलेले मला बघायचे होते,
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नव्या… विणा च्या रूम मधून बाहेर आली वीणाच्या आईने दरवाजा उघडला होता. समोर एक परिपक्व, तेजस्वी…विणा समोर उभी होती. तिच्या चेहऱ्यामागचे नि:स्वार्थ प्रेम आणि आपलेपणा नव्याला जाणवला. विणाच्या चेहऱ्यावरचे तेज पवित्रतेची पावती देत होते.
विणा आत येताच नव्याने विणाला घट्ट मिठी मारली आणि रडक्या थरथरत्या आवाजात नव्या उदगारली
मैत्री तर तूच जपली.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा









सुंदर
एकतरी मैत्रीण जरुरी असते.
खूप छान कथा
सुंदर लिहिले
सुंदर …
सुरेख
Waahg
अशी एखादी मैत्रीण सगळ्यांना असावी.
छान कथा
वाह…
Thanks all 🙏🏻